सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या अनुमावशी – अनुराधा प्रभुदेसाई

आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो कि ज्यात पूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद असते. अशा प्रसंगात आपण काय निर्णय घेतो ह्यावर पुढली दिशा ठरलेली असते.
अनुराधा प्रभुदेसाई एक मध्यम वर्गीय, आपली नोकरी, आपलं कुटुंब ह्यात रमलेली.. एक सामान्य स्त्री.. २००४ ला सुट्टीत फिरायला कारगिल ला जाते, द्रास इथून प्रवास करत असताना भारतीय सेनेचा एक बोर्ड तिचं लक्ष वेधून घेतो त्यावर लिहिलेलं असतं.
I only regret that I have but one life to lay down for the country.
ते शब्द कुठेतरी त्यांच्या मनात खोलवर रुजतात. चौकशी केल्यावर त्यांना कळते कि, “आप को पता नही यहां तो हजारो लाशे गिरी थी” हे शब्द त्यांना आतून कुठेतरी अस्वस्थ करतात.
आपलं मुंबई मधलं एक सुखवस्तू आयुष्य जगताना ज्या देशात आपण रहातो त्याच्या दुसऱ्या भागात काय झालं ह्याची सुतराम कल्पना मला नाही!!!
१९९९ कारगिल मध्ये भारत – पाकिस्तान ह्यामध्ये युद्ध झालं; पण मुंबई मध्ये त्याची झळ काही जाणवली नाही. ती जाणवली नाही कारण अवघ्या २० ते २५ वयोगटातील तरुण मुलांनी इकडे रक्त सांडलं.
यांनी आपल्या जीवाचा त्याग ह्या देशाची इंच इंच भूमी वाचवण्यासाठी केला म्हणून आज आपण इकडे येऊ शकलो.
ह्या विचाराने अनुराधा प्रभुदेसाईंचं मन आतून कुठेतरी त्यांना विचारू लागतं कि, तू काय करू शकतेस?….
मग त्यांनी कारगिलच्या विजय स्तंभाच्या इथेच शप्पथ घेतात, “त्या तरुण सैनिकांचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही. ह्या सैनिकांचं बलिदानाची गाथा मी सामान्य नागरिकांपर्यंत नक्की पोहचवेन. त्या शिवाय पुढची पाच वर्ष मी कारगिलला नियमित भेट देत राहीन. “
ह्या नंतर जो सुरु झाला तो न थांबणारा एक प्रवास. कारगिल वरून परत आल्यावर अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून रक्षाबंधनाला कारगिलला येण्याची परवानगी मागितली.
सगळे सोपस्कार पूर्ण करून अनुराधा प्रभुदेसाई ह्या रक्षाबंधनाला सैनिकांच्या भेटीला कारगिलला पोहचल्या. सैनिक आणि तिथल्या सगळ्यांसाठीच हे सगळं नवीन होतं. एक सामान्य मध्यम वर्गीय स्त्री, एक सामान्य नागरिक आपल्या भेटीला इतक्या दूरवर सीमेवर येते ह्यातच सगळं काही आलं होतं.
सैनिकांशी जुळलेल नातं मग अजून घट्ट होतं गेलं. त्या नंतर जो कारवाँ सुरु झाला तो आजतागायत चालू आहे. विजय दिन आणि अनु मावशी ह्याचं नातं कारगिलला पक्क झालं ते कायमचं. मुंबईतील एक सामान्य स्त्री सैनिकांसाठी त्यांची ‘अनुमावशी’ झाली.
२००९ मध्ये स्वतः घेतलेली, ५ वर्षांची शप्पथ पूर्ण झाल्यावर पुढे आपण हा प्रवास करू शकू कि नाही ह्या बाबत साशंकता मनात असताना भारतीय सेनेचे ब्रिगेडियर पाल ह्यांनी अनुराधा प्रभुदेसाई ह्यांना हे सुंदर काम पुढे चालू ठेवण्याची ऑर्डर केली.
त्यातून जन्म झाला एका नवीन प्रवासाचा. ४ ऑक्टोबर २००९ ला ‘लक्ष्य फौंडेशन’ ची स्थापना झाली. सामान्य नागरिक आणि भारतीय सैनिक ह्यांच्यातील दरी कमी करणं हे मुख्य उद्दिष्टय समोर ठेऊन लक्ष्य चा प्रवास सुरु झाला.
लक्ष्य बद्दल लिहिताना अनुराधा प्रभुदेसाई लिहतात…..
कारवाँ बढता गया..
लक्ष्य फौंडेशन च्या माध्यमातून आज भारतीय सैनिक आणि भारतीय नागरिक ह्यांच्या मधील दरी कमी करण्यासाठी अनेक उपक्रम राबावले जातात जसे कि युवा प्रेरणा, व्हॅलेंनटाईन माय सोल्जर, प्रत्येक सैनिक एक पणती, मिशन वीर यात्रा, प्रोजेक्ट ३ सी, ४ डी, दिवाळी- भाऊबीज विथ सोल्जर, इत्यादी.
सध्या त्यांचा मेरा देश मेरी पेहचान हा कार्यक्रम लोकांना आपल्या देशाची जाणिव करून देण्यासाठी सुरु आहे. भारताबाहेर जाऊन जर आपल्याला भारतीय असल्याची जाणिव होते किंवा भारताची आठवण होते तर मग भारतात राहून का नाही?
ह्या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित आहे.
२६ जुलै २०११ ला लेफ्टनंट जनरल दस्ताने ह्यांच्याकडून अनुराधा प्रभुदेसाई ह्यांना सन्मानित करण्यात आलं. भारतीय सैनिक आणि नागरिक ह्यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आला.
लक्ष्य च्या माध्यमातून आजवर अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी भारताच्या फॉरवर्ड पोस्ट ज्यामध्ये थ्रेगाम, पंचगम, उरी, पाटण, जिंगल, रुस्तम ह्यांना भेट देऊन सैनिकांशी हितगुज केली आहे.
ह्या शिवाय पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड तर जम्मू मधल्या पुंछ, राजोरी, नागरोटा ह्यांना हि भेटी दिल्या आहेत. नुब्रा – सियाचीन इथल्या भारतीय सेनेच्या हॉस्पिटलला ही त्यांनी भेट दिलेली आहे.
मुश्कोव व्हॅली, द्रास, काकसर, बटालिक, तुर्तुक इकडे हि भेट दिली आहे, तर सगळ्यात दुर्गम असणाऱ्या सियाचीन बेस कॅम्पला भेट देऊन त्यांनी सैनिकांशी हितगुज केली आहे.
त्यांना पी.ओ.पी. म्हणजेच भारतीय सेनेच्या ‘पासिंग आऊट परेड’ साठी पुणे, चेन्नई, बेळगाव, लेह ह्या ठिकाणी भारतीय सेनेतर्फे बोलावण्यात आलेलं आहे.
ह्या शिवाय शाळा, कॉलेज, मान्यवर संस्था ह्या मधून जवळपास १२०० हून अधिक वेळा सामान्य नागरिक, विद्यार्थी ह्यांच्याशी संवाद साधून तर पुस्तक, कविता सैनिकांच्या पराक्रमावर लिहून, अशा सगळ्या माध्यमातून भारतीय सैनिक आणि सामान्य नागरिक ह्यांच्यामधील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
अनुराधा प्रभुदेसाई ह्यांचा हा प्रवास म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला आदर्श आहे. एक सामान्य स्त्री, ठरवलं तर काय करू शकते ते भारतीय सेनेतील प्रत्येक सैनिकाला समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांना अनकेदा निशब्द करतो.
ज्या स्वातंत्र्याची आज आपण फळे खातो आहोत. ज्या लोकशाही मधील आपल्या कर्तव्यांबद्दल इतके जागरूक आहोत ते आज आपल्याला विरासत म्हणून मिळालेलं असलं, तरी ते टिकवण्यासाठी आजपण प्रत्येक क्षणाला आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीय सैनिक आपलं रक्त सांडत आहे म्हणूनच टिकून आहे. त्याची जाणीव पण आपण आज ठेवत नसू तर आपल्या सारखे कृतघ्न आपणच!
त्याच सैनिकाला, त्याच्या समर्पणाला सामान्य नागरिकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई ह्यांना माझा साष्टांग दंडवत!
तळटीप:- २०१५ साली अनुमावशी सोबत कारगिलला जातानाचा अनुभव माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आहे. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा एक क्षण म्हणजे कारगिल इथला विजय दिवस. माझ्या विचारांना एक नवीन दिशा देण्याचं काम अनुमावशी तू केलं आहेस त्यासाठी मी तुझा आजन्म ऋणी आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
Thanks for the information. We r proud of all soldiers.