व्यसनाच्या आहारी गेलेले नितीन घोरपडे जिद्दीने आयर्नमॅन होतात तो प्रेरणादायी प्रवास

आयर्नमॅन
आयर्नमॅन

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सगळेच धडपड करतात. काही यशस्वी होतात तर काही पराभूत! पण ह्याही पलीकडे काही माणसं असतात कि जी यशाच्या शिखरावर जाऊन, पराभवाच्या गर्तेत खोलवर रुततात. सगळं काही संपलं असं वाटत असताना फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेतात. ती भरारी वेगळी असते कारण आयुष्याच्या दोन्ही टोकाचा अनुभव त्याच्या मागे असतो. अशा वेळी पुन्हा एकदा उंची गाठल्यावर मिळालेल्या यशाचं समाधान हे शब्दात सांगता येतं नसतं. औरंगाबाद च्या आयर्नमॅन नितीन घोरपडे ह्यांचा प्रवास हा असाच आयुष्याच्या दोन टोकाला स्पर्श केलेला आहे. आयर्नमॅन हा किताब मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. शारिरीक क्षमतेची कसोटी घेणारा हा किताब मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात अन् मिळवतातही पण नितीन घोरपडे ह्यांनी हा किताब नुसता मिळवलेला नाही तर जगलेला आहे. कारण त्यामागे आहे असा एक भूतकाळ ज्याचा विचार केला तर त्याचं हे कर्तृत्व अशक्य वाटतं.

अतिशय गरीब आणि हालाखीच्या परिस्थितीत त्याचं बालपण गेलं. दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करणारी आई आणि पदरी ४ मुलं अशा खडतर परिस्थितीत आपल्या आईला आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. सकाळी पेपर टाकून शाळा आणि शिक्षण सुरु होतं. आजूबाजूची संगत वाईट असल्याने दारूचं व्यसन लागायला वेळ गेला नाही. आधी थ्रील म्हणून तर नंतर लहानपणी हातात आलेल्या पैशामुळे त्याचं व्यसनात रुपांतर कधी झालं हे त्यांनाहि कळालं नाही. ट्रान्सपोर्टचा बिझनेस बहरायला लागला आणि हातात पैसे येताच पैसे आणि दारू ह्याचं समीकरण जुळून आलं. आधी दारू ने नशा होत होती; पण ती पण कमी पडायला लागली. मग प्रवास सुरु झाला तो गांजा, चरस, ब्राऊन शुगर पर्यंत… हे ही कमी पडायला लागलं म्हणून अगदी स्नेक बाईटचा ही आसरा घेतला. हो नशा करण्याच्या प्रकारात स्वतःला सापकडून डसवून घेणं. हा अघोरी प्रकार सुद्धा केला जातो. (सगळी व्यसनं नुसती शरीर आतून पोखरत नव्हती तर हा प्रवास रसातळाला सुरु होता.)

२४ तास दारूच्या नशेत नितीन घोरपडे राहू लागले. एकदा त्याच नशेत २ दिवस गायब ही झाले. दोन दिवसांनी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी सापडले. तिकडे आपला प्रवास कसा झाला ह्याची आठवण ही होत नव्हती इतकी परिस्थिती आता हाताबाहेर गेली होती. आता दारू घेतली तर आयुष्याचा शेवट आहे हे डॉक्टरांनी नितीन घोरपडेनां सुनावलं परंतु काही दिवस दारू शिवाय काढल्यावर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती कायम राहिली.

पुन्हा एकदा दारू त्यांच्या रक्तातून धावायला लागली आणि पुन्हा त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले. २२ दिवस हॉस्पिटल मध्ये राहिल्यावर त्यांना काहीच आठवत नव्हते. तिकडून घरी आल्यावर काही मित्रांनी त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात नेले. त्याचे चांगले परिणाम दिसायला लागले. एप्रिल २०१० मध्ये नितीन घोरपडे ह्यांनी दारूला रामराम ठोकला तो कायमचाच. पण ह्या काळात सगळ्याच गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. एकीकडे शरीर आतून पूर्ण निकामी झालं होतं; वजन अवघं ४२ किलोवर आलं होतं. तर दुसरीकडे व्यसनामुळे व्यवसायामध्ये जवळपास एक कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर झालं होतं. सगळीकडून सगळ्याच आशा संपुष्टात आल्या होत्या!!

त्यांनी पुन्हा एकदा व्यवसायाकडे लक्ष दिलं. २०१५ पर्यंत व्यवसाय पुन्हा एकदा सुरळीत झाला. शरीर पुन्हा पूर्ववत होते आहे असं वाटू लागताना त्यांना चालताना ही दम लागू लागला. दारूने आतून पोखरलेल्या शरीराने आता त्याचे दुष्परिणाम दाखवायला सुरवात केली होती. तेव्हाच त्यांनी निश्चय केला पुन्हा एकदा फिट व्हायचं. आता त्यांना नशा लागली ती फिटनेस ची…

रोज धावणे, सायकलिंग करत असताना नितीन घोरपडे ह्यांनी २०१५ ला एका मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. तिकडे पहिल्या पाचात त्यांनी नंबर पटकावला. मग जिद्द आणि नशा अजून वाढली. तिकडून मागे वळून न बघता हैदराबाद हाफ मॅरेथॉन (२१ किमी) आणि मग २०१६ साली मुंबई मॅरेथॉन मध्ये (४२ किमी) अंतर पूर्ण केलं. मग अजून एक शिखर त्यांना खुणावू लागलं ते म्हणजे आयर्नमॅन ट्रायथलॉन ही शर्यत.

१९७८ पासून आयर्नमॅन ही स्पर्धा सुरू आहे. जागतिक ट्रायथलॉन महासंघ ‘आयर्नमॅन’ स्पर्धेला मान्यता देते. भारतात या स्पर्धेच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षाविषयक मानके त्यांच्या पद्धतीने पाळले जात नाहीत. त्यामुळे ही स्पर्धा भारतात आत्तापर्यंत होऊ शकलेली नाही. साहजिकच विदेशात जाऊनच या स्पर्धेत सहभागी व्हावे लागते. जलतरण, धावणे व सायकलिंग अशा तीन प्रकारांत निर्धारित वेळेत अंतर कापणे या स्पर्धेत आवश्यक असते.

नितीन घोरपडे ह्यांच्या समोर आव्हान खूप मोठं होतं. त्याचं शरीर ज्या बदलांना सामोर गेलं होतं त्यातून अशा खडतर स्पर्धेत भाग घेणं म्हणजे एक मोठं शिवधनुष्य होतं. पण जेव्हा स्वप्नांना जिद्द आणि मेहनतीची जोड मिळते तेव्हा स्काय इज द लिमिट!

प्रवास सुरु झाला. आता एकच स्वप्न आणि एकच ध्यास ते म्हणजे ‘आयर्नमॅन’ हा किताब. प्रशिक्षक अभिजित नारगोळकर ह्यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण सुरु झालं. सकाळी ४ ते रात्री ९ असा पूर्ण दिनक्रम आखून त्यात जिम, सायकलिंग, धावणे आणि पोहणे अशा सर्व गोष्टींचा सराव ते करत होते. स्पर्धा जर्मनी मधल्या हॅम्बर्ग इकडे होणार होती. त्यामुळे तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं हे खूप मोठं आव्हान त्यांच्या जवळ होतं. नितीन घोरपडे ह्यांना या स्पर्धेत १५ तास ५० मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यात नदीतील ३.८ किलोमीटरचे अंतर २ तास २० मिनिटात पोहून गाठायचे होते. यानंतर सायकलिंगचे १८० किलोमीटरचे अंतर ७ तास १० मिनिटे आणि रनिंगमधील ४२ किलोमीटरचे अंतर ६ तास १० मिनिटांमध्ये पूर्ण करायचे होते.

जर्मनी मधल्या थंड हवामानात वातावरणाशी जुळवून घेऊन हा किताब मिळवणे म्हणजे एक खडतर लक्ष्य समोर होतं. प्रत्यक्ष जुलै महिन्यात तिकडे गेल्यावर परिस्थिती उलट होती. तापमान ३० डिग्री च्या आसपास होतं सरावात वापरलेली सायकल आणि प्रत्यक्ष सायकल ह्यात खूप तफावत होती. पण आता मागे वळायचं नाही हा एकच विचार मनात ठेवून नितीन घोरपडे ह्यांनी स्पर्धेला सुरवात केली. फक्त १२.४९ तासात त्यांनी ‘आयर्नमॅन’ ह्या किताबाला गवसणी घातली. त्यांनी अनेक अल्ट्रा रन केल्या आहेत ज्यात खारदुंगला ह्या जगातील सगळ्यात उंचीवरच्या रस्त्यावरची ७२ किमी ची रन समाविष्ट आहे. पुणे अल्ट्रा रन १०० किमी. १५.४९ तासात पूर्ण केली आहे, मुंबई नाशिक सह्याद्री अल्ट्रा रन १६१ किमी ३२ तासात पूर्ण केली आहे. २४ तासाची स्टेडीयम रन ज्यात त्यांनी १३५ किमी. अंतर धावलं आहे. ह्या शिवाय त्यांनी सायकलिंगच्या ३ एस.आर. (Super Randonneur) पूर्ण केल्या आहेत. (200+300+400+600km= 1 एस.आर.). हाफ आयर्न डिस्टन्स कोल्हापूर ६.१८ तासात पूर्ण केली आहे ज्यात (१९०० मीटर पोहणे + ९० किमी सायकलिंग + २१ किलोमीटर रन) सामाविष्ट आहे.

आयर्नमॅन हा किताब अनेकांना मिळाला असेल पण नितीन घोरपडे ह्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. एक दारू पिऊन आयुष्य उध्वस्त झालेला माणूस ते ‘आयर्नमॅन’ हे दुर्दम्य इच्छाशक्ती च उदाहरण आहे. कधीकाळी दारूच्या नशेत चोवीस तास असणारे नितीन घोरपडे ‘अल्कोहोलिक अनॉनिमस'(अनामिक मद्यपी) 👈 येथे संस्थेच्या नावावर क्लिक केल्यास या संस्थेची वेबसाईट ओपन होईल. व्यसन सोडवण्यासाठी याचा आधार गरजूंनी आवर्जून घ्यावा. तसेच व्यसनाच्या आधीन असलेल्यांना हे शेअर करावे. ह्या संस्थेच्या मदतीने जी २०० पेक्षा जास्त देशात कार्य करते त्यांच्या सोबत दारूच्या गर्तेत गेलेल्या लोकांना पुन्हा त्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी काम करत आहेत. ‘लोकांना सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ ह्या उक्ती च्या अगदी विरुद्ध त्यांनी ह्या लढ्यात आपला आयुष्याच्या दोन टोकांचा प्रवास लोकांसमोर मांडला आहे. एकेकाळी जगणार की नाही अशी शाश्वती नसणारे नितीन घोरपडे मराठवाड्यातील पहिले आयर्नमॅन ठरले आहेत. अजून हा प्रवास संपलेला नाही. ह्यापुढचं लक्ष्य त्यांनी निर्धारित केलं आहे. आपल्या आधीच्या वेळेपेक्षा कमी वेळात डेन्मार्क इकडे होणारी पुढली आयर्नमॅन स्पर्धा जिंकण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. त्यांचा हा राखेतून उडणाऱ्या फिनिक्स पक्ष्याचा प्रवास सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या आयर्नमॅन किताबासाठी त्यांचं अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!!!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. prajwaldhawale says:

    सर मि यसनि आहे मला तुम्ही काही मार्गदर्शन करावे ही विनंती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!