पेमेंटची रिकव्हरी, उधारी वसूल करण्यात अडचण येते का तुम्हाला?

पेमेंटची रिकव्हरी उधारी

सर, काही दिवसांपुर्वी मी एक प्रॉपर्टी विकली, मध्यस्थ असणार्‍या एजंटने व्यवहारातली अर्धी रक्कम बरोबर घरपोच आणुन दिली, चोख व्यवहार करुन विश्वास संपादन केला, उरलेली रक्कम लवकरच देतो असे सांगितले.

पण आता मात्र तो पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे, आमचे कुटुंब साधे सरळमार्गी मध्यमवर्गीय कुटुंब आहे, भांडणे, कोर्ट हे नकोसे वाटते. आम्हाला कुणाचाही कसलाही सपोर्ट नाही, पाठीशी कोणीही भक्कम आधार नाही.

पैसे मिळत नाहीयेत, ह्या एका कारणामुळे घरात तणावाचे वातावरण आहे, मानसिक व शारिरीक त्रास, मनस्ताप होत आहे, मार्ग सुचवा!

धन्यवाद!

व्यापार आणि व्यवहार करताना सर्वांत मोठा मानसिक त्रास कोणता असेल तर उधारी!

आपल्या आजुबाजुला केवळ आणि केवळ उधारीच्या टेंशन मुळे बेजार असलेले अनेक लोक आपल्याला दिसतील.

मी दोन वर्ष साईड बिजनेस म्हणुन एक एजन्सीचा व्यवसाय चालवला, त्या काळात मीही अशा अनेक अडचणींना फेस केले.

त्या व्यवसायात मिळालेल्या कडु वाईट अनुभवांनी मी हे शिकलो की, उधारी मागणे, गोड बोलुन वेळेवर पैसे काढुन घेणे, ही सुद्धा एक कला आहे. हे एक शास्त्र आहे.

दुकानात खेळते भांडवल आणि खिशात खुळखुळणारा पैसा असेल तरच जीवनात आनंद आणि मनात उत्साह असतो. नव्या कल्पना सुचतात, आणि प्रगती होते.

हे कसे साध्य करावे ते सांगण्यासाठी आज प्रस्तुत करत आहे, उधारी कशी वसुल करावी, एखाद्याकडे अडकलेले पैसे कसे वसुल करावेत ह्या संबंधीच्या एकदम साध्या सोप्या टिप्स!

नियम पहिला – व्यवहार करण्याआधी, Terms & Condition मनातल्या मनात पक्क्या ठरवा. मगच व्यवहार करा.

मोघम व्यवहार करु नका, आधी स्वतः गाफील रहायचं आणि ह्याने मला फसवले, तो हरामखोर आहे, असे नंतर बोंबलुन काहीही फायदा होत नाही.

माल दिल्यापासुन किती दिवसात पेमेंट अपेक्षित आहे, ३० दिवस, ६० दिवस, ९० दिवस? मनोमन टाईम फ्रेम पक्की आणि ठाम करा.

लक्षात ठेवा, अडकलेल्या उधारीकडे सुरुवातीला झालेले दुर्लक्षच प्रॉब्लेमला क्रिटीकल बनवते.

उधार असलेला पैसा अडकतो, त्याशिवाय त्याला फोन करण्यात, पैसे मागण्यात वेळ आणि उर्जा वाया जाते. तो पैसे देईल का नाही, हा विचार करण्यात मानसिक शक्ती खर्च होते. त्यामुळे प्रत्येक उधारीच्या बाबतीत सुरुवातीपासुन सतर्क रहा.

नियम दुसरा – Strong Follow up system!

एकदा का डेड लाईन उलटली की पार्टीला रिमायंडर जायलाच हवे!

फोन करा, व्हॉटसएप करा, इ-मेल करा, तुमचा पैसा तुम्हाला किती आवश्यक आहे, हे तुमच्या कर्जदाराला कळु द्या.

त्याला काय वाटेल, बरं दिसत नाही, तो चांगला आहे, स्वतःहुन देईल पैसे, मागायला मला नको वाटते, असला भिडस्तपणा करणारेच शेवटी बाराच्या भावात जातात. ह्या लोकांचीच उधारी बुडते. त्यामुळे पैसे मागण्यात कुचराई आणि चालढकल करु नका.

सुरुवातीला उधारी मागताना ढिले पडलात की शेवट तुमचाच हे लक्षात ठेवा.

काही लोक बिलं पाठवायला उशीर करतात, कामाचा व्याप आहे अशी कारणे देतात, यशस्वी व्यावसायिक बनायचे असेल तर वेळप्रसंगी हातातली कामे बाजुला ठेवुन बिलं पाठवायला हवीत.

बिल गेल्यावर लगेच तो काही पैसे देणार नाही, तिथुन तर प्रक्रिया सुरु होते.

एकदा पैसे उशीरा द्यायची सवय लागली की कर्जदार सोकावलाच!

जितका Strong Follow up तितकी उधारी वसुली जास्त! Follow up म्हणजे वारंवार पैसे मागणे, पुन्हा पुन्हा पैसे मागणे, पैसे वसुल करण्याचा हा एकच हुकुमी एक्का असतो.

वसुली करण्याचं काम स्वतःकडे कधीही घेऊ नका. त्यासाठी पगारी माणुस ठेवा.

आणीबाणी असेल, केस हाताबाहेर जात आहे, असे वाटल्यासच तुम्ही स्वतः पिक्चरमध्ये या.

उधारी मागताना नम्र भाषा वापरावी, कितीदाही फोन करावा लागला किंवा पैसे मागण्यासाठी जावे लागले तरी त्रागा करु नये.

तुम्ही उत्तेजित झालात, तुम्ही भडकलात, शिवीगाळ केलीत की उधारी बुडलीच समजा!

नियम तिसरा – औकातीपेक्षा जास्त माल देऊ नका!

एखाद्याच्या गोड बोलण्याला भुलु नका. त्याची ऐपत काय ह्याचा बारकाईने अभ्यास करा.

एखादा उधार माल मागायला लागला की त्याची पुर्णपणे चौकशी करा. बाजारात पत नसेल अशा लोकांशी फक्त रोखीने व्यवहार करा. विषाची परीक्षा करु नये.

“बादमे पछताके का होवत, जब चिडीया चुग गई खेत!”

पहीले पाच व्यवहार कॅशने करा, प्रत्येक माणसाचं शक्य तितक्या बारकाईनं निरीक्षण करा, त्याचं कॅरॅक्टर कळुन येईल.

नियम चौथा – एकदा ऐकुन घ्या, एक संधी द्या.

एखादा माणुस वारंवार मागुनही पैसे देत नसेल तर त्याला एकदा त्याची अडचण विचारा.

होवु शकतं की, त्याला तुमचे पैसे बुडवायचे नाहीयेत, पण तो खुप मोठ्या संकटात अडकला आहे.

कधी कधी त्याला बिलाबद्द्ल काही शंका असतात, त्या शंका तात्काळ दुर करा.

बिलाची कॉपी, डिलीव्हरी चलन, ट्रान्सपोर्ट रिसीप्ट सगळे पुरावे जपुन ठेवल्यास इथे फायदा होतो.

नियम पाचवा – आपल्या कर्जदाराच्या ओळखीच्या लोकांशी मैत्रीपुर्ण संबंध प्रस्थापित करा.

प्रत्येक माणुस इज्जतीला भितो.

एखाद्याकडे पैसे अडकले असतील तर त्याच्या शेजार्‍यांसमोर, चारचौघात पैसे मागुन त्याच्यावर मानसिक दबाव निर्माण करा.

माझे पैसे बुडवण्याचा काही जणांनी प्रयत्न केला, पण मी एकदा त्याच्या काऊंटरला जाऊन उभा राहीलो की, त्याचा बाप पण पैसे देऊन मोकळा व्हायचा.

नियम सहावा – ‘ब्लॅकलिस्ट’ करा. मुद्दामहुन पैसे तटवणार्‍या लोकांपासुन लांब रहा.

ज्यांची नियत साफ नाही अशा लोकांशी व्यवहार करु नका.

पुर्ण पैसे काढुन घ्या आणि मगच व्यवहार तोडल्याचे जाहीर करा.

नियम सातवा आणि शेवटचा – रिकव्हरी एजंट किंवा कोर्ट!

अगदीच नाईलाज झाला तर हतबल होवुन पैशावर पाणी सोडु नका.

मार्केटमध्ये अशा अनेक एजन्सी असतात, ज्या वीस तीस किंवा पन्नास टक्के कमिशन घेऊन ह्या कर्जदारांना सळो की पळो करुन सोडतात व पैसे वसुल करुन देतात.

बॅंका, फायनान्सवाले अशा कॉर्पोरेट गुंडाचा सर्रास वापर करतात.

हे ही जमत नसेल, किंवा इच्छा नसेल तर चांगल्या, विश्वासु वकिलाचा शोध घ्या. कोर्टात जाणे हा ही मानसिक दबाव तयार करण्याचा, समोरच्याला मानसिक त्रास आणि उपद्रव देण्याचा एक मार्ग असतो.

कोर्टाबाहेर समझौता करुन, शक्य तेवढी मोठी रक्कम पदरात पाडून घ्या.

काही काही माणसं, ‘लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उधारी वसुल करताना कसा उपयोग होतो?’ असले फालतु प्रश्न विचारतात.

लॉ ऑफ अट्रेक्शन वापरुन, पोट भरता येईल का? हा प्रश्न विचारणं जसं मुर्खपणाचा आहे, तसंच काहीतरी आहे हे!

‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ हा फक्त स्वतःचा स्वतःशी, स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद आहे.

‘एका जागेवर बसुन बसुन पंचपक्वानाची कल्पना केली आणि भरलेलं ताट समोर आलं,’ अशा खोट्या आशावादाला बळी पडुन ह्या सिद्धांताला इतकं उथळ बनवु नका.

कोणतीही गोष्ट ओढुन ताणुन बळजबरीने लॉ ऑफ अट्रॅक्शनने प्राप्त कशी करता येईल, असे विचारणार्‍यांची कीव येते.

लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरुन एका तरुणाला माझ्याकडे कशी आकर्षित करु?

लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरुन मुलगी नको, मुलगाच होईल असे उपाय सांगा!

ह्या असल्या मानसिकते मुळे स्वतःचे नुकसान होते.

भव्य दिव्य स्वप्नांचे रोपण मनावर करणं, आणि त्यासाठी दररोज झोकुन देऊन परिश्रम आणि एकाग्रतापुर्वक सातत्याने कृती करणं, हाच माझ्या लेखी खरा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे.

स्वप्नं पुर्ण होईपर्यंत झपाटुन काम करणं, ह्यालाच मी खरा आकर्षणाचा सिद्धांत मानतो, बाकी सब बकवास!

उधारी वसुल करण्यासाठी आतमध्ये तीव्र इच्छा निर्माण करा, आता जागेवरुन उठा आणि पैसे मागा!

एक विशिष्ट तरुण गळाला लागत नसेल तर मिळेल त्याच्याशी संसार करुन स्वप्ने पुर्ण करा, वेड्या अट्टहासापायी, रोज स्वतःचा तमाशा करुन घेऊ नका.

काही वेळा, शंभर टक्के प्रयत्न करुनही रिझल्ट आपल्या बाजुने येत नाही, तेव्हा, अशावेळी निराश न होता, झाले त्यावर पाणी ओतुन कृष्णार्पणमस्तु म्हणुन चॅप्टर क्लोज करुन, आनंदाने, उत्साहाने आणि आत्मविश्वासाने नव्या धड्याची सुरुवात करा.

मनःपुर्वक आभार आणि शुभेच्छा!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

  1. साहेब मला उधारी खातेदारांना टोमणे मारण्यासाठी काही वाक्य हवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.