नवीन वर्षाचा संकल्प करा आरोग्यासाठी या सवयी लावण्याचा

नवीन वर्षाचा संकल्प

आज २१ व्या शतकात सर्व संपत्तीच्या मागे धाव घेत आहेत. आरोग्यास दुय्यम स्थान दिले जाते.

“माणुस आज सवयींचा गुलाम झाला आहे”…. आरोग्यप्राप्तीसाठी एखादी सवय सोडा म्हटले तर रुग्ण तो डाॅक्टर सोडतो.

एखादी सवय सोडल्याने विना औषधी आजार बरा होईल असे सांगितले तर काही जण, “पण हे काही आपल्याच्याने जमायचे नाही” असे म्हणतात.

एखाद्या व्यसनाप्रमाणे आज माणूस वाईट सवयीत पुरता अडकून गेलाय.

“जान जाए पर वचन न जाए” या म्हणी प्रमाणे “जान जाए पर आदत न जाए” असे जणू काही अभिमानाने मिरवल्याप्रमाणे काही जणांची बाॅडी लॅंग्वेज झाली आहे.

मोडेन पण बदलणार नाही, अशा वागणूकीने आपण स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारत आहोत हे सुद्धा कसे यांना कळत नाही.

लोकहो खास लोकाग्रहास्तव मी आज आपल्यासमोर इंग्रजी नवीन वर्षासाठी काय संकल्प करावा जेणेकरुन आपली नय्या सुखरुप पार होईल ते थोडक्यात मांडणार आहे.

सर्वप्रथम रोज लवकर झोपायला सुरुवात करा. हे मी रात्रीच्या झोपेबद्दल बोलतोय बरं का! नाहीतर काही झोपप्रेमी झोपायलाच टपलेले असतात, म्हणून सविस्तर सांगितलेले बरे.

फक्त सकाळी उशीरा उठा म्हटले तर, रात्री उशीरा झोपायची सवय तशीच ठेवल्याने, बर्‍याच जणांचा संकल्प निवडणुकीतल्या जाहिरनाम्याप्रमाणे कागदावरचं रेंगाळतो. म्हणूनच प्रथम झोपेची सेटिंग लावावी म्हटलं.

रात्रीच्या झोपेची वेळ सुनिश्चित केली की आपले जैविक घड्याळ लवकर सेट होते. रात्री साधारण 10.00 – 11.00 पर्यंत झोपण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी रात्री जेवल्यावर दंतमंजन चूर्णाने बोटाने दात घासून कोमट पाण्याने गुळण्या कराव्या.

नंतर थोडावेळ घरगुती कामात हातभार किंवा थोडा फॅमिली टाईम घालवून केसांत मूळाशी तेल मुरवावे. याने केसांच्या मुळाची त्वचा स्निग्ध होते, डॅण्ड्रफपासून सुटका होते, केस तुटणे, दुभंगणे, गळणे यांसारख्या तक्रारी कमी होतात.

त्यानंतर कंगवा फिरवावा, याने केसांचा रक्तपुरवठा सुधारतो, कोंडा मोकळा होतो, उवा- लिका असल्यास बाहेर काढायला सोपे जाते.

त्यानंतर उशीवर एखादे कापड गुंडाळावे, जेणेकरुन झोपल्याने तेलाचा डाग उशीवर न पडता, त्या कापडावर पडेल. हे कापड दुसर्‍या दिवशी धुवावे.

अशी तीन कापडे तयार ठेवावीत, एक धुतल्यावर सुकले नसल्यास दुसरे उपयोगी पडते व पावसाळ्यात दुसरेही सुकले नसल्यास तिसरे उपयोगी पडते.

बर्‍याच प्रॅक्टिकल अडचणींमुळे योजना बारगळतात, म्हणून तुमचा संकल्प नव्याचे नऊ दिवसाप्रमाणे लगेच मावळू नये, यासाठी एवढे सविस्तर सांगत आहे.

केसाची चंपी केल्यावर पायाच्या तळव्याला हाताने किंवा काश्याच्या वाटीने तेल मुरवावे. अंगठ्याने सर्व ठिकाणी दाब द्यावा व काॅटन साॅक्स घालावा.

काॅटन साॅक्सचेही एकूण तीन जोड वापरात असावेत, ऐनवेळी साॅक्स ओला आहे, म्हणून तळपायांची चंपी कॅन्सल व्हायला नको ना ! पायाच्या चंपीला पादाभ्यंग असे म्हणतात, याने पायाच्या भेगा नाहीशा होतात, झोप चांगली लागते व दृष्टी सुधारते.

रात्री झोपताना एखादे शांत सुमधुर भक्तीगीत किंवा वाद्याची धुन लावून शवासनात संपूर्ण अंग ढिले सोडून झोपावे.

अर्धवट झोपेच्या अवस्थेत उद्याच्या कामाचे नियोजन डोक्यात फिड करावे. हे जमत नसेल तर झोपण्याआधी ध्यानमुद्रेत बसून एकाग्र व शांत झाल्यावर चांगली झोप येण्याविषयी, सकाळी लवकर उठण्याविषयी व उद्याच्या नियोजनाविषयी स्वयंसुचना द्याव्यात.

ज्यांचे आत्मबल चांगले असते, ते ठरवल्याप्रमाणे सकाळी विना-गजरसुद्धा वेळेवर उठतात.

ज्यांच्यात शारीरीक किंवा मानसिक आळस ठासून भरलेला असतो त्यांनी गजर लावून घड्याळ किंवा मोबाईल लांब ठेउन द्यावा नाहितर सकाळी मला उठवले का नाहिस, गजर कोणी बंद केला म्हणून ओरड सुरु होते, गजर तर महाशयांनी स्वतःच बंद केलेला असतो !

अजून एक ज्यांचा काळजीखोर स्वभाव असतो, त्यांना झोपताना गजर लावल्यावर लवकर झोपच येत नाही व सारखे अजून झोप लागली नाही, किती वाजले आता कितीशी झोप मिळणार म्हणून गजर पुढे ढकलत राहतात व शेवटी गजरच बंद करतात, तेव्हा कुठे यांचा डोळा लागतो!

अशा व्यक्तींनी एखाद्या सकाळीच कायमस्वरुपीचा गजर सेट करुन ठेवावा, म्हणजे रात्री झोपताना एन्झायटी (बेचैनी) होत नाही.

सकाळी उठल्यावर दंतमंजन, नेत्रस्नान, अभ्यंग, प्राणायाम, योगासने किंवा व्यायाम करुन योगनिद्रा घ्यावी.

दिनचर्येचा विषय खूप मोठा आहे, याचे सविस्तर वर्णन एका लेखात होऊ शकत नाही, तोवर एवढे तरी सुरु करा. नि इंग्रजी नविन वर्ष जोमाने सुरु करा.

चला तर मग नव्या उमेदिने या नव वर्षाचेही जल्लोषात स्वागत करुयात, आपल्या सवयी बदलायला तसा कोणताही मुहुर्त स्वागतार्हच आहे.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.