शेतकऱ्यांना ‘लावारीस’ ठरवणाऱ्या सत्तांधांना लगाम घालणार कोण?

शेतकऱ्यांना 'लावारीस'

२०१४ च्या निवडणुकीत न भुतो न भविष्यती अशा प्रचंड मताधिक्क्याने केंद्रात भाजपाची सत्ता आली. मात्र यश पचवणं अनेकांना जमत नाही. सत्तेची नशा एकदा डोक्यात गेली की, भल्या भल्ल्यांची टाळकी सटकतात. नेमकी तशीच गत भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. त्यांचे अनेक खासदार, मंत्री आणि ज्येष्ठ नेते कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रकाश झोतात येत असतात. भाजपच्या या वाचाळवीरांची नावे जर काढली तर भली मोठी यादी तयार होईल.

याच वाचाळवीरांच्या यादीत आता भाजपा प्रवक्ते ‘चौकीदार अवधूत वाघ’ यांच्याही नावाचा समावेश करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचे अकरावे अवतार मानणार्‍या वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचा उल्लेख चक्क ‘लावारीस’ म्हणून केला. एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपली अक्कल पाजळली आहे. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणार्‍या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता.

या ट्विटला ‘आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात.’, अशा प्रकारचे उत्तर वाघ यांनी दिले. असल्या पायपोस किमतीच्या नेत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांबद्दल केलेले असले वक्तव्य ऐकल्यानंतर कोणत्याही सुजाण नागरिकाची तळपायातली आग मस्तकात गेल्यावाचून राहत नाही.

भाजपचा हाच खरा चेहरा आहे. हे येथे आवर्जुन नमुद करायला हरकत नाही. कारण अवघूत वाघच नव्हे तर याआधीही भाजपच्या अनेक नेत्यांनी अशीच संवेदनाहिन वक्तव्ये केल्याचा इतिहास आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी तर तूर खरेदीबद्दल भाष्य करताना शेतकर्‍यांना ‘साले’ अशी शिवी देऊन अकलेचे तारे तोडले होते. खासदार पूनम महाजन यांनी तर शेतकर्‍यांच्या लाँग मार्च मागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा जावईशोध लावला होता.

मध्य प्रदेशमधील एका भाजपच्या नेत्याने तर दानवेंनाही याबाबतीत मागे टाकले. येथील हकम सिंह अनजाना नावाच्या भाजपच्या नेत्याने तर शेतकरी अप्रामाणिक असतात आणि त्यांना चपलेने मारायला पाहिजे, असे वक्तव्य करून कळस गाळला होता. हकम सिंह अनजाना यांचा शेतकर्‍यांचा अपमान करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. शेतकर्‍याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते. मात्र त्याच शेतकर्‍यांविषयी भाजप नेत्यांमध्ये अपशब्द वापरण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे यावरून दिूसन येते.

खर्‍या अर्थाने सत्ता डोक्यात गेल्यानंतर काय दुष्परिणाम होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा काही मागे नाहीत. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात नाभिक समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. तर भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींना पळूवन आणण्याची भाषा केली होती. भाजपाचे विधानपरिषदेचे सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले होते तर भाजपाचे नगरचे नगरसेवक छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले होते. सुब्रमण्यम स्वामी, साक्षी महाराज वगैरे वगैरे अशी यादी केल्यास ती वाढतच जाणारी आहे. मात्र खरा प्रश्न हाच आहे की, भारतीय जनता पक्षाच्या या वाचाळवीरांना चढलेला हा सत्तेचा माज उतरवणार कोण?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसकडे भाजपाचा उधळलेला वारू रोखण्याची आणि बेताल वक्तव्ये करणार्‍या नेत्यांची मस्ती उतरवण्याची नामी संधी चालून आली होती. मात्र काँग्रेसचा अहंकार केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. याची साक्ष अलिकडच्या काळात घडलेल्या काही घटनांवरून पटल्याशिवाय राहत नाही. छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश यासारख्या राज्यांत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी भाजपला सत्तेपासून बेदखल करण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसच्या अहंकारापायी बसपाने काँग्रेससोबत देशपातळीवर आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतही तेच झाले आम आदमी पक्षाने सर्वकाही विसरून काँग्रेससमोर दोस्तीचा हात पुढे केला. मात्र काँग्रेसने त्यांनाही भाव दिला नाही.

महाराष्ट्रातही काँग्रेसने तोच कित्ता गिरवला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुरूवातीपासून आघाडी करण्यासंबंधीची भुमिका घेतली. मात्र शेवटपर्यंत झुलवत ठेवून ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून आघाडीसाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातही २२ उमेदवारांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस झोपेतून जागी झाली. मात्र जाहीर केलेल्या उमेदवार्‍या माघारी घेणे आंबेडकरांनाही शक्य नव्हते. २२ जागी उमेदवारांची घोषण करेपर्यंत काँग्रेसवाल्यांनी कसली वाट बघितली, हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.

भाजपने मात्र आपल्या निवडणुकीच्या रणनितीत मोठे फेरबदल करत नरमाईची भूमिका घेतली. आपल्या निवडून येणार्‍या मतदारसंघातील जागाही त्यांनी आपल्या घटकपक्षांना देऊन सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग प्रशस्त केला. दुसरीकडे अहंकारी काँग्रेसने भाजपला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी मदतीचा हात दिला असेच म्हणावे लागेल. कारण यावेळी जर पुन्हा भाजपा सत्तेत आली तर त्याला सर्वस्वी काँगे्रसचा अहंकार जबाबदार असणार आहे. मग प्रश्न उरतो तो हाच की, सत्तांध वाचाळवीरांना रोखणार कोण?


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!