अशिक्षित असून जगाच्या पटलावर आपलं नाव उमटवणाऱ्या, राहीबाई पोपरे!!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गेली अनेक वर्ष सगळ्याच माध्यमातून चर्चेत राहिला आहे. अवेळी येणारा पाऊस, शेती उत्पादन घेण्यात येणाऱ्या अडचणी ते शेतीमालाला मिळणारा हमीभाव अशा एक ना अनेक गोष्टींमधून हतबल झालेला शेतकरी, पर्यायाने कर्जाच्या ओझ्याखाली दबत आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे हे अनेक घटनांमधून अधोरेखित झालं आहे.

पण अशा बिकट परिस्थितीतून मार्ग काढत एका निरक्षर स्त्रीने सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक बी / बियाणे ह्याची जपणूक करण्यासाठी महाराष्ट्रात एक चळवळ उभारली आहे.

ह्या चळवळीची नोंद दस्तुरखुद्द भारत सरकार ते बी.बी.सी. ह्या सर्वांनी घेतली आहे. बी.बी.सी. ने २०१८ सालातल्या जगातल्या सगळ्यात प्रभावशाली पहिल्या १०० महिलांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. तसेच भारत सरकारने २०१९ चा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

ह्यासह भारताच्या ‘कौन्सिल फॉर सायंटिफिक ऍन्ड इंडस्ट्रिअल रिसर्च’ चे डायरेक्टर जनरल आणि भारताचे एक सर्वोत्तम शास्त्रज्ञ ‘रघुनाथ माशेलकर’ ह्यांनी ज्यांना “बियांची आई” ही उपाधी बहाल केली आहे अशा ‘राहीबाई सोमा पोपेरे’ आज सगळ्याच स्त्रियांसाठी एक आदर्श ठरत आहेत.

मला वाटतं, बी.बी.सी. च्या त्या लिस्ट मध्ये अशिक्षित असणारी पण त्याच वेळी आपल्या कर्तृत्वाची दखल जागतिक पातळीवर घ्यायला लावणारी ही भारतीय दुर्गाशक्ती एकमेव महिला असेल.

नैसर्गिक बी / बियाणं देशीविदेशी कंपन्यांनी तयार केलेल्या कृत्रिम आणि जास्त पीक देणाऱ्या बियाणांमुळे येत्या काही वर्षात नष्ट होणाच्या मार्गावर आहे.

आज एकरात जास्त पीक घेण्याच्या स्पर्धेत ह्या बियाणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या तशाच दुर्लक्षित ठेवल्या जात आहेत. आजचा शेतकरी दिवसेंदिवस ह्या कृत्रिम बी / बियाणांवर अवलंबून होतो आहे. ह्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागले आहेत. हे कृत्रिम बी पुढल्या वर्षीसाठी राखून ठेवता येत नसल्याने शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी नवीन चढ्या भावाने ते विकत घ्यावं लागत आहे. तसेच ह्या शेतीतून तयार झालेला माल खाल्ल्यामुळे आजारांची संख्या ही वाढत आहे.

हे सर्व लक्षात आल्यावर राहीबाई पोपेरे ह्यांनी नैसर्गिक बी / बियाणं गोळा करण्यास सुरवात केली. १५ तांदळाच्या जाती तर इतर भाजांच्या ६० पेक्षा अधिक नैसर्गिक बियाणांचं त्यांनी संवर्धन केलं. आपली चळवळ पुढे नेताना महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या ‘अकोले’ तालुक्यात त्यांनी ‘कळसुबाई परिवार बियाणे संवर्धन समिती’ ची स्थापना करून ह्या कामी गावातील इतर स्त्रियांना आपल्यासोबत बरोबर घेतलं.

नैसर्गिक बियाणांचं असलेलं महत्त्व त्यांनी गावातील स्त्रियांना आणि शेतकऱ्यांना पटवून दिलं. आपल्या ४ एकराच्या उजाड असलेल्या शेतात पाण्याचं कुंड निर्माण करून पावसाचं पाणी साठवलं.

“महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ट्रान्स्फर फॉर रुरल एरिआ’ ह्यांच्या सहयोगाने त्यांनी जवळपास २ एकर ची शेती ओलिताखाली आणत त्यातून शेतीचं उत्पन्न घेण्यास सुरवात केली. फोर स्टेप पॅडी ह्या शेतीच्या पद्धतीने करण्यात त्यांनी कौशल्य मिळवलं.

आपला हा अनुभव मग त्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांना द्यायला सुरवात केली. पावसाच्या पाण्याची बचत, सेंद्रिय शेती, नैसर्गिक बी / बियाणं ते पीक घेण्याच्या आधुनिक पद्धतींचा उपयोग त्यांनी आपल्या आजूबाजूला समजावून सांगताना एक चळवळ उभी केली.

त्यांची कल्पना जोर धरत होती. त्यातून मग त्यांनी बियाणांची बँक स्थापन केली. ज्यातून ३२ वेगवेगळ्या पिकांच्या जवळपास १२२ पेक्षा जास्त जातींचं नैसर्गिक बी / बियाणांचं वाटप त्यांनी सुरु केलं.

हे वाटप करताना अट एकच घातली गेली की जेवढं बी / बियाणं शेतकरी ह्या वर्षी नेतील त्याच्या दुप्पट बी / बियाणं त्यांनी पुढल्या वर्षी बँकेला परत करायचं. ह्या कल्पकतेने राबवलेल्या उपक्रमाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. नैसर्गिक बी / बियाणं, सेंद्रिय शेती ह्यामुळे निघणाऱ्या उत्पन्नाचा दर्जा कमालीचा वाढला आहे. तसेच आपोआप नैसर्गिक बी / बियाणांचं संवर्धन होते आहे!

आपलं कर्तृत्व इथवर मर्यादित न ठेवता राहीबाई पोपेरे ह्यांनी ‘चेमदेवबाबा महिला बचत गट, कोंभळाणे’ स्थापन करत वैद्यकीय शिबीर, तसेच सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा वापर करण्यासाठी अजून एक चळवळ सुरु केली.

ह्या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या पटलावर दिसायला लागल्यावर ह्याची दखल ‘बी.ए.आय.एफ. रिसर्च फौंडेशन’ ने २०१७ साली घेतली. राहीबाई पोपेरे ह्यांनी इथेच न थांबता २०० पेक्षा अधिक बी / बियाणांचं संवर्धन आणि २५,००० पेक्षा जास्त गावच्या घरातील शेती आणि बगीच्यांमध्ये अशा नैसर्गिक बी / बियाणांचं संवर्धन करण्याचा मानस बोलून दाखवला आहे.

एक सामान्य शेतकरी, अशिक्षित बाई जिने कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. शेती करणाच्या पूर्ण पद्धतीला बदलण्याचा विडा उचलून त्यात बदल घडवते. आपल्या अनुभवाने समृद्ध होऊन तोच अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना समजावून सांगून एक चळवळ उभारते.

ज्याने नुसत्या शेतीमधून निघणाऱ्या उत्पन्न आणि त्याच्या दर्जा मध्ये आमूलाग्र बदलच घडत नाही तर नैसर्गिक बी / बियाणांना संवर्धन करण्याची, निसर्गाला आपलंसं करण्याकडे एक पूर्ण समाज पाऊल टाकतो. तिच्या कर्तृत्वाची दखल जिथे साता समुद्रापार असलेली ‘बी.बी.सी.’ घेते पण ज्या महाराष्ट्रात ही चळवळ सुरु केली तो महाराष्ट्र आज तिच्या नावापासून अनभिज्ञ आहे ही मोठी शोकांतिका आहे.

महिला दिनाच्या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींकडून नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना राहीबाई सोमा पोपेरे ह्यांच्या फोटोमागे कित्येक वर्षाचा एक प्रवास आहे ज्याचा आदर्श समाजातल्या प्रत्येक स्त्री, पुरुषांनी नक्कीच घ्यायला हवा. आयुष्य जगलेल्या राहीबाई सोमा पोपेरे ह्यांना माझा साष्टांग नमस्कार!!!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “अशिक्षित असून जगाच्या पटलावर आपलं नाव उमटवणाऱ्या, राहीबाई पोपरे!!”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय