श्रेष्ठ मातृत्व

“चिवचिव, कावकाव ” पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला की. घरात उबदार पांघरुण घेतलेल्या माणसांचे डोळे उघडतात. सूर्यनारायण पृथ्वीवर येउन पोहचलेला असतो. सूर्यदेवाचं येणं आणि अंधाराचं निघून जाणं. हा पृथ्वीवर असणारा नित्यक्रमच होय. जणू एका ठिकाणी काम करणारे दोन कामगार. एक दिवसपाळी करणार तर दुसरा रात्रपाळी. एक कामावर रुजू झाल्या शिवाय दुसरा जागा सोडणार नाही. मग वर्षात कधी रात्र उशिरा येते तर कधी सूर्य. फक्त वर्षातील एकच दिवस दोघं वेळेवर येतात. त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्थापनाला पण सवय होउन गेलेली असते. सूर्य पृथ्वीवर मानवासाठी मित्राचे कर्तव्य बजावत असतो. पृथ्वीला प्रकाशानं स्वच्छ करत असतो. प्रत्येक जीवाला अन्नपाणी शोधण्यास मदत करत असतो. सूर्य निघून गेल्यावर दिवसभर थकल्या जीवांना शांतीदान देण्याचं काम रात्र करत असते.

सित्या उठ. झेंडा उंचा हायना आज, मास्तर आज शाळंन पेढं वाटणारं हाय आज.

पेढ्यांचे नाव ऐकून सित्या उठला. आज प्रजासत्ताक दिन होता. रात्री गुरूजींनी मुलांना सांगून ठेवले होते. उद्या झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला की पेढे वाटणार आहोत. काही मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम करवून गुरजींनी घेतले होते. त्यामध्ये सित्यापण होता. गावात शाळा सुरू होउन सहा महिने झाली होती. या अगोदर शाळेला शिक्षक उपलब्ध होत नव्हते. मुलांना दुसर्‍या गावात शाळेत जावं लागायचं. रोज सात किलोमीटपर्यंत चालत जा चालत या.

हे मुलांना कंटाळवाणं वाटत असे. मग आता गुरूजींनी शाळा सुरू केली त्यावेळेस सहा ते दहा वर्ष वयावरील मुलांना पहिल्या वर्गातच बसवलं होते. बाहेरच्या गावात शाळेत पालक वर्गपण पाठवत नव्हता कारण रात्र झाली की गावात येणारा निमुळता पायवाटेचा रस्ता व रस्त्यामध्ये निघणारे साप विंचू सारखं संकट.

सित्याचे गाव म्हणजे पस्तिस एक घरांची जंगलातली वस्ती. अतिदुर्गम भागात गावाचा समावेश. गाव रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान झोपणार. सकाळी कोंबडा कोंबडा आरवला की गाव जागं. घड्याळ गावातील ठरावीकच एक दोन घरांमध्ये.

सूर्याचा आकाशातील संचार किंवा निसर्गात घडणार्‍या वेगवेगळया घटना हेच ह्या गावातील लोकांचे घड्याळ. गावातील नायकाचा मुलगा बाहेर मुंबईकडून शिकून आलेला. तोच गावातील साक्षर व्यक्ती. गावात नायकाच्या घरीच रेडिओ. मग गाव करमणुकीचं साधन म्हणून रेडिओ ऐकायला त्या नायकाच्या घरी एकत्र येइ. गावात प्रवासाचे साधन म्हणजे कुणाला चालता येत नसेल आणि दुसरी कडे उपचारासाठी घेउन जाण्याची वेळ आली तर बैलगाडीचा उपयोग केला जायचा. तसे जाण्यायेण्याचा उपयोग पायी प्रवासानेच असायचा. पाऊलवाट निमुळती असायची पण वेळेत पोचवणारी.

पायी प्रवासाच्या मानाने बैलगाडीचा प्रवास दूरवरून असायचा. बैलगाडीला जागा जास्त आणि शक्यतो सपाट लागायची. शेजारी सात किलोमीटरवरचे गाव ह्या लोकांना रोजगार देत असे. रोजगार हा हंगामी असायचा. ज्यावेळी रोजगार नसेल त्यावेळी जंगलात जाणं. डिंक, पळसाची पानं, विडीची पानं तोडून आणून तालुक्याला विकली जायची. गावातील काही माणसं टोपल्या बनवण्याचं काम करत. घरात वापराच्या घरगुती सामानात धातूची वस्तू कमीच.

देश स्वतंत्र झाला पण अतिदुर्गम भागात सुविधांचा अभाव हा होताच. गावात मुलांचे मैदानी खेळ असायचे. कुस्त्या खेळणं. कबड्डी, हुतुतू, सुरपारंबी हे खेळ चालत. महिला एकत्र येउन गाणी गात. काही पारंपारिक चित्र रेखाटनं असे मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. उन्हाळयात कठोर मेहनत करून पावसाळ्यात गरजेच्या जिन्नसांची साठवणूक केली जायची. ह्यासाठी जंगलातून झाडाचा डिंक गोळा करायचा, करवंद, जांभळं तसेच जी उपलब्ध रान फळं व फुलं तालुक्याला नेऊन त्या बदल्यात घरात लागणारी वस्तू खरेदी करायची. जसे की कांदा, लसूण, ज्वारी बाजरी सुकी मच्छी, मसाल्याचे पदार्थ इत्यादी पावसाळ्यात मिळणार्‍या रानभाज्या किंवा मासे सुकवून ठेवायचे. ते उन्हाळयात वापर करायचे.

सित्याच्या आईला वाटायचं नायकाच्या मुलासारखं माझा सित्यापण शिकला पायजेय. म्हणून ती त्याला न चूकता शाळेत पाठवायची. आज शाळेत २६ जानेवारी निमित्त ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला गावातील सर्वांना गुरूजींनी बोलावलं होते. गावातील महिला वर्ग शक्यतो मुलांना न चूकता शाळेत पाठवायाचा. कारणच तसे होते. मुलं शाळेत गेली का त्यांना दुपारी जेवण दिले जायचं. कपडे मिळायचे. पुस्तक मिळायची आणि मुलं शिकली तर साहेब होतील हे मनात स्वप्न!!

गावात शाळेची इमारतच पक्की वीटकामात सिमेंट वापरून बांधलेली. गावातील घरं म्हणजे साध्या झोपड्या होत्या. खाली शेणाने स्वच्छ सारवलेली जमीन, छतावर गवत टाकलेलं. भिंती बांबूंनी किंवा कारवींनी बनवलेल्या. त्याला व्यवस्थित खिडकी तयार केलेली. शेणात लाल माती एकत्र करून भिंत सारवलेली. गावातील सर्वच घरे अश्याप्रकारे होती म्हणून शाळेच्या इमारतीचा सार्‍या गावाला हेवा वाटायचा. गावातील तरूणांना संध्याकाळी तर लहानांना दिवसा खेळायला हक्काचे ठिकाण असायचे जणू.

पांढरा सदरा त्याला अनेक प्रकारचे डाग पडलेले. इजार पण तशीच डाग लागलेली. पण खाकी रंग असल्यामुळे डाग दिसून येत नव्हते. शाळा सुटली का लगेच अंगावरच्या कपड्यासह खेळायला जायचे. झाडावर चढून फळं तोडायची. झाडाच्या फळाफुलांच्या चिकाने कपड्यांवर विशिष्ट प्रकारची कलाकुसर केली होती.

पण आईने तालुक्यातून आणलेल्या सुगंधित साबणाने कपडे धुतले होते. संपूर्ण डाग निघाले नसले तरी बर्‍यापैकी कपडे स्वच्छ झालेले. त्यांना येणारा वास मनाला प्रसन्न करत होता. सित्या आनंदात उड्यामारत शाळेत गेला. आज ध्वजवंदनाचा कार्यक्रम असल्यामुळे गुरूजींनी दफ्तर नका आणू म्हणून सांगीतलं होते.

गावातील शाळा सुरू होऊन सहा महिने झाले होते. पण शाळेतील शिक्षकांनी मुलांची उत्कृष्ट तयारी करून घेतली होती. मुलांना दहा दहा ओळीपर्यंत भाषण लिहून दिले होेते. डोंगराळ भागातील अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या गावातील मुलांना पुस्तकी भाषेत बोलायला शिकवणं हेच अवघड.

सहा महिन्यात मुलं काही लिहायला शिकली नव्हती. मग सोप्या शब्दांनी अक्षर रचना करून व जिथे सोपे शब्द वापरायला पर्यायच नसेल तर मग कठीण शब्द. मग तयार होणार्‍या अक्षराची तयारी करणं खूपच अवघड. ‘स्वतंत्र’ शब्दाची तयारी करून घेतांना गुरूजींना तारेवरची कसरत करावी लागली. आज सहा महिन्यामध्ये सुंदर प्रगतिपथावर शाळा होती. या मागे होती आंधळे गुरूजींची मेहनत. शाळेचे पाच वर्ष वय तर आंधळे गुरूजींचे नोकरीचे वय सहा महिने.

आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला गावातील बर्‍यापैकी ग्रामस्थांची उपस्थिती होती. शाळेत एकच खुर्ची होती. कार्यक्रमाला अध्यक्ष निवडल्यानंतर ते खुर्चीत स्थानापन्न होत असतात. मग आलेल्या ग्रामस्थांसमवेत गुरूजी खाली फरशीवर बसले. गावातील माणसांची फरशीवर एकत्र बसण्याची पहिलीच वेळ. त्यांना गार फरशीवर खूप आनंद वाटत होता. शेजारी मुलांना मांडी घालून बसलेलं पाहिलं आणि ग्रामस्थही मांडी घालून बसले. गुरूजींनी गावातील नायकाला अध्यक्ष बनवले. सगळ्यांना टाळ्या वाजवायला लावल्या. मग अध्यक्ष जाऊन शाळेतील एकमेव खुर्चीत बसले. गुरूजींनी मेहनत घेउन मुलांचे कार्यक्रम केलेले पाहून ग्रामस्थ आनंदित झाले. मग गुरूजींनी अध्यक्षांना दोन शब्द बोलायला सांगीतले. अध्यक्ष बोलायला उभे राहिले.

आपल्या गावात ह्यो मास्तर आला. त्या अदोगर आपल्या गावात शाळा त होती पण मास्तर घावत नव्हता. ह्यो आंधळे मास्तर ज्यायेळे पासून आपल्या गावात आला. बेस असी परगती दिसाय लागली. मास्तर सहा महिन्यापासून येतयं आणि तिथून आपल्या खोंडीवाडी गावाची परगती आपल्या मुलांची परगती होतेय. ह्या शाळेत मास्तरनी बोलवून आपल्याला मान दिला. मास्तरचे अख्ख्या गावाच्या कडून आभार मानतो….. जय हिंद.

नाईक गावाच्या बाहेर जाऊन येउन असायचा. म्हणून त्यांना बर्‍यापैकी बोलता येत होते. कार्यक्रम झाला पेढे वाटले. प्रत्येकाने पटापट पेढा तोंडात टाकला. मनोमन सार्‍यांना वाटले. मास्तरनी अजून एक द्यायला हवा होता. शाळेतल्या त्या पेढ्याची चवच न्यारी असते. पण ह्यामध्ये सित्या होता. तो थोडा खिन्न झाला होता. कारण त्याचे वडिल आमंत्रण असून पण आले नव्हते. त्याची आई आणि वडिल जंगलात सरपण गोळा करायला गेले होते.

सित्याने पेढा खाल्ला नाही त्याने सदर्‍याच्या खिशात ठेवला. कार्यक्रमाची सांगता झाली होती. सित्या बाहेर आला बाहेर करवंदीचं झुडूप होते. त्याने एक पान तोडलं त्यावर पेढा ठेवला. पुन्हा एक पान तोडून ते पेढ्यावर ठेवले. तेथेच करवंदीचे काटे तोडले आणि दोन्ही पानं विणली. बाजूनं करवंदीच्या पानाचे अच्छादन केले. इजारीच्या खिशात कोंबून तो उड्या मारत घराकडे निघाला.

अनवाणी पायाने रस्त्यावर धूळ उडवत घरी पोहचला. दारापुढे पोहचल्यावर आजी बोलली.

उलीक पायेला धूळवट लागेल ते धवून झे.

सित्यानं बाहेच्या माठातलं पाणी घेऊन पाय धुतले. आजीला बोलला.

म्हतारे ब, बा कायला नय आला शाळेनं. संमद्या पोरांचं बा आलंन.

आजी बोलली…..

भिक्या रानांन गेला काड्याकिड्या आणू ला. म्हणूनस नय आला.

सित्याचा राग शांत झाला. तो आजीला शाळेतल्या गोष्टीबद्दल सांगत होता. आजीला त्याच्या गमती जमती आवडत होत्या. आजीला त्याचे शाळेतले पुस्तकी शब्द समजत नव्हते. पण त्याचे मन ठेवण्यासाठी आजी त्याला प्रतिसाद देत होती. तेव्हड्यात डोक्यावरचा भारा जमिनीवर जोरात आपटल्याचा आवाज आला. सित्या उठला.

ब आलीय . . बा भी आलय. .

सित्या आईला जाउन बिलगला. वडिलांनी जोडीला बांबूंचे ओझे जंगलातून आणले होते. उन्हांतून आईवडिल आले होते. ओझं डोक्यावर असल्या कारणाने दोघांना धाप लागली होती. दोघे घामाने ओलेचिंब भिजले होते. सित्या बिलगलेला तशीच आई त्याला घेउन घरात आली. मातीच्या थंड माठातील पाणी प्यायली. एक लोटा बाहेर पतीला घेउन आली.

तसे सित्याने हाफ पॅन्टच्या खिशातला शाळेत मिळालेला पेढा बाहेर काढला. करवंदीच्या पानाला टोचलेले काटे व्यवस्थित बाहेर काढले. वरचं करवंदीचं पान बाजूला केलं. पेढा उष्णतेने विरघळत होता. पेढा मिळाला त्यावेळेस जो घट्ट होता. आता तेव्हडा नव्हता राहिला. सित्याने पेढ्याचा तुकडा तोडून पहिला घास आईच्या तोंडात टाकला. आईला खूप भरून आले. नंतर आजीला व वडिलांना दिला. उरलेला आईच्या हातात दिला. व लहान भावाला शोधायला गावात पळाला. आई मागून आवाज देत होती.

सित्या वासरा तू भी झे थोरा.

सित्याने ऐकले नाही. तो गावातील दोन चार घर सोडून गेला पण.

सित्या गावात जिथं मुलं खेळत होती तेथे पोहचला. सित्या पेक्षा लहान भाउ भिगल्या. तो अजूनतरी शाळेत जाण्याच्या वयाचा झाला नव्हता. सित्याने त्याला त्याच्या पाठी मागून उचलून घेतले. तसा तो रडायला लागला. त्याला पाठी मागून उचलणं आवडलं नसणार. सित्याने त्याला सांगीतलं.

तुले पेढा आणलय शाळेतन.

तरी तो काही तयार झाला नाही. मग सित्याने सांगीतलं.

पेढा खावायचा.

तोंडाने खूण करून त्याला दाखवले तसा तो तयार झाला. भिगल्याला घेउन सित्या निघाला. घरी आला. सित्याने आईला सांगीतलं.

ब’ भिगल्यालं पेढा दे.

आईने करवंदीच्या पानातला पेढा काढून भिगल्याला देण्या अगोदर. थोडा तुकडा सित्याला देऊ केला. पण ते भिगल्याला आवडलं नाही. तो रडायला लागला.

माजहे, नगा देऊ तेल.

सित्या बोलला.

ब , नंग माले. दे समदी तेला.

आईने संपूर्ण पेढा लहान भिगल्याला दिला. तसे वडिल बोलले.

पक्क व्दाड गाबरू आहे हे धाकटं.

आजी बोलली भिगल्याला…

दे भिगल्या माह्या वासरा, दादाले उलुसा.

तो पर्यंत भिगल्याने संपूर्ण पेढा तोंडात टाकला होता. सित्या बोलला.

बा, खावदे त्याले बारकं प्यार हाये ते.

आईला सित्या खूप समजदार वाटला. मग सित्या आईच्या पुढ्यात बसून, शाळेतल्या गमती जमती सांगू लागला. त्याने कसं भाषण केलं. गावातली कोण कोण माणसं शाळेत आली होती. आई एकीकडे दुपारच्या जेवणाची तयारीचे पाहत होती. भाताची पेज शिजत ठेवली. वाळवलेले मासे बाहेर काढून भाजी शिजवत ठेवली. एकीकडं मुलाशी गप्पा करता करता ती चुलीवरच्या जेवणा कडे लक्ष देत होती. जेवण तयार झाल्यावर मातीच्या बाडगीत प्रत्येकाला पेज माश्याचे कालवण वाढले. सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. मुलं पुन्हा बाहेर खेळायला गेली. आजीनी तंबाकू ची मशेरीने दात साफ करायला घेतले. भिक्याने तंबाकू चुना लावून मळली. चिमूट तोंडात भरली. आई दारकीनं घरात भांड्याकुंड्यांची आवरा आवर केली.

भिक्याने जंगलातून आणलेल्या बांबूंची कोयत्याने चिपाड करयाला घेतली. तेव्हड्यात शेजारची आजीची मैत्रिण गप्पा करायला आली. आजीने तिच्या पुढे मशेरीची पुरचुंडी केली. तिने डाव्या हाताच्या तळहातावर मशेरी घेउन. दात घासायला सुरवात केली. दोन्ही मैत्रिणींच्या बाता रंगात आल्या. शेजारची आजी सांगू लागली.

सुमली बाय, कालचेला माह्म ल्योक तालुकेची बाजारला गेलाल. तिकडं त्याल सांगल. तेंचे गावात वाघरू घुसलं होते म्हनं.

सित्याच्या आजीने मशेरी लावायचं थांबवलं.

अतिदुर्गम भागातील गावांना वाघाची अथवा वन्य श्वापदांची भीती असणं. हे त्यांच्यासाठी नवीन नव्हते. नवीन पिढीने ह्या अश्याप्रकारच्या कथा फक्त ऐकलेल्या. पण अनुभवलेल्या नसल्या कारणाने. त्यांना वाघ आलाय. ही बातमी गंभीर वाटली नाही. पण जे वयस्कर होते त्यांनी ह्या गोष्टी अनुभवलेल्या असल्यामुळं त्यांना गांभीर्य होते. शेजारच्या आजीच्या बोलण्याला उपहासात्मक घेत भिक्या बोलला.

तातेय कायबी सांगतेल लोकं बग. कुण्या डोळ्यानं हेरला नसताव. त्येलाबी पोट हाय. त्यो काय जागीव थोडा थांबतय.

भिक्याची आई त्याला आडवत बोलली.

भिक्या वासरा तसं नाय त्ये. तू बघिटल नशील. आमी पायलव. गावातून माणूस उचलून नेतांना.

भिक्या आईच्या पुढे काय बोलणार. पण हा म्हणता ही बातमी गावभर पसरली. कुठून ही बातम्या म्हणा किंवा अफवा रोजच गावात धडकू लागल्या. काही खर्‍या होत्या. कुणाच्या तरी नात्यातली बातमी यायला लागली. आता पर्यंत गांभीर्यपूर्वक न घेणारा वर्ग गांभीर्याने घ्यायला लागला. गावातील लोकांचे रात्री एकत्र येण्याचे प्रमाण वाढले. उपाय योजना काय करावी या बद्दल खलबतं होऊ लागली.

मुळात वाघ शक्यतो गावात घुसत नाही. पण ज्यावेळी तो नरभक्षक होतो त्यावेळी तो गावात घुसून माणसांची शिकार करतो. जंगलात त्याला कुण्या माणसाचे मांस किंवा रक्त जिभेला लागले की वाघ हा नरभक्षक होतो. जो पर्यंत त्याच्या जिभेला माणसाच्या मांस रक्ताची चव मिळाली नाही. तो पर्यंत तो नरभक्षक नसतो. एकदा की वाघ नरभक्षक झाला. मग त्याला कुठल्या प्राण्याच्या मांसाची गोडी लागत नाही.

गावातील लोकांनी उपाय योजना म्हणून रात्रीचा पहारा देण्याचे ठरवले. मग गावातील पुरुषांचे गट तयार झाले. रात्रभर गाव जागे असायचं. गावातील घरात असणारी हत्यारं धार लावून तयार असायची. कुठे काही ‘खट्टू’ झाले तरी सारा गाव घरातील मिळेल त्या हत्यारांनी एकत्र जमू लागला. अफवांचे पण जोरदार पेव फूटायला लागले. एक दिवस अशीच अफवा आली. सर्व गावातील माणसं ह‍तात जे मिळेल ते घेऊन आले. एकाने हातात लाल मिरचीची भुकटी आणली. अफवा आहे हे समजल्यावर एका माणसाने विचारले.

सुभण्या काय झेवून आलासर हातन.

सुभण्या बोलला.

बुकटी हाये.

गाव आश्चर्यकारक नजरेतनं त्याला पाहू लागला. तोच माणूस पुन्हा बोलला.

वाघरु मारून का कोड्यासं करशील का?.

सारा गाव समस्येचं गांभीर्य विसरून मनमुराद हसू लागला. तसे सुभण्या बोलला.

नाय मिनिही ईचार केलता, वाघराच्या नजरव बुकटी फेकाची मंग तुमाले तेला माराय सोपं जाईल.

त्याचे बोलण्याने पुन्हा हास्याचा जणू पूर आला. शाळेच्या गुरूजींनी नरभक्षकाची बातमी आल्या पासून शाळेत जाणं बंदच केलं होतं. घरची माणसं त्यांना त्या गावात जायला विरोध करत होते. पण आज खूप दिवसांनंतर गुरूजी गावात आले.

गुरूजींना गावात शाळेवर जाण्यासाठी घरचे संमती देत नव्हते. गावात जाण्यासाठी सात किलोमीटर चालत जावे लागत होते. रस्ता जंगलातून जाणारा होता. गावाची भाैगोलिक स्थिती अशी की चारही बाजूनं जंगल. गावाची लोकसंख्या फारफार शंभर सव्वाशेच्या आसपास. त्यामध्ये उपस्थित शक्यतो दिवसा कुणी नसतेच. सर्व मजूरवर्ग होता.

आज गुरूजींनी गावात प्रवेश केल्यावर सर्वांना खूप आनंद झाला. कारण गुरूजी आले की त्यांच्या जोडीला. शेजारच्या गावातील माणसं मुलांना पोषक आहार घेऊन येत असत. गुरूजी शाळेत मुलांना शिकवत व जोडीला आलेले मदतनीस गावातील घरात खिचडी शिजवत असत. दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये ते अन्न मुलांना वाटले जाई.

गुरूजी आल्याचा आनंद गावातील महिला वर्गाला खूप झाला. कारण गावातील मुलांना दुपारच्या जेवणाची सोय झाली होती. नरभक्षक वाघाच्या भीतीनं महिला वर्गाला मुलांना सोडून बाहेर कामाला जाता येत नव्हते. गुरुजी आले तसे सर्व महिला एकत्र आल्या व जंगलात फार दूरवर न जाता गावाच्या शेजारी सरपण घेऊन येण्याचे त्यांनी ठरवले.

आता गुरूजींनी गावातील मुलांना जमा करून शाळेत आणले. बर्‍याच दिवसांनंतर शाळा उघडली. खूप धूळ जमा झाली होती. आता मास्तरांनी मुलांच्या जोडीला साफसफाई करायला सुरवात केली. आतली वर्गखोली साफ करून झाली. आता मोर्चा व्हरांड्यात वळवला गेला. सतरा मुलं आणि गुरूजींनी काही वेळातच वर्गखोली व व्हरांडा स्वच्छ करून टाकला. आता मोर्चा शाळेच्या पटांगणात वळला. मुलं गुरूजींबरोबर गप्पा करत सफाईचे काम करत होते.

अचानक. . सळसळ झाडाच्या पानांआडून आवाज यायला लागला. हा आवाज नेहमी पेक्षा वेगळाच होता. सर्व नजरा आवाजाच्या दिशेने लागल्या. दोन तीन मिनिटांनंतर आवाज बंद झाला. सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. मुलं आपसात चर्चा करायला लागली.

कायबा असलर त्ये.

गुरूजी बोलले काय नव्हतं आपल्याला भ्रम झाला. पण गुरूजींना पण धोक्याची चाहूल लागली. पण आता आवाज बंद झाला मग का? विचार करावा अशी मनाची समजूत करून गुरूजींनी परत मुलांचे लक्ष दुसरी कडे वळवले. सर्व कामात दंग झाले.

पुन्हा पाच एक मिनिटांनंतर तसाच आवाज यायला सुरवात झाली. पण आता हा आवाज थांबण्याचं नाव घेत नव्हता. सर्व घाबरले आणि आता सर्वांच्या नजरा पुन्हा आवाजाच्या दिशेने. आता आवाज आणखी वाढला. सर्व घाबरली. आवाज जसं जसा वाढत होता गुरूजी व मुलांच्या ह्रदयाचे ठोके वाढत होते. आवाज आता फारफार दोनशे मीटरवर असेल आणि पानांआडून . .

ते उमद जनावर, तो नरभक्षक दिसू लागला. अंगावर पट्टे पट्टे सुळे चमकत होते. नाका जवळ मिशी होती. त्यांनी गुरूजींसह मुलांना पाहिले. जोरात डरकाळी फोडत तो आला. त्याचे झेप घेत पळत येणं. पायाखाली जे येइल त्याचा चूरा करणं. जिथे उडी पडत होती. तेथे आवाज येत होता.

मुलं घाबरून ओरडायला लागली. रडायला लागली. तो नरपशू ह्या मुलांच्या, गुरूजींच्या दिशेने येतोय. आता गुरूजींना स्वत:च्या जीवापेक्षा मुलांची चिंता वाटू लागली. मी तर पळून जाऊ शकतो पण मुलांच काय?. आता स्वत:सह मुलांचे प्राण वाचवायचे कसे. आता वाघ फक्त दोन तीन मिनिटावर होता. आता कुणाचा तरी बळी निश्चित . .

मुलांच्या रडण्याने, ओरडण्याने आता मास्तरांना काही सुचत नव्हते. आता तर वाघ कुणाचा तरी बळी घेणार. पण त्यांनी ऐकलं होते संकटात शांत राहून विचार करायचा. म्हणजे समस्येवर समाधान सुचत असते. गुरूजींनी दोन मिनिटं शांत मन केले आणि त्यांना उपाय सुचला. गुरूजी जोरात ओरडले.

धावा आत वर्गात.

आणि मुलांना लोटत वर्गाकडे घेऊन गेले.

धावा पटकन घुसा वर्गात.

गुरूजींनी जोरजोरात ओरडायला सुरवात केली. मुलं वर्गाच्या दिशेने धावली. दरवाज्या जवळ मुलांची गर्दी वाढली. आता अर्धा मिनिटात नरभक्षक गाठणार तर मुलं सर्व आत घुसून गुरूजी पण वर्गात घुसले. लगेच कडी आतून लावायला घेतली. . पण कडी आपण लावू याची शाश्वती गुरूजींना नव्हती कारण आता नरभक्षक दरवाज्यातून उडी मारून आत घुसणार तर गुरूजींनी दरवाजा लावून कडी लावली. आणि धाडकन उडी वाघाची दरवाज्यावर पडली. जी मुलं अगोदर बाहेर ओरडत होती. ती आता आत वर्गखोलीत ओरडायला लागली. गुरूजींनी टेबल खुर्ची दरवाज्या जवळ ठेऊन देवाचा धावा सुरू केला.

आता गावाला पण नरभक्षक आल्याची बातमी पोहचली. गावातील माणसं शाळेच्या दिशेने धावली. हातात जे मिळेल ते संगतीला हत्यार घेतलं. गावातील लोकांनी ऐकले होते. जोरात आवाज केल्याने जंगलातील कुठलाही प्राणी घाबरून पळून जातो. लोकं जमा होऊन जोरजोरात ओरडू लागली जे घरात मिळेल ते वाजवू लागली. जमलेली माणसं वाघाच्या दिशेने दगड भाला जे मिळेल ते ठरावीक अंतरावर ऊभे राहून फेकू लागली. जी मुलं आत अडकली होती त्यांच्या आया पुढे धावण्याचा प्रयत्न करत होत्या गावातील ईतर पुरुष मंडळी त्यांना मागे खेचत होते.

शेवटी गावाचा विजय झाला. नरभक्षकाला पळ काढावा लागला. तो पण जखमी अवस्थेत. लोकं आनंदाने ओरडू लागली. शाळेचा दरवाजा उघडला गेला. आणि बाहेर मुलं येऊन आपल्या घरातल्या आज्यांना वा आयांना बिलगू लागली. वाघाचा आवाज घेऊन जंगलात सरपणाला गेलेल्या स्त्रीया धावत आल्या होत्या. त्यांना समस्येचं गांभीर्य लक्षात आले होते. बाहेर येणार्‍या मुलांना आया घट्ट मिठीत घेत होत्या. अखंड चुंबनाचा वर्षाव मुलांवर सुरू होता. मास्तरांनी जमिनीवर अंग टाकून जास्तीत जास्त श्वासावर नियंत्रण मिळवण्याचा असफल प्रयत्न करत होते. घश्याला कोरड पडली होती. गावातून कुणी तरी मास्तरांना पाणी आणून दिले.

थोड्यावेळात मास्तर तंदुरुस्त झाले. गाव खूप मोठ्या संकटा मधून सावरले होते. पण संकट टळणारं नव्हते.

काही गावकर्‍यांनी अंदाज बांधला आता वाघ येणार नाही. तो जखमी झालाय आणि जरी जखमी झाला असला तरी तो दुसरीकडे निघून जाईल. जखमी वाघ आणखी धोकादायक असतो असे गावातील लोकं ऐकून होते.

संध्याकाळी गावातील पुरुष मंडळी जी बाहेर गेली ती परत आली. त्यांना हकिकत समजली. त्यांनी गावाचे संकट ग्रामदेवतेने दूर केले आहे असे मांडले व देवतेला बळी देण्याचे निश्चित केले. मास्तरांना गावातील बैलगाडी जुपून घर पर्यंत सोडले. घरी गेल्यावर रात्री मास्तरांना जोराचा ताप भरून आला. झोपेत मास्तर ओरडत होते.

“पळापळा वर्गात घुसा वाघाच्या तावडीत सापडू नका.

मास्तरांना धक्यातून सावरायला बरेच दिवस लागले. गावात लोकांनी ग्रामदेवतेचा उत्सव केला. देवाला बळी दिला. आता आपल्या गावावरचे संकट टळले. आता नरभक्षक परत येणार नव्हता. लोकांनी नेहमी प्रमाणं आपली कामे सुरू केली. आज सर्व गावातील लोकांनी आपआपल्या कामाला सुरवात केली.

सित्याने घरी आईला शाळेतला घडलेला किस्सा सांगीतला. त्या दिवशी तर आई सित्याला रात्रभर कुशीत घेऊन झोपली. मनोमन देवाचा धावा करत होती. देवाचे अंतःकरण पुर्वक आभार मानत होती.

आज गावात वयस्कर माणसं आणि लहान मुलंच होती. मास्तर येत नाही मग मुलांना आता शाळा नव्हती.

आता नरभक्षकाने वेगळी शक्कल लढवली. तो लपून गावात घूसला. गावाच्या बाहेर गोठा होता. पण गोठ्यात गुरं नव्हती. वाघाच्या भीतीने मालक गुरांना घराच्या अंगणात बांधत होते. तो गोठ्यात येऊन लपला. खेळणार्‍या मुलांचा आवाज घेऊन तो सुखावला.

लोकांनी आपआपल्या कामाला सुरवात केली.

आता नरभक्षक वाघाला भूक असहाय्य होऊ लागली. खूपच दिवस उलटले होते. त्याला माणसाचे रक्त प्यायला मिळाले नव्हते. पंधरा दिवसा पूर्वी त्याला ह्याच गावातून कुठल्याही प्रकारची शिकार मिळाली नाही. पण जखमी होऊन रिक्त हस्ते परतावे लागले. आज तो पूर्वनियोजन करून आला. रोज तो गावातील हलचाली टिपत होता. आज त्याला गाव खाली वाटले. मोठ्यांपेक्षा लहान मुलांची शिकार त्याला सोईस्कर वाटू लागली.

मागच्या प्रकाराचा जणू अभ्यास करून तो आला होता. गर्दीच्या मानसशास्त्राचा आता त्याला चांगला अभ्यास झाला होता. म्हणून आज तो चोरपावलांनी गावात घुसला. गावातल्या गोठ्यात बराच वेळ लपून राहिल्यावर त्याला मुलांच्या खेळण्याचा आवाज आला. आज त्याचे खूप दिवसांनंतरचे खूपच रुचकर मांस खाण्याचे स्वप्न पुर्णत्वास जाणार होते. मुलांच्या खेळण्याच्या आवाजाच्या दिशेने तो नरभक्षक लपत चोरपावलांनी पुढे पुढे जात होता. तो आता सरपणाच्या लाकडांच्या ढिगार्‍या जवळ पोहचला. त्याने आडोश्याने मानवर करून पाहिले. आठ दहा मुलं खेळत होती. त्यामध्ये पाच ते दहा वयापर्यंतची मुलं होती. आता वाघाने निश्चित केले. यामधून जे तावडीत सापडेल ते मुल उचलायचं आणि जंगलाच्या दिशेने धूम ठोकायची.

त्याची नजर आता भिगल्यावर होती. कारण तो सहज तावडीत सापडणारा होता. वजनाने हलका दिसत होता. भिगल्याला उचलून घेऊन पळायला सोपे वाटत होते. आता वाघाने सगळ्या मुलांना वगळून भिगल्यावर नजर खिळवून धरली. तो आता भिगल्याच्या हालचाली टिपत होता. आता तो पूर्णपणाने भिगल्यावर चित्तएकाग्र करून बसला. आता त्याला कुठल्याही क्षणी भिगल्याला उचलायचे होते. निरागस मुलं खेळण्यात दंग होती.

सकाळी दारकी, भिगल्या व सित्याची आई, सित्याला आणि भिगल्याला जवळ घेऊन एक एक गोड मुका घेऊन बोलली…

सित्या माह्या वासरा म्हतारीबला तरास नगासा देऊ. लयीच लांबच्याला नगा जाऊस खेळालं. सित्या भिगल्याव नंजर ठिव.

आज्ञाधारक सित्या आईला वचन देऊन गावात खेळायला निघाला.

गावातील एका मोकळ्या अंगणात मुलं खेळत होती. तेथे अंगणात सभोवताली असणार्‍या झाडांची सावली येत होती. आता सूर्य मध्यावर आला. जंगलात गेलेल्या महिला डोक्यावर सरपणाची मोळी घेऊन तर काही झाडाची बाजारात विकता येणारी पानं घेऊन घराकडे परत येत होत्या. सित्याच्या आजी मुलांकडे अधूनमधून येऊन लक्ष देत होती. सित्या तर आईने सांगीतलं म्हणून भिगल्यासंग खेळत होता.

नरभक्षक इकडे भिगल्याकडे नजर रोखून होता. मुलंाच्या पैकी एकाची नजर सरपणाच्या ढिगार्‍याच्या हलचाली वर गेली. त्याला आता ती हलचाल भयावह वाटू लागली. तो आता खेळ सोडून सरपणाच्या ढिगार्‍याकडे पाहू लागला. आता सर्व मुलं हळूहळू त्याच्या बाजूला गोळा झाली. आणि कुणाला तरी वाघाची शेपूट दिसले तशी त्याने. . जोरात आरोळी ठोकली.

अर्रर्र धावाऽ ऽ,धावा वाघरू हाय त्यो.

तशी सर्व मुलं धावत सुटली. सित्यापण त्यांच्या संग धावत होता. त्याच्या लक्षात आले. भिगल्या मागे राहिला. खरच भिगल्याला इतर मुलांच्या गतीने पळता येत नव्हते.

नरभक्षकाच्या लक्षात आले. आता मुलांना समजले. ती घराच्या दिशेने पळत आहेत. आता आपल्या तावडीतून शिकार निसटणार आहे. पण ज्याच्यावर आपण नजर ठेवलेय ते मुल तर मागे आहे. चला आता त्यालाच उचलू या. तो उडी मारून भिगल्याला पकडायला धावला. आता झेप घेऊन वाघ भिगल्याला उचलणार तर मध्येच सित्या भिगल्याला उचलायला वाकला. आणि वाघाच्या जबड्यात भिगल्याची मान सापडण्या ऐवजी सित्याची मान सापडली. नरभक्षक सित्याला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाला. लहाना भिगल्या.

दादव.

करून जमिनीवर झोपून रडू लागला. मुलं ओरडत होती.

सित्याल वाघरू झेवून जेलय. धावयऽऽ.

मुलं सित्याच्या घराकडे धावत होती. त्यांना रस्त्यामध्ये दारकी येतांना दिसली. डोक्यावर सरपणाची मोळी होती. घामाघूम झालेली. श्वासांची गती वाढलेली. वर सूर्यनारायण आग ओकत होता. मुलं तिच्या जवळ गेली आणि म्हणाली.

दारकी तातेय, तुलेय सित्याला वाघरूनं उचलय त्य्यो अंगाल.

दारकी मोळीसह जमिनीवर कोसळली. जोरात छाती बडवू लागली. आणि क्षणार्धात उठून. मुलांनी सांगितलेल्या दिशेने धावत सुटली. तिच्या पायात नऊ नागांचे बळ संचारले. खूपच जोरात धावत असता. तो काळासारखा नरभक्षक तिला दिसला. आता चित्र असे उमटले नरभक्षक पुढे पळतोय. त्याच्या जबड्यात निरागस पाडस सित्या आणि त्याच्या मागे धावणारी हरिणी… दारकी.

बाळाला वाचवण्यासाठी ही माता त्या हिंस्र श्वापदाच्या मागे धावतेय. शेवटी तिने त्या श्वापदाला त्या नरभक्षकाला गाठले. आणि बाळ सित्याला जोरात कचकटून मिठी मारली. तो नरभक्षक वाघ आता सित्या आणि दारकीला फरफटत नेत होता.

दगडातून, काट्याकुट्यात रस्त्यात लागणार्‍या झुडपातून तो दोघांना ओढत होता. आता दारकीच्या अंगावरची वस्त्र कधीच गळून पडली होती.

दोघांना फरफटत तो दगडाच्या कपारीत घेऊन गेला. आता गावात बातमी पसरली आजूबाजूला आवाज देऊन बोलवता येइल त्या गावकर्‍यांना बोलावल गेलं. भिक्याला समजलं तो पण रडायला लागला. आता गावातील जमा झालेली खूप सारी माणसं हातात. काठ्या जे काही मिळेल ते घेऊन. जंगलाच्या दिशेने आले.

पावलावर त्यांनी वाघाचा माग काढला. समोरचे चित्र खूपच भयानक होते. वाघाच्या जबड्यात ते नऊ वर्षाचे बाळ. ह्रदय पिळवटून टाकणारा प्रसंग उपस्थित लोकं सुरक्षित अंतरावरून पाहत होती. शेवटी भिक्याने हिंमत करून दगड उचलून वाघाच्या दिशेने घेऊन धावला. आणि पुढे वाघाने जोरात डरकाळी फोडली. भिक्या हातातला दगड टाकून मागच्या मागे पळाला. ते श्रेष्ठ मातृत्व बघून ते हिंस्र श्वापद मुलाची मान आपल्या जबड्यातून मोकळी करून बाजूला झाले. लांबून तो वाघ कित्येक वेळ त्या बाळाला व त्या घट्ट मिठी मारून पडलेल्या मातेला पाहत होता.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय