असाही रोमान्स…

वाळवंटा मधील वातावरणात एक वेगळीच शांतता आहे. दूरवर पसरलेला वाळूचा अथांग सागर त्यात छत्री प्रमाणे जाणवणारी छोटी छोटी खुरटी झुडपं. त्यावर चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या आणि बुलबुल. काल रात्री येऊन गेलेली पावसाची एक सर त्यामुळे थंड होऊन हळूच अंगाला स्पर्श करून जाणारा वारा ह्या सगळ्यावर कडी म्हणजे मोरांच्या आवाजाने एकदम गाढ झोपेतून येणारी जाग.

अश्या धुंद करणाऱ्या वातावरणात अनेकदा मी मलाच विसरून जातो आणि त्यात एकरूप होतो. उन चढायच्या आधी पक्ष्यांची चाललेली धावपळ, खुदकन हसून घाबरून आपल्या समोरून तुरुतुरु पळणारी खारूताई टकमक बघत जाताना बघून अनेकदा मला माझ्याच बालपणात पटकन घेऊन जाते.

निसर्गाच्या ह्या रुपात एकरूप होताना हाताशी अनेक क्षण असे लागतात जे मोजता येत नाहीत. आज मोरांच्या आवाजाने जागा झालोच होतो. मग निसर्गाशी एकरूप होतांना त्याचं दर्शन ही अगदी जवळून झालं. ज्याच्या आवाजाने जागा झालो तो बिचारा त्या खुरट्या झाडावर चढून तिला आर्त साद घालत होता.

त्याच्या आवाजात एक वेगळीच कशिश मला जाणवली. अश्या वेळी माझ्या डोक्यात मात्र हिंदी चित्रपटा मधील रोमान्सचे क्षण उभे राहिले. कदाचित तो तिला सांगत असावा, “प्रिये, आज जर तू माझ्या आवाजाला साथ देऊन मला भेटायला आली नाहीस… तर कदाचित ह्या झाडावरून खाली उडी मारून माझं जीवन संपवून टाकेल.” असा काही विचार मनात येतो तोच ती त्या दुसऱ्या टोकावरून स्वतःला जरा सांभाळत मला येताना दिसली. त्याला ही ती येताना दिसलीच होती त्यामुळे त्याच्या आवाजातली आर्तता आता शिगेला पोहचली होती.

शेवटी ती आलीच त्याच झाडाजवळ ज्यावर तो तिला साद घालत होता. पण ती न थांबता पुढे जाऊ लागली तेव्हा त्याने आगतिक होऊन झाडावरून स्वतःला झोकून दिलं. कदाचित तुझ्यासाठी मी काही करू शकतो हा विचार त्याच्या मनाला शिवला असावा. त्या हवेत विहार करत तो अगदी तिच्या जवळ उतरला. जणू काही तिला भेटायला स्वर्गातून त्याने भूतलावर अवतार घेतला ह्या आविर्भावात तो तिच्या मागे मागे चालू लागला. काही अंतर गेल्यावर मागे चालणाऱ्या त्याला ती काहीच भाव देत नाही हे लक्षात आल्यावर त्याला राहवेना. मग पुढे जे काही १० मिनिटे सुरु होतं ते बघून माझ्या डोळ्याचं मात्र पारणे फिटलं.

अचानक त्याने कूस बदलून आपल्या आत बंदिस्त केलेल्या त्या नजराण्याचा अविष्कार तिच्या समोर पेश केला. त्या नंतर अतिशय तालबद्ध पद्धतीने त्याने तिच्या समोर रुंजी घालायला सुरवात केली. सप्तरंग पिसाऱ्यांच्या त्या मनमोहक तालबद्ध नृत्य आविष्काराने मी मात्र मंत्रमुग्ध झालो. काही वेळ ती पण त्याच्या त्या आविष्कारात स्वतःला विसरून गेली असावी कारण तो धुंद होऊन नाचत होता आणि ती एकटक त्याच्या त्या रुपाकडे बघत होती. १० मिनिटे गेली असावी ती आणि मी दोघेही त्याच्या त्या लयबद्ध नृत्याने एकाच जागी खिळून बसलो होतो. आजूबाजूला काय सुरु आहे ह्याचा अंदाज आम्हा दोघांना ही नव्हता. पण अचानक तिला काय झाले माहित नाही त्याच्या ह्या मनमोहक नृत्याने तिचं समाधान झालं नसावं तिने आपलं तोंड फिरवलं आणि चालू लागली.

रोमान्स

ते बघून त्याचा ही हिरमोड झाला असावा. आसमंतात सप्तरंगाची उधळण करणारा त्याचा पिसारा अर्ध्यावर आला आणि मग हळूच अस्ताला गेला. कुठेतरी त्याचं तुटलेलं मन मला का कोणास ठाऊक पण इतक्या लांबून ही जाणवलं. कदाचित जीव तोडून केलेला तो स्वर्गीय अविष्कार त्याच्या सखीला आवडला नसावा ह्याची खंत त्याच्या देहबोलीतून माझ्यापर्यंत पोहोचली ह्यात सगळं आलं. पण तो हरला नाही पुन्हा एकदा तिच्या मागे रुंजी घालत ते दोघे त्या दुसऱ्या क्षितिजावर नाहीसे झाले. त्याच सोबत मी पण भानावर आलो. घड्याळाचे काटे कामाची वेळ झाली सांगत होते.

कुठेतरी त्या दोघांचा तो रोमान्स बघून आपलंपण असचं असतं ह्याची जाणीव झाली. पण प्राणी आणि माणसात एकच फरक.. प्रेम, प्रतिसाद समोरून मिळाला नाही तर ओरबाडून घेण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. तो खचला, कुठेतरी नाराज झाला पण पुढल्या क्षणाला पुन्हा तीचं मन वळवण्यासाठी तिच्यामागे रुंजी घालू लागला. पण त्याने काही ओरबाडून घेतलं नाही. त्याने जबरदस्ती केली नाही. जे जसं आहे तसं ते स्वीकारण्याची त्याची वृत्ती मला सकाळीच खूप काही शिकवून गेली. कोणत्याही नात्यात नकार पचवण्याची ताकद आपली असायला हवी. अडकलेला पतंग निघत नाही म्हणून तो फाडण्याची आपली वृत्ती आपल्याला त्या मुक्या प्राण्यांपेक्षा खाली नेते हे पुन्हा एकदा मनात पक्क झालं. पण त्याचा तो स्वर्गीय अविष्कार माझ्या मनात बंदिस्त झाला तो कायमचा.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

You may also like...

1 Response

  1. Manjusha says:

    Khup chan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!