न आवडणाऱ्या व्यक्तीशी ऍड्जस्ट कसं व्हायचं?

न आवडणाऱ्या व्यक्तीशी ऍड्जस्ट कसं व्हायचं?

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तो समाजाशिवाय एकटा जगू शकत नाही. समाज म्हटलं की व्यक्तींच्या समूह आला, व्यक्ती म्हटले की त्याचा स्वभाव आला, त्याचे इतर गुण-अवगुण आले… एकंदरीत काय तर त्याचे व्यक्तिमत्व आले.

माणूस आवडणं किंवा न आवडणं, पटणं किंवा न पटणं हे त्याच्या व्यक्तिमत्वावर पूर्णपणे अवलंबून आहे.  एखाद्याला एखाद्या माणसाचं बाह्य व्यक्तिमत्त्व आवडत नाही तर एखाद्याला त्याचा स्वभाव आवडत नाही किंवा त्याचे अंतर्गत व्यक्तिमत्त्व आवडत नाही.

जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही किंवा पटत नाही तीला टाळणं हा यावर एक उपाय असू शकतो. पण जर आपल्याला त्या व्यक्तीला टाळणे शक्य नसेल तेव्हा मात्र आपला नाविलाज होतो.

आणि न आवडणाऱ्या व्यक्तीसह इच्छा नसताना सुद्धा राहावं लागतं, बोलावं लागतं किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध ठेवावे लागतात.

अशा वेळी न आवडणाऱ्या किंवा न पटणार्‍या लोकांना सोडून जाणं शक्य होत नाही. त्यांच्या सहवासात त्यांचे ते न पटणारे किंवा न झेपणार बोलणे ऐकत, त्यांचे वागणे सहन करत जगावं लागतं. 

आणि त्या ठिकाणी आपण आनंदी नसतो समाधानी नसतो किंवा उत्साही सुद्धा नसतो त्याचाच परिणाम आपण करीत असलेल्या कामाच्या कॉलिटी वर होतो, आपल्या जगण्यावर होतो म्हणजे एकूणच आपल्या आरोग्यावर सुद्धा होतो.

अशा वेळेस ऑफिसमध्ये किंवा आपल्या घरात सुद्धा भावनिक नातं पारदर्शक न राहता संशयी बनतं. उत्साह संपून नैराश्य येतं. शेजारी असो, ऑफिस असो, कंपनी असो किंवा आपलं घर असो ज्या ठिकाणी आपण काम करतो किंवा राहतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचे, स्वभावाचे वेगवेगळे लोक राहत असतात आणि त्या सर्वांशी आपलं जमेलच असं नाही.

एकमेकांबद्दल आदर न राहता मनं दूषित होतात. त्याचा उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन सगळ्यांचाच लॉस होतो. तर मित्रांनो अशा या कठीण गुंतागुंतीच्या प्रश्नावर तोडगा काढणं जास्त अवघड नाही बरं का!! 

खरं तर ते सहज शक्य आहे पण त्यासाठी आपण आपल्या विचारांची व मनाची कक्षा विस्तारीत करून घेणं गरजेचे आहे. म्हणजेच आपण आपलं मन मोठं करणं गरजेचं आहे.

मित्रांनो, या मानवी जगात निसर्गाने प्रत्येकाला त्याच्या स्वभावाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला आहे. म्हणूनच प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार त्याच्या गुणवैशिष्ट्यांनुसार जगत आहे. 

त्यात आपणही आलोच. प्रत्येकाला आपापल्या स्वभावाचा पॅटर्न असतो त्या पॅटर्ननुसार तो आपल्या जीवनात जगत असतो. आपल्याला जर कोणी म्हटलं, की तुझा हा स्वभाव मला आवडत नाही…

तर आपल्याला पण त्या समोरच्या व्यक्तीचा राग येतोच ना!!  तसंच आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीला जर आपण असं म्हटलं तर त्याला सुद्धा सहाजिकच आपला राग येईल. म्हणून प्रत्येक जण आपल्या स्वभावाचं, आपल्या व्यक्तिमत्त्वाचं मालक असतं, हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे.

अश्या व्यक्तीला हँडल कसे करावे? किंवा अश्या व्यक्तीबरोबर डील कसे करावे?

आता तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा. त्याच्यातील कोणते गुण किंवा स्वभाव तुम्हाला आवडत नाही ते आठवण्याचा प्रयत्न करा.  कोणतीही व्यक्ती कुणालाही पूर्णपणे कळलेली नसते. 

हा!! सहवासाने आणि अनुभवाने कळेल…. मात्र शंभर टक्के कळालेली व्यक्ती ही आपल्याला शंभर टक्के आवडेल याची खात्री देता येत नाही.

जशी कोणतीही व्यक्ती आपल्याला १००% आवडू शकत नाही तसेच आपणही कोणाला १००% आवडू याची खात्री देता येत नाही. 

मित्रांनो कोणताही माणूस शंभर टक्के आदर्श नसतो म्हणून आपल्याला न आवडणारा माणूस हा १००% आदर्श असलाच पाहिजे अशी अपेक्षा आपण ठेऊ शकत नाही.

कोणताही माणूस १००% आदर्श असू शकत नाही हे आधी तुम्हाला स्वीकारावे लागेल. कारण तुम्ही सुद्धा १०० % आदर्श नाही. मित्रांनो इथे तुम्हाला असं वाटतं की मी त्याच्या एवढा वाईट नाही… बरोबर आहे कारण, हे आपल्याला वाटतं!! आणि आपल्याला जे वाटतं ते त्याला वाटलं पाहिजे ना!! आणि म्हणूनच…

Accept as he is or Accept as she is!!!

आपल्या मनाला हे खडसावून सांगा की समोरचा माणूस जसा आहे तसाच तो असणार आहे मी त्याला बदलू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही तुम्हाला याचा त्रास होतच राहणार. 

तो समोर दिसला की तुमच्या कपाळावर आठ्या उमटणार, तुमचा बीपी वाढणार आणि म्हणूनच त्याला स्वीकारणं हा सर्वोत्तम उपाय आहे.

एकदाचं त्या महाशयाला तुम्ही स्वीकारलं, की त्याचं मनात एक काल्पनिक कार्टून बनवा म्हणजे तो दिसला की त्याचा तुम्हाला राग न येता हसू येईल आणि आपण आनंदी राहू. कार्टून चा स्वभाव हा विचित्र असतो हे आपलं मन आता स्वीकारायला लागेल.

न आवडणाऱ्या व्यक्तीशी ऍड्जस्ट कसं व्हायचं?

न आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर ऍडजेस्ट होण्याचा आणखी एक पुढचा टप्पा म्हणजे आपल्याला आवडणारा एक छानसा छंद जोपासा. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत मन गुंतवले म्हणजे रिकाम्या वेळात त्रास दायक वाटणाऱ्या व्यक्तीचा विचार न येता, आपल्या छंदात मन गुंतून राहील. 

हळूहळू आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत इतकं मन गुंतवा की त्या व्यक्तीचा विचार करायला सुद्धा वेळ राहणार नाही.

बरेचदा छंद जोपासताना असासुद्धा जोपासता येईल की ज्या पासून काहीतरी अर्निंग होऊ शकेल. आणि तुमच्यापुढे पर्याय उपलब्ध होतील.

परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल. बऱ्याच लोकांच्या बाबतीत तर असे असते की न आवडणाऱ्या व्यक्तीवरच ते अवलंबून असतात. आणि हीच गोष्ट त्यांना नैराश्यकडे नेते.

अशी कुठलीही परिस्थिती आत्मविश्वासाने हाताळली तर नक्कीच मार्ग काढता येतो. माणूस हा मुळातच क्रिएटिव्ह असतो, त्याच्याकडे कौशल्य असतात आणि याच कौशल्यांनी आसपासच्या माणसांना हाताळायला शिकलं तर कुठल्याही स्वभावाच्या व्यक्तीबरोबर ऍडजस्ट होणं सहज शक्य होईल. 

डोळसपणे चौफेर पहा. त्या कार्टून पेक्षा आपले स्किल्स वाढवून आपण सहज प्रमोशन मिळवू शकतो असा आत्मविश्वास कामाच्या ठिकाणी बाळगला तर तुमच्यासाठी परिस्थिती खूप सोपी होऊन जाईल.

हे तर झाले माझे विचार. तुम्हाला सुद्धा माणसांना हाताळण्याच्या आणखी काही कल्पना असतीलच. कमेंटमध्ये तुमच्या आयडिया जरूर सांगा. आणि तुमच्या मित्रांना हा लेख शेअर करून चर्चेत सहभागी करून घ्या.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

3 COMMENTS

  1. Ha lekh khupch chan vatla. Pn vichar mandn ani lihin farch sop ast, ani suggestion den.practical life mdhe te anubhvn farch kthin. Jyachyavr bitte tyalch te smjt.

    • हो ते बरोबर आहे. ज्याच्यावर बीतते त्यालाच सहन करावे लागते. पण त्यासाठी असे काही जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत तर परिस्थिती थोडी सोपी होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.