सुरेख १०८ खांब असलेलं कोल्हापूर जिल्हातलं खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर

कोपेश्वर मंदिर

खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर

जिल्हा- कोल्हापूर (कोल्हापूर शहरापासून साधारण ६० किलोमीटरच्या अंतरावर)

आपण घर बांधायचं ठरवलं की त्याचं स्वप्न बघण्यापासून ते प्रत्यक्षात उतरेपर्यंत पूर्ण घराचा नक्षाच बदलून जातो. आपण काहीतरी मनात चित्र बनवतो. घर असं असेल तसं असेल.

मग घरात इथं दरवाजा, तिथं खिडकी हवी असं एक स्वप्न प्रत्येकानं बघितलेलं असतं. पण प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्यावर गोष्टी खूप बदलतात.

कधी स्थापत्य शास्त्राच्या कक्षेत न बसल्याने, तर कधी प्रत्यक्षात बांधताना आलेल्या बदलांमुळे आपलं घराचं स्वप्नं प्रत्यक्षात काही वेगळ्याच पद्धतीने साकार होतं.

हे झालं साधं घराच्या बाबतीत; परन्तु आपल्या संस्कृतीची एक भव्यदिव्य कलाकृती उभी करायची असेल तर किती विचार करावा लागेल?

कलाकृती उभारताना नुसती उभी न करता पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना ती मार्गदर्शक ठरेल आणि सगळ्या आक्रमणांना मग ती नैसर्गिक असो वा कृत्रिम त्यात टिकून राहील हा सगळा विचार करावा लागतो. त्यामुळेच भारतीय संस्कृतीचं द्योतक असलेली मंदिरं उभारताना अनेक गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे.

कोणतंही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी हे मंदिर निगडीत आहे त्याच्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिलं गेलं आहे.

अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफलं गेलं आहे. हि मंदिरं उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टीकोन मग तो तांत्रिक बाबतीत असो वा गणिती बाबतीत, वापरला गेला आहे.

म्हणूनच आज १००० वर्षानंतर आजही ही मंदिरं अनेक आक्रमणांना पुरून उरत आहेत. असंच एक मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे.

Khidrapur Kolhapur

त्या मंदिराचं नाव आहे ‘कोपेश्वर मंदिर’ जे कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूर इकडे बनवलं गेलं आहे. हे मंदिर भगवान शंकराला वाहिलेलं आहे.

पण इथं शंकराच्या मंदिरात नेहमी असणारा नंदी दिसत नाही. ह्याला कारण असून त्याची एक कथा आहे. विष्णू म्हणजे सृष्टीचा चालक आणि शंकर म्हणजे सृष्टीचा विनाश करून त्यातून पुन्हा निर्मिती करणारा ह्या दोघांना एकत्र इथे पूजलं जातं.

ह्या मंदिराच्या निर्माणात पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केली गेली आहे. ह्या मंदिराची निर्मिती ‘शिलाहार’ राजवटीत १२ व्या शतकात झाली.

११०९ ते ११७८ ह्या काळात हे मंदिर बांधलं गेलं आहे. जवळपास ९०० वर्ष जुनं असलेलं हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे.

‘कोपेश्वर’ मंदिर आजही मजबुतीने उभं आहे. ह्या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर ९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेलं आहे असं भासवण्यात आलं आहे.

ह्यातील प्रत्येक हत्तीची रचना वेगळी आहे. ह्या मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले १०८ खांब आहेत. ह्या खाबांनी मंदिराचं पूर्ण छत तोललेलं आहे. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे.

१०८ खांब मंदिराच्या निर्मितीमध्ये निवडण्यामागेही गणित आहे. असं म्हटलं जातं की ह्या आकड्याला हिंदू धर्मात मोठं स्थान आहे.

ह्यामागे एक कारण सांगितल जातं ते म्हणजे पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट सूर्याचा व्यास आहे तर सूर्य आणि पृथ्वी ह्यामधील अंतर १०८ पट सूर्याच्या व्यासाइतकं आहे.

चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे.

(मी गणित करून बघितलं तर सूर्याचा व्यास आहे १३,९१,००० किमी. ह्याला १०८ ने भागल्यास उत्तर येते १२,८७९ किमी. पृथ्वीचा व्यास आहे १२,७४२ किमी. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील अंतर आहे १४९.६ मिलियन किलोमीटर. जर सूर्याच्या व्यासाला १०८ ने गुणल तर उत्तर येते १५० मिलियन किलोमीटर. चंद्राचा व्यास आहे ३४७४ किमी. त्याला १०८ ने गुणल्यास उत्तर येते ३ लाख ७६ हजार किलोमीटर. प्रत्यक्षात चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर आहे. ३ लाख ८४ हजार किलोमीटर.)

ह्याशिवाय हिंदू धर्मात १०८ पुरण आहेत तर १०८ उपनिषदे आहेत. संस्कृत भाषेत ५४ अक्षरे असून ती शिव आणि शक्ती रुपात लिहिता येतात, दोन्ही मिळून संख्या होते १०८.

ह्या शिवाय इतर अनेक गोष्टी १०८ ह्या संख्येचं हिंदू धर्मातील महत्त्व अधोरेखित करतात. आपल्या संस्कृतीत महत्वाच्या असणाऱ्या संख्येला मानून त्यावरून एखाद्या मंदिराची पूर्ण रचना करणे हे विज्ञान, तंत्रज्ञान ह्या शिवाय शक्यच नाही.

आपल्या संस्कृतीच्या कलेच्या आविष्कारात गणिताला स्थान देणे हे त्या प्रगत संस्कृतीचा एक दाखला नक्कीच आहे!

इथल्या शिल्पकलेवर एक वेगळा ग्रंथ होईल इतकी ती सुंदर आहे. नजाकत असणाऱ्या अनेक मूर्ती डोळ्याचं पारणं फेडतात.

पण ह्या सगळ्यावर कडी म्हणजे इथला स्वर्ग मंडप! स्वर्ग मंडपाची रचना करताना त्याला ४८ खाबांनी तोललेलं आहे. ह्यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा उच्च अविष्कार आहे.

प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. ह्यात गणितात असणाऱ्या सगळ्या आकारांचा वापर केला आहे. ( Round, Square, Hexagon, Octagon ) गोलाकार, चौकोनी, षट्कोन, अष्टकोन अशा सगळे आकार आपण प्रत्येक खांबात बघू शकतो.

हे सगळे खांब बनवताना त्याची रचना अशी केली गेली आहे की आपण ते पहाताना मंत्रमुग्ध होतो.

स्वर्गमंडपात वरच्या बाजूला १३ फूट गोलाकार छत नसून त्यातून आकाशाकडे बघताना स्वर्ग बघितल्याचा भास होतो. ही रचना १२ नक्षीदार खांबांनी तोललेली आहे.

स्वर्ग मंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून हा पूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र अश्या सगळ्या गोष्टींचा अविष्कार आहे.

ह्या सगळ्या शाखा एकमेकात इतक्या सुंदरतेने मिसळलेल्या आहेत की आपण एकातून दुसरी बाजूला काढू शकत नाही.

स्वर्ग मंडपाचा नुसता फोटो बघितला तरी विचार मनात येतो? हे खांब कसे बनवले असतील. कारण त्यावर असलेल्या कलाकुसरीवरून ते छिन्नी आणि हातोड्याने बनवणं अशक्य आहे असं वाटतं.

त्यावरील रचना एकमेकांशी मिळतीजुळती आहे. म्हणजेच ह्याचं निर्माण हे एका मास प्रोडक्शन सिस्टीमचा भाग असलं पाहिजे. त्याशिवाय अशी निर्मिती अशक्य आहे.

गणितात बघितले जाणारे सगळे आकार एकसंध दगडाच्या शिळेवर असे निर्माण करणे म्हणजे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा एक वेगळा अविष्कार आहे कारण प्रत्येक खांबाच्या शिळेचं वजन कित्येक टना मध्ये आहे.

इतक्या वजनाच्या खांबाना गोलाकार फिरवून त्यातून टर्निंग पद्धतीने आकार देणं ह्यासाठी खूप मोठी यंत्रणा नक्कीच वापरली गेली आहे.

ह्या सगळ्या खांबांची रचना आणि त्यावर शिल्पकलेची मांडणी करताना हे आकार कुठेच विसंगत वाटत नाहीत. ९०० वर्ष उलटून गेल्यावर पण सगळ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन आजही तिकडे जाणाऱ्या प्रत्येकाला हे मंदिर मंत्रमुग्ध करत आहे.!

खिद्रापूर इथे असलेलं कोपेश्वर मंदिर आपल्या हाकेच्या अंतरावर आहे. तिथं जाऊन त्या शंकराच्या आणि विष्णूच्या मूर्तीला नमस्कार करत असतानाच त्या मंदिराच्या शिल्पकारांच्या विज्ञान, गणित, स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानासमोर नतमस्तक होऊया !!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Pramod Savur says:

    Very very informative. Is the temple included in the tourist internery ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!