क्रेडिट कार्ड वापरण्याचे ९ महत्वाचे फायदे

क्रेडिट कार्ड

अनेक वेळा आपल्याला आवडलेली वस्तू विकत घेण्याचा मोह होत असतो; पण काही वेळेस ती वस्तू विकत घेताना आपल्याकडे रोख रक्कमच उपलब्ध नसते.

बँक खात्यामध्ये देखील पैसे नसल्याने डेबिट कार्डचा वापर देखील करता येत नाही. अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते ते म्हणजे क्रेडिट कार्ड!

बँक खात्यामध्ये पैसे असो अथवा नसो, क्रेडिट कार्डचा वापर करून आपण आवडलेली वस्तू सहज खरेदी करू शकतो. एखादी महागडी वस्तू असेल, तर ती देखील आपण क्रेडिट कार्डचा वापर करून हफ्त्यांद्वारे खरेदी करू शकतो.

तुम्ही देखील क्रेडिट कार्ड चा वापर करता का? जर हो, तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. हो, पण त्याच बरोबर क्रेडिट कार्डचा वापर करताना काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

जर क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला तर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात देखील अडकू शकता. या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाऊ नये याच कारणामुळे अनेक जण डेबिट कार्ड वापरणे पसंत करत असत.

परंतु आज अनेक जण क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्ड वापरताना त्याचा वापर सुयोग्य पध्दतीने करणे गरजेचे असते. क्रेडिट कार्ड वापरण्याचे काय फायदे आहेत ते पाहुया.

१. उचल सहज उपलब्ध

क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, क्रेडिट कार्डद्वारे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उचल घेता येते. थोडक्यात, खात्यामध्ये अथवा तुमच्या जवळ पैसे नसले तरीही, क्रेडिट कार्डचा वापर करून बँकेने निश्चित केलेल्या रक्कमेपर्यंत तुम्हाला व्यवहार करता येतो.

या निश्चित मर्यादेला क्रेडिट लिमिट असे म्हणतात. क्रेडिट कार्डद्वारे वापरलेला पैसा तुमच्या खात्यामधून देखील वजा होत नाही व तो परतफेड करण्यासाठी निश्चित केलेला कालावधी देखील मिळतो.

२. परतफेड करण्यासाठी कालावधी

क्रेडिट कार्डद्वारे करण्यात आलेले व्यवहारची परतफेड करताना ग्राहकाला एक निश्चित कालावधी देण्यात आलेला असतो. हा कालावधी साधारणता २० ते ५० दिवसांचा असतो.

या कालावधीमध्ये तुम्ही कधीही पेमेंट परत करू शकता. यावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही.

समजा, तुमची क्रेडिट कार्डची एका महिन्याची मर्यादा ही ५० हजार रूपये आहे. जर तुम्ही त्या महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत क्रेडिट कार्डद्वारे ५० हजार रूपयांची खरेदी केली तर तुम्हाला त्या ५० हजारांचे देय देण्यासासाठी पुढील महिन्याच्या २० तारखेपर्यंत मुदत देण्यात येत असते.

ही मुदत बँकेने निश्चित केलेल्या कालावधीवर अवलंबून असते.

३. हफ्त्यांद्वारे वस्तू खरेदी करणे सोपे

जर तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि आर्थिक कारणांमुळे ती वस्तू घेणे शक्य नसेल तर अशा वेळेस क्रेडिट कार्ड हे फायदेशीर ठरते.

क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही वस्तू खरेदी करू शकता व त्याचे मासिक हफ्ते देखील क्रेडिट कार्डद्वारे देणे सोपे पडते. गाडी, टिव्ही खरेदी करताना आपण वैयक्तिक कर्ज काढतो, पण अशा वेळेस कर्ज न काढता क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही या वस्तू सहज खरेदी करू शकता.

४. व्यवहारांची सुयोग्य नोंद

आपण अनेक ठिकाणी व्यवहार करत असतो. खरेदी करत असतो. पण त्या व्यवहारांची नोंद करून ठेवणे काही वेळेस विसरून जातो व महिन्याच्या अखेरीस कोणते पैसे कोठे खर्च झाले याची नोंद शोधू लागतो.

अशा वेळेस क्रेडिट कार्डने केलेले व्यवहार फायदेशीर ठरतात. क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांचे स्टेटमेंट वापरकर्त्यांना प्रत्येक महिन्याला मिळत असते.

त्यामध्ये तुम्ही कोठे कोठे, किती खर्च केला याची संपूर्ण नोंद असते. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या वापरामुळे आपल्याला व्यवहारांचा तपशील मिळतो व खर्चांवर नियंत्रण ठेवणे देखील शक्य होते.

५. प्रोत्साहन आणि विविध ऑफर्स

अनेक वेळा क्रेडिट कार्ड्सवर अनेक ऑफर्स देण्यात येतात व खरेदीसाठी प्रोत्साहित केले जाते. अनेक निरनिराळ्या ऑफर्स मुळे बचत देखील होत असते.

तसेच कार्डवर रिवार्ड पॉइंट्स देखील मिळतात. ते पॉइंट्स रिडिम देखील करता येतात. नवीन वर्ष, दिवाळी अशा सणांच्या काळात खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध ऑफर्स दिल्या जातात. त्यामुळे सणांच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर केल्याने बचत होते.

६. अडचणीच्या काळात मदतगार

जर अडचणीच्या काळात तुम्हाला रोख रक्कम हवी असेल तर अशावेळेस क्रेडिट कार्डचा वापर करून देखील एटीएममधून रोख रक्कम काढता येते.

मात्र यावर अधिक प्रमाणात व्याज आकारले जाते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएममधून पैसे काढणे टाळावे.

७. विमा सुरक्षा

अनेक वेळा क्रेडिट कार्डद्वारे विमा सुरक्षा देखील प्रदान केली जात असल्याची माहिती वापरकर्त्याला देखील नसते.
सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम व प्रीमियम अशा कार्डच्या श्रेणी असतात. त्यानुसार वापरकर्त्याला विमा सुरक्षा कवच देण्यात येत असते.

अपघाती मृत्यू झाल्यास वापरकर्त्याच्या घरच्यांना रक्कम, तसेच कार्डचा वापर करून खरेदी करण्यात आलेली वस्तू चोरीला गेली अथवा खराब झाली तर त्यावर देखील भरपाई मिळते.

८. सुरक्षित

डेबिट कार्डच्या तुलनेत क्रेडिट कार्डचा वापर सुरक्षित आहे. डेबिट कार्ड काही प्रमाणात असुरक्षित आहे कारण याचा वापर करून कोणीही एकाच वेळेस तुमच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकतो व ही रक्कम परत येण्यास देखील वेळ लागतो. क्रेडिट कार्डच्या बाबतीत ही चुक सुधारण्याची संधी असते.

९. चांगला क्रेडिट स्कोअर

जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर चांगल्या पध्दतीने करत असाल, पेमेंट वेळेत करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअरदेखील वाढतो. त्यामुळे पत वाढते व त्याचा फायदा पुढे कर्ज घेताना देखील होतो.

सौजन्य : www.arthasakshar.com

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप किंवा टेलिग्राम वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप / टेलिग्राम मेसेज करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.