तुमच्या लहान बाळाला भरवताना त्याच्या हातात मोबाईल देता का तुम्ही?

चला, आज एक अगदी नवा पण रोजच्या आयुष्यात भेडसावणारा प्रश्न सोडवण्यासाठी आलोय आपणासमोर!
एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे खरे पाहता बरेच आहेत. कोणाला एकत्र कुटुंब नको असतं ? सर्वांनाच खरे पाहता हवं असतं, पण एकमेकांना समजून घेऊन चालण्यासाठी जो पोक्तपणा लागतो, प्रेम, क्षमाशीलता हवी असते.
विश्वास हवा असतो तो कमी पडल्यामुळे एकीचे विभाजन होते, कुठे सूनेची, कुठे सासूची तर कुठे ननंदेची तर कुठे जावेची तर फार क्वचित सासर्याची चूक पहावयास मिळते. अशीच इतर नात्यांचीही चूक असू शकते.
एखादा अन्नपदार्थ बनवताना मूळ पदार्थांबरोबर जसे अग्नि, भांडे, मसाले इ. सर्व गोष्टी, योग्य जुळून आल्या तरच तो स्वादिष्ट होतो तसेच संसाराचे असते; सासू, सून, नवरा, जाव, ननंद, सासरा यापैकी एकाचे जरी गणित फसले की संसाराची चव बिघडलीच समजा !
दरवेळी पटत नसल्यानेच विभक्त रहावे लागते असे नसून, बर्याचदा अर्थाजनासाठी सुद्धा कुटुंबापासून लांब रहावे लागते. अशा वेळी होणार्या मूलास आजी आजोबांचे प्रेम मिळत नाही, व्यस्त जीवनशैलीमुळे बाळाला वडीलांचा सहवास व प्रेम ही पुरेसे मिळत नाही.
नातेवाईकांपासून आधीच लांब असल्याने नि त्यात शहरातले वास्तव्य म्हणजे शेजारधर्म ही बर्याचदा कमी आढळतो, या सर्व गोष्टींमुळे बाळासाठी आई व वडील हेच जीवन, त्यामुळे जास्त माणसांत गेले कि किंवा साधे गार्डन मध्ये गेले तरी बाळ बावरते.
त्यात बाळ झोपेल त्यावेळेतच काय ती कामे करून घेणे, नवरा असेपर्यंतच महत्वाची कामे उरकणे, अन्यथा जेवणही धड खायला वेळ मिळत नाही किंवा घाईघाईत खावे लागते अशी एकंदर आईची अवस्था असते.
आधीच बर्याच भारतीय स्त्रिया ऍनिमियाने ग्रस्त म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबीनची कमतरता त्यात रात्रीचे बाळामुळे होणारे जागरण नि दिवसभर न संपणारे काम यामुळे चारी मुंड्या चित झाल्याने अंगावरचे दूधही लवकर कमी येण्याची दाट शक्यता असे एकंदर चित्र असते.
बाळाला खेळवायलाही घरात दुसरे कोणी नसल्याने जरा खाऊ घालताना बाळ रडु लागले की यु ट्यूबवर बाळांसाठीच्या गाण्यांचा व्हिडियो लावून, कसेतरी त्याचे मन रमवून त्याला चार घास भरवणे.
अशी एकदा योजलेली युक्ती कधी नेहमीचीच सवय होउन जाते, कळतही नाही नि त्यात काही गैर असते, हे ही बर्याच जणांना माहित नसते.
सहाव्या महिन्यापासून मूल थोडे थोडे वरचे खाऊ लागले की दरवेळी हे व्हिडियो, रोज किमान चार वेळा तरी दाखवले जातात. त्यात मोबाईलची स्क्रिन टि.व्ही.पेक्षा लहान असल्याने तो जास्त अंतरावर ठेवलाही जात नाही.
त्यातच आता विविध कंपन्या व संस्थांच्या जाहिरातीही यात येतात त्यामुळे स्किप ऍड करायसाठी मोबाईल जास्त लांबही ठेवायची फजिती. ब्राईटनेस झिरो करायचेही बर्याचदा राहून जाते.
अहो, आमचा हा रोज “चला जाऊ दे नव” गाणं लावल्याशिवाय जेवतच नाही, असे अभिमानाने सांगितले जाते!
तर काही घरात सारखा स्मार्टफोन बाळांच्या हातात दिला जातो नि वरून मोठ्या स्क्रिनचा एल ई डि टिव्ही छोट्या भाड्याच्या घरातहि वापरला जातो.
खरे पाहता मोठ्या टि.व्हि साठी दोन भिंतीतले अंतर जास्त असायला हवे, अन्यथा खूप जवळून मोठी एल ई डी स्क्रिन पाहिली जाते, जे डोळ्यांसाठी हानिकारक असते.
आज बर्याच बालकांना ३ – ५ वर्षातच चष्मे लागत आहेत व त्याचे कारण म्हणजे अगदि लहान पणापासूनच त्यांच्या हाती दिला जाणारा मोबाईल व जवळून टि.व्हि., कम्प्युटर इ. पाहण्याची सवय !
👉 हि सवय कशी मोडायची त्यावरील हा आजचा लेख खास आपणासाठी सादर आहे.
कारण शेवटी प्रश्न बाळाच्या डोळ्यांचा आहे !
आता पाहूयात हि यु ट्यूब व्हिडियो दाखवण्याची आवश्यकता का निर्माण झाली ? नि ती मूलभूत गरज आहे का ?
बाळाची आई :- अहो डाॅक्टर, हा खाताना खूप किटकिट करतो. अजिबात एका जागी स्थिर बसत नाही. सारखी वळवळ चालू असते. व्हिडियो लावल्यावर शांतपणे खातो.
डाॅक्टर :- मला सांगा ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांची मुले खातच नाहित का? त्यांच्या माता काहीतरी वेगळा उपाय करतच असतील ना!
बाळाची आई :- खेळण्याने खेळवत असतील.
डाॅक्टर :- मग तुम्ही सुद्धा तसे करु शकता.
बाळाची आई :- अहो पण तो कोणत्याच खेळण्यात जास्त वेळ रमत नाही.
डाॅक्टर :- मला सांगा तुम्ही खेळणी कुठे ठेवता ?
बाळाची आई :- एका बाॅक्समध्ये
डाॅक्टर :- अहो, पण बाॅक्स कुठे ठेवता? ते पण सांगा ना! हे बरयं, कुठे राहता? विचारल्यावर घरात राहते असं उत्तर दिल्यासारखं झालं हे !
बाळाची आई :- (हसत हसत) एका खोलीच्या कोपर्यात जमिनीवरच.
डाॅक्टर :- अहो आता एक काम करा, घरी गेल्यावर सर्व खेळण्यांचे बाॅक्स बेडवर म्हणजे उंचावर ठेवा, जिथे तो जाऊ शकत नाही, नि त्याला कंटाळा येईल तसे एक एक खेळणे काढून द्या. तीच खेळणी एका वेळी सर्व न दिसल्याने त्याचा खेळण्यातील रस निघून जाणार नाही. तोच तोचपणा वाटणार नाही व चांगला रमायला लागेल.
बाळाची आई :- हो डाॅक्टर मी नक्की करुन पाहते असं.
पण नुसत्या खेळण्याने समजा खाऊ पूर्ण होई पर्यंत तो रमला नाही तर काय करायचे ? ते पण सांगून ठेवा.
डाॅक्टर :- मला सांगा पूर्वीच्या काळी आई बाळाला चारताना काय करायची? किंवा तुमची आई किंवा सासुबाई बाळाजवळ असत्या तर त्यांनी काय केले असते? मोबाईलवर गाणे लावून द्या तर मुळीच म्हटल्या नसत्या ना!
बाळाची आई :- अहो तो तर त्यांना अजिबात त्रास देत नाही, त्यांच्याकडून भरभर खातो, न त्रास देता. गावी गेल्यावर आम्ही अनुभवले आहे.
डाॅक्टर :- काय करतात त्या?
बाळाची आई :- बालगीते किंवा बडबड गीते गातात.
डाॅक्टर :- मग तुम्ही पण गा ना!
बाळाची आई :- मला येत नाहित ओ.
डाॅक्टर :- अहो, कोण आईच्या पोटातून शिकून येतं का ? तुम्ही पण शिका ना !
बाळाची आई :- डाॅक्टर तेवढा वेळ असतो का आम्हाला ? मी एकटि सर्व कशी हॅण्डल करते ? घरातलं सर्व बघून मलाच माहित.
डाॅक्टर :- स्वयंपाक करताना तुम्ही मोबाईलवर बालगीते लावून ऐकू शकता ना! कि त्याला पण वेळ नाही! तेव्हा ऐकून ऐकून तुमची बालगीते पाठ होतील व तिच तुम्ही बाळाला चारताना गायची म्हणजे सुटला ना प्रश्न! किंवा बाळाला खाऊ घालताना मोबाईलवर बालगीते लावून मोबाईल लांब ठेऊन हातात एखादे खेळणे जे बरेच दिवस दिले नव्हते, ते देऊन तुम्ही गुणगुणत चारु शकता, नि पाठ झाले कि, विना मोबाईल तम्हीच म्हणा. आता तर लागला ना तुमच्या प्रश्नांचा सोक्ष मोक्ष!
बाळाची आई :- हो ना डाॅक्टर, खूप छान पद्धतीने समजावलंत तुम्ही.
डाॅक्टर :- उत्तरं तर तुम्हीच दिलीत तुमच्या प्रश्नांची. मी तर तुम्हाला फक्त जाणीव करुन दिली, नि थोड्या प्रॅक्टिकल टिप्स दिल्या, बस!
बाळाची आई :- मस्तच डाॅक्टर, खूप बरं वाटलं ! आता मी त्याची व्हिडियोची सवय लवकरच घालवेन. धन्यवाद सर!
५ दिवसानंतर बाळाची आई पुन्हा भेटायला आल्या नि म्हणाल्या डाॅक्टर तुम्ही म्हणाल्या प्रमाणे करून पाहिलं, पहिल्या दिवशी ५ – १०% त्रास दिला त्याने नि अगदि दुसर्याच दिवसापासून काहीच न दमवता खाऊ लागला.
व्हिडियो दाखवल्याशिवाय तो खाणारच नाही हा आमचाच समज होता. त्याला व्हिडीयो पाहण्याची सवय लागली होती म्हणण्यापेक्षा, आम्हालाच तो दाखवण्याची सवय लागली होती. बरं झालं तुम्ही आमचा मेंटल ब्लाॅक घालवलात.
लेखक : डॉ. मंगेश देसाई
मोबाईल : ७३७८८२३७३२
Picture Credit : www.theindusparent.com
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
खूपच छान माहिती आणि लेख