पानिपताचं युद्ध मराठे का हरले? आणि का घडतं पानिपत?

चौदा जानेवारी….
उत्तरायण होईल, संक्रात होईल, पतंग उडवले जातील, आणि एकमेकांना तिळगुळ खाऊ घालुन तोंड गोड केले जाईल.
ह्या सगळ्यात दोनशे अठ्ठावन्न वर्षांपुर्वी जे घडलं होतं, ते कोणाला आठवायची इच्छा होईल का?
“पानिपत!”
सर्वात कमी वेळात, समोरासमोरच्या युद्धात सर्वात जास्त लोक मारले गेले, आतापर्यंत झालेलं जगातलं सर्वात संहारक युद्ध आहे, पानिपत!
पानिपत ही मराठी माणसाच्या मनावरची एक जखम आहे, पानिपतावर एक अख्खी मराठी पिढीच नष्ट झाली.
पानिपत झालं नसतं तर इंग्रज भारतावर राज्य करु शकले असते का?
का झालं होतं पानिपत? पानिपत युद्धाचे परिणाम काय काय झाले? ह्या पानिपतातुन काही शिकलो का आपण?
अफघाण योद्धा अहमदशहा अब्दाली आपल्या रानटी टोळ्यांना घेऊन चौंथ्यादा दिल्ली लुटायला येतो, तेव्हा आपल्या घरापासुन दिडहजार किलोमीटर अंतरावर जाऊन मराठे, आपल्या प्राणाची आहुती का देतात?
ह्या सगळ्या प्रकरणाची सुरुवात औरंगजेबाच्या मृत्युपासुन होते, औरंगजेबाच्या मृत्युनंतर मुघल सत्ता खिळीखिळी झाली. वजीर आणि सम्राट यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरु झाला.
मराठ्यांमध्येही यादवी युद्ध सुरु व्हावे, गादीचा संघर्ष सुरु व्हावा, ह्या हेतुने संभाजी महाराजांचे पुत्र शाहु महाराज ह्यांना १७०७ मध्ये मुघल कैदेतुन सोडुन देण्यात येते.
आपल्या पित्याचा अमानवी आणि क्रुर छळ करुन ठार मारणाऱ्या औरंगजेबाला, शाहु महाराजांनी वचन दिलेले असते, “मी मुघलांविरुद्ध कधीही लढणार नाही, उलट त्यांचे इतर शत्रुंपासुन रक्षण करेन.”
ह्यामुळे मराठी राजवटीत आतापर्यंत अष्टप्रधान मंडळातले एक मंत्री असलेले ‘पेशवे’ आता शाहु महाराजांच्या वतीने सेना आणि मोहिमा यांचे नेतृत्व करु लागतात.
हे पेशवे, बाळाजी विश्वनाथ भट, हे मुत्सद्दी होते.
राज्य चालवण्यासाठी पैसा लागतो, आणि राजाच्या तिजोरीत पैसा येतो, टॅक्स जमा करुन किंवा शत्रुकडुन खंडण्या गोळा करुन!
ह्या तीस हजार मराठी वीरांनी पहिल्यांदा सुंदर दिल्लीचे रस्ते पाहिले, इथले प्रचंड वैभव पाहिले, आणि आपणही हे सारं मिळवु शकतो, अशी उमेद त्यांच्या मनात तयार झाली.
ह्या सेनेत पेशव्यांचा एकोणीस वर्षांचा तरणाबांड मुलगा बाजीराव ही होता. त्याला दिल्लीने जणु भुरळ पाडली होती.
पुढे बाळाजी विश्वनाथांचं निधन होते आणि पेशवेपद बाजीरावांना मिळतं.
बाजीराव हे मराठ्यांच्या इतिहासातलं सोन्याचं पान आहे, मराठ्यांच्या विखुरलेल्या शक्तीला त्यांनी शत्रुविरुद्ध एकत्रित केले, त्यांच्या खांद्याला खांदा लावुन मोहिमा लढवल्या, उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतुल पराक्रम गाजवला.
१७२० मध्ये पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्यांच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्यांनी २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७) तसेच भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७मे, इ.स. १७३९) या आणि अशाच छत्तीस मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया त्यांनी जिंकल्या आहेत.
त्यांचा “सक्सेस रेट” “१००%” आहे.
वेगवान हालचाल हेच त्यांचे प्रभावी हत्यार आहे. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती, आपण “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली.
शाहूमहाराज म्हणत, ‘मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.’
पण हेच बाजीराव, शाहु महाराजांनी औरंगजेबाच्या वचनात बांधलेले असल्यामुळे म्हणा किंवा खंडणीच्या अमिषाने म्हणा, त्यांनी मुघलांवर प्रत्यक्ष आक्रमण केले नाही, आपल्या शक्तीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.
ह्याबद्ल्यात एका अभद्र युतीचा जन्म झाला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यांचा घास गिळण्यासाठी टपुन बसलेल्या मुघल साम्राज्याचेच मराठे संरक्षक झाले.
ह्यातुनच पुढे पानिपत घडलं!
एक वर्षांपुर्वी शत्रुवर आक्रमण करण्यासाठी निघालेलं पन्नास हजार लष्कर आणि इतर एक लाख लोकं यांचा युद्ध्याच्या मैदानात अर्ध्या दिवसात दारुण पराभव होतो, धुळधाण होते, काही तासात ते सगळे क्रुरपणे मारले जातात? कापले जातात, युद्धभुमीला रक्ताचा अभिषेक घडतो. खरचं काही तासांचं युद्ध इतका मोठा निर्णय घडवतं का?
पानिपत का घडतं?
केव्हा केव्हा घडतं असं भयानक आणि संहारक पानिपत?
- युद्ध न लढणारी, तीर्थक्षेत्र आणि देवस्थाने यांचं दर्शन करण्यासाठी निघालेल्या, हौशी लोकांची खुप मोठी संख्या सोबत असल्यामुळे मराठ्यांच्या हालचाली मंदावल्या. म्हणुन जेव्हा एसेट्स पेक्षा लायेब्लिटीज जास्त असतात, तेव्हा पानिपत घडतं!
- धर्माच्या नावावर एका क्षणात मतभेद विसरुन एक होऊन, वज्रमुठ बनवुन लढणाऱ्या शत्रुसमोर लढणारी सेना, जेव्हा एकदिलाने न लढता, जातीपातीत विभागुन लढते, उच्च नीचतेच्या विळख्यात अडकते, कर्मकांडाला नको तितके महत्व देते, तेव्हा पानिपत घडतं!
- फ्रेंच सेनापती बुसीच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या इब्राहिम गाडदीने मराठ्यांच्या वतीने गोल व्युह रचला होता, त्याच्या रणनितीमुळे अब्दालीचे हजारो लोक मारले गेले, पण दुर्भाग्य! आपल्या परांपरागत गनिमी काव्याच्या सवयीमुळे, काही मराठी सरदारांनी स्वतःहुन तो गोल तोडला, आणि युद्धाचे पारडे फिरले.
म्हणुन आपल्या सेनापतीने दिलेला आदेश, सगळ्यांकडुन जशाच्या तसा पाळला जात नाही, त्या सेनेत पानिपत घडतं!
- रानटी अब्दालीचे भय असुनही, उत्तर भारतातली एकही प्रबळ सत्ता, जसे की राजपुत, जाट, बुंदेले, गुर्जर, शीख, अवधेचा नवाब ह्यापैकी कोणीही मराठ्यांच्या मदतीला आले नाही. का बरं?
कारण त्यांच्या नजरेत अब्दाली आणि मराठे सारखेच होते, अब्दालीइतके क्रुर नाही पण मराठे त्यांच्यावर वेळोवेळी आक्रमण करायचे. त्यांच्या किल्ल्यांवर तोफा डागायचे. खंडण्या उकळायचे. त्या खंडण्यांनी आपले सुंदर सुंदर महाल उभा करायचे.
थोडी शक्ती आली की आपलेच लोक, आपल्यापेक्षा दुबळया लोकांना पैशासाठी लुटु लागतात, शोषण करुन दहशत माजवतात, तेव्हा पानिपत घडतं!
- अब्दालीची ही पाचवी दिल्ली स्वारी होती, सदाशिवराव भाऊ-विश्वासराव यांची मात्र ही पहिलीच उत्तरेतली मोहीम होती. शिंदे-होळकर जरी जुने जाणते सुभेदार होते, ह्या भागात अनेक वर्ष वावरेलेले होते.
तरीही उत्तरेचा भुगोल, गंगा-यमुना-चंबळ नद्यांचे महापुर आणि अन्नरसद शत्रास्त्रांचा पुरवठा, उत्तरेत असलेले मदतीचे दोर, अब्दालीचा अघोरी रानटीपणा कसल्याही परिस्थितीचे अचुक आकलन शेवटपर्यंत मराठ्यांना झाले नाही.
मराठ्यांना एकेक नदी ओलांडायला एकेक महिना लागतो, त्याउलट अब्दाली चपळाईने यमुना ओलांडुन मराठ्यांचे मदतीचे सर्व रस्ते बंद करतो.
इथे मराठे शंभरवर्षांपुर्वीच्या मुघल फौजेसारखे वागले, थोडे फाजील आत्मविश्वासाने, आणि थोडे सुस्तावल्यासारखं! याउलट अब्दाली चपळपणे वागला, गनिमी काव्याने लढला, अगदी शिवाजी महाराजांसारखा!
अब्दालीकडे असलेल्या पाच हजारांच्या राखीव सैन्यामुळे अब्दाली हे युद्ध जिंकला. तो क्रुर होता, पण शिस्तबद्ध होता.
लढाईत मराठ्यांचा जोर असताना, मरणाच्या भितीने अब्दालीचे सैनिक पळु लागले तेव्हा अब्दालीने आपल्या सैनिकांना स्वतःच ठार मारले. ज्यामूळे त्याच्या सैन्यात मागे फिरण्याची, पळुन जाण्याची, इतर कोणाची ही हिंमत झाली नाही.
जेव्हा शत्रुचा बारकाईनं अभ्यास न करता, शत्रुपक्षाला कमी लेखुन, लढण्यासाठी निधडी छाती पुढे केली जाते, तेव्हा तेव्हा पानिपत घडते.
- सकाळी साडेअकरापर्यंत युद्धाचे परिणाम मराठ्यांच्या बाजुने असतात, मात्र पुढे क्षणाक्षणाला सामोरे जाणाऱ्या तळपत्या सुर्यामुळे डोळ्यात जाणाऱ्या किरणांमुळे मराठ्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी येते.
हे असं होवु शकतं, असं तिथल्या एक लाखांहुन अधिक लोकांपैकी एकाच्याही लक्षात आलं नाही.
अब्दालीकडे दुर्बिणी होत्या, बंदुका होत्या, उंटावरुन हलवता येतील, अशा हलक्या पण प्रचंड संहार करणाऱ्या तोफा होत्या,
याउलट मराठ्यांकडे इब्राहिम गाडदी सोडला तर बहुतांश सैन्य हे तलवार, भाला चालवणारे सैनिक होते.
मराठी लष्करामध्ये दळणवळणासाठी अवघड अशा तोफा आणि हत्ती होते, जे त्यांच्या पराजयाचे कारण बनले. आधुनिक तंत्रज्ञानासाठी आपल्याला तेव्हाही इंग्रज आणि फ्रेंचावर अवलंबुन रहावे लागायचे आणि दुर्दैवाने आजही रहावे लागते.
हजारदा वाचले असेल.
“हत्तीवर बसलेल्या विश्वासरावाला बंदुकीतुन सुटलेली एक गोळी लागते, आणि लढाईचा रंग बदलतो.“
वाळवंटात राहणाऱ्या मध्ययुगीन काळात वावरणाऱ्या अब्दालीकडे आधुनिक शस्त्रे असु शकतात मग कला, संस्कृती, विज्ञान, शास्त्रे यांच्यामध्ये रुची असणाऱ्या मराठ्यांकडे बंदुकासारखी आधुनिक शस्त्रे का नव्हती?
शस्त्रास्त्रांच्या बाबतीत शत्रु जेव्हा आपल्यापेक्षा वरचढ असतो तेव्हा ‘पानिपत’ घडते.
- विश्वासराव पेशवे पडले की मराठ्यांची सेना विखुरते, सेनापती पडला म्हणुन सैनिकांचे मनोबल खचते, जो तो स्वतःचा जीव वाचवत पळत सुटतो. पण पळत सुटले, म्हणुन ते वाचले नाहीत, युद्ध संपल्यावर त्यांचीही कत्तल झालीच.
ते सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले असते तर!…
- आपल्या लोकांपेक्षा, आपल्या मातृभुमीपेक्षा आपला जीव प्यारा वाटु लागतो, तेव्हा पानिपत घडते!
दीड लाख लोकांनी आहुती देऊन अनेक धडे आपल्याला असे शिकवले आहेत, त्यातुन आपण बोध घेणार आहोत का?
हेच पानिपतावर धारातिर्थी पडलेल्या वीर सैनिकांना खऱ्या अर्थाने नमन ठरेल.
पानिपताच्या युद्धात नेमकं काय झालं होतं, याविषयी पुढच्या भागात!…
लेखातील मुद्द्याशी सहमत असाल तर लाईक करा,
पानिपताविषयी नवी काही माहिती असेल तर कमेंट करा,
मराठ्यांच्या शोर्य आणि इतिहासाचा अभिमान असल्यास आपापल्या फेसबुक वॉलवर शेअर करा.
धन्यवाद आणि मनःपुर्वक आभार!
लेखक विश्वास पाटील लिखित पुस्तक पानिपत साठी येथे क्लिक करा
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा