SWP, Switch, STP- गुंतवणूकदार त्याचा उपयोग कसा करू शकतात

investment

SWP-switch-STPएस. आई. पी. म्हणजे Systemic Investment Plan ही प्रामुख्याने म्यूचुयल फंडात ठराविक कालावधीने नियोजनपूर्वक गुंतवणूक करण्याची योजना असून यासंबंधीची माहिती त्यावरील लेखातून यापूर्वी आपण घेतली आहेच. यामधून ‘ थेंबे थेंबे तळे साचे ‘ या न्यायाने भांडवल जमा होवू शकते. याउलट ठराविक काळाकरीता सातत्याने काही रक्कम मिळत रहावी ही काहींची गरज असू शकते. एक रकमी जमा रक्कम एकदाच काढून घेतली किंवा पारंपारिक साधनांत गुंतवली तर त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा येतात.

एस. डब्ल्यू. पी. (Systemic Withdrawal Plan)

म्यूचुअल फंडांच्या योजनेत एकरकमी गुंतवणूक करून आपल्या जरूरीप्रमाणे ठराविक काळाने आवश्यक रक्कम काढून घेतली तर त्यावर अधिक फायदा होण्याची शक्यता असते. अशा तऱ्हेने रक्कम काढून घेण्याच्या पद्धतीस एस. डब्ल्यू. पी. (Systemic Withdrawal Plan) असे म्हणतात.

सर्वसाधारणपणे उच्चशिक्षणाचा वाढता खर्च, सेवानिवृत्तीनंतर कमी झालेले उत्पन्न यांची तोंडमिळवणी करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. हातात असलेली मोठी रक्कम भविष्यातील गरज पूर्ण करण्यासाठी वापरली जावू शकते. ज्या योजनेतील जमा रक्कम आपल्याला ठराविक काळात हवी असेल तर तेथे एक फॉर्म भरून द्यावा लागतो. यामध्ये योजनेचे नाव, प्रकार, पर्याय फोलीओ क्रमांक याचबरोबर किती रक्कम किती कालावधीने हवी याची माहिती द्यावी लागते. आपण सांगितलेल्या दिवशी असलेल्या निव्वळ मालमत्ता मूल्याचा (Net Assets Value) विचार करून आवश्यक तेवढेच यूनिट्स मोडले जावून त्यांच्याकडे नोंद असलेल्या आपल्या बँक खात्यात रक्कम जमा होते. एन. ए. व्ही. जास्त असली तर कमी युनिट आणि कमी असल्यास अधिक युनिट मोडले जातात. एस. आई. पी. च्या बरोब्बर उलटी क्रिया आहे. यावर मुळातून कोणतीही करकपात केली जात नाही.

म्यूचुयल फंडांच्या अनेक योजना आहेत या प्रत्येक योजनेचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यक्ती तिच्या गरजेनुसार त्यांच्याकडे असलेले पैसे, जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणूक प्रकाराची विभागणी, थांबण्याचा कालावधी, पैशांची एकरकमी गरज अथवा ठराविक काळाने लागणारी गरज यानुसार विविध फंडांच्या २००० चे आसपास असलेल्या योजनांमधून आपल्याला योग्य अशी योजना निवडू शकतो.

एस. टी. पी. (Systemic Transfer Plan)

एस. टी. पी. (Systemic Transfer Plan) ही अशी पद्धती आहे ज्यामुळे एका योजनेतून ठराविक काळाने आपणास हवी असलेली रक्कम काढून घेवून ती न वापरता याच फंड हाऊसच्या दुसऱ्या प्रकाराच्या योजनेत ठरवलेल्या कालावधीत एस. आई. पी. द्वारे बदलली जाते. ज्या योजनेतून रक्कम काढून घेणार त्यास “सोर्स फंड” असे म्हणतात तर ज्या योजनेत गुंतवणूक करायची आहे त्यास “टार्गेट फंड” असे म्हणतात. एखाद्या गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक ईक्विटी फंडात ग्रोथ योजनेत आहे कालांतराने त्यास आपली गुंतवणूक तेथे ठेवणे धोकादायक वाटले तर त्यासाठी दोन पर्याय आहेत —

  • सोर्स फंडातिल सर्व युनिट एकदम विकून आलेल्या पैशातून त्या अथवा अन्य फंडाच्या दुसऱ्या योजनेत जाणे किंवा त्याच योजनेचा ग्रोथ ऑप्शन डीवीडेंड मध्ये बदलणे (यास स्विच असेही म्हणतात)  त्याच फंडांच्या अन्य योजनेत जायचे असल्यास फंड हाऊसला फॉर्म भरून देवून अथवा ऑनलाइन अशी विनंती करावी लागते. अन्य फंड हाऊसच्या योजनेकडे जायचे असल्यास विमोचन (Redumption) फॉर्म भरून द्यावा .
  • ठराविक कालावधीने सोर्स फंडातिल काही युनिट विकून (SWP) त्याच फंड हाऊसच्या अन्य टार्गेट फंडाचे (STP) युनिट घेणे .

एस. डब्ल्यू. पी. , स्वीच , एस. टी. पी. चे माध्यमातून सर्वसाधारणपणे एक वर्षांच्या आत युनिट मोडले असता नियमांप्रमाणे विमोचन शुल्क (Exit Load), जे १% असते, ते कापून घेण्यात येते. सध्याच्या आयकर नियमांप्रमाणे ६५ % हून अधिक समभाग सहभाग (Equity Exposure) असलेल्या योजनांवर एक वर्षांच्या आत झालेला नफा /तोटा अल्पमुदतीचा असून नफ्यावर १५ % कर अधिक सेस द्यावा लागतो तर एक वर्षानंतर विकलेल्या युनिटवरील नफा पूर्णतः करमुक्त असतो. तर डेट फंडांच्या युनिटवर तीन वर्षांच्या आत विकल्यास अल्प व तीन वर्षांवरील यूनिट विकून झालेला नफा दीर्घ मुदतीचा धरला जावून त्यावर नियमांनुसार कर आकारणी केली जाते. कर आकारणी करताना एकूण करपात्र उत्पन्न लक्षात घेतले जाते. योजनेतून मिळणारी लाभांशाची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. यूनिट होल्डर्सचे सोयीसाठी काही फंड हाऊसनी ठराविक कालखंडात झालेला, फक्त नफा काढून घ्यायची सोय एस. डब्ल्यू. पी. च्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. अशा प्रकारे नफा काढून घेतल्याने योजनेच्या मुल्यातील चढउतारामूळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीची यापूर्वीच भरपाई झाल्याने त्याची तीव्रता कमी होते.

म्युच्युअल फ़ंडासंबंधित इतर लेख-

म्यूचुअल फंड योजना कशा काम करतात?
नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (SIP म्हणजेच Systematic Investment Plan)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Previous articleकल्पनांना कवेत घेणारी कल्पना चावला
Next articleअनपेक्षित
१९८२ पासून "हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल" या कंपनीत नोकरी, शिक्षण बी कॉम. एवढ्यातच अकाउंट डिविजन मधे पी. एफ. विभागात उपव्यवस्थापक म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागाचा सक्रिय कार्यकर्ता असून १९८४ पासून शेअर बाजाराशी संबधीत, गुंतवणूक करप्रणाली आणि आर्थिक विषयांच्या लेखनासाठी अलीकडेच सुरुवात केली आहे. मराठी माणसाला शेअरबाजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळावी आणि तीही आपल्या भाषेत म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.