शत्रूला नामोहरम करणारा शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आपणही शिकला तर

शिवाजी महाराज

सध्या छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जीवनावर लिहलेलं द्वारकानाथ पितळे ह्यांचं ‘स्वराज्याच्या कारभार’ हे कादंबरीवजा पुस्तक वाचत आहे. एकेक पान वाचताना अंगावर शहारे येतात, रोमांच उभे राहतात, इतका छान इतिहास मांडलाय.

तसेतर बर्‍याचशा देशांमध्ये, एकाहुन एक रणनिती आखणारे, निर्भय, बेडर, शुरवीर आणि सरस असे सेनापती होऊन गेले!

ज्युलियस सीझर, अलेक्झेंडर, नेपोलियन आणि अलिकडच्या काळात ग्लॅड्स्टन, चर्चिल, हिटलर, मुसोलिनी आणि अशा बर्‍याच जणांनी युद्धशास्त्राच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलयं!

एक सेनानायक म्हणुन हे सगळे आपापल्या ठिकाणी महान आणि श्रेष्ठ आहेत.

पण शिवाजी महाराजांसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो.

शिवाजी महाराज ग्रेट का? कारणे दोन

  • एकतर ते या मातीतले आहेत, ते आपले आहेत, आजही आपलेच वाटतात, अवतीभवती आहेत असंच वाटतं, कदाचित म्हणुनच आजही ते आपल्या मनावर राज्य करतात!
  • दुसरं म्हणजे, सैन्य, पैसा, शस्त्रे यांच्या दृष्टीने शत्रु आपल्यापेक्षा शेकडो पटीने बलाढ्य असताना देखील, केवळ बुद्धीचातुर्याच्या बळावर त्यांनी ह्या गनिमांना कित्येकदा खडे चारले.

राजांच्या युद्धशास्त्राचा बारकाईनं अभ्यास केला, तर अगदी सहज लक्षात येईल की कोणतीही मोहीम आखण्याच्या आधी महाराज शत्रुचं लक्ष विचलित करायचे.

प्रतिस्पर्धी पक्षाला गाफील करायचे. अशी काही खेळी करायचे की शत्रु बेसावध होईल, किंबहुना शत्रु बेसावध होईपर्यंत वाट पहायचे.

मग पुर्ण ताकदीनिशी एक जोरदार तडाखा!

आणि शत्रु नामोहरम!…

औरंगजेबाच्या आदेशानुसार, लाखो सैनिकांची फौज घेऊन स्वराज्यावर शाहिस्तेखान चालुन येतो, सगळ्या मुलुखाची आणि रयतेची धुळधाण करतो, जाळपोळ करतो, शेतं नष्ट करतो,

सरळसरळ आव्हान देतो.

महाराजांना उकसवण्यासाठी, तो चक्क महाराजांच्या घरात म्हणजे पुण्याच्या लाल महालातच कुटूंबकबिल्यासह तळ ठोकतो.

महाराज कुठेही त्याचा समोरासमोर सामना करत नाहीत.

वरवर शांत भासत असलेले शिवाजी महाराज आतुन खवळलेले असतात.

एकेक दिवस दिवस संघर्ष करुन, एकेका प्राणप्रिय मावळ्याचं रक्त सांडुन, उभा केलेलं स्वराज्य असं उध्वस्त होताना राजांना किती दुःख होत असेल?

पोटच्या पोराप्रमाणे आपल्या प्रजेला जपणार्‍या, राजांच्या मनाला, अशा प्रत्येक सैतानी आणि अक्राळविक्राळ आक्रमणानंतर काय यातना होत असतील?

पण महाराज ह्या शाहिस्तेखानाचे सगळे उच्छाद शांतपणे सहन करतात.

ते योग्य संधीची वाट पाहतात, किती दिवस माहीतीये?

तीन वर्ष! तब्बल एक हजार दिवस!

आणि मग अमावस्येच्या एका भयाण रात्री लाखो फौजेच्या गराड्यात निवांत झोपलेल्या शाहिस्तेखानाच्या डेर्‍यात, घुसुन त्याच्यावर झडप घालतात.

अख्खं लहानपण जिथं गेलं, सगळ्या चोरवाटा माहित असलेला तो लालमहाल, रोजे चालु असल्यामुळे रात्रीच्या वेळी पेंगुळलेले पहारेकरी, मोगलांच्याच वेषात महाराज आणि त्यांचे मावळे, असा पहारा करता का, म्हणुन दिंडी दरवाजातुन आत घुसुन आधी तिथल्या पहारेकर्‍यांना मारतात.

त्यातला एक सुटतो, आणि आरडाओरडा करत सैनिकांना उठवु लागतो.

मग शाहिस्तेखान जिथे आहे, तिथे डायरेक्ट त्याच्या बेडरुममध्येच घुसतात, त्याचे नशीब बलवत्तर म्हणुन त्याच्या हुशार बायका सगळी शमादानं म्हणजे दिवे विझवतात, तरीही त्या काळ्याकुट्टं अंधारामध्ये शत्रुच्या हालचालीचा अंदाज घेऊन महाराज त्याच्यावर तलवार चालवतात.

आणि अशी काही आयुष्यभराची अद्दल घडवतात की, हा जंगबहाद्दुर शाहिस्तेखान शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हा केव्हा आपल्या तुटलेल्या तीन बोटांकडे पाहतो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्याला शिवाजी महाराजांची आठवण येते.

सगळंच किती अजब, अतर्क्य आहे की नाही?

अफझल खानाचा वध असेल किंवा शाहिस्तेखानावर स्वारी, खरतंर काही सेकंदाचा खेळ, जीवावरची जोखीम, पण प्रत्येक वेळी मोहीम फत्ते!

दोन्ही चढायांमध्ये आपला एकही माणुस न गमवता महाराज सहीसलामत वापस!

उलट ह्या झटापटीत शाहिस्तेखान आपल्या लाडक्या मुलाला गमावतो.

विनिंग रेशो – वन हंड्रेड पर्सेंट!…

आणखी खरी मजा तर पुढेच आहे.

शाहिस्तेखानावर वार केल्यावर महाराज मावळ्यांना घेऊन ताबडतोब बाहेर पडतात, आणि वार्‍याच्या वेगाने सिंहगडाकडे निघतात.

पण जाता जाता आधीच ठरल्याप्रमाणे, दोनशे बैलांना, त्यांच्या शिंगाना आगी लावुन कात्रजच्या दिशेने पाठवुन देतात.

म्हणजे पुन्हा इथेही शत्रुला चकवा!

हल्ला झाल्यावर तिसर्‍या दिवशी मामा शाहिस्तेखानानं पुणं सोडलं, इतक्या झटपट तर अणुबॉंब पडल्यावरही जपाननेही शरणागती पत्कारली नव्हती.

“असाच कधीही, कुठुनही येऊन शिवाजी एके दिवशी माझं मस्तक मारेल! नको, मी जातो!”….😩😩

काय ही दहशत! काय ती प्लानिंग! सगळचं लई भारी!

महाराज अद्वितीय साहसी होते, पण त्यासोबत ते विलक्षण अभ्यासु होते, आपल्या हेरखात्यावर ते प्रचंड पैसा खर्च करायचे.

सुरतेवर स्वारीच्या आधी बहिर्जी नाईकांनी सुरतची सगळी ब्लु प्रिंट महाराजांपुढे ठेवली होती, कोणत्या भागावर फोकस करायचा, कोणत्या भागात फिरकायचेही नाही, दानधर्म करणारी माणसे कोणकोण आहेत, त्यांना धक्का लावायचा नाही, सगळे सगळे आधीच ठरवलेले होते.

इथेही शत्रुला दिलेला चकवा बघा.

सुरतेवर जायच्या आधी त्रंबकेश्वरला सैन्याची जमवाजमव केली आणि उगीचच अफवा उठवली की मराठी सैन्य औरंगाबादवर चालुन जाणार आहे.

हे ऐकुन मुघल शहजादा शाहाआलम आपल्या फौजेसह सज्ज झाला, तिकडे मुघलांची सुरत चार दिवस ‘बदसुरत’ होत होती.

अगदी सहज!

सुरतेचा किल्लेदार इनायतखान बिनशर्त शरणागती पत्कारतो, पळुन जातो.

महाराजांना कुठेही कसलाच विरोध होत नाही,

कारण एकच, अनपेक्षित वार!

शत्रुचं लक्ष डायव्हर्ट करणं, गाफील शत्रुवर संपुर्ण शक्तिनिशी हल्ला करणं!

अफझल खान वधामुळे शहाणा झालेला अदिलशहाचा शुर सरदार सिद्दी जौहर, पन्हाळगडाला वेढा देतो.

महाराज गडावर अडकतात, वेढा एकदम कडक असतो, कित्येक महिने सिद्दी जौहर एकदम नाकेबंदी करतो.

युद्धशास्त्राचा नियम आहे, माशाला मारता येत नसेल तर त्याच्याभोवतीचं पाणी काढुन घ्या.

तो आपोआपच तडफडुन मरेल.

पुढे शंभरवर्षांनी पानिपतावर अब्दालीने मराठी फौजेसोबत नेमकं हेच केलं आणि जिंकला.

पण प्रचंड सावध, बुद्धिमान आणि शिस्तप्रिय असलेल्या सिद्दीच्या वेढ्यातुन मात्र महाराज शेवटी निसटलेच!

इतकी वर्ष शत्रुकडेच असतानाही, एक अशी अवघड वाट शोधुन काढली, जी सिद्दीला माहितच नव्हती, महाराज पन्हाळगडाच्या त्या चिंचोळ्या भागातुन निसटले.

सिद्दीला तह करायचा आहे, असं सांगुन आणि आपला ‘डुप्लिकेट’ त्याच्या भेटीला पाठवुन निसटले.

पुन्हा एक ‘चकवा’!

सर्वात मोठा चकवा तर त्यांनी आग्र्याला औरंगजेबाला दिला,

आपल्या बापाला, सख्ख्या भावाला आणि आपल्या मुलाला मारणारा, कित्येक शत्रुंना कपटाने विषप्रयोग करुन मारणारा पाताळयंत्री औरंग!

साधी वागणुक दिल्यामुळे चिडुन महाराज त्याच्या दिवाण-ए-खास मधुन रागारागाने, चवताळुन बाहेर पडतात, तेव्हा बादशहाचे सगळे चमचे सरदार बादशहाला सुचवतात की महाराजांना जिवंत सोडु नका.

वरवर औरंगजेब नाही म्हणतो पण लगेच राजांना नजरकैदेत टाकतो.

शिवाजी महाराजांना अंधारकोठडीत डांबुन त्यांचा शेवट करण्याचा त्याचा डाव असतो.

महाराज ताबडतोब रामसिंगाच्या मार्फत आग्राच्या सावकारांकडुन अनेक कर्जे घेतात, आणि अनेक मोल्यवान भेटी नजराणे घेऊन, आपल्या विरोधात असलेल्या सगळ्या मोठमोठ्या सरदारांकडे आपली खास माणसं पाठवतात.

आधी महाराजांच्या विरोधात असलेले अनेक सरदार पुढे पुढे राजांचे मित्र किंवा तटस्थ तरी होतात. विरोध मावळतो.

त्यांच्यातल्या एका सरदारांकडुन महाराज आपल्या माणसांसाठी महाराष्ट्राकडे येण्यासाठी पासेस उपलब्ध करवुन घेतात.

पोलादखानाच्या पाच हजार सैन्याच्या हातात मिठाई ठेऊन महाराज तिथुनही पसार होतात.

औरंगजेब चवताळुन उठतो, जागोजागी नाकेबंदी करतो, तेव्हा महाराज तेच मुघलांचेच पासेस प्रत्येक नाक्यावर दाखवत, हजारो किलोमीटरचा प्रवास सहीसलामत करुन सुखरुप रायगडावर पोहोचतात.

ओरंग दाढी खाजवत राहतो, त्याची प्रचंड छीथु होते!

आपण आपल्या शत्रुचा, त्याच्या स्ट्रेंग्थ आणि विकनेसचा अभ्यास करतो का?

आपण शत्रु गाफील असताना वार करतो का?

आपण आपल्या शत्रुला चकवा देतो का?

काही शत्रु बाहेरच्या जगात असतात, काही आपल्या आतमध्येच दडुन बसलेले असतात.

आळस, नैराश्य, अनिर्णय, टाळाटाळ, चालढकल, लंपटपणा, अतिखाणे, चहाड्या करणे, वगैरे, वगैरे….

तुमच्या आतल्या आणि बाहेरच्या प्रत्येक शत्रुवर विजय मिळवण्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!..

अमॅझॉनवर उपलब्ध असलेली छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके घेण्यासाठी येथे क्लिक करा.

मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.