प्रेरणादायी लेख-नैराश्य घालवून आनंदाने जगण्याचे हे सहा नियम!!

प्रेरणादायी लेख

काही वर्षांपुर्वी आम्ही नवीकोरी आय ट्वेन्टी कार विकत घेतली होती, तेव्हाची गोष्ट!

मी खुप खुश होतो, खुप दिवसांचं स्वप्न पुर्ण झालं होतं, तेव्हा मी ड्रायव्हिंग शिकत होतो, तरीही नवीन गाडी चालवायला हात शिवशिवत होते, आणि व्हायचे, तेच झाले,…

एक आठवडा व्हायच्या आतच मी रस्त्यावर एका पोलला धडक दिली, माझ्या हातुन आमच्या नव्या कारवर खुप सारे स्क्रॅचेस पडले. मी ते पाहीले आणि कारला कमी, आणि माझ्या मनावरच स्क्रॅचेसच्या जास्त जखमा झाल्या.

माझा खुपखुप मुड ऑफ झाला.

मी शांत शांत, उदास बसलेला पाहुन, माझ्या मित्राने माझा मुड ऑफ झालेले ओळखले.

खोदुन खोदुन विचारले, तेव्हा मी ही खरे खरे सांगितले.

आणि कारण ऐकुन मित्र म्हणाला, एवढचं ना!..चालायचचं, कारला स्क्रॅचेस पडणारच, गाडी म्हण्टली की अपघात होणारच… त्यात काय एवढं मनावर घ्यायचं..

त्याचे शब्द माझ्या मनावरचा ताण एकदम हलका करुन गेले.

“कार म्हण्ट्ल्यावर स्क्रॅचेस पडणारच”, ऐकुनच एकदम मस्त वाटलं.

अपराधभाव पुर्ण निघुन गेला, तेव्हापासुन पुन्हा कार कित्येकदा घासली, पण त्याचे काहीच वाटले नाही, मनाला लावुन घेतले नाही.

एक दोनदा डेंटींग-पेंटींग करुनही झालं, कारच्या असल्या हलक्याफुलक्या अपघाताचं आता काही वाटत नाही.

अपघात फक्त कारचे होतात, असं नाही, अपघात माणसांच्या मनाचेही होतात, आणि अपघात घडला की अशीच निराशा येते…

ही निराशा पण डीसेंट्रीसारखी असते, ती यावी असं कुणालाच वाटत नाही, पण तिच्या येण्यावर कुणाचंच नियंत्रण नसतं.

आणि ती एकदाच येऊन जात नाहीत, तर एकामागुन एक तिचे उमाळे येतच असतात, आणि त्या कळा सहन करणंही असह्य असतं..

मग निराश व्हायला कसलंही निमीत्त पुरेसं असतं..

अभ्यासात नापास झालो, आली निराशा….

मनासारखा जॉब मिळत नाही, आली निराशा….

लग्न जमत नाही, आली निराशा….

मनासारखा जोडीदार मिळाला नाही, आली निराशा….

कुटुंबाच्या गरजा वाढल्यात आणि पैसा पुरत नाही, आली निराशा…

प्रेमात पडलेल्या व्यक्तीने नाकारलं, आली निराशा….

प्रेम दोन्ही बाजुंनी मान्य आहे, पण लग्न होवु शकत नाही, आली निराशा….

आरोग्याच्या कटकटी मागे लागल्यात, आली निराशा….

आरोग्यावर प्रचंड पैसा खर्च करावा लागतोय, आली निराशा….

जबाबदाऱ्या पुर्ण नाही करु शकलो, आली निराशा….

स्वप्ने मोठ्ठी आणि वास्तव खोटे, आली आणि पसरली निराशा….

आजुबाजुला नजर टाकली तर अशी कित्येक निराश झालेली माणसं तुम्हाला दिसतील.

निराशा आली की आत्मविश्वास नष्ट होतो.

काही करुन दाखवण्याची वृत्ती खलास होते.

आता त्यांना कुणाचे उपदेशाचे डोस आणि सल्ले ऐकायला नकोसे वाटते.

पुस्तकं वाचणं, अभ्यास करणं, असले प्रकार जीवावर येतात.

सगळ्या जगाचा प्रचंड राग येतो, चिडचिड वाढते.

जगण्यातला आनंद, चेहऱ्यावरचं हास्य सारं काही हरवुन जातं,

काळजीने केस गळायला लागतात, चेहरा निस्तेज बनतो. बुद्धीही मंद बनते.

थोडक्यात ह्यांच्या आयुष्यातला, जगण्यातला रसच संपायला लागलेला असतो,

सहज म्हणुन अवतीभवती नजर टाकली तरी अशा भरपुर व्यक्ती तुम्हालाही दिसतील.

यात कॉलेज ‘स्टुडंट्स’ पासुन कॉर्पोरेट जॉब करणारे ‘सिंगल’ दिसतील,

कधी तरुण तडफदार वयाचे बुद्धीशाली आणि कर्तूत्ववान माणसं दिसतील,

कधी सुखात लोळणाऱ्या गृहीणींपासुन, रिटायर झालेले, जगाची चिंता करणारे, रिकामटेकडेही दिसतील.

मग हे लोक टिव्ही बघुन, वॉट्सएप, फेसबुक चाळुन स्वतःचं मन रमवायचा प्रयत्न करतात.

तरी राहुन राहुन पुन्हापुन्हा यांचं दुःख उफाळुन वर येतच राहतं…

मग ह्या समस्येवर काही उपाय आहे का?

हो, आहे. कित्येक वर्षांपुर्वी मीही अशाच प्रकारच्या एका प्रचंड मानसिक तणावातुन गेलो होतो.

ही स्थिती भयानक आणि केविलवाणी असते, हे मान्य तरी हा जीवनाचा शेवट नसतो.

उलट अशा संकटात, दुःखद स्थितीत तावुन सुलाखुन निघालेलं मन पुढे प्रचंड निग्रही, कणखर आणि खंबीर बनतं.

निदान माझा तरी असाच अनुभव आहे.

अशाच किंवा कसल्याही कारणाने तुम्ही नैराश्याचे डिप्रेशनचे शिकार झाला असाल, तर खालील उपाय वापरुन तुम्हीसुद्धा जगातली सर्वात जास्त आनंदी व्यक्ती बनु शकता.

भुतकाळ पुसुन टाका

भुतकाळात बऱ्या वाईट आठवणींचं गाठोडं असतं,

जोपर्यंत ते उर्जा देतं, तोपर्यंत ते सोबत बाळगायचं असतं,

जर ते ओझं बनुन, जोखड बनुन, आपल्या आयुष्याची गति कमी करत असेल, त्रास देत असेल, मग मात्र दयामाया न दाखवता, त्याला झुगारुन देण्यातच खरा शहाणपणा असतो.

त्रास देणारी प्रत्येक गोष्ट निर्दयीपणे फेकुन द्यावी, दुःख उराशी कवटाळुन बसण्यापेक्षा त्याची विल्हेवाट लावुन, आयुष्याची नवी सुरुवात करायला हवी.

मोठ्ठी स्वप्न पहा, मोठ्ठी ध्येयं ठरवा

आपलं मन खुप कलाकार आहे, ते रिकामं राहुच शकणार नाही, त्याला चघळण्यासाठी सतत काहीनकाही हवं असतं.

तेव्हा जुन्या कष्टदायक अपुऱ्या स्वप्नांच्या बदल्यात, त्याहुन मोठ्ठी, उदात्त अशी स्वप्ने त्यात पेरली पाहीजेत, मोठमोठ्ठी ध्येय ठरवली पाहीजेत. रोज सकाळ संध्याकाळ ती मनात घोळवली पाहीजेत.

उदा. माझं खुप छान करीअर सेट झालेलं आहे…

सध्याच्या कमाईपेक्षा माझी कमाई पाचपट वाढलेली आहे….

माझं खुप सुंदर जोडीदारासोबत लग्न झालेलं आहे, माझा सुखाचा संसार सुरु आहे…

माझ्या कूटुंबातल्या प्रत्येकाला माझा खुप अभिमान आहे….

मी एक आनंदी आणि प्रसन्न व्यक्तीमत्व आहे….

असे रोज घोकल्याने, सतत असा विचार केल्याने आत्मप्रतिमा सुधारते,

आत्मविश्वास बळावतो, एक नवी शक्ती मिळते…

स्वतः वर प्रेम करा

सगळ्यात महत्वाचं, आपण जगाच्या दृष्टीने तुच्छ कःपदार्थ नसुन, आपण स्वतः, जगातली एक आगळीवेगळी, एकमेव द्वितीय, महान व्यक्ती आहोत हे पुन्हा पुन्हा मनाला सांगा.

अकांउंट मध्ये निनावी पैसे भरावेत तसे आपल्या आयुष्याच्या खात्यात देव रोज नवे चोवीस तास भरतोय, ते काहीतरी भव्य दिव्य करुन दाखवण्यासाठी, असा विश्वास बाळगा.

मी हातात घेतो, ते काम चिकाटीने पुर्ण करतो अशी जिद्द अंगात बाणवली की लवकरच तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हाल!..

स्वतःला गुंतवुन ठेवा

लक्षात घ्या, माणुस जेव्हा दुःखात बुडालेला असतो तेव्हा, एकटेपणा हाच त्याचा सर्वात मोठ्ठा आणि खरा शत्रु असतो.

उदास राहणं, मोबाईलवर स्क्रोलींग करत लोळत पडणं, आळशीपणा हेच आपल्याला पुन्हा पुन्हा निराशेच्या गर्तेत ढकलतात.

त्याउलट अशा वेळेस शरीराला खुप कष्ट करायला लावावेत, इतकं काम करावं की कामानं अक्षरशः थकुन जावं.

स्वतःला कामात असं काही झोकुन द्यावं की रात्री ग्लानी यायला पाहीजे, पडल्या पडल्या एकदम शांत झोप लागली पाहीजे.

कॉलेजात असाल तर जिममध्ये जा, वर्कआउट करा, एरोबिक्स, डान्सक्लास जॉईन करा, परवडत नसेल तर रोज दोन अडीच तास वॉकींग करा.

दिवसातुन थोडा वेळ एकट्यानेच जोरजोरात गाणी लावुन मनसोक्त नाचा, अंग दुखेपर्यंत नाचा, शरीरातली उर्जा बाहेर पडुन, नव्या उर्जेचा संचार होईल.

गरजुंना मदतीचा हात द्या

बॉलीवुडचं एक जुनं पण, खुप सुंदर गाणं आहे.

तुम बेसहारा हो तो किसीका सहारा बनो,
तुम्हे अपने आप सहारा मिल जायेगा,
पहुंचा दो कोई, कश्ती किनारेपे,
तुम्हे अपने आप किनारा मिल जायेगा.

ह्या जगाचा एक बेसीक नियम आहे, द्या म्हणजे मिळेल, स्मितहास्य द्या, स्माईल मिळेल, मान द्या, सन्मान मिळेल, आदर द्या, आपलेपणा मिळेल, बी लावा, झाड उगवेल, दान द्या, पैसे मिळतील. दिलेलं व्याजासकट वापस मिळतं, मग ते प्रेम असो वा इतर काहीही…

थोडं, आजुबाजुच्या, इतर, गरजु लोकांच्या आयुष्यात डोकावुन बघा!.. बघा किती मोठ्मोठी संकटं झेलतायतं ते, त्यांच्यासमोर तर आपलं दुःख क्षुल्लक आहे, स्वतःचं दुःख विसरुन, आता त्यांना मदत करा, बघा, तुमच्या एखाद्या साध्या कृतीने, कूणाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, तर एक आत्मिक समाधान मिळेल.

दुःखांना तलवार बनवण्याऐवजी ढाल बनवा.

प्रत्येक माणसाच्या मनात खोलवर भळभळणारं दुःख असतं, ते दुसऱ्याला जितकं साधं वाटतं, तितकी त्याची तीव्रता सहन करणाऱ्याला जाणवते, अशा दुःखांनी आयुष्यात उलथापालथ होते.

अशा परिस्थितीचा मी कित्येकदा अनुभव घेतला आणि ह्या दुःखांमुळेच मी आधीचा राहिलो नाही. प्रत्येक आघाताने अधिकाधिक मजबुत झालो. अधिकाधिक दृढ झालो.

दाग अच्छे है, च्या धर्तीवर मी जर “दुःख अच्छे है” असं म्हणालो तर तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल का?

बघा,

जेव्हा आपल्याला पैशाचा प्रचंड प्रॉब्लेम येतो, तेव्हा आपण बैचेन होतो आणि भरपुर पैसे कमवण्याचे अनेक रस्ते आपण शोधुन काढतो.

अहंकारामुळे भांडणं व्हायला लागली, तेव्हा आपल्याला नात्यांची किंमत कळते आणि आपण गोष्टी प्रेमाने हाताळायला शिकतो.

संधी मिळाल्या नाहीत, तेव्हा आपण स्वतःहुन नव्या संधी तयार करायला शिकतो.

व्यवसायात अनेक चुका केल्या, त्या अनुभवातुन बहुमोलाचे धडे आपण शिकतो.

प्रत्येक दुःख आपल्याला समृद्ध बनवत आहे.

फक्त त्याकडे ‘दुःख’ म्हणुन न पाहता एक ‘धडा’, एक ‘अनुभव’ म्हणुन नितळपणे पाहता आले पाहिजे.

दुःखामध्ये गुंतायचे नाही, बस्स!…

यापुढे तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस अधिकाधिक आनंद घेऊन येवो, अशा मनःपुर्वक शुभेच्छांसह….

मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.