रोजच्या जगण्यात संवादाचं महत्त्व काय? संवाद साधले तर वाद संपतील का?

साधता संवाद…. संपतील वाद…!

संवाद हा प्रत्येक नात्याचा प्राणवायू आहे…. मग ते नातं पालक-पाल्यांचं असो, प्रियकर-प्रेयसीचं असो, नवरा-बायकोचं असो कि मित्र- मैत्रिणीचं. एकमेकांवरचा विश्वास आणि संवादावरच नात्यांची भिस्त असते. संवादा शिवाय नातं फुलतंही नाही आणि बहरतंही नाही. ज्याप्रमाणे फेव्हीकॉल दोन गोष्टी एकमेकांना जोडून ठेवण्याचे काम करतो. त्याच प्रमाणे दोन माणसे, नाती, व्यवहार जोडून ठेवण्याचे काम संवाद करतो. नात्यातील कुरबुरी बऱ्या करून नात्यांना लयबद्धता देणारं ते एक वंगण आहे, संवाद

घडला नसता संसार,
जुळली नसती नाती।।
नसता जर संवाद,
तर घडल्या नसत्या भेटी।।

या कवितेत संवादाचं महत्व अगदी सुरेखपणे रेखाटण्यात आलं आहे. तसेही, संभाषण वा संवाद साधण्याची कलाच माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं आणि सरस ठरविते. संवाद हाच सगळ्या समस्यांवरचा उत्तम उपाय आहे. हा आमचा-तुमचा सर्वांचा रोजचा अनुभव आहे. पण तरीही आज नात्यातला संवाद हरवत चाललाय. लोक एकमेकांशी खूप बोलतात पण त्यांच्या बोलण्यात मोकळेपणा नाही तर कृत्रिमपणा असतो. सु-संवादापेक्षा वि-संवादाचे संभाषण अधिक केल्या जाते. त्यामुळे माणसामाणसातील नात्याचे बंध उलगडू लागले आहेत. पित्याचे आपल्या मुलाशी जमत नाही. नवरा आणि बायकोच्या नात्यात किती सुसंवाद उरलाय, याचं उत्तर कौटुंबिक न्यायालयात गेलं कि कळते. मित्र मैत्रिणी किंवा प्रियकर प्रेयसी यांच्या नात्यात आलेल्या दांभिकपणाबद्दल तर बोलायलाच नको. व्यावहारिक हितसंबंधांचा विचार करून कृत्रिम मैत्र्या केल्या जातात. गरज संपली किंवा एकदा छोटासा समज- गैरसमज झाला संवादाचे दरवाजे बंद केल्या जातात. बऱ्याच वेळा वाद होतो म्हणून संवाद टाळला जातो. पण, त्यामुळे तर्क कुतर्कांच्या लहरी निर्माण होऊन एकेमकांत गैरसमज येतात. साध्या साध्या गोष्टीतील विसंवाद वर्षानुवर्षे जपलेल्या नात्याला तडा देण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे परिस्थिती कशीही असो नात्याची वीण घट्ट करण्यासाठी संवादाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवायला हवे.

पूर्वी संवादाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. प्रत्यक्ष भेटून किंवा पत्राच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला जायचा. हल्लीच्या आधुनिक युगात कम्युनिकेट करण्यासाठी बरीच साधनं उपलब्ध झाली आहेत. या साधनांमुळे जगाच्या या टोकावरील माणूस त्या टोकावरच्या माणसाशी जोडला गेला. पण त्यांच्या जवळच्या नात्यामधील कम्युनिकेशन गॅप ची छाया गडद होऊ लागली आहे. घरातील माणसं घरातल्या माणसांशी महिनामहिना बोलत नाहीत. बोलली तरी त्यांच्यात संवादाऐवजी वितंडवादच अधिक असतो. उदाहरणादाखल नवरा-बायकोच्या नात्याची अवस्था बघा. पती-पत्नीमध्ये अनेकदा दोघेही आपापल्या ठिकाणी योग्य असले तरी परस्परांसाठी आयोग्य ठरतात. आपआपसातील विरोधाभासावर संवाद न साधल्याने कितीतरी नाती तुटल्याची उदाहरणे आहेत. पती-पत्नीचे नाते सर्वस्वी प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असते. प्रेम असो कि विश्वास हा सुसंवादाशिवाय टिकून राहू शकत नाही. भांडय़ाला भांडे लागते त्याप्रमाणे पती-पत्नी या पवित्र नात्यात घरगुती वाद होणे स्वाभाविक आहे. पण या वादाच्या आगीवर संवादाचं पाणी वेळीच टाकल्या गेलं पाहिजे. आजच्या काळातील पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आणि आर्थिक स्वावलंबी झाली आहेत. त्यामुळे कुणी कुणाचे ऐकायचे? या अहंकारी भावनेवरूनच खरा वाद होतो. यावर संवाद साधला गेल्यास नात्यातील माधुर्य टिकून राहू शकेल. त्यामुळे ज्या गोष्टी पटत नाही त्यावर मनमोकळा संवाद साधता आला पाहिजे. ‘मेड फॉर इच अदर’ हा घासून पुसून स्वच्छ करुन फक्त वापरायचा शब्द नाही तर एकमेकांनी एकमेकांच्या विचार प्रवाहाला समजून घेऊन जगण्याचा मार्ग आहे, हे उमजून घेतले पाहिजे.

तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतॊय…. काम शाळा नोकरी यामुळे आधीच वेळ मिळत नाही त्यातच तंत्रज्ञांच्या वापरामुळे नात्यातील संवाद कमी होतोय. त्यामुळे नातेसंबंध दृढ करण्यासाठी आता आपल्याला संवादाचे दरवाजे उघडावे लागतील. संवाद ही कला आहे. आपण काय बोलतो यावर नात्याचं भवितव्य अवलंबुन असतं. आपल्या बोलण्यानं एखाद्याला प्रेरणाही मिळू शकते किंवा एखाद्याचं मनही दुखू शकतं. म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात,

बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर |
पाडू नये चरे ||

संत तुकाराम महाराज

समोरच्याचे मन दुखणार नाही असं बोलता आलं कि तो संवादाचं ठरतो. अर्थात, संवाद ही कला असली तरी त्यासाठी फार काही मोठ्या स्किल्सची आवश्यकता आहे, असे नाही. आपल्या प्रेमाच्या माणसांशी बोलताना मनात आणि शब्दात प्रेम, आपलेपणा आणि आत्मियता असली कि प्रत्येक शब्द संवाद ठरतो. समोरच्याचे एकूण आणि समजून घ्यायची तयारी असली तर क्षणात हा संवाद सुसंवाद बनतो.

‘अरे म्हणता कारे येते.. बोलल्यासारखे उत्तर येते’ समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकानुसार आपण लोकांना ज्या शब्दात बोलू त्या शब्दात त्यांच्याकडून उत्तर येत असते. त्यामुळे आपण वादा ऐवजी संवादाची भूमिका ठेवली तर मनस्ताप होत नाही. मुळात आपल्याला संवादातील मर्म समजून घेण्याची गरज आहे. भाराभर बोलणे म्हणजे संवाद नाही, तर तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे,

थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे | मुद्देसूद बोलणे | ही संवाद कला..

ती आपण आत्मसात केली पाहिजे. बरेचदा एकेमेकांशी बोलताना आपला सूर निव्वळ चौकशीचा असतो. संभाषणात तोचतोपणा आला की एकतर ते कंटाळवाणे होते आणि दुसरे म्हणजे दोन व्यक्तींमध्ये अंतर निर्माण करते. अशा संवादातून कुणी उलट तपासणी घेत असल्याचा भास होतो. त्यापेक्षा मनमोकळं बोलण्यावर आपण भर दिला तर नात्यात आपुलकी निर्माण होऊ शकेल. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण एकेमेकांशी बोललं पाहिजे. आपण संवाद करत नाही म्हणून आपल्यातले वाद कधीच संपत नाहीत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. माणसाचं जीवन क्षणभंगुर आहे… खोलवर विचार केला तर, जन्मापासून ते मरणापर्यंतचं आपलं जीवन फक्त ‘एका श्वासाचं’च आहे. बहिणाबाई यांच्या शब्दात मांडायचं झालं तर..

आला सास, गेला सास,
जीवा तुझं रे तंतर.
अरे जगनं मरनं,
एका सासाचं अंतर

कवयित्री बहिणाबाई

हेच श्वासाचं अंतर सुफल व आनंददायीपणे जगलं पाहिजे. आपल्याजवळ श्वास किती बाकी आहेत, आपल्याला माहित नसतं. परंतु जे हातात आहेत ते तरी किमान आपण गुण्यागोविंदाने जागून घेतले पाहिजे. साध्या साध्या कारणांवरून आपल्याच माणसावर आपण कशासाठी राग धरायचा? वाद करून किंवा अबोला धरून हशील तरी काय होणार आहे… त्यामुळे चला, जाणतेपणे किंवा अजाणतेपणी झालेल्या चुका सुधरुया….. जीवनातील त्रासदायक व निगेटिव्ह भूतकाळावर पडदा टाकूया…… आणि एकेमकतील नात्यांचे बंध घट्ट करण्यासाठी संवाद साधूया…. कारण, साधता संवाद….. संपतील वाद…!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय