अबोली – भाग २

आजकाल मी रंग खेळणं सोडलं आहे. आजकाल म्हणजे तरी झाली काही वर्षं.
आजची रंगपंचमी अपवाद. तू मात्र कधीच खेळायची नाहीस. बारावीत असताना एकदा रंगपंचमीच्या दिवशी तू शिकवणी घेऊन परत घरी निघाली होतीस आणि वाटेत मी नेमका तुझ्या समोर आलो, मित्रांबरोबर रंग खेळून!
मला असा रंगलेलं पाहून खुदकन हसलीस, अणि मी मित्रांच्या घोळक्यातून बाजूला येऊन तुझ्याशी बोलायला आलो.
“हे काय? तू ह्या वर्षी पण रंग नाही खेळणार?” मी तुला हे विचारताच तुझे डोळे चमकले. लगेच खाली मान गेली तुझी अणि दुसऱ्या क्षणाला एक हात उचलून माझ्या गालावरचा रंग जरा घेऊन तुझ्या गालावर लावलास!
“झाली रंगपंचमी!” इतकंच बोलून तिकडून धूम ठोकलीस! त्यानंतर रंगपंचमी मी नेहमी लक्षात ठेवायचो! हल्ली मात्र खूप वर्ष कसलीच आठवण नाही.
आता आजचंच घे. सकाळी खाली दंगा चालला होता. काय आहे बघायला खिडकी उघडली तर रंग खेळणारी कितीतरी छोटी मुलं दिसली! लगेच कपडे बदलले आणि तुझ्या घराच्या दिशेने पावलं पडत गेली.
तू परत आल्यापासून हे नित्याचंच आहे. काही झालं तरी माझी वाट तुझ्या घरावरुनच जाते.
तू आणि ती छोटी मुलगी.. माझे सगळे विचार व्यापून असता.. तुझ्या घरा जवळ आलो आणि लांबूनच अंगणातून तुमचे रंगीबेरंगी हसायचे आवाज आले.
खरंतर लगेचच मागे वळायचा विचार होता. पण राहवलं नाही म्हणून तुमच्या फटकापाशी आलो, जरा लांब ऊभा राहूनच तुझ्या सगळ्या रंगांना डोळ्यांत साठवलं आणि परत फिरलो तोच एक नाजूक हाक ऐकू आली, “काका! रंग?”
तुझी रंगीबेरंगी बाहुली माझ्या दिशेने दुडुदुडु पळत आली पण गडबडीत हातात रंग आणायला मात्र विसरली!
अवघ्या काही क्षणांचा विचार तिला पुरला. तिने खाली वाकायची खूण केली, मी वाकलो आणि तिने तिच्या गालांवरचा रंग काढून हळूच माझ्या गालांवर लावला.
आज एक वर्तूळ पूर्ण झालं!
लेखन: मुग्धा शेवाळकर
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.