ओपन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग म्हणजे काय?

अल्गोरिथमिक ट्रेडिंग म्हणजे काय?

भांडवल बाजारातील शेअर, इंडेक्स, एफ. एन. ओ., करन्सी, कमोडिटी यांच्या व्यवहारासदर्भात ओपन पोझिशन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग यासारखे शब्द ऐकायला मिळतात. हे म्हणजे नक्की काय आहे ते जाणून घेऊयात. आपल्याला माहीत आहेच की शेअरबाजार, वस्तुबाजार, विदेशी चलनबाजार हे भांडवल बाजाराचे घटक आहेत. या बाजारामध्ये तेथे खरेदी/ विक्री केली जाऊ शकेल अशा सर्वांचे, रोखीचे /हजर (Cash) आणि भावी व्यवहार (Derivetives) केले जातात. यात खरेदीदार विक्रेते या दोघांचा सामावेश होतो. यामध्ये विशिष्ठ भावात केलेल्या खरेदीची नंतर विक्री करता येते किंवा आधी केलेल्या विक्रीची विहित काळात खरेदी करून देता येते.

जेव्हा बाजारात कार्यरत गुंतवणूकदार व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडे आधी खरेदी केलेली भांडवली मालमत्ता असते तेव्हा त्यांची (खुली स्थिती) ओपन पोझिशन आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून पूर्णपणे नव्याने खरेदी किंवा विक्रीसाठी शेअर्स, वस्तू, निर्देशांक किंवा चलन यांची ऑर्डर टाकली जाते. ही ऑर्डर मार्केट ऑर्डर असेल तर लगेच स्वीकारली जाते किंवा लिमिट ऑर्डर असेल तर अपेक्षित भाव आल्यावर पूर्ण होते या सर्वच ऑर्डर्स जोपर्यंत त्याच्या विरुद्ध ऑर्डर केल्या जाऊन जुळून पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या सर्व पोजिशन ओपन आहेत असे म्हणतात.

उदा. एखाद्या गुंतवणूकदाराकडे L & T या कंपनीचे १०० शेअर्स आहेत ही व्यक्ती जोपर्यंत ते शेअर्स विकत नाही तोपर्यंत ही पोझिशन ओपनच राहाते अशाप्रकारे अनेक पोझिशन ओपन राहू शकतात. ओपन पोझिशन आहे याचा अर्थ असा की संबंधित गुंतवणूकदाराने भांडवल बाजारात गुंतवणूक करून त्याच्याशी संबंधित असलेला धोका मान्य केला आहे. अल्पकालीन गुंतवणूकदार जसे डे ट्रेडर, पॉझिसशनल ट्रेडर आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार यांच्या ओपन पोझिशन या सेकंदाच्या काही भागाहून कमी ते कित्येक वर्षे एवढ्या कालावधीपैकी कितीही कमी अधिक काळ असू शकतात.

या ओपन पोझिशन त्याच्या विरुद्ध ट्रेड केला की क्लोज होतात यालाच (बंद स्थिती) क्लोज पोझिशन असे म्हणतात. खरेदी केलेली मालमत्ता विकून अथवा आधी विकलेली मालमत्ता खरेदी करून देऊन ओपन पोझिशन क्लोज होऊ शकते. क्लोज पोझिशन ही अनेक कारणासाठी केली जाऊ शकते. त्यातील सर्वात महत्वाचे कारणे खालीप्रमाणे-

  • अपेक्षित उतारा मिळतो आहे असे वाटल्याने.
  • काही अडचणींवर मात करण्यासाठी असलेली पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी.
  • जास्त पैसे नसल्याने डे ट्रेडिंगमध्ये नाईलाजाने कापण्यासाठी.
  • संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी स्टॉप लॉसचा वापर केल्याने.
  • बाजाराच्या नियमानुसार मालमत्ता अगर पैसे वेळेत न देऊ शकल्याने रिव्हर्स झालेले सौदे.

शेअरबाजारात व्यवहार करण्यासाठी ऑर्डर देण्याच्या विविध पद्धतीमध्ये आपणास कव्हर ऑर्डर व ब्रॅकेट ऑर्डर यांची माहिती यापूर्वीच मिळवली आहे. कव्हर ऑर्डर टाकून आपला संभाव्य तोटा मर्यादित ठेवू शकतो तर ब्रॅकेट ऑर्डरमुळे मर्यादित तोटा आणि अपेक्षित फायदा मिळवता येतो या पद्धतीने एका विशिष्ठ भावास ऑर्डर आपोआप टाकली जाईल अशी व्यवस्था आहे त्याप्रमाणे काही मोठे गुंतवणूकदार संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या ऑर्डर विशिष्ट संगणक प्रणालीच्या साहाय्याने करतात.

कोणत्या भावास कोणते शेअर्स घ्यायचे किंवा कोणत्या भावास विक्री करायची याचे स्वतंत्र तंत्र विकसित करून त्याप्रमाणे खरेदी विक्रीची ऑर्डर टाकली जाईल याची व्यवस्था करतात. यास अल्गोरिदमीक ट्रेडिंग असे म्हणतात. यामुळे फंड व्यवस्थापन अचूक आणि सुलभ होते. ही पद्धत विकसित करण्यासाठी खुला भाव, बंद भाव, विशिष्ट वेळेतील सरासरी भाव, बदलता सरासरी भाव, उलाढाल, मागील सर्वोत्तम भाव, किमान भाव, मागील ५२ आठवड्यातील भाव या सर्वांचा वापर करण्यात येतो. ही पूर्ण संगणकीय प्रणाली असल्याने तिची योग्य ती सुरक्षा राखली न गेल्यास त्याचे हॅकिंग होऊन मोठा घोटाळाही होण्याचा धोका असल्याने विद्यमान पद्धत निर्दोष होऊन गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये यासाठी भांडवल बाजार नियामक उपाय योजत आहे.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.