शेअरबाजाराच्या चढ उतारांना सामोरे जाण्यासाठी गुंतवणुकीचे धोरण कसे ठरवावे?

गुंतवणुकीचे धोरण

गुंतवणूकदारांचे विविध प्रकार आपण यापूर्वी पाहिले आहेत यात गुंतवणूक कालावधीनुसार रोजच्या रोज व्यवहार करणारे ते डे ट्रेडर्स, मध्यम कालावधी साठी गुंतवणूक करणारे त्यांना पोझिशनल ट्रेडर्स, तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्याना ‘लॉन्ग टर्म ट्रेडर्स’ असे संबोधण्यात येते.

आपल्या जोखिम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूकदार व्यवहार करीत असतात. डे ट्रेडिंग विषयी माहीती आणि त्यावरील श्री. नितीन पोताडे यांनी शोधलेल्या पद्धतीची माहीती आपण यापूर्वी एका लेखात करून घेतली आहे.

अलीकडे त्यांनी पोझिशनल ट्रेडर्सना त्याचे व्यवहार अधिक किफायतशीर कसे बनतील यावर मार्गदर्शन करणारा मूळ इंग्लिशमधील लेख मला पाठवला होता. जो मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणुकदारांना त्यांची गुंतवणूक अधिक फायदेशीर करून देईल.

  • या पद्धतीचे महत्वाचे फायदे असे
  • ही गुंतवणूक भावनारहित (Emostion less) होते. त्यामुळे भाव वर खाली गेले तरी आनंदच मिळतो.
  • यासाठी बाजाराचा कल (Trend)ओळखण्याची गरज नाही.
  • ज्या समभागांचे भाव त्याच्या आधीच्या दिवसाच्या सर्वोच्च भावाहून अधिक (Gap up) किंवा आधीच्या दिवसाच्या किमान भावाहून कमी (Gap Down) दराने उघडतात तेव्हा अधिक फायदा होतो.
  • ज्या काळात बाजारभाव मोठया प्रमाणात खालीवर होतात (Volatile market) ही पद्धत अतिशय उपयोगी आहे.

समभागात केलेली कोणतीही गुंतवणूक अधिक फायदेशीर होण्यासाठी त्याच्या किमतीपेक्षा त्याचे आंतरिक मूल्य ओळखता येणे यासाठी अभ्यास करणे जरुरीचे आहे.

बाजारातील किमतीत होणाऱ्या फरकाने गडबडून घाबरून चुकीचा निर्णय घेतल्याने अपेक्षित परिणाम मिळत नाही. तेव्हा अवास्तव अपेक्षा न करता विवेक बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे.

यासाठी गुंतवणूकयोग्य शेअर्स मध्ये निरंतर गुंतवणूक करण्याची (SIP) आणि निरंतर गुंतवणूक मोकळी करण्याचा (SWP) एकत्रित पर्याय सुचवला आहे.

बहुतेकांचा असा अनुभव आहे की आपण ज्या शेअर मध्ये गुंतवणूक केली त्याचा भाव आपण खरेदी केल्यावर नेमका खाली आला आणि विक्री केल्यावर वाढला.

यामुळे नाही म्हटलं तरी आपला निर्णय चुकला तर नसेल ना? अशी शंका येवून निराशा येते. यासाठी स्थिरचित्त राहणे महत्वाचे आहे.

आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे याची खात्री आणि ठाम विश्वास आपल्याला असेल तरच आपली गुंतवणूक अधिक फायदेशीर होईल. यासाठी…

  • आपण कोणते समभाग व त्यात गुंतवणूक किती रकमेची करायची हे प्रथम निश्चित करावे.
  • यांतील 50% रकमेची एकदम गुंतवणूक करावी.
  • आधी खरेदी केलेल्या शेअर्सच्या संख्येच्या 5% शेअरची खरेदी करण्याची ऑर्डरच्या शेवटच्या (येथे मूळ खरेदी किमतीच्या) 5% खालील भावाने टाकावी.

त्याचबरोबर

  • आधी खरेदी केलेल्या शेअर्सच्या संख्येच्या 5% शेअरची विक्री करण्याची ऑर्डर शेवटच्या (येथे मूळ खरेदी किमतीच्या) 5% अधिक भावाने टाकावी.
  • याप्रमाणे आपली खरेदी आणि विक्री यांची सूचना लिमिट ऑर्डर तसेच आफ्टर मार्केट ऑर्डर या प्रकारांनी देता येईल. त्यासाठी सतत लक्ष ठेवून संगणकावर बाजारभाव पहात बसण्याची आवश्यकता नाही.

याचा फायदा असा की या शेअर्सचे भाव खाली येत असतील (मंदी) तर जास्त किंमत मोजून घेतलेले सर्व शेअर अंगावर पडत नाही शिवाय भावात सातत्याने बऱ्यापैकी फरक पडत असेल तर खरेदी आणि विक्रीतून होणाऱ्या नफ्याने सरासरी किंमत खाली येते.

याचा एकच तोटा असा की भाव वर जात असतील (तेजी) तर फायदा कमी होईल. कसं ते उदाहरणासह पाहुयात. समजा आपण ‘अबक’  ही कंपनी निवडली असून त्याचा भाव  ₹200/ शेअर आणि ₹2 लाख पर्यंत गुंतवणूक करायची आपली तयारी आहे. तर-

आपल्या संभाव्य गुंतवणुकीच्या 50% ₹1 लाख गुंतवणूक केली की सदर कंपनीचे 1 लाख ÷ 200= 500 शेअर येतील.

यानंतर रोज 500 शेअरच्या 5% म्हणजेच 25 शेअर मूळ खरेदी भावाच्या 5% कमी म्हणजे ₹190 ने खरेदीसाठी तर 5% अधिक म्हणजे ₹210 ने विक्री करण्यासाठी ठेवायचे आहेत.

जर खरेदीची ऑर्डर ₹190 ने पूर्ण झाली तर अजून 25 शेअर्स ₹180 ने खरेदी करण्यासाठी आणि ₹200 ने विक्रीसाठी ठेवायचे आहेत. (शेवटच्या खरेदीच्या ₹190 च्या 5% कमी अधिक भावाने)

जर विक्रीची ऑर्डर ₹210 ने पूर्ण झाली तर अजून 25 शेअर्स ₹200 ने खरेदी करण्यासाठी आणि ₹220 ने विक्री  करण्यासाठी ठेवायचे आहेत. (शेवटच्या विक्रीच्या ₹210 च्या 5% कमी अधिक भावाने)

या प्रकारे ऑर्डर सातत्याने टाकत राहिल्याने आपल्याकडे शेअर्स जमा होत राहून सतत थोडेफार पैसे मिळत राहतील. बाजारामध्ये होणाऱ्या चढ उतार याचा फायदा घेता येईल.

कितीही संयमित गुंतवणूकदार असेल तरी भाव खाली आला तर तो थोडा निराश होतो.

त्याला यापुढे भाव खाली आला ही खरेदीची संधी आहे या दृष्टीने त्याकडे पाहिले जाईल. त्यामुळे एकूण गुंतवणूकीबद्धलचा दृष्टिकोनच बदलून गेल्याने गुंतवणुकीचा आनंद घेता येईल.

अशा प्रकारचे धोरण पूर्ण पैशाची गुंतवणूक होईपर्यंत किंवा पूर्ण पैसे मोकळे करून घेण्यासाठीही करता येईल.

सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्सचे गेल्या 52 आठवड्यातील सर्वात जास्त आणि सर्वात कमी भाव यावर नजर टाकली असता भावातील फरक किती मोठा आहे ते समजेल.

आपण जे शेअर्स घेण्याचे ठरवले आहे त्या कंपनीच्या कमी जास्त भावातील मर्यादा आपल्याला नीट समजली, थोडेसे तारतम्य वापरून भावातील फरकामुळे आपला फायदाच होईल.

त्यातून त्याच कंपनीचे शेअर घेतले तर एकूण शेअर्सची संख्या वाढेल आणि पर्यायाने एकूण नफ्यातही वृद्धी होईल. यासाठी शांत संयमित धोरणाची गरज असून त्यासाठी अशा प्रकारे व्यवहार करण्याची जास्त गरज आहे.

ही गुंतवणूक धोकादायक प्रकारात मोडत असल्याने आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून याबाबत आपले धोरण स्वतःच्या जबाबदारीवर ठरवावे.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.