मूड स्विंग

अवतीभवतीच्या जगात इतकी हरवून जातेस, वाटतं कुणी अनोळखी अस्तित्वच बरोबर वावरतंय.
एरवी शंभर हत्तींचं बळ घेऊन, येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करतेस, सगळ्यांना धीर देत पुढे जाण्याचा मार्ग शोधतेस…..आणि कधी कधी अशी स्वतःलाच हरवून जातेस…
का गं असं …?? माहीत आहे…
आजचं हे मूड स्विंग च वारं काही नव नाही तुझ्यासाठी. पण ‘का’ हा प्रश्न आलाच ना मनात..?
आत्तापर्यंत सगळ्यांच हवं नको पाहताना किती किती swings अनुभवलेस असे. असंख्य वेळा तुझ्या मनाची आंदोलने तुला हलवून गेली. स्त्रीत्वाचं लेणं लेऊन जन्माला आलीस.. पण त्याचे रडगाणे व्हावे, असे कधीच वाटले नाही तुला.. आणि म्हणूनच तर, हिमतीनेच निभावलंस सारं!!!
अगदी जोडीने आकाश पाळण्यात बसताना जागा आणि स्वप्ने तुलाच तर adjust करायची होती. तो झोकाही, तू झोकातच दिलास मनाला… गरोदरपणातल्या कोडकौतुकात, बसलेल्या झोक्यावर.. मनात उठलेले कल्लोळ… पोटावर हात ठेवत.. पिल्लाला आधार देत परतवलेसच ना…
आणि मग हाती नुसतीच पाळण्याची दोरी न घेता, संस्कारांची अंगाईगीतं बाळकडूसारखी पाजवत, आईपण सिद्ध केलंसच!!!
तारेवरची कसरत कशाला म्हणतात हा प्रश्न डोक्यात सुद्धा येऊ न देता साऱ्याच कसरती लिलया सांभाळत राहिलीस, ते कुणासाठी???? तुझाच तर सोस होता हा! हक्काच्या नात्यांना स्वतःच्या पाशात गुंतवलस, तर चुकलं कुठेच नाही…..
पण आता…. हळूहळू मुठीतल्या वाळूसारख्या झरझरणाऱ्या वेळेला, कधीतरी तुझ्यासाठी ही थांबू दे जरा! “नाच गं घुमा” असं म्हणत स्वतःच्याच वर्तुळात हौसेने गिरक्या घेताना कधीतरी थांबव स्वतःला!!!!!
“मन येत ग भरून कधिकधी.. ऐक जरा त्याचंही. त्यालाही गरज असते उबदार कुशीत शिरुन, मायेच्या वर्षावात गुदमरून जाण्याची!! मग घे ना कवेत त्याला… दे प्रेमाचा मखमली स्पर्श!!!
मोकळ्या आभाळाखाली संध्याकाळचे रंग न्याहाळताना झोक्याला दे एक नवी साथ… हो, तुझ्या आतल्या आवाजाची साथ!! ऐक त्याचही कोलाहापासून दूर जाऊन….
अगदी बरोब्बर!! “मूड स्विंग “…. का म्हणून बघू नको त्याच्याकडे… तो आहे म्हणून बघशील स्वतःकडे. तो सांगतोय ना, थोडसं मायेनं, प्रेमानं जवळ घे स्वतःलाच… कर लाड थोडेसे!!!!
अगं…भरुन आलं मन कधी तर बरसून घे… आणि मोकळी हो येणाऱ्या ओलसर सुगंधी क्षणांना सामोरी जाण्यासाठी!
ऐक जरा, येणाऱ्या काळाची चाहूल… रित्या होणाऱ्या घरट्यात तुझीच साथ तर असणार आहे तुला! काय हवं काय नको हे जाणुन घ्यायला आता तरी कर सुरुवात.. कारण काडी काडी जमवून बांधलेल घरटं हा तुझाच तर सोस होता, मात्र येणाऱ्या एकटेपणाच्या काळोखावर मात करण्या, मूड स्विंग हा हवाच! निदान तेव्हातरी शिकशील स्वतःतील आभा जीवंत ठेवून, अंगणात झिरपणाऱ्या तुझ्याच प्रतिभेच्या किरणांची उब घेण्या!!!!!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.