नवीन वर्षासाठी हे नवे आर्थिक संकल्प आवर्जून करा!!

नवीन वर्षाची गुढी

नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पांनी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी.

ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही. मी अलीकडेच महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीकरीता, ‘मुलांसाठी गुंतवणूक करायचीय ?’ याविषयावर एक लेख दिला होता.

त्यात पी. पी. एफ., म्युच्युअल फंडाचे एस. आय. पी. आणि शेअर्सच्या एस. आय. पी. यांची माहिती दिली होती. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार त्यांची टक्केवारीत विभागणी करून त्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय सुचवला होता.

खरंतर कोणतेही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचा हा अतिशय समतोल पर्याय आहे. याचबरोबर या नव्या आर्थिक वर्षासाठी आपण कायकाय करणे अपेक्षित आहे याची उजळणी करुयात.

1) मुदतीचा विमा: वार्षिक उत्पन्नाच्या २० पट हवा. तेवढा आहे का नाही ते पहा? योग्य तेवढी रक्कम टॉप अप करा.

2) आरोग्य विमा : वार्षिक उत्पन्नाच्या २/३ पट आहे की नाही ते पहा. वरील दोन्ही योजना अखंड चालू राहणे महत्वाचे आहे. याची आठवण करून देणाऱ्या तारखेचा रिमाईंडर मनात आणि मोबाईलमध्ये सेट करा.

याशिवाय आपली कोणतीही विशेष गरज असेल त्याप्रमाणे जोखीम लक्षात घेऊन योग्य ते सुरक्षा कवच घ्यावे.

3) समभाग संलग्न बचत योजना (ELSS): कर वाचवण्यासाठी elss योजनेस प्राधान्य द्या. त्यात एस. आय. पी. करा.

ELSS, म्युच्युअल फंडाच्या योजना, शेअर्स यातून असाधारण कमाई होत असेल कर भरावा लागेल याचा विचार न करता फायदा काढून घ्या आणि तो सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF), स्वेच्छा भविष्यनिर्वाह निधी (VPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) सारख्या करमुक्त योजनेत गुंतवा.

काही विशेष हेतूने एस. आय. पी. केले असेल तर त्यातील बहुतेक रक्कम आपल्या जरुरीपूर्वी काढून घेऊन मनी मार्केट फंडात ठेवा म्हणजे जेव्हा खरच पैशांची गरज असेल तेव्हा मार्केट खाली असेल तर नुकसान होणार नाही.

4) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS): आपले करपात्र उत्पन्न ५ लाखाहून अधिक असेल तर जास्तीचे ५० हजार एन. पी. एस. मध्ये टाका यामुळे कर तर वाचेलच (80 CCD/1-B नुसार) आणि दीर्घकाळात त्याचा अधिक फायदा होईल.

आता एन. पी. एस. खाते ऑनलाइन उघडता येते तसेच वेळोवेळी त्यात पैसेही भरता येतात. यातील शेअर्सच्या गुंतवणुकीची मर्यादा 75% पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच मुदत पुर्ण झाली की त्यातून 60% रक्कम काढता येते ती पूर्णपणे करमुक्त आहे.

5) स्वेच्छा निवृत्तीवेतन योजना (VPF) : आपल्या पी. एफ. मध्ये स्वेच्छेने अधिक रक्कम टाकता येते. ती वाढवा, भरणे चालू केले नसल्यास चालू करा. पी. पी. एफ., व्ही. पी. एफ., एस. एस. वाय. यात गुंतवलेली, आणि एन. पी. एस. मधून काढून घेता येणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असल्याने करसवलतींचा विचार न करता अधिकाधिक गुंतवणूक करा ज्यामुळे मोठी रक्कम जमा होईल आणि करमुक्त उत्पन्नात भर पडेल.

6) आकस्मिक निधी: यासाठी ठेवलेली रक्कम बँकेच्या बचत (Saving) अगर मुदत खात्याऐवजी (FDR) नव्याने चालू झालेल्या पेमेंट बँकेत ठेवा तेथे अधिक व्याज मिळेल.

करकपात होऊ नये म्हणून 15/G, 15/H फॉर्म : आपले करपात्र उत्पन्न सेक्शन 87 मधील करसुट धरून ५ लाख या करपात्र मर्यादेच्या आत असल्यास, सर्वसाधारण लोकांनी ४० हजारापेक्षा जास्त व्याज मिळू शकणार असेल तर 15/G आणि जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत 50 हजारहून अधिक व्याज मिळू शकणार असेल 15/H फॉर्म एप्रिलमध्येच भरून द्यावा म्हणजे मुळातून करकपात होणार नाही.

आपल्या गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेणे जरुरी आहे. असा आढावा वर्षातून किमान एकदा तरी घ्यावा. म्युच्युअल फंड आणि शेअर्सचा उतारा ऋण झाला म्हणून घाबरून जाऊन विक्री न करता त्याचे आंतरिक मूल्य लक्षात घ्यावे.

या सर्व जुन्याच गोष्टी आहेत फक्त त्यांची आठवण या लेखात करून देतोय म्हणूनच ‘संकल्प जुनेच वर्ष नवे’.

येणारे नवीन वर्ष भरभराटीचे जाओ या शुभेच्छा.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Renukadas says:

    Really it is very much needed in Marathi language

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!