कल्पनांना कवेत घेणारी कल्पना चावला

kalpana-chawala

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही..
पण गगनभरारी च वेड रक्तातच असाव लागतं…
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही… व.पु.काळे 

Atlantis-space-shuttel
अटलांटिस स्पेस शटल

ह्याच गगनभरारीच वेड बालपणापासून असलेली आणि आकाशाची ओढ असलेल्या कल्पना चावलाने लहानपणापासून आपल्या स्वप्नानचा पाठलाग केला. भारताच्या करनाल ह्या शहरात तिचा जन्म झाला. आपल शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तिने भारतात घेतल. पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज मधून तिने एरोनॉटीकल इंजिनिअरिंग ची पदवी घेतली. १९८२ च्या वर्षात तिने उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली. युनिवर्सिटी ऑफ टेक्सास मधून १९८४ साली मास्टर डिग्री तर १९८८ मध्ये तिने आपली डॉक्टरेट पूर्ण केली. १९८८ मध्ये तिने नासा मध्ये काम करण्यास सुरवात केली.

नासा मध्ये विविध पदं भूषवताना आपल्या हुशारीची चुणूक तिने कामात दाखवली. ह्याच साठी १९९६ मध्ये नासाने तिला आपल्या स्पेस मिशन साठी अंतराळवीर म्हणून निवड केली. स्पेस शटल कोलंबिया मधून एस.टी.एस. ८७ मधून अवकाशाला तिने आपल्या कवेत घेतल. ह्याच सोबत भारतात जन्मलेली पहिली महिला आणि राकेश शर्मा ह्यांच्या नंतर अवकाशात जाणारी दुसरी भारतीय ठरली. आपल्या पहिल्या मिशन मध्ये कल्पनाने १०.४ मिलियन माईल्स इतक अंतर कापल. ३७२ म्हणजेच १५ दिवस आणि १२ तास ती अवकाशात होती. पृथ्वीवर परतल्यावर तिने नासा मध्ये आपल काम सुरु ठेवल.

damaged-model
स्पेस शटल च्या पंखाला झालेली इजा कशी असेल ह्याचं मॉडेल

२००० साली एस.टी.एस. १०७ स्पेस मिशनसाठी तिची पुन्हा निवड झाली. ह्या न त्या कारणाने हे मिशन खूप लांबणीवर गेल. १६ जानेवारी २००३ मध्ये ती पुन्हा अवकाशात झेपावली. ह्या काळात तिने ८० प्रयोग केले. स्पेस शटल कोलंबिया उड्डाण भरताना फ्युल च्या टाक्यांमधून निघालेला एक तुकडा कोलंबिया च्या पंखावर आदळला. या आधीच्या उड्डाणामध्येही अश्या तऱ्हेच्या घटना घडल्या होत्या पण त्याने झालेल नुकसान हे जास्त नव्हतं. कोलंबिया पृथ्वीवर परत आल्याशिवाय त्याबाबत अवकाशात काही करण नासाला शक्य नव्हत. आपल काम संपवून कोलंबिया पृथ्वीवर परतत असतान वातावरणामधील अतिशय तप्त गॅसेसनी निखळलेल्या फरशीच्या नुकसान झालेल्या भागातून आत प्रवेश करत यानाची संपूर्ण यंत्रणा कोलमडून टाकली. काही क्षणात हवेतच कल्पना चावला आणि तिचे ६ सहकारी ह्यांना वीरमरण आले.

१ फेब्रुवारी २००३ हा तो काळा दिवस ज्यादिवशी आपल्या कल्पनांना कवेत घेणारी भारताची सुपुत्री कल्पना अनंताच्या प्रवासाला निघून गेली. पण जाताना तिने अनेक मनांना स्वप्न दाखवली आणि त्यांना ती कवेत घेण्यासाठी उद्युक्त केल. म्हणून आजही कल्पना चावला हे नाव अजरामर आहे.

Dream is not  You see in sleep.  Dream is something , that does not let You sleep ……. Dr. A.P.J. Abdul Kalam

Space-shuttel
मी अमेरिकेत असताना च्यालेंजर सारख अटलांटिस स्पेस शटल बघण्याचा योग आला तेव्हा त्याच्या पंखावरील फरश्यांचा घेतलेला फोटो.

कदाचित करनाल सारख्या छोट्या शहरातून येताना कल्पनाने अस एक स्वप्न बघितल ते पूर्ण करण्यासाठी तिने आपल आयुष्य वेचल. भारतातून पण एक स्त्री आकाशाला आपल्या कवेत घेऊ शकते हा आत्मविश्वास तिने सगळ्याच भारतीय महिलांना दिला. भारताने मेट स्याट सिरीज मधील आपल्या पहिल्या उपग्रहाला कल्पना चावला ला आदरांजली म्हणून कल्पना – १ अस नामकरण ५ फेब्रुवारी २०१३ केल.
आजच्या दिवशी १५ वर्षापूर्वी कल्पना चावला अनंतात विलीन झाली. पण आपल्या मागे एक अमूल्य अस आयुष्य मागे ठेवून गेली आहे. तिच्या आयुष्याकडे बघून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येईलच पण त्याही पलीकडे प्रत्येक भारतीयाला आपल्या स्वप्नांना कवेत घेण्यासाठी उद्युक्त करेल. मला नेहमीच प्रेरणा देणाऱ्या कल्पना चावला ला माझी भावपूर्ण आदरांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.