आकाशाकडे बघताना (भाग-१)

रात्रीच्या अंधारात आकाशाकडे बघितलं की अनेक तारे लुकलुकताना आपल्याला दिसतात. शहराच्या रोषणाईमध्ये तसं आकाश आपल्याशी कमीच बोलतं पण कधी गावाला गेल्यावर अथवा कधी वीज गेलेली असताना पूर्ण अंधारात ताऱ्यांचा जो सडा आपल्या समोर उभा राहतो, तो आपल्याला आपण ह्या विश्वाचा किती छोटा भाग आहोत ह्याची जाणीव करून देणारा असतो.

ह्या सगळ्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमध्येही अनेक गोष्टी लपलेल्या असतात, किंवा ज्याची जाणीव एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला कमीच असते. कारण आकाशाकडे बघायचं तर दुर्बीण हवी किंवा टेलिस्कोप हवा अशी एक समजूत. त्याशिवाय आकाशात अनेक तारे जोडून तयार होणारे नेमके आकार कोणते आणि त्याचं महत्त्व ह्यापासून आपण सामान्य माणूस कोसो दूर असतो. पण जर थोडा अभ्यास केला तर हे अनेक आकार आपल्यापुढं जे सौंदर्य उभं करतात ते जर आपण समजायला लागलो तर ह्या आकाशाची मज्जाच काही वेगळी आहे.

हजारो वर्षांपासून प्रत्येक संस्कृतीत मानवाला आकाशाचं कुतूहल राहिलं आहे. कारण तिकडून येणारा हा प्रकाश ह्या विश्वाच्या अनंत रूपांमधलं एक रूप घेऊन आपल्याशी बोलत असतो. हा प्रकाश कधी कधी आपल्याला कित्येक वर्ष, हजारो ते लाखो वर्ष मागे नेतो. कारण तो आपल्या पर्यंत पोहचायला तितका काळ लागलेला असतो.

आज आपण आपल्या घरातून अशा कित्येक हजारो वर्षाच्या इतिहासाला आपल्या डोळ्यात बंदिस्त करू शकतो. ह्याला फक्त नजर हवी आणि बघण्याचा दृष्टिकोन. आकाशात दिसणाऱ्या ह्या वेगवेगळ्या ताऱ्यांना जगातील अनेक संस्कृतीने अनेक आकारात बंदिस्त केलं आहे. ढगांचे आकार बघताना जसं आपण एखाद्या गोष्टीशी त्याला समरूप करतो तेच अनेकांनी ताऱ्यांच्या बाबतीत केलं आहे. म्हणून जगात आज अनेक तारकासमूह हे वेगवेगळ्या नावाने प्रत्येक संस्कृतीत ओळखले जातात.

असाच एक तारकासमूह जो आपल्याला नुसत्या डोळ्यांनी आकाशात स्पष्ट तर दिसतोच पण त्याचा आकार आणि त्यातले तारे आपलं लक्ष नेहमीच वेधून घेतात तो म्हणजे ‘ओरायन’ तारकासमूह म्हणजे मृग नक्षत्र. जानेवारी ते मार्च ह्या महिन्यांमध्ये ओरायन तारकासमूह आपल्याला आकाशात स्पष्टपणे दिसतो. हा तारकासमूह ओळखायलाही खूप सोप्पा आहे.

संध्याकाळच्या आकाशात साधारण डोक्याच्या आणि क्षितिजाच्या मध्ये बघितलं तर आकाशात तीन तारे एका सरळ रेषेत दिसतील त्यांची नाव आहेत. अलनीटाक, अलनिलम आणि मिनटाका. ह्या तीन ताऱ्यांच्या भोवती चार तारे आपल्याला चौरस बनवताना दिसतील. त्यातले दोन तर खूपच तेजस्वी आहेत. जे ओळखणं खूप सोप्पं आहे. ह्यातला वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात एक तारा तांबूस रंगाचा दिसेल, त्याचं नाव आहे बेटलज्यूस आणि खालच्या बाजूच्या उजव्या कोपऱ्यात एक निळ्या रंगाचा तेजस्वी तारा दिसेल त्याचं नाव आहे रायजेल. ह्या ताऱ्यांच्या तुलनेने उरलेले दोन अंधुक पण कोपऱ्यात असणाऱ्या ताऱ्यांची नाव आहेत बेलाट्रिक्स आणि साइफ.

अशा सात ताऱ्यांनी मिळून तयार होणारा तारकासमूह रात्रीच्या आकाशात एकदम स्पष्ट आपल्याला दिसतो. ह्यातील प्रत्येक तारा खरं तर वेगवेगळ्या अंतरावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पण पृथ्वीवरून बघताना मात्र ते एकाच पटलावर आहेत असा भास होतो.

‘बेटलज्यूस’ साधारण ६४३ प्रकाशवर्ष लांब आहे. (१ प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाशाने कापलेले अंतर)

‘रायजेल’ साधारण ८६० प्रकाशवर्ष लांब आहे.

‘बेलाट्रिक्स’ साधारण २५० प्रकाशवर्ष लांब आहे.

‘मिनटाका’साधारण १२०० प्रकाशवर्ष लांब आहे.

‘अलनिलम’साधारण २००० प्रकाशवर्ष लांब आहे.

‘अलनिटक’ साधारण १२६० प्रकाशवर्ष लांब आहे.

‘साइफ’ साधारण ६५० प्रकाशवर्ष लांब आहे.

पृथ्वीपासून ह्यांची अंतर बघितली , तर हे तारे विश्वाच्या पोकळीत किती लांबवर पसरलेले आहेत ह्याचा थोडा अंदाज आपल्याला येईल. ह्या ताऱ्याकडून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहचायला कित्येक वर्षे लागतात. प्रत्येक ताऱ्याच्या प्रकाशाचा कालावधी कित्येक वर्षांनी वेगळा आहे. पण पृथ्वीवरून बघताना हे सगळेच एकाच ठिकाणाहून प्रकाशमान आहेत असं आपल्याला वाटत रहाते.

ह्यातील प्रत्येक तारा आपल्या सोबत कित्येक वर्षाचा इतिहास घेऊन पृथ्वीवर पोहचत आहे. ह्या सातही ताऱ्यांची माहिती पुढे देणार आहे पण ओरायन तारकासमूह हा फक्त ह्या सात ताऱ्यांपुरता मर्यादित नाही तर तारे निर्मितीची एक भट्टी आपण इथे उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. जी पूर्ण आकाशात उघड्या डोळ्यांनी दिसणारी एकमेव भट्टी आहे. ह्या भट्टीचं नाव आहे ‘ओरायन नेब्युला’.

नुसत्या डोळ्यांनी आकाशात दिसणारा ओरायन तारकासमूह किंवा ज्याला मृग नक्षत्र म्हणतात लगेच दिसून येतो पण त्याच सोबत आपल्याला आकर्षितही करतो. ह्या तारका समूहातल्या प्रत्येक ताऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे. ते जाणून घेतल्यावर जेव्हा आपण आकाशात ह्या तारका समूहाला एका वेगळ्या नजरेतून बघू.

आधी सांगितलं त्या प्रमाणे ओरायन हा तारका समूह ज्या सात महत्त्वाच्या ताऱ्यांनी बनला आहेत ते आहेत ‘बेटलज्यूस, रायजेल, बेलाट्रिक्स, साईफ, अलनिटक, अलनिलम आणि मिनटाका.’ आता हे सर्व तारे वेगवेगळ्या अंतरावर आहेत ते आपण बघितलं. आता ह्या ताऱ्यांविषयी थोडं जाणून घेऊ.

ओरायन

१) बेटलज्यूस :- ओरायन तारका समूहातील मला आणि जगातील पूर्ण वैज्ञानिकांना आकर्षित करणारा बेटलज्यूस हा तारा आहे. आपण त्याला राक्षसी तारा म्हणू शकतो. बेटलज्यूस हा रेड सुपर जायंट तारा आहे. आपल्या आकाशातील ९ वा सगळ्यात तेजस्वी तारा आणि ओरायन तारकासमूहातील दुसऱ्या नंबरचा तेजस्वी तारा आहे.

सूर्यापेक्षा जवळपास २० पट हा तारा मोठा आहे. जर हा तारा सूर्याच्या जागी ठेवला तर हा गुरु च्या कक्षेपर्यंतची जागा व्यापेल इतका अवाढव्य आहे. इतका मोठा असूनही हा आकाशातील राक्षसी ताऱ्यांच्या मानाने लहान आहे. पण तरीसुद्धा ‘बेटलज्यूस’ चा आकार खूप मोठा आहे. हा तारा व्हेरीएबल स्टार किंवा तारा आहे. ह्याचा आकार बदलत असून हा विश्वाच्या पोकळीत सुमारे ३० किमी / सेकंद वेगाने प्रवास करत आहे.

बेटलज्यूस वर वैज्ञानिकांनी का इतकं संशोधन केलं आहे तर ह्याचं उत्तर आहे हा तारा म्हणजे अवकाशातील एक टायमर लावलेला बॉम्ब ! बेटलज्यूस च वय साधारण १० मिलियन वर्ष आहे. जवळपास ४०,००० हजार वर्षापूर्वी त्याने आपल्या आयुष्याचा शेवटच्या घटका मोजायला सुरवात केली आहे. आपल्या आतल्या भागात हेलियम चं न्यूक्लीयर फ्युजन करत ऑक्सिजन आणि कार्बन तयार आहे. एका क्षणाला ह्या आतल्या भागाला तो सांभाळू शकणार नाही. मग जे होईल ती आकाशातली दिवाळी असेल. बेटलज्यूस एखाद्या बॉम्ब प्रमाणे फुटेल. हा स्फोट इतका प्रचंड असेल की जवळपास ६४३ प्रकाशवर्ष दूर असलेल्या पृथ्वीवर ही दिवाळी उघड्या डोळ्यांनी चक्क दिवसा पण दिसू शकेल. ह्या स्फोटाची व्याप्ती चंद्राइतकी तेजस्वी असेल. दिवसाही चंद्रा प्रमाणे आकाशात दिसून येईल.

बेटलज्यूस चा स्फोट आत्ता झाला ही असेल किंवा त्याला होण्यासाठी काही मिलियन वर्षाचा कालावधी ही लागेल. आत्ता झाली तरी आपल्याला पृथ्वीवरून दिसण्यास ६४० वर्षाचा कालावधी लागेल. ह्या ताऱ्याचा आकार, वस्तुमान हे अनेक गणितांवर आधारित आहे. त्यामुळे हा बॉम्ब नक्की केव्हा फुटेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण जेव्हा कधी ही दिवाळी अवकाशात होईल तेव्हा हा सोहळा अवकाशातील एक अभूतपूर्व सोहळा असेल.

२) रायजेल :- ओरायन तारकासमूहातला सगळ्यात तेजस्वी तारा आणि आकाशातील ७ वा सगळ्यात तेजस्वी तारा म्हणून ‘रायजेल’ ओळखला जातो. रायजेल पण राक्षसी तारा आहे. रायजेलची त्रिज्या सूर्याच्या त्रिजेच्या ७० पट आहे. सूर्यापेक्षा रायजेल जवळपास ६१,५०० ते ३६३,००० पट जास्ती तेजस्वी आहे. रायजेल पण व्हेरियेबल तारा असल्याने त्याच्या तेजस्वीपणात उतार चढाव येत असतात. जेव्हा आपलं तंत्रज्ञान तोकडं होतं तेव्हा रायजेल हा एकच तारा असं वाटत होतं. पण खरे तर रायजेल च्या बाजूला तीन ताऱ्यांची एक सिस्टीम आहे. रायजेल च्या तेजस्वितेमुळे ह्या ताऱ्यांचा प्रकाश झाकला जातो. रायजेल भविष्यही सुपरनोव्हा हेच आहे.

३) बेलाट्रिक्स :- हा तारा पण आकाराने खूप मोठा आहे. सूर्याच्या ८.६ पट ह्याच वस्तुमान आहे. ह्याच वय जवळपास २५ मिलियन वर्ष आहे. ह्याच्या बाह्य भागाच तपमान जवळपास २२,००० केल्विन आहे. ओरायन तारकासमूहातला तिसरा सगळ्यात तेजस्वी आणि आपल्या आकाशातला २५ वा सगळ्यात तेजस्वी तारा आहे.

४) साईफ :- ओरायन तारका समूहातला हा तारा पण राक्षसी तारा आहे. ह्याच वय जवळपास ६.२ मिलियन वर्ष असून ह्याच वस्तुमान सूर्यापेक्षा जवळपास २८ पट जास्त आहे. ह्या ताऱ्यावरील इंधन म्हणजेज हायड्रोजन संपुष्टात आलेला असून ह्याची वाटचाल ही ओरायन तारकासमुहातील इतर ताऱ्यान प्रमाणे सुपरनोव्हा कडे सुरु आहे.

५) ते ७) अलनिटक, अलनिलम आणि मिनटाका :- हे तिन तारे मिळून ओरायन तारकासमूहाचा बेल्ट तयार होतो. ह्या ओरायन बेल्ट मधील सगळ्यात वरच्या बाजूचा तारा म्हणजे मिनटाका. मिनटाका हा तारा खरे तर तिन ताऱ्यांची रचना आहे. ह्या बेल्ट मधला मधला तारा म्हणजे अलनिलम. अलनिलम हा तारा पण निळा राक्षसी तारा आहे. ह्याचा तेजस्वीपणा सूर्यापेक्षा तब्बल २७५,००० पट जास्ती आहे. ह्याची त्रिज्या सूर्यापेक्षा २४ पट मोठी आहे. काही मिलियन वर्षात ह्या ताऱ्याचं रुपांतर रेड सुपर जायंट मध्ये होईल. ह्याचं वय जवळपास ५.७ मिलियन वर्ष आहे. ओरायन बेल्ट मधला सगळ्यात शेवटचा तारा म्हणजे अलनिटक. अलनिटक तारापण निळा राक्षसी तारा असून ३३ पट सूर्यापेक्षा मोठा आहे. २१,००० पट सूर्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे. हा तारा एक नसून तिन ताऱ्यांची एक रचना आहे.

हे सात तारे मिळून ओरायन तारकासमूह तयार होतो. आकाशात बघताना हे सगळे तारे एक वाटले तरी ह्यातील प्रत्येक तारा आपलं स्वतःचं एक वेगळं नशीब घेऊन जन्माला आला आहे. त्यांच्या जन्माच्या वेळीच त्यांचा मृत्यू कसा होणार हे ठरलेलं आहे. पण त्या आधी कित्येक मिलियन वर्ष विश्वाच्या ह्या अनंत पोकळीत आपला प्रकाश हे तारे सोडत आहेत. आज पृथ्वीवर आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी ह्या वेगवेगळ्या अंतरावर असणाऱ्या एकमेकांशी संबंध नसणाऱ्या ताऱ्यांना ‘ओरायन’ किंवा ‘मृग नक्षत्रात’ एकत्र बांधून त्याचं एक वेगळं विश्व तयार केलं आहे.

‘ओरायन’ तारकासमूह हा ह्या ताऱ्यांपुरता मर्यादित नाही. आधी सांगितलं त्या प्रमाणे ह्या तारका समूहात तारे निर्मितीची एक भट्टी सुरु आहे. जिथं अशाच कित्येक ताऱ्यांचा जन्म सुरु आहे. ह्या तारकासमूहातील ह्या भट्टी म्हणजेच ओरायन नेब्युला विषयी जाणून घेऊ पुढल्या भागात!

तळटीप :- ताऱ्यांचा आकार दाखवणारा हा एक फोटो. आपल्या सौरमालेतील ग्रहांपासून सुरु झालेला हा वाढत्या आकाराचा प्रवास जिथं आपल्या सूर्याला ही एक कणाचं अस्तित्त्व देतो. तिथं माणूस म्हणून आपण कुठंच नाही!

1) Mercury < Mars < Venus < Earth
2) Earth < Neptune < Uranus < Saturn < Jupiter
3) Jupiter < Wolf 359 < Sun < Sirius
4) Sirius < Pollux < Arcturus < Aldebaran
5) Aldebaran < Rigel < Antares < Betelgeuse
6) Betelgeuse < Mu Cephei < VV Cephei A < VY Canis Majoris

(क्रमश:)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय