३ एप्रिल, दैदिप्यमान इतिहास घडवणाऱ्या शिवाजी महाराजांची पुण्यतिथी

शिवाजी महाराजांची पुण्यतिथी

रायगडावर पाऊल ठेवताच माती मस्तकी लागावी हीच इच्छा असते. जग्दिष्वराच्या मंदिरातून बाहेर पडून माघारी तसाच फिरलो. समाधीकडे जाण्याची ताकद ह्या पायात उरलीच नाही रायगड खूपदा केलाय पण खूप कमी वेळा समाधी जवळ जाऊन येण्याच्या योग आला….

नाही होत माझी हिंमत अजून त्या तेजस्वी सूर्याला पाहण्याची…. हो नाही येत अंगात बळ, नाही होत धाडस, समोर जाण्याचं…

वडील गेल्यावर पोरगं पोरक होतंय तसा अवघ्या स्वराज्याला पोरके करून आजच्या दिवशी ३ एप्रिल १६८० ला महाराज दिगंतात विलीन झाले…

महाराज गेले आणि स्वराज्याचा धनीच गेला…. कित्येकजण शोकाकुल झाले, आमचा देवच रायगडी असतो, त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय चैन पडत नसणारी रयत डोक्यावरून वडिलांचे शत्र हरवल्यासारखी झाली… शत्रूनेही गुडघे टेकून नमाजी अदा केल्या…

महाराज आजच्या दिवशीच तुम्ही रयतेस पोरंक केलंत, धाकल्या धन्याच्या पाठीवर जबाबदारी टाकून गेलात…

रयतेस पोटाशी घेवून बापासारखा जीव लावणारा राजा ह्या मातीत घडून गेल्याचा एक अभिमानाच वाटतोय.
पण महाराज तुमचं स्वप्न होतं हे स्वराज्य टिकावं, स्वराज्य जगावं, लोकांसाठी इथं ना कोणी छोटा ना मोठा, सगळे सारखेच असं हे स्वराज्य तुम्ही जनतेच्या पदरात टाकलं… अवघे आयुष्य झिजलात तुम्ही रयतेसाठी….

पण महाराज आजही होत नाही त्या समाधीजवळ येऊन दोन मिनिटं थांबायचे धाडस…. नाही होत आजही… माझ्याकडून तिथं येऊन एकदा मुजरा करताना. समोर येता क्षणी आठवतो तो काळ… डोळ्यांत असणारा अंगार…ते स्वप्न स्वराज्याचे… तो वसा… ती शपथ… ते मावळे आणि जीव ओवाळून टाकणारे तुम्ही…

महाराज आपण गेलात पण तुमची दूरदृष्टी सोडून गेलात…. जगण्याचं तंत्र आणि शिवराय एक मंत्र देऊन गेलात… एखाद्या मनाने मेलेल्या शरीरात स्फुरण निर्माण करण्याची ताकद असणाऱ्या राज्यांनी अवघ्या स्वराज्याला जगण्याचा मंत्र दिला… आज साडेतीनशे वर्षे होऊन गेलीत पण तुमची दूरदृष्टी कोणाला लाभलेली नाही…

नाही होऊ शकले आपणांसम आणि होणारही… ऐसा राजा पुन्हा होणे नाही…. महाराज पोरकी झाली असेल ओ त्यावेळी रयत… तो पोरकेपणा आजही जाणवतोय….

रायगडी फिरताना आजही तिथला दगड अन् दगड इतिहासच सांगत असतो….

सांगत असतो तो पराक्रम… सांगत असतो ती निष्ठावान मांदियाळी

सांगत असतो तो प्रत्येक मावळ्यांची असणारी ओढ….

त्या दगडात आपण चिरनिद्राच घेताय असेच वाटू लागते… ती शांतता…. आणि हवेचा होणारा स्पर्श…

ज्यांच्यामुळे देवळात देव आहेत त्यांना पाहताना देवाला पाहिल्यावर देखील आनंद होत नाही त्याहून जास्त होतो…

उगवतीच्या पहिला किरण जसा काय मुजराच करून येतोय असं वाटू लागतं…

मावळतीला पाहताना आज मात्र माझा सूर्यच मावळतोय अस वाटू लागलं…

एक दैदिप्यमान इतिहासाची परंपरा देणारे आमचे धनीच गेलेत असे वाटू लागतं… तिनशेहून अधिक वर्ष होऊन गेलीत पण माझ्या राज्याची उणीव मात्र भरून आलीच नाही…

शौर्य, धैर्य, नितीमत्ता, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवाला मुक्त करण्यासाठी आणि या भूतलावर सुवर्ण-स्वराज्य निर्माण करणारे तुमचे आमचे नाही तर या सकल त्रैलोक्याचे पालनकर्ते, तारणहार… राजमान्य राजश्री, अखंडलक्ष्मीअलंकृत, महापराक्रमी महाप्रतापी, महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व स्वराज्याला पोरके करुन अनंतात विलीन झाले…

ज्यांच्या उपकारांची परतफेड आपण हजारो पिढ्या करु शकत नाही. अशा या महामानवाला, युगपुरुषाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा त्रिवार मुजरा आणि विनम्र अभिवादन…

शिवाजी महाराजांचा स्वर्गवास- ३ एप्रिल १६८०


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.