काय असतं सॉफ्ट स्किल आणि बोलण्यात त्याचं महत्त्व किती?

सॉफ्ट स्किल

तोंडातून शब्द काढून आपण बोलतो खरं, पण हे बोलणं आणि वापरलेल्या शब्दांबद्दल किती सजग असतो आपण, याचा कितीदा विचार करतो…? वयाच्या साधारणपणे दुसऱ्या वर्षी मनुष्यप्राणी बोलायला लागतो. तिथून पुढे मरेपर्यंत त्याचे बोलणे संपत नाही. मौन-बिन म्हणजे योग्याचं काम. सामान्य मनुष्याचं बोलल्याविना चालत नाही. बोलणं ही नैसर्गिक क्षमता आहे. पण सुंदर बोलणं ही कला आहे. तोंडातून आवाज काढणं किंवा विशिष्ट भाषेत संदेश देणं, हे आपण कायमच करत असतो. परंतु तरीही बोलण्याचं महत्त्व मात्र आपल्याला काही लक्षात येत नाही.

आजकाल सॉफ्ट स्किल या शब्दाला कॉर्पोरेट क्षेत्रात कमालीचं महत्त्व आलं आहे. काय असतं हे सॉफ्ट स्किल आणि बोलण्यात त्याचं महत्त्व किती? आपलं म्हणणं किंवा संदेश कमीत कमी, अचूक आणि तरीही परिणामकारक शब्दात बोलता किंवा लिहिता येणं, हे फार मोठं कौशल्य आहे. प्रयत्नाने व सरावाने ते अवगत करता येतं. पण यातला सर्वात महत्त्वाचा घटक कदापि विसरता कामा नये. तो म्हणजे संदेशाची सत्यता, प्रामाणिकपणा आणि तो पाठवणाऱ्याची आंतरिक तळमळ.

संतांची चार शब्दांची वाक्यं आपल्या हृदयांवर शतकानुशतके अधिराज्य गाजवतात. त्या शब्दांना एवढी हुकूमत का प्राप्त होते? कारण त्या शब्दापाठी अनुभवाची धार आहे. हृदयाचा सच्चेपणा आहे. ‘शहाणे करुनि सोडावे सकळ जन’ ही तळमळ आहे.

‘जग बदल घालुनि घाव’ इतक्या चार साध्या शब्दांत इतकी ताकद कुठून आली? त्या चार शब्दांपाठीही कवीच्या अनुभवाची धग आहे. अन्यायाचा खंबीर प्रतिकार करण्यासाठी कवीने झेललेले वार आहेत. दुसऱ्याने अन्यायात जगू नये, म्हणून त्याला वाटणारी आत्यंतिक तळमळ आहे.

संत तुकाराम म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने/शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. आम्ही जन्मभर अखंड बोलतो. शब्दांचे समुद्र ओततो, पण शब्दांचं रत्न काही आपल्याला सापडत नाही. घरी कपाटभर पुस्तकं असतात, पण शब्दांचं धन काही कळत नाही. शब्दापाठचा संघर्ष, अनुभवांची खोली आणि जनकल्याणाची अपार तळमळ शब्दाला रत्न बनवते. या झाल्या महान गोष्टी, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यातही शब्दाचं काही महत्त्व आहेच.

सणावाराला आपण वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार करतो. त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे आशीर्वादाचे फक्त चार शब्द मनाला किती तृप्त करतात. त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाचं तेज त्या शब्दांना लाभतं. पाया पडल्यावर कुणी नुसतं ‘सुखी व्हा’ एवढंच म्हटलं तर किती आनंद होतो. एखाद्याला आशीर्वाद देणाऱ्याला महाकाव्य म्हणावं लागत नाही, फक्त दोनच शब्द असतात. ‘सुखी राहा,’ ‘कल्याण होऊ दे,’ ‘सौभाग्यवती भव,’ वगैरे. इथं हे लहानसे शब्द साध्या माणसाच्या जीवनात सुखाचा मंत्र बनतात. ऐकणाऱ्याला शांती-समाधान देतात. बीजमंत्र नेहमी अल्पाक्षरी असतात, पण त्याच्यात बीजाची फुलण्या-फळण्याची संपूर्ण ताकद असते.

आज आपल्या हातात संदेशवहनाची उदंड साधनं आली आहेत. भरारा भाराभर संदेशांची देवाणघेवाण मुक्तहस्ताने चालू असते. आपण न वाचताच मेसेज फॉरवर्ड करण्याइतके फॉरवर्ड झालोय. शब्दांचा सच्चा, कोवळा, सोलीव पारदर्शी अर्थ मात्र हरपलाय.

वर्षानंतर माहेरी आलेल्या लेकीला आई म्हणते, ‘बरीयेस ना?’ दोनच शब्द, ‘बरीयेस ना?’ केवढी माया, केवढा ओलावा, केवढं वात्सल्य, केवढी ओढ आहे त्यात. दुसऱ्या ढीगभर शब्दांना त्या ‘बरीयेस ना?’ची सर नाही. मुलाखतीच्या वेळी आपण जेव्हा बोलतो त्या वेळी त्यातला खरेपणा, अचूक माहिती समोरच्याला सकारात्मक बनवते. नेमक्या शब्दातले लहानसे संदेश योग्य ते काम करतात. संत ज्ञानेश्वरांनी एका ओवीत लिहिलंय, ‘ये हृदयीचे ते हृदयी घातीले.’ आपण अनेक नात्यांनी जगतो. प्रत्येक नात्यात संदेशांची शाब्दिक देवाणघेवाण अपरिहार्य असते. थोडं विचारपूर्वक, विवेकाने, मृदूपणे बोललं तर अनेक संबंध यशस्वी होतात. खणाखण शब्दांच्या तलवारी वाजवल्यानं कामं होत नाहीत. पण शब्दाला अनुभवाची जोड लाभली की, शब्द तलवारीपेक्षा प्रभावीपणे धारदारपणे काम करतात.

एखाद्याशी फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलण्यापूर्वी मनातल्या मनात वाक्यांची जुळवाजुळव करून ठेवली तर बोलणं मोजकं पण योग्य होतं. परीक्षेच्या वेळी मनात आधीच आपल्या शब्दात उत्तरं बनवली तर ती अधिक सुसंगत होतात. थोड्याशा पूर्वतयारीने काय बोलायचं ते आधीच ठरवल्याने बोलण्याची परिणामकारकता वाढते. वेळ आणि शब्दांचा फापटपसारा वाचतो.

काही लोक बोलताना जागोजाग सुंदर म्हणी, वाक्प्रचार वापरतात. ऐकायला छान वाटतं. अर्थ लवकर समजतो. आपलं बोलणं ‘सौ बात की एक बात’ बनवायचं असेल तर नेहमी संयमाने आणि विचारपूर्वक बोललेलं चांगलं. नाहीतर मग, ‘बोल-बोल नाऱ्या, न धोतर गेलं वाऱ्या…’ व्हायला वेळ लागत नाही.

‘व्यक्तिमत्व विकासासाठी सॉफ्ट स्किल’ मराठी पुस्तक


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!