घरात घुसून मारू; राज ठाकरे नि मोदींचे ब्रीदवाक्य

घरात घुसून मारू

देशभरात 2019 ची लोकसभा निवडणूक खूप गाजली. ओम ने रोमचा पराभव केला अशी भावना लोकांमध्ये आहे. लोकशाही विरुद्ध राजेशाही अशीही ही निवडणूक होती व यामध्ये लोकशाहीचा विजय झाला. हा विजय अनेक लोकांच्या पचनी पडलेला नाही. काही लोक अजूनही वैचारिक अल्पवीरामात (coma) आहेत, काही लोक ईव्हीएमच्या नावाने बांगड्या फोडत आहेत तर काही जण भारतीय जनतेला शिव्या वाहण्यात धन्यता मानत आहेत.

पण स्वयंघोषित पुरोगाम्यांचा पराभव भारतीय जनतेने केला आहे. राज ठाकरे ह्यांनी ट्विटवरून अनाकलनीय एवढेच टाईप केले आहे. त्यांना म्हणे भर दुपारी लोक गुड मॉर्निंग म्हणत आहेत. ते राज ह्यांच्या घरी चहा घेऊन जातात की नाही हे मात्र सांगता येत नाही. पण त्यांची उठण्याची वेळ अजित दादांच्या कृपेने संबंध महाराष्ट्राला ज्ञात झाली आहे.

याबद्दल अजित पवार यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. तशी अजित पवारांनी मनःस्थिती सध्या चांगली नसणार कारण त्यांचे सुपुत्र पराभूत झाले आहेत. असं म्हटलं जातं की आजोबांनीच म्हणजे पवार साहेबांनीच नातवाचा पराभव केला आहे. खरं खोटं पवारांनाच माहीत आहे. तसं ते दुसऱ्यांचे पुतणे पळवण्यात पटाईत आहेत अशी चर्चा राजकीय पटलावर आहे. त्याच प्रकारे त्यांनी राज ठाकरेंनाही पळवले होते असे म्हटले. पुन्हा खरे खोटे आपल्याला माहीत नाही.

पण ज्याप्रकारे राज यांनी शरद पवारांचा प्रचार केला त्यावरून संशय घ्यायला बरीच जागा आहे. राज ह्यांच्याकडून मोदी विरोधकांना खूप आशा होती. मी माझ्या मोदी विरोधी मित्रांना सांगून थकलो की राज हे मराठी माणसाने नाकारलेले नेते आहेत, ते उत्तम कलाकार, नकलाकार असल्यामुळे लोक त्यांना टाळ्या देतील, मीही देतो, पण कुणी मत देत नाही. जो माणूस स्वतःसाठी मत मागतो आणि लोक त्यांना नाकारतात, तो माणूस दुसऱ्यांसाठी मत मागून लोक स्वीकारतील कसे?

जर काँग्रेस राष्ट्रवादीला चांगली मते मिळाली असती तर स्वतःला मन सैनिक (सैनिक हा शब्द फार क्युट आहे, असो) म्हणवून घेणारे याचं श्रेय राज ह्यांना देणार होते म्हणून या पराभवाचं श्रेय ते मोठ्या मनाने राज ठाकरेंना देऊ शकतात. उलट त्यांनी जिथे जिथे प्रचार केला तिथे उमेदवार अपमानजनकरित्या पराभूत झालेले आहेत. राज हे खूप मोठा आवाज करतात एवढंच त्यांचं श्रेय आहे, ते आक्रस्ताळेपणा करत भाषण करतात हाच त्यांचा गुण आहे, नेते म्हणून ते बालवाडीतच नापास झालेत.

राज ठाकरेंचे समर्थक निवडणूकीच्या वातावरणात लोकांना धमक्या देणे, घरात घुसून मारणे अशी अराजकता पसरवत होते. एक मराठी माणूस आणि मनसेचा माजी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला वाटलं की ज्यासाठी मनसेची स्थापना झाली त्यापासून ते कुठेतरी दूर जात आहेत.

म्हणून मी राज ठाकरेंना त्यांच्या घरच्या पत्त्यावर एक पत्र पाठवलं. त्या पत्राचा आशय असा होता की तुम्ही ही अराजकता थांबवावी आणि ज्यासाठी पक्षाची स्थापना केली ते कार्य पुढे न्यावं. ते पत्र ज्यावेळी मी सोशल मीडियावर अपलोड केलं तर मनसेचे कार्यकर्ते खळवले, एकाने तर फोन करून धमकी दिली. आता लोकशाही पद्धतीने सभ्य भाषेत पत्र लिहीण हे सुद्धा या विघ्नसंतोषी लोकांना पटू नये आणि पाकिस्तानी पद्धतीने धमकी द्यावी?

मला वाटलं होतं की राज ठाकरेंनी माझ्या पत्राला उत्तर नाही दिलं तरी चालेल पण आपल्या कार्यकर्त्याना त्यांनी समज द्यावी. लोकशाहीसाठी हे घातक आहे हे त्यांनी समजावून सांगावे. कारण आम्ही कॉलेजमध्ये असताना राज हे आमचे हिरो होते. असो.
मला वाटलं होतं की राज हे महाराष्ट्रात मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, भले ते त्यांचे समर्थक नसले तरी. ते बाळासाहेबांचे पुतणे आहेत, जरी पक्ष वेगळा असला तरी बाळासाहेबांची नाळ तुटली नव्हती असा समज आम्हा कित्येक तरुणांचा झाला होता. पण राज ह्यांनी याबाबतीतही निराशा केली. सभेमध्ये माझ्यावर टीका करणार्यांना घरात घुसून मारा अशी भाषा त्यांनी वापरली. मला काही मित्रांनी फोन करून सांगितलं की हे तुझ्या पत्राला उत्तर आहे. असो.

पण घरात घुसून मारणे हे जणू ब्रीदवाक्य झालं होतं, कारण जितेंद्र आव्हाडसारखे नेते व अमेय तिरोडकरसारखे “तटस्थ” पत्रकार राज ह्यांच्या घरात घुसून मारू या ब्रीदवाक्याने भलतेच खुश होते. त्यांनी भक्तांना चिडवायला सुरुवात केली. कदाचित लावारीस भक्तांना घरात घुसून मारल्यामुळे लोकशाही आणि संविधानाचा मान राखला जाणार होता. पण घरात घुसून मारा हे प्रकरण खूप गाजलं. हीच भाषा नरेंद्र मोदींनी सुद्धा केली होते. तेही घरात घुसून मारू असं म्हणाले होते. पण ही भाषा त्यांनी पाकिस्तानी अतिरेक्यांसाठी वापरली होती.

भारताकडे दुष्ट नजर नजरेने पाहाल तर आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू असं मोदी म्हणाले आणि त्यांनी अतिरेक्यांना घरात घुसून मारलंही… विरोधक पुरावे मागत राहिले, पण सर्वसामान्य भारतीय जनता (विरोधकांच्या मते भक्त, भक्ताड, अंडभक्त वगैरे वगैरे) खुश होती. मोदींच्या रुपात जनतेला कित्येक वर्षाने वास्तविक अँग्री यंग मॅन सापडला होता. लोकांनी या घरात घुसून मारणाऱ्याला मते दिली.

मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे असं बहुसंख्य मतदारांना वाटतं. घरात घुसून मारू हे राज ठाकरे आणि मोदींच ब्रीदवाक्य होतं असं वेगळ्या अर्थाने म्हणायला हरकत नाही. पण मोदींना देशाची सुरक्षा महत्वाची वाटते. हा दोन संस्कृतीतला अंतर आहे. मोदी यापुढे घरात घुसून मारणार आहेत आणि देश सुरक्षित ठेवणार आहेत.

देशाला असाच नेता हवा आहे जो लोकांचं सरंक्षण करून आतंकवाद्याना घरात घुसून मारतो… असा नेता नकोय जो स्वतःवर टीका झाली म्हणून सामान्य भारतीय जनतेला घरात घुसून मारतो. निवडणुकीच्या निकालामुळे हा मुद्दा आता स्पष्ट झाला आहे. यातून विरोधक बोध घेतील अशी आशा आपण बाळगायला हरकत नाही. उत्तम तेच होईल हा आशावाद सावरकरांनी आपल्याला दिला आहे. 

लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद…


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.