युद्धाच्या उंबरठ्यावर घरात सुरक्षित बसून आपलं कर्तव्य काय?

Say no to war

माणूस हा प्राणी इतर सजीवांपेक्षा प्रगल्भ आहे कारण तो विचार करू शकतो, आलेल्या अनुभवातून शिकू शकतो, स्वतःला घडवू शकतो आणि त्यातून स्वतःला कसं, कुठे, कश्या पद्धतीने व्यक्त करायचं हे ठरवू शकतो. पण अनेकदा हा प्रगल्भपणा फक्त दिखाव्या पुरता आहे का असचं मनोमन वाटत राहते. सध्या जे सोशल मिडिया वर चालू आहे त्यावरून तरी सगळेच त्या हातात कोलीत असलेल्या माकडासारखे वागत आहेत. हातात सोशल मिडियाचं कोलीत मिळालं आहे. त्या सोबत लोकशाही ने बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग थांबायचं कशाला घे उडी आणि लाव आग. मग त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया बघून मिळणाऱ्या क्षणिक आनंदाच्या डोहात घे उडी. पण हा क्षणिक आनंद नकळत आपल्या घराला ही आग लावतो आहे ह्याची जाणीव न कोणाला होते आहे न ते समजण्याची मानसिकता.

मिडिया आणि सोशल मिडिया ही न सुरु झालेल्या युद्धाचे आखाडे बांधून आधीच सगळीकडे आग लावत सुटली आहेत. त्याने केलं मग म्हणून मी केलं. तो तसं बोलला म्हणून मी तसं बोललो. त्याने आग लावली म्हणून मी पण आग लावली. तो डाव्या विचारसरणी चा तर मी उजव्या विचारसरणी चा. तो अमुक पक्षाचा मग मी अमुक पक्षाचा. तो त्याचा भक्त तर मी ह्याचा पाठीराखा. नक्की काय साधत आहोत ह्यातून? ह्या शाब्दिक युद्धात भाग घेऊन, आग लावून त्यातून आपण कोणाची तरी जिरवली किंवा त्यातून आपण आनंदी होऊ असं वाटत असेल तर तो खूप मोठा भ्रमनिरास आहे. कारण जळणारा आणि जाळणारा दोघेही एकाच मातीचे आहोत हे विसरून का जात आहोत आपण?

ज्याने कधी देशांच्या सीमा बघितल्या नाहीत. जो नागरिक स्वतःच्या देशांच्या सीमेवर जायला घाबरतो. ज्याने युद्धभूमीवर कधी पाउल ठेवलं नाही. ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारण, कुटनीती, संभाव्य परिणाम त्याचे फायदे / तोटे ह्याचं न कसलं ज्ञान आहे न ते शिकण्याची मानसिकता असा प्रत्येक जण सोशल मिडीयाचं कोलीत घेऊन आपलं देशप्रेम व्यक्त करत आहे. ज्या युद्धभूमीवर आपण पाउल कधी ठेवलं नाही. ज्या देशासाठी आपण आपल्या प्राणांची बाजी कधी लावली नाही ते लोक आज मोबाईल आणि कॉम्प्यूटर च्या स्क्रीन वरून युद्ध कसं कराव किंवा करू नये. त्यासाठी काय रणनीती असावी ह्यावरून चर्चा करत आहेत. ह्यात अगदी राजकारण काढून त्यांच्या आधीच्या पिढीने काय केलं आणि काय नाही हे सांगण्याची अहमिका ही त्यात आहे. हे सगळं करून काय मिळवतो आहोत ह्याचं त्यांना काहीच पडलेलं नाही.

शत्रू जेव्हा समोर उभा रहातो तेव्हा आपण आपल्यातील मतभेद विसरून एकत्र उभं रहायचं की एकमेकांच्या वागण्याची दुषण काढत शत्रूला दुही माजवण्याची संधी द्यायची. आपल्या पक्षाने काय करावं, नेत्याने काय करावं ह्या त्यांचा प्रश्न पण आपण ही त्यांची री ओढायला लागलो तर तुमचं नक्की प्रेम पक्षावर आहे की त्या नेत्यावर ह्याचा आधी विचार करावा. राजकारणी आणि काही स्वार्थी लोकं आग लावणारी विधान, पोस्ट किंवा गोष्टी करणार. त्या आगीवर आपण पाणी टाकायचं की आपण त्याच कोलीत बनवून सगळीकडे पसरवायचं ह्याचं तारतम्य आपल्याला एक सुजाण नागरिक म्हणून असायला हवं. मिडिया करते आणि दाखवते कारण बघणारे आपल्या सारखी माकडे आहोत हे त्यांना चांगल माहित आहे. ज्यांना प्रत्येक क्षणाला एक कोलीत दिलं तर प्रत्येक घर त्या आगीत जळेल आणि त्यांचा टी.आर.पी. वाढेल. होणारं नुकसान हे दुसरं कोणाच नाही तर आपलंच आहे.

जे सैनिक आपल्या देशाचं रक्षण करत आहेत ते कुठेच नाहीत? दाखवा मला एखादा सैनिक जो त्याने देशासाठी गाजवलेल्या कर्तुत्वाची स्वतः पोस्ट करत आहे? दाखवा एखादा सैनिक ज्याने आपल्या मित्राला, सहकाऱ्याला युद्धात गमावलेलं आहे तो आज आपल्या दुखाचा बाजार मांडत आहे? आज सगळ्यात जास्त त्या सैनिकाने गमावलेलं असून पण तो शांत आहे. तो न आनंदी आहे न तो दुख्खी आहे. त्याने आपलं कर्तव्य बजावलेलं आहे आणि त्याचा त्याला अभिमान आहे. मग तो जर शांत आहे तर आपण काही न करता आपल्यात तो उन्माद आणि ते दुखः सोशल मिडिया मधून मांडण्याची अहमिका का? तो सैनिक कुठेच नाही मग आपण त्याचे फोटो कोणतीही शहानिशा न करता कसे फॉरवर्ड करत आहोत? ते सांगून आपल्याला किती आनंद आणि किती दुखः झालं हे दाखवत आहोत तर नक्कीच आपल्याला आपल्या अंतरंगात डोकावून बघण्याची गरज आहे. कारण आज आपण फक्त माकड झालो आहोत जे हातात मिळालेल्या कोलीताने सगळीकडे आग लावत फिरत आहे.

भारता बद्दल आणि ह्या देशाबद्दल प्रेम कोणाला नाही. मतांतरे, पक्षीय राजकारण हे नक्कीच लोकशाही चा भाग आहेत. नेता, त्याचे निर्णय ह्या बद्दल अनेक मते नक्कीच असू शकतात. पण म्हणून ह्याचा संदर्भ देशाच्या सुरक्षेशी जोडणं कितपत योग्य? कोणीतरी केलं म्हणून मी करण खरंच गरजेच आहे का? त्यांच्यात आणि तुमच्यात मग काय अंतर? प्रगल्भता आहे ती अश्या काळात माकड न बनण्याची. गोष्टी चांगल्या / वाईट कशाही असो त्यावर विचार करून योग्य निर्णय घेण्याची आपली पात्रता आहे मग त्या पात्रतेचा उपयोग आपण कधी करणार आहोत? माकड बनून आग लावण्यात कोणताही पुरुषार्थ नाही कारण ते सगळेच करतात आणि करतील. पुरुषार्थ हा आहे की आपण त्या साखळीचा भाग न होणं आणि ती आग पाण्याने किंवा इतर पद्धतीने विझवणं. आता प्रत्येकाने ठरवायचं त्याला/ तिला काय बनायचं आहे.

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!