नुसत्या काही सवयी लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता का?

नुसत्या काही सवयी लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता का?

मित्रांनो प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःला काही विशिष्ठ सवयी लावून घेतल्या तर तो आयुष्यात कुठेही पोहोचू शकतो. यशाचं शिखर पादाक्रांत करू शकतो.

अहो काहीही काय सांगता… तुमचा लेख वाचून काढावा म्हणून काहीही सांगाल का? नुसत्या काही सवयी लावून काय होतं? महान लोक, अतिश्रीमंत व्यावसायिक वगैरे वगैरे यांची पुस्तकं वाचून कोणी महान होतं का? तुम्ही सकाळी लवकर उठा पण सांगाल…. अहो आमचा पेपरवाला, दूधवाला पण सकाळी लवकरच उठतो. तर हे ‘सक्सेस हॅबीट्स’ वगैरे काही नसतं. यशस्वी व्हायला, श्रीमंत व्हायला नशीब लागतं….

असंच वाटतं ना तुम्हाला. एवढ्यातच आपल्या मनाचेTalks च्या फेसबुक पेजवर #LetUsTalk मध्ये आपण याबद्दल पण बोललो.

आता इथे एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. मग तुम्हाला नक्की पटेल कि एक छोटीशी, साधी सवय काय करू शकते… एखाद्याच्या आयुष्यात काय बदल आणू शकते.

एकदा दोन मित्र खूप वर्षांनंतर एकमेकांना भेटतात. पण एके काळचे जिगरी दोस्त असलेले हे मित्र आता अगदी विरोधाभासी जीवन जगत असतात. त्यातला एक मित्र आयुष्याच्या खाच खळग्यांतून धक्के खात खात, गरिबीलाच आपलं नशीब समजून, आहे त्यात आहे तसा मी समाधानी आहे अशी स्वतःची समजूत करून घेऊन आलेला दिवस पुढे ढकलत असतो. पण दुसरा मित्र मात्र दिवसेंदिवस यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करत असतो. आणि अर्थातच लक्ष्मी प्रसन्न झाल्यासारखं आयुष्य तो जगत असतो.

तर असाच एकदा हा श्रीमंत मित्र जेव्हा आपल्या या गरीब मित्राच्या घरी जातो तेव्हा घरात सगळीकडे अस्वच्छता असते. जाळी-जळमटं घराच्या सगळ्याच कानाकोपऱ्यात लागलेली असतात. कुबट वास पसरलेला असतो.

तेव्हा हा श्रीमंत मित्र आपल्या मित्राला सांगतो. अरे घरात स्वच्छता का नाही ठेवत तू. तेव्हा गरीब मित्र सांगतो. काही फरक पडत नाही त्याने. कारण थोड्याच दिवसाने घर पुन्हा जैसे थे होतंच. आणि त्यासाठी लागणारा खर्च काही मला परवडत नाही. त्यामुळे हे असं राहणं हेच माझं नशीब…. आणि आपल्या मित्राच्या स्वतःमध्ये बदल करायला लावणाऱ्या कुठल्याही युक्तिवादाला टोलवण्यात मात्र तो अगदी हुशार असतो.

तर श्रीमंत मित्र यावर एक युक्ती करतो. तो एक छानसा फ्लॉवरपॉट आपल्या या मित्राला भेट करतो. (गरीब मित्र म्हणण्यापेक्षा त्यासाठी दुसरा मित्र असा शब्द आपण वापरू.)

तर हा दुसरा मित्र आपल्या घरात जो त्यातल्या त्यात बरा स्वच्छ कोना असतो तिथे हा फ्लॉवरपॉट ठेवतो. आता त्याच्या घरी कोणीही आलं की त्याला म्हणतं की, ‘अरे तो एवढा सुंदर फ्लॉवरपॉट त्या जागेला शोभत नाही. ती जागा जरा स्वच्छ कर’ आता मात्र हा दुसरा मित्र ती जागा जरा स्वच्छ करतो. आणि त्या कोनाड्यात जरा रंगरंगोटी पण करतो. आता कोणीही बघितलं की म्हणत अरे ती तेव्हढीशीच जागा सुंदर दिसते. निदान तेवढ्या भिंतीला तरी शोभा येऊ दे. आणि आता आपोआपच त्याला स्वतःलाच पूर्ण घर स्वच्छ, सुंदर करायची इच्छा होते. एक सुंदर फ्लॉवरपॉट एका माणसाची राहणी बदलू शकतो.

मित्रांनो सवयीचं सुद्धा असंच असतं. एका चांगल्या सवयीचा संसर्गसुद्धा तुमच्या अंगी इतर चांगल्या सवयी आणून तुम्हाला यशस्वी, समृद्ध जीवन जगायची सवयच लावून जातो.

जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये एखादी सुंदर, क्रांतिकारक, रिव्हॉल्युशनरी सवय लावून घेतात तेव्हा ती सवय हळूहळू तुमच्या आयुष्यात बदल घडवायला सुरू करते.

चांगला अभ्यास करायची सवय विद्यार्थ्यांमध्ये महत्त्वाकांक्षा वाढवते. चांगले मित्र- मैत्रिणी बनवण्याची सवय आपल्याला पण त्यांच्या सारखं बनायला प्रेरणा देते. स्वतःला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करण्याची सवय तुमच्यातला आत्मविश्वास वाढवते. तुम्हाला व्ही.आय.पी. असल्याचे फिलिंग देते.

म्हणजे मला सांगायचं एवढंच की आपल्यात दर वर्षी प्रकर्षाने लक्षात ठेवून एक, दोन रिव्हॉल्युशनरी सवयी लावून घ्या. आणि बघा काय होतं. पैसा कमावण्यावर फोकस नका करू. पैसा तर या चांगल्या सवयीचं बायप्रॉडक्ट बनेल.

जेव्हा तुमच्या सवयी चांगल्या असतील, विचार करण्याची पध्दत चांगली असेल, काम चांगलं असेल तर बायप्रोडक्ट असल्यासारखा पैसा आणि यश आपोआप तुमच्याकडे येईल. बाकी कसलीच चिंता करू नका फक्त #SuccessHabits चांगल्या सवयी स्वतःला लावून घ्या.

चांगल्या सवयीला कुठल्याच मुहूर्ताची गरज नसते. म्हणून पुढच्या वर्षीचं रिझोल्युशन करण्यासाठी हा प्लॅन पुढे ढकलू नका. आजच ठरवा तुम्हाला कुठली चांगली सवय लावून घ्यायची. आणि ती सवय अगदी काटेकोरपणे पाळा म्हणजे आमलात आणा. हा लेख वाचून चांगल्या सवयीचं महत्त्व तुम्हाला पटलं तर आणखी असाच काही चांगला विषय तुमच्यासाठी घेऊन यायला मला पण आवडेल.

तर मग कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणती सवय #SuccessHabit तुम्ही लावून घेणार. आणि ती सवय नीट आमलात आणण्यासाठी तुम्हाला मनस्वी शुभेच्छा💐

मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

4 COMMENTS

  1. मी पण एक चांगली सवय लावून घेणार आहे लवकर उठणे व्यायाम करणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.