केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी रोजच्या रोज ही काळजी घेतलीच पाहिजे

केस

केस हा सर्व तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

ओ उडे जब जब जुल्फे तेरी।
कवारीयो का दिल मचले….।।

अशी सुंदर केसांची स्तुती केलेले गाणे त्यामुळेच आजही गुणगुणायला लावते.

आज बर्‍याच कारणांनी केसांच्या अनेक समस्या डोके वर काढू लागल्या आहेत.

केसांच्या समस्यांच्या मूळाशी जायचे असेल तर प्रथम घरोघरी होणारा संवाद ऐकावा लागेल.

आई :- अग तनु ऐकतेस का इकडे ये, पळू नकोस. मला तेल लावू दे.

तनु :- मी नाही जा. तू खूप तेल लावतेस, मला शाळेत सगळे चिडवतात. चिपकु चिपकु म्हणतात.

आई :- अगं वेडे मग केसं मजबूत कशी होणार? ऐकत जा जरा. त्यांना म्हणावं, मी मोठी झाल्यावर तुम्हाला, मी तेल का लावायची? याचे उत्तर आपोआप मिळेल. जेव्हा तुमची केसं विरळ असतील नि माझी दाट, तुमची केसं नाजूक असतील नि माझी घट्ट, तुमची केसं भुरकट असतील नि माझी काळी भोर, मग तुम्हाला कळेल.

तनु :- बरं पण थोडंसंच लाव, जास्त लावलस तर मी शाळेत जाणार नाही.

आई :- हो ग बाई, थोडंच लावते, मग तर झालं !

चिपकु चिपकु जाहिरातीने तेलाविषयी तिटकारा व हेअर जेलचा वापर वाढला. बरेच जण केस थोडे ओले असतानाच त्यावर हेअर जेल लावू लागले. त्यामुळे केसात डॅण्ड्रफ होऊ लागला व केस गळू लागले.

तेलापासून लोक लांब जाऊ लागल्याने लोकांच्या डोक्यापासून केस लांब जाऊ लागले !

जशी कोणतीही केस हाताबाहेर गेल्यावर तिच्यावर काही ईलाज लागू पडत नाही, तशीच केसांची केस डोक्याबाहेर गेल्यावर, त्यावर हमखास ईलाज दरवेळी होईलच असे नाही !

केसांच्या समस्येविषयी आता आयुर्वेदिक डाॅक्टरांकडूनच जाणून घेऊयात.

श्री. केसाळकर :- डाॅक्टर बरेच दिवस झाले माझे केस गळत आहेत. बरेच उपाय करून झाले, आता शेवटचा उपाय म्हणून आपणाकडे आलोय.

डाॅ. :- (मनातल्या मनात – हेच तर दुर्दैव आहे, आपले लोक सर्वात शेवटी आयुर्वेदाकडे येतात नि ऍलोपॅथिनेही फरक पडेनासा झाला कि आयुर्वेदाने एकदम फास्ट फरक हवा असतो नि काही साईड ईफेक्ट तर होणार नाही ना अशी आवर्जून शंका विचारली जाते.) अहो काहीच काळजी करू नका आपण पूर्ण केस हिस्टरी घेऊन योग्य निदान करुनच, अचूक औषधोपचार सुरु करतो व आहार, विहार, औषधी व पंचकर्म याद्वारे हा प्रश्न सोडवतो.

(कारण कुरळे केसवाल्यांना सरळ केस आवडतात, काळे केसवाल्यांना तांबडे केस आवडतात, अशी एकंदर तर्‍हा ! हे म्हणजे सोलापूरात भाताचे पिक नि कोकणात निवडुंगाचे पिक घेण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे केसांचे स्वरूप असते. ते काही कालावधीसाठी बदलायचा प्रयत्न करण्याऐवजी ते मूळ स्वरुप आपल्याला आवडायला हवे.) अशी अनेक कारणे केस गळतीस कारणीभूत होतात.

श्री. केसाळकर :- अहो माझे तर यापैकी काहीच कारण वाटत नाही.

डाॅ. :- मला सांगा तुम्ही रोज तेल लावता का केसांना?

श्री. केसाळकर :- हो.

डाॅ. :- पण किती?

श्री. केसाळकर :- 4 – 5 थेंब

डाॅ. :- अहो ठिबक सिंचनाला हि जास्त थेंब पाणी लागतं नि तुम्ही एवढ्या मोठ्या मस्तकाला एवढेसे तेल लावता ? असे कसे चालेल? ( तेलाचं प्रमाण ऐकून मनातल्या मनात म्हटलं नक्की केसांचच तेल लावता की वेदनाशामक तेल, देव जाणे !)

श्री. केसाळकर :- तेलकट केस घेऊन कामावर कसे जायचे?

डाॅ. :- एक आयडिया सांगतो तुम्हाला. रोज रात्री झोपताना केसांवर वेगवेगळ्या जागी तेल सोडावे, नि बोटांच्या पहिल्या पेरांनी नखे न लागू देता, हलका व गोलाकार मसाज करावा. कसेही जास्त ताकदिने केसांच्या मूळाशी घासू नये. तेल लावल्यावर केसांमधून स्वच्छ कंगवा फिरवावा. याने केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह सुधारतो. रात्री लावलेले तेल सकाळपर्यंत भरपूर मुरते व चिपकु चिपकु वाटत नाही.

पोटातून काही मोजकी आयुर्वेदिक औषधे वापरून व केसांसाठी काही विशिष्ट टिप्स सांगून यांचे केस गळणे लवकरच समाधानकारक रीत्या कमी झाले.

म्हणूनच म्हणतो……. केसांच्या समस्येच्या मूळाशी हात घालायचा असेल तर, सर्वप्रथम केसांच्या मूळाशी तेल मुरवायला हवे !”

लेखक : डॉ. मंगेश देसाई
मोबाईल : ७३७८८२३७३२

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!