समभाग विभाजन एकत्रीकरण

समभाग

शेअरबाजारात नोंदणी केलेल्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची संख्या ठरलेली असते त्याचा उल्लेख कंपनीच्या मसुद्यात (Articles of incorporation) केलेला असतो. ही संख्या त्या कंपनीच्या समभागांचे दर्शनीमूल्य (Face value) किती आहे यावर अवलंबून असते. समजा एखाद्या कंपनीचे भाग भागभांडवल 10 कोटी रुपये असेल आणि ते ₹ 10/- च्या एका भागात असेल तर त्याच्या समभागांची संख्या 1 कोटी होईल.

कंपनीच्या मसुद्यात कंपनीचे भागभांडवल 10 कोटी असून ते 10 रुपयाचा 1 समभाग याप्रमाणे 1 कोटी समभागात विभागले आहे असा उल्लेख असेल. याप्रमाणे ते ₹ 5/- मध्ये असल्यास समभागांची संख्या 2 कोटी होईल तर ₹ 2/- असल्यास हीच संख्या 5 कोटी होईल. आर्थिक उदारीकरणापूर्वी बहुतेक कंपन्यांचे दर्शनी मूल्य हे ₹ 10 किंवा ₹ 100 होते. नवीन मार्गदर्शक तत्वाप्रमाणे ही अट काढून टाकली असून फक्त ते पूर्ण अंकात असावे असे म्हटले आहे. त्यामुळेच आता ₹1, 2, 5, 10 असे वेगळे दर्शनीमूल्य असलेले शेअर्स बाजारात आहेत. हे शेअर्स यापूर्वी असलेल्या शेअर्सचे विभाजन करून निर्माण झाले आहेत. तर नव्यानेच बाजारात आलेल्या कंपन्या त्यांना अपेक्षित असलेल्या दर्शनी मूल्याचे समभाग बाजारात आणत आहेत.

अस्तित्वात असलेल्या शेअर्सचे दर्शनीमूल्य कंपनीचे संचालक मंडळ ठराव करून कमी / जास्त करू शकतात. यामुळे शेअर्सच्या संख्येत वाढ / घट होऊ शकते. यासाठी शेअर्सचे मूल्य विभागणी (Splitting) करून कमी / एकत्रीकरण (Consolidation) करून जास्त करावे लागेल. शेअरच्या बाजारभावातही त्याप्रमाणे प्रमाणशीर पद्धतीने  घट / वाढ होईल. दर्शनीमूल्य कमी होऊन शेअरच्या संख्येत वाढ झाली की त्याप्रमाणात बाजारभाव कमी होईल तर दर्शनीमूल्य वाढून शेअर्सच्या संख्येत घट झाल्यास त्याचे बाजारभाव त्या प्रमाणात वाढेल.

शेअर्सचे विभाजन किंवा एकत्रिकरणाचा कंपनीच्या बाजारमूल्यावर (Market value) सहसा कोणताही परिणाम होत नाही. तरीही अनेक कंपन्या शेअर विभाजन करण्याचा निर्णय घेतात कारण अशा शेअर्सच्या बाजारभावात खूप मोठी वाढ झालेली असते किंवा त्याचे भाव तशाच प्रकारच्या दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत सर्वोच्च पातळीवर असतात. त्यामुळेच अनेक लोक इच्छा असूनही ते शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय झटकन घेऊ शकत नाहीत. विभाजनामुळे प्रमाणशीर पद्धतीने भाव खाली आल्यास अनेकांना हे शेअर्स आपल्या आवाक्यात आले असे वाटतात. शेअर्सच्या संख्येत वाढ झाल्याने उलाढाल योग्य शेअर्स अधिक प्रमाणात उपलब्ध होतात मागणी वाढल्याने लवकरच त्यात वाढ होऊ शकते.

HDFC बँकेच्या संचालक मंडळाने 22 मे 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत  ₹2/- दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या शेअर्सचे ₹ 1/- च्या दोन समभागांमध्ये विभाजन करायचे ठरवले आहे. अशाचप्रकारे ₹ 2/- एवढे दर्शनी मूल्य असणाऱ्या बँकांची नावे, या 18 जून 2019 चा राष्ट्रीय शेअरबाजारातील बंद भाव, गेल्या 52 आठवड्यातील सर्वात कमी व सर्वाधिक भाव खालीलप्रमाणे-
 

बँकेचे नाव       बंद भाव     52 आठवड्यातील                                                                                     S No                          किमान आणि कमाल भाव
1.ICICI Bank          422     (373 – 456)
2.BOB                     116     (105 – 128)
3.Axis Bank           776     (700 – 855)
4.Fedral Bank       105     (095 – 117)
5.Yes Bank           109      (107 – 404)
या तुलनेत
HDFC Bank      2417     (1895-2470)

इतर बँकांच्या तुलनेत, HDFC Bank चा चालू बाजारभाव आणि 52 आठवड्यातील किमान कमाल भाव यात असलेली तफावत लक्षात येईल. 7 मे 2019 रोजी बँकेने, 22 मे 2019 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत  ₹ 2/- च्या एका शेअर्सची विभागणी, ₹ 1/- च्या दोन भागात करण्याविषयी विचारविनिमय केला जाईल असे जाहीर केले. त्याप्रमाणे संचालक मंडळाने या दिवशी झालेल्या बैठकीत विभागणी प्रस्ताव मान्य केला आहे. त्याआधी बँकेचा आजवरचा सर्वोच्च भाव ₹ 2367/- होता.

या विभागणीस रीतसर मान्यता मिळाल्यावर तांत्रिकदृष्ट्या चालू बाजारभावाच्या निम्मा म्हणजेच ₹ 1209/- एवढा एक रुपयात विभागणी केल्यानंतराचा भाव राहू शकतो. परंतू तो जास्त राहील ह्या अपेक्षेने शेअरचा भाव वाढत आहे. यामुळे या शेअर्सचा बाजारभाव  ₹ 2470/- ची विक्रमी पातळी गाठून खाली आला आहे.  विभाजनानंतर  भाव ₹ 1250/- च्या आसपास राहिला तरी ₹2470/- च्या तुलनेत तो अनेकांना ते शेअर खरेदी करायला प्रोत्साहित करू शकेल.

व्यवहार होऊ शकणाऱ्या शेअर्सच्या संख्येत वाढ होईल. सातत्याने चांगले त्रैमासिक निकाल देणाऱ्या या बँकेच्या शेअरच्या मागणीत होणाऱ्या वाढीमुळे अल्पकाळात तो ₹1500/- पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे आता खरेदी करणाऱ्या धारकाना अल्पकाळात 20% हमखास उतारा मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेअरचे विभाजन करण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्वच कंपन्यांच्या बाबतीत तंतोतंत असेच घडेल असे नाही. तर त्या कंपनीचा भाव तश्याच प्रकारच्या इतर कंपन्यांच्या भावाहून खूप अधिक असून कंपनीच्या निकालाची कामगिरी चढतीच असावी लागते आणि सर्वसाधारण बाजारही सुस्थितीत असावा लागतो.

समभाग एकत्रीकरणाची प्रक्रिया बरोबर याच्या उलट आहे. या कंपन्यांचा बाजारभाव तुलनात्मक दृष्टीने कमी आहे असे संचालक मंडळास वाटत असते. त्यामुळे त्याच्या बाजारभावात वाढ होण्यासाठी त्याचे दर्शनीमूल्य, भागाचे एकत्रीकरण करून पूर्ण केले जाते. यामुळे बाजारातील उलाढालयोग्य शेअर्सची संख्या कमी होऊन, मोठ्या सट्टेबाजीच्या प्रमाणात घट होते. शेअर्सचे विभाजन /एकत्रीकरण यामुळे बाजारमूल्यावर काहीही फरक पडत नाही.

यासाठी संचालक मंडळाचा ठराव, सर्वसाधारण सभेची मान्यता आणि त्याप्रमाणे घटनेत दुरुस्ती करून घेऊनच यासंबंधीची तारीख निश्चित केली जाते. या तारखेस असलेल्या सभासदांच्या शेअरची संख्या वाढते / कमी होते. बाजारात नोंदणी केलेल्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सचा एक आंतरराष्ट्रीय ओळख क्रमांक असतो त्यास ISIN असे म्हणतात. आपल्या डिपॉसीटरीकडून येणाऱ्या खाते उताऱ्यावर (Holding statament) तो दिलेला असतो. विभाजन किंवा एकत्रीकरण यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन शेअर्ससाठी तो नव्याने मिळवावा लागतो. जुने शेअर्स खात्यातून वगळून त्याऐवजी नवीन शेअर्स इलेक्ट्रॉनिक रुपात खात्यात जमा केले जातात. ज्याच्याकडे कागदी स्वरूपात शेअर प्रमाणपत्र आहे त्यांचे जुने प्रमाणपत्र रद्द करून नवीन प्रमाणपत्र पाठवण्यात येते आणि ही प्रक्रिया पूर्ण होते.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!