क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार..!

कुसुमाग्रज

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जळत्या निखाऱ्यांवरुन चालणाऱ्या क्रांतीकारांच्या ओठावरचं, कविवर्य कुसुमाग्रज यांनी शब्दबद्ध केलेलं हे गाणं ऐकलं की, डोळ्यासमोर उभे राहतात शाहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु. पायाखाली अंगार असताना सुद्धा स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या या तीन युवकांनी उन्मत्त इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. कीर्तीसाठी किंवा प्रीतीसाठी गुंतून न पडता मातृभूमीसाठी या तिन्ही वीरांनी आपले आयुष्य समर्पित केले. या त्रिमूर्तींनी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान हा स्वातंत्र्य चळवळीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. ‘इन्किलाब झिंदाबाद,’ चा नारा देत भारतमातेच्या या सुपुत्रांनी ब्रिटीशांच्या साम्राज्यशाही विरोधात लढा उभारला आणि देशाच्या स्वतंत्र्यासाठी हसत-हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करले. घरावर तुळशीपत्र ठेऊन भारतमातेसाठी जे शहीद झाले ते अमरत्वाला प्राप्त ठरले. अशा महान क्रांतिवीर देशभक्तांचा आज स्मृतिदिन..!

इंग्रजांच्या अमानुष मारहाणीत क्रांतिकारक लाला लजपतराय यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव हे तीन भारतमातेचे पुत्र पेटून उठले. ब्रिटिश पोलीस अधिकारी जे. पी. साँडर्स याची या तिघांनी हत्या केली. ब्रिटिशांनी या वीरांना पकडून सध्याच्या पाकिस्तानमधील लाहोर येथील तुरुंगात डांबले व आजच्याच दिवशी म्हणजे २३ मार्च १९३१ रोजी त्यांना फासावार चढविण्यात आले. म्हणूनच या वीरांच्या स्मरणार्थ २३ मार्च ला ‘शहीद दिन’ असे संभोदले जाते. संपूर्ण देशभरात आजच्या दिवशी या वीरांचे स्मरण केले जाते.. त्यांना अभिवादन केले जाते.

अशा महान देशभक्तांचे आणि क्रांतिवीरांचे सतत स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये मुक्तपणे वावरत आहोत हे त्यांच्याच बलिदानाचे फळ आहे. त्यामुळेच या क्रांतीविराना अभिवादन करत असताना ज्या स्वातंत्र्याचा आज आपण उपभोग घेत आहोत त्याचे ‘मुल्य’ आपल्याला कळले आहे का? देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या क्रांतीकारांच्या ‘ देशभक्ती ‘ ची व्याख्या आपल्याला उमगली आहे का? शहीद भगतसिंग यांचे स्थान तमाम भारतीयांच्या मनात तेवणाऱ्या ज्योतीसारखे अढळ आहे.. यात शंका नाही, परंतु भगतसिंग यांचे विचार आपण आत्मसात केले आहेत का? किंबहुना त्यांचे विचार आपल्याला समजले तरी आहेत का? यावर अंतर्मुख होण्याची गरज निर्माण झाली आहे.

भगतसिंगांचे हौतात्म्य आणि त्यांच्या अतुलनीय बलिदानाच्या कथा सर्वश्रुत आहेत. भगतसिंग हे नाव आजही अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यांच्या मनात उत्साह जागवते. देशभक्ती, आत्मबलिदान आणि स्पष्ट विचार यांचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे भगतसिंग आहे. भगतसिंगाना अवघे तेवीस वर्षांचे झंझावाती आयुष्य लाभले असले तरी त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू आजच्या युवकांना मार्गदशक असून त्यांचा विचार आजही प्रासंगिक आहे. ‘देशभक्ती’ कशाला म्हणावी, हे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या क्रांतीवीरांनी आपल्या आचरणातून दाखवून दिली.

देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा व त्यांना आपल्या बलिदानातून प्रेरणा मिळावी ही शाहिद भगतसिंग यांची इच्छा होती. आपल्या आदर्शांसाठी हे तिन्ही क्रांतिकारक हसत हसत फाशीच्या तख्तावर चढले. त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याची गोमटी फळे चाखत आहोत. त्यामुळेच आपल्याला या स्वातंत्र्याचं मोल कळलं आहे काय? याचा विचार करण्याची गरज आहे. आज स्वातंत्र्याचा उपभोग स्वैराचारासारखा घेतला जातो. कोण काय बोलेल आणि त्याचा कसा अर्थ काढला जाइल याचा नेम राहिला नाही. अभिव्यक्ती स्वतंत्र्याच्या नावावर या देशात देश विरोधी घोषणा दिल्या जातात.. आंधळ्या विरोधातून त्याचे समर्थन केले जाते. फक्त ‘बोलणे’ हीच आपल्या क्रांतीची परिभाषा बनली असल्याने आपण काही चुकीचे बोलत आहोत असेही याना वाटत नाही. त्यामुळेच ज्या मातीत आपण जन्म घेतला त्या मातीचा जयजयकार करण्यास विरोध करण्यापर्यंतही काहींची मजल गेली आहे.

वास्तविक स्वातंत्र्यपूर्व काळात ‘वन्दे मातरम’ आणि ‘ भारत माता कि जय ‘ या घोषणांनी कोट्यावधी स्वतंत्रसैनिकांना वेड लावले होते. भारत माता कि जय म्हणत अनेक क्रांतीकारकांनी आपल्या अंगावर इंग्रजांच्या लाठ्या काठ्या झेलल्या.. काही जणांनी हौतात्म्य पत्कारले.. थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु व सुखदेव हे सुद्धा ‘वन्दे मातरम’, ‘ भारत माता कि जय ‘ इन्किलाब झिंदाबाद,’ चा नारा देत फासावर चढले होते. मात्र आज कुणी एक म्हणतो म्हणून आम्ही ‘भारत माता कि जय’ म्हणणार नाही.. असे वक्तव्य जाहीरपणे केले जाते.. आणि त्यावर काही विशिष्ट लोक जोरजोरात टाळ्या वाजवितात याला या देशाचे दुर्दैवच म्हटले पाहिजे.

शहीद भगतसिंग याना असा ‘भारत’ निश्चितच अभिप्रेत नव्हता. भगतसिंग यांना संहारक क्रांती अपेक्षित नव्हती तर लोकजागृती आणि लोकसंघटन याद्वारे होणाऱ्या क्रांतीचे ते भोक्ते होते. त्यामुळेच त्यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीत जगणार्‍या भारतीयांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत निर्माण करून त्यांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले, स्वातंत्र्यलढ्यासाठी युवकांमध्ये राष्ट्रभक्ती ची भावना रुजवली. राष्ट्रप्रेमाने भारावलेले हजारो लाखो युवक स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात सामील झाले.

मात्र सध्याच्या काळात राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम यांचा अर्थ फार संकुचित झाला आहे. जो तो आपल्या सोयीनुसार याचा अर्थ लावून घेतो. कुणी याचा दुसऱ्याला डिवचण्यासाठी वापर करतो, तर कुणी राष्ट्रवादाच्या नावावर आपल्या मतपेट्या सुरक्षित करतो. मुळात देशाबद्दल आपुलकीची प्रगल्भ भावना, प्रेम, आदर, आणि कर्तव्य भावना असणे आणि या सर्व भावना नागरिकांच्या आचरणात व वागणुकीत प्रत्यक्षात येणे याला आपण राष्ट्रप्रेम म्हणू शकतो. अर्थात घोषणा द्यायला लावून आणि घोषणा देवून राष्ट्रप्रेम जन्माला घालता येत नाही तर ते मनात असावे लागते. मात्र आजकाल राष्ट्राप्रेमासारख्या भावनांना डीवचन्यात काही लोकांना पुरुषार्थ वाटू लागला आहे. ही या देशाची खरी शोकांतिका आहे. त्यामुळेच या देशातील स्वतंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला भगतसिंग यांचं चरित्र नव्यानं अभ्यासाव लागणार आहे.

स्वातंत्र्याचे मोल अनमोल आहे.. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतीकारांच्या बलिदानामुळे ते आपल्याला मिळाले आहे त्यामुळे त्याचे मोजमाप आपण शब्दात करू शकत नाही.. म्हणून या क्रांतीवीरांच्या विचारांचा मागोवा घेऊन वाटचाल करणं हीच शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना खरे अभिवादन ठरेल..!

अमेझॉनवर उपलब्ध असलेली शहीद भगतसिंग यांच्यावर आधारित पुस्तके


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!