चकवा- मराठी कथा

मराठी कथा

हि उत्कंठावर्धक कथा शेवट्पर्यंत पूर्ण वाचा.

आज सकाळी खूप दिवसांनी छान जाग आली आहे. ‘फ्रेश’ वाटतंय. कितीतरी दिवसांनी झोप पूर्ण झाल्यासारखी वाटतेय. हल्ली रोज झोपेतून उठल्यावर डोकं जड वाटायचं, आज सगळंच हलकं वाटतंय.

डोकं आणि शरीर सुद्धा. सवयीप्रमाणे मान फिरवून मी शेजारी बघते. नवरा आधीच उठलाय, पांघरुणाची नीट घडी करून ती उशीवर ठेवली आहे. कमाल आहे, रोज पांघरूण तसंच असतं, त्याच्याबाजूचं बेडशीट ही विस्कटलेलं असतं. हा उठणार आणि तसाच बाहेर जाणार मग मी उठून सगळं आवरायचं.

आज असं काय झालं? आणि गेला कुठे? बहुतेक चालायला गेला असेल. तसे आम्ही रोजच सकाळी चालायला जातो पण हल्ली माझी झोप काहीकेल्या पूर्ण होत नाही म्हणून मला न उठवता एकटाच जातो तो. मी केस बांधायला घेते, मुलांचं आवरायला हवं. मोठ्याची ट्युशन, मग शाळा. त्याचे दोन डबे. छोटीसाठी नाश्ता.

दादा गेल्यावर तिचा अभ्यास मीच घेते. तिचा फक्त जेवणाचा डबा. नाश्त्याची तयारी करेपर्यंतच नवरा येईल चालून. त्याला सकाळी अंडी उकडून लागतात. मग छोटीला सोडायला शाळेत जायचं. येताना ती आणि दादा एकत्रच बसने येतील आणि “भूक लागली” म्हणत अख्खं घर डोक्यावर घेतील. आज त्यांच्यासाठी छान दडपे पोहे करू असा विचार करत करत मी अंडी काढायला फ्रिज उघडते.

मी गोंधळले आहे. फ्रिजमध्ये काहीच जागेवर नाहीये. अंडी सुद्धा नाहीयेत. दुधाचं फक्त एक छोटं भांडं! आता मुलांना सकाळी दूध कसं देऊ? नवऱ्याला येताना आणायला सांगावं असा विचार करत मी पटकन खोलीत येते. माझा मोबाईल कुठे गेला?

मला तर झोपताना साईडटेबलवर ठेवायची सवय आहे. मी सगळीकडे फोन शोधत आहे. कपाटातल्या ड्रॉवरमध्ये मिळाला. मोबाईलसारखी उपयोगी वस्तू इतक्या आत कशी ठेवेन मी? हे माझ्या नवऱ्याचंच काम असणार. रात्री मी फेसबुक बघत बसते ते त्याला आवडत नाही म्हणून त्याने लपवून ठेवला असणार.

मी नवऱ्याचा नंबर लावते. “The number you are calling does not exist. आपण प्रयत्न करत असलेला नंबर अस्तित्वात नाही.” असंच ऐकू येत आहे फक्त. असं कसं होऊ शकतं, हल्ली ह्या मोबाईल कम्पन्या फालतू झालेल्या आहेत असा विचार करून मी पुन्हा नंबर फिरवते. परत तेच.

कमाल आहे. माझं लक्ष घडाळ्याकडे जातं. ७:२० झाले आहेत म्हणजे पाच एक मिनिटात परत येईलच. वरून हाक मारून सांगितलं की झालं काम असं म्हणत मी गॅलरीत जाते.

बापरे, इथे असं काय झालंय सगळं? झाडांची किती पानं गळून पडली आहेत. मी दर दोन दिवसांनी बाल्कनी झाडते, आठवड्यातून एकदा धुते. मग हे असं कसं शक्य आहे? गुलाबाचं रोप मरत आलंय, जास्वंदीला कीड लागली आहे.

असं एका रात्रीत सगळी उलथापालथ कशी झाली? कठड्यावर धुळीची पुटं आहेत. रोज संध्याकाळी मुलं खाली खेळायला गेल्यावर आम्ही इकडे उभं राहतो. कधी कॉफी आणि गप्पा कधी नुसत्याच गप्पा, पाऊस असला आणि लहर आली तर कांदा भजी. रोजचा वावर असताना एवढी धूळ कशी काय बसू शकेल?

आणि मुख्य म्हणजे नवऱ्याला धुळीची ऍलर्जी आहे. घरात धूळ साचू नये म्हणून मी अक्षरश: डोळ्यात तेल घालून सारखं पुसत असते. माझी नजर आता खाली जाते, शेजारचे कुलकर्णी काका काकू फिरून येत आहेत. मला बघून कुलकर्णी काकू काकांना काहीतरी सांगत आहेत. मी वरूनच त्यांना हात करून नवरा दिसला का म्हणून विचारते. ते काकूंकडे बघतात.

“नाही गं, गेले दोन तीन दिवस देसाई दिसलेच नाहीत. अगं असं काय करतेस काल तूच सांगत होतीस ना ते ऑफिसच्या कामाला बाहेरगावी गेलेत म्हणून? विसरलीस का?” काकू एका दमात बोलतात.

बाहेरगावी? मला काहीच कसं आठवत नाही? आणि काल तर मी कुलकर्णी काकूंना भेटलेच नाही दिवसभर. माझा नवरा पूर्वी जायचा खरं ऑफिसच्या कामाला सतत बाहेर.

महिन्यातून आठ दिवस तरी बाहेर असायचा, मग मी आणि मुलं फक्त घरी. पण मोठा सहावीत गेल्यावर बाहेरगावचं काम कमी झालं. कमी म्हणजे जवळजवळ नाहीच, दोन महिन्यातून एकदा वगैरे जात असेल. पण मला अजिबातच आठवणार नाही असं कसं होईल?

जाऊदे कुलकर्ण्यांना काही विचारलं तर उगीच भिशीच्या बायकांमध्ये जाऊन गॉसिप करतील की रेखा देसाईला काहीही आठवत नाही. त्यांच्याकडे बघून हसून मी आत जायला निघते. नवऱ्याला पुन्हा फोन लावते. परत तीच रेकॉर्डिंग.

पण छोटीचा डान्स फक्त गुरुवार आणि शनिवार जायचं असतं. आज कोणता वार? बहुतेक तंद्रीत बॅग उचलून गेली असेल.

पण तिला तरी काय दोष देणार, मला तरी कुठे आजचा वार आठवतोय? माझ्या विसराळूपणाला कंटाळून मी खोलीतल्या कॅलेंडरमध्ये बघते. मुलं पण काय आगाऊ आहेत. ऑगस्ट महिना चालूये आणि कॅलेंडरचं पान ऑक्टोबरवर करून ठेवलंय. आता संध्याकाळी आल्यावर बघते त्यांना. मग नवरा लगेच त्यांची बाजू घेईल आणि त्यांना खाली खेळायला पाठवेल. आज मी उगीच रुसणारे त्याच्यावर.

उगीच रुसले की तो खूप छान वागतो. मागे एकदा मी अशीच उगीच रुसले होते तेंव्हा तो टॉवेल विसरून अंघोळीला गेला आणि मग आतून हाक मारून मला टॉवेल द्यायला सांगितला होता. मी टॉवेल दिला आणि त्याने माझा सगळा रुसवा पुसून काढला होता. मी मुलांच्या स्टडी टेबलजवळ उभं राहून विचार करत आहे.

एकीकडे त्यांच्या वह्या बघत आहे. छोटी गणिताच्या गृहपाठाची वही घरीच विसरली वाटतं. तिला दप्तर भरायला अजून मदत लागते, आता संध्याकाळी रडत रडत डायरीतून चिट्ठी घेऊन येईल. मोठ्याच्या टेबलवर आम्हा चौघांचा फोटो आहे. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बंगलोरला गेलो होतो तिथे काढलेला.

त्याने कधी फ्रेम करून आणला मला माहीत नाही. नवरा मुलांना पॉकेटमनी देतो, त्यातून ते काहीतरी आणत असतात. पण आणलेलं सगळं आधी मला दाखवायचं असतं. विसरला असेल.

मागे छोटीसाठी छोटं ड्रेसिंग टेबल करून घेतलंय. माझं लक्ष आरशात जातं. आत्ताच तीन महिन्यापुर्वीचा फोटो बघितला म्हणून असेल पण माझं वजन एकदम कमी झाल्यासारखं वाटतंय, चेहरा जरा सुरकुतला आहे. केस पातळ झाल्यासारखे वाटत आहेत. नीट झोप होत नाही म्हणून असणार.

दारात किल्ली घालून दार उघडण्याचा आवाज येतो. अरुणा असणार. मी घरात नसताना म्हणून यायला तिला किल्ली दिली तर शहाणी मी असताना सुद्धा किल्लीनेच येते. मी हॉलमध्ये जाते.

“अहो ताई, लवकर उठलात तुम्ही? मला पण जरा उशीरच झाला. थांबा लगेच खायला करून देते.” दार लावताना ती अखंड बडबडत आहे. ही काय वेडी झालीये का? ही कशाला खायला करून देणार मला?

“अरुणा, नसती कामं करण्यापेक्षा तू जरा तुला सांगितलेली कामं कर. गॅलरी नीट साफ कर आज.”

“हो, हो करते.”

तरीही ती किचनमध्येच जात आहे.

“अरुणा नाश्ता करायचं तुझं काम नाही. मी करते.” आता मात्र मला जरा राग येतोय.

“ताई तुम्हाला बरं वाटत नाही असं दिसतंय, तुम्ही जरा पडा म्हणून म्हणतेय मी.. मी करते पटकन खायला.. आणि अहो मला दादांनीच सांगितलं आहे तुम्हाला नाश्ता करून द्यायला. मी फोन करू का त्यांना?”

“काही फोन करू नकोस. त्याचा फोन लागत नाहीये. इतक्या सकाळी मुलं आणि तो कुठे गेले कळत नाही.”

“अहो दादा गावाला नाही का गेले परवा! मुलं आणि ते.. अजून चार दिवसांनी येणार.. असं तुम्हीच मला सांगत होतात काल.. ऐकाना, ताई तुम्ही हॉलमध्ये तरी बसता का.. हा बघा मी लावतेच फोन.”

सगळ्यांना का वाटतंय की तो गावाला गेलाय? तो आणि मुलं गावाला जाणार आहेत, माझ्या नणंदेकडे, पुढच्या आठवड्यात. तिकडे माझ्या सासूबाई आहेत त्यांना थोडे दिवस आमच्याकडे घेऊन यायला.

पण मग ह्या आठवड्यातच तो आणि मुलं कशी गावाला जातील? आणि माझा फोन लागत नाही तर हिचा कसा लागेल? मला काहीच कळत नाहीये. त्यात ही अरुणा सराईतासारखी डबे उघडून नाश्ता कशी करायला लागली? नाही तिचा काहीतरी गाईसमज झाला असेल.

दहा घरची कामं धरली आहेत तिने झेपत नसताना त्यामुळे इकडचं तिकडचं मिळून काहीतरी तिसरीच गोष्ट बनवली असेल तिने. मी तिला हेच सगळं ओरडून सांगायच्या तयारीत आहे, पण ती सारखी अस्वस्थ होऊन हाताची बोटं मोडत आहे.

माझं डोकं जड व्हायला लागलंय. मी हाताने डोकं धरून बसले आहे. अरुणा आता घाबरल्यासारखी वाटतेय. फोन कानाला लावत बाहेर जात आहे. मी परत मुलांच्या खोलीत जाते, तिथल्या लॅण्डलाइनवरून शाळेत फोन लावायला घेते सगळे नंबर मला पाठ आहेत. मला त्यांना विचारायचंय की माझी मुलं आली का?

दुपारी डबा नेऊन द्यायला परवानगी लागते. ती घेते आणि पटकन डबा नेऊन देते. पण माझे हात जड झाले आहेत. शाळेचा पण नंबर अस्तित्वात नसेल तर? मला भीती वाटते.

माझं डोकं आता खूप दुखायला लागलंय.. मला माझी मुलं हवी आहेत.. मी तिथेच पटकन डोकं धरून खाली बसते. मला खूप आरडाओरडा करावासा वाटत आहे. परत दार वाजते. खालच्या मजल्यावरची दिशा आलीये. ती नर्स आहे. अरुणा तिच्या हातात काहीतरी देत आहे.

“डोकं दुखतंय ना? हे इंजेक्शन देते पटकन. श्वास घे एक मोठा.” दिशा मला थोपटत सांगत आहे. तिला माझ्या डोकेदुखीबद्दल कसं कळलं? मला काहीच कळत नाहीये.

Manachetalks

मला हळूहळू जाग येतेय. मी माझ्या खोलीत आहे. शेजारी माझा भाऊ मला थोपटत बसला आहे. हा इथे कधी आला? आणि हा का आला? माझा नवरा कुठे आहे?

आणि माझी मुलं कुठे गेली आहेत? दारात माझ्या सासूबाई उभ्या आहेत. सकाळी त्या कुठे होत्या?कदाचित काकड आरतीला गेल्या होत्या. मी विसरलेच होते हल्ली त्या आमच्याकडेच राहतात. बहुतेक म्हणूनच फ्रिजमध्ये अंडी नव्हती सकाळी, त्यांना माहीत नाही नवरा अंडी खातो ते.

त्या डोळे पुसत उभ्या आहेत. काय झालंय काही कळत नाही. मी भावाकडे बघत आहे. मी आता त्याला ओरडूनच विचारते की माझी मुलं आणि नवरा कुठे आहेत? इतक्यात आतमध्ये डॉक्टर येत आहेत. अरुणा त्यांना आत घेऊन येत आहे, दिशा त्यांना काहीतरी सांगत आहे. काय चाललंय सगळं?

“अगं विसरलीस का? ते तिघे नगरला नाही का गेले मुलांच्या आत्याकडे?” भाऊ मला सांगतोय. मला काहीच आठवत नाहीये. मी आठवायचा प्रयत्न मात्र करते आहे. नगर.. आत्या.. १५ ऑगस्टची सुट्टी..

गाढ झोपलेला नवरा आणि मुलं.. माझं डोकं परत जड होतंय. डॉक्टरांच्या हातात इंजेक्शन दिसतंय..

“तिला शक्यतो एकटीला सोडू नका. एकटी असली की ह्या जगातून फार पटकन ती भूतकाळात जाते आणि तिथेच राहायला लागते.. तिला ८-९ तासांनी जाग येईल…” पुढचं मला काहीच ऐकू येत नाही. डोकं हलकं होत जातंय आणि झोपलेल्या नवऱ्याचे आणि मुलांचे चेहरे दिसत आहेत. आत्ता तिघे उठतील आणि भूक भूक करून घर डोक्यावर घेतील.

लेखन : मुग्धा शेवाळकर

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!