किरण (एक प्रेमकथा)

एक प्रेमकथा

विवेक कित्येक दिवसानंतर आज छान तयार झाला होता मित्राचे लग्न असल्यामुळे सर्वांच्याच सोबत जाणे त्याला भाग पडले. पारंपारिक ड्रेस घालावा असा सर्वांचा ठराव पास झाला. खरं तर विवेक जाण्यास तयारच नव्हता कारण मधला बराच काळ तो कुठेही गेलेला नव्हता की फारसा मित्रांमध्ये मिसळत नव्हता..

पण आज कोण जाणे त्याचा मूड वेगळाच होता. त्याने गोल्डन कलरचा त्यावर सुंदरसे वर्क असलेला कुर्ता पायजमा घातला होता. त्याच्या दिसण्यात अजूनच चार चांद लागले होते. आपले रूप त्याने आरशात न्याहाळले गुणगुणतच थोडा केसांवर स्प्रे मारला आणि केस व्यवस्थित सेट केले. तसा तो दिसायला राजबिंडाच होता आणि त्यावर तो ड्रेस..

कुणीही मुलगी त्याच्या प्रेमात पडावी इतका सुंदर दिसत होता….!! सायंकाळची वेळ.. एकमेकांना फोन करून निघण्याची वेळ ठरली.. आज थोडा तो बदललेला दिसत होता.. स्वतःची कार काढली नी समोरच्या स्टॉप वरून मित्राला घेतले नी एकदाचे सर्व मित्रमंडळ आपापल्या सोयीप्रमाणे पोहोचले सुद्धा..

सर्वजण खूप खुश होते पण विवेक कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता.. कुणालाही हे लक्षात आले नाही. सर्व मनाच्या कुप्पीत साठवून ठेवले होते पण किती दिवस? एक न एक दिवस तरी ते घट्ट बसलेलं झाकण उफाळणारच..!!

तसंच काहिसं परंतु समतोल सुद्धा साधायलाच हवा.. उफाळलेल्या भावना बाहेर निघायला आसुसलेल्या होत्या पण रस्ताच मिळत नव्हता कुठे तरी वाटा मोकळ्या व्हायलाच हव्या होत्या.. वरवर जरी तो आनंदी दिसत असला तरी आतून तो खूप दुखावलेला होता. कोण ओळखणार मनातील भाव?

आज मित्राचे लग्न पण मी कुठेतरी हरवतोय..! चल यामध्ये नकोच शिरायला. मनाची तयारी करून तो उठला पण पुढल्याच क्षणी त्याला एकदम समोरच माया दिसली. हो ती मायाच होती.. मी स्वप्न तर बघत नाही ना? एका क्षणी त्याला हवेत तरंगत असल्याचा भास झाला. हलकीशी हवेची झुळूक त्याला स्पर्शून गेली. अंधारी रात्र संपून पहाटेच्या उजेडाची चाहूल व्हायला लागली. एकदम तिला समोर बघून तो निशब्दच झाला..

काय बोलावे काही कळत नव्हते. दोघांमधेही मूक संभाषण सुरू होते. दोन जीव एकमेकात परत गुंतू पहात होते. तेवढ्यात रिया नी आवाज दिला नी ती भानावर आली. नजरेचा एक कटाक्ष टाकून हवेच्या झुळुके प्रमाणे ती निघून गेली. विवेकचे विचारचक्र सुरू झाले.. माया आज एकटीच का आली असेल? निलेश तिच्यासोबत का आला नसेल? मनात विचारांचे वादळ गर्दी करीत होते. हे वादळ शमायलाच हवे म्हणून एकदा तरी आपण मायासोबत बोललंच पाहिजे. पण कसे? “ही आज अबोल दिसलेली माया तीच अवखळ, बडबडी माया का?” वर्तमानकाळातून तो भूतकाळात डोकावू लागला…

कॉलेज चे भव्य प्रांगण.. मुलींचा कबड्डीचा सामना रंगात आलेला.. थर्ड इअर विरुद्ध फायनल इअर…दोन्ही टीम कसून प्रयत्न करीत होत्या.. माया थर्ड इअर या टीमची कॅप्टन होती आणि ती आपल्या टीमला व्यवस्थित हाताळत होती आणि जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करीत होती. विवेक फायनल चा विध्यार्थी त्यामुळे बघ्याच्या भूमिकेत तो पण आलेला..

मायाचा खेळ बघून तो भारावून च गेला. मनातून ती त्याला आवडायला लागली या गोड स्वप्नात असताना सामना संपला सुद्धा आणि त्यामध्ये थर्ड इअर जिंकले. हीच संधी साधून तो मायाचे अभिनंदन करायला गेला आणि हातात हात मिळवला तशी हलकीशी शिरशिरी तन आणि मनाला भिडून गेली. त्यादिवसापासून अगदी तो तिच्यासाठी वेडा झाला होता परंतु तिला काय वाटेल?

तिच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात तरी माझ्यासाठी जागा असेल का? पण काहीही असो मी तिला प्रोपोज करणारच मग तिने नाही म्हटले तरी चालेल… मेसेज करून त्यांनी जवळच्याच एका कॉफी हाऊस मध्ये भेटायचे ठरविले. तिच्याही मनाच्या कुप्पीत ज्योत मिणमिणत होतीच मनोमन तिला विवेक आवडतच होता कारण लगेच तिनी होकार दिला आणि झाले त्यादिवसापासून त्यांची प्रेमकहाणी रंगायला लागली..

एकमेकांच्या हातात हात घेऊन कितीतरी वेळ गप्पागोष्टी करण्यात जाई.. कहानीत रंग भरणे सुरू होते.. रंग भरता भरता दोन वर्षे कसे भुर्रकन निघून गेले काही कळले नाही.. स्वप्ननगरीतून वास्तवात डोकावू पहात होते.. वास्तवाचे भान यायला लागले नेमका त्याच वेळी विवेक डिग्री पूर्ण करून उच्च शिक्षणाकरिता परदेशात गेला आणि M.S. पूर्ण झाले की लग्न करू या… ही आशा ठेऊन खुशीने निघाला कारण तो दुसऱ्या मुलीचा विचारही करू शकत नव्हता..

इकडे माया खूप उदास रहायची कारण असं वाटायचं की आपलं सर्वस्वच कुठेतरी हरवलं.. आता तिचे सुद्धा फायनल इअर संपले समोर पी. जी.करायचे आणि नंतर जॉब करायचा हा विचार असताना अचानक घरून लग्नाबद्दल प्रस्ताव आला परंतु मला जॉब करायचाच ही सबब सांगून तिने टाळाटाळ केली पण काही दिवस ओसरल्यावर परत तोच विषय…

आता तिला सांगणे जरुरी होते पण तिचे घरच्यांनी काहीही ऐकले नाही कारण त्यांनीही मायाकरिता सुंदर, गलेलठ्ठ पगार, एकुलता एक असा मुलगा शोधला.. तिच्या मनाविरुद्ध शुभमंगल पार पडले त्याआधी तिने विवेकला फोन करून सांगितले इकडे हे सर्व असं चाललंय पण तो तरी काय करणार? शिक्षण अर्धवट सोडून येऊ शकत नव्हता.

तरी त्याने बराच प्रयत्न केला पण प्रयत्न निरर्थक राहिले. इकडे मायाला आईवडिलांना दुःखी करायचे नव्हते होकार द्यावाच लागला.. सासरचा उंबरठा ओलांडला आणि ती आता पूर्णपणे निलेश सोबत संसारात लीन झाली होती. निलेश पण तिच्यावर खूप प्रेम करीत होता. छान संसार सुरू होता. पण थोड्याच दिवसात नाण्याची दुसरी बाजू दिसायला लागली, वरवर प्रेम करणारा निलेश काही वेगळाच होता.

त्याचे वागणे वेगळेच वाटायला लागले तिला मिळालेला जॉबही सोडायला लावला, बाहेर कुठे जायला बंदी, कुणासोबत बोलायचे नाही बोलली तर मारझोड, एकदा तर जळत्या सिगारेटचे चटके पण दिले. अशा विक्षिप्त वागण्याला ती कंटाळली होती. तिला ते सर्व असह्य होत होते तरी ती सहन करीतच होती. खेळाडू असल्याकारणाने तिने बराच प्रतिकार पण केला तरी काही फरक पडला नाही.

शेवटी तिने हिंमतीने पोलिसात तक्रार केली आणि आईवडिलांना सुद्धा सांगितले.. त्यांनी समजावण्याचा बराच प्रयत्न केला पण आता सर्व हाताबाहेर गेलेलं असल्यामुळे ती सुद्धा निलेश सोबत रहायला तयार नव्हती. आता प्रेमाचा अंकुर फुटणे कठीण होते म्हणून ती वडिलांसोबत निघून आली..

दोन वर्षांचा गेलेला काळ पण तो तिला जन्मठेपेच्या शिक्षेपेक्षा कठीण वाटत होता. जुन्या आठवणी गाठीशी होत्या पण फक्त आठवणीतच दिवस काढत होती.. अचानक एक दिवस तिची खास मैत्रीण रिया चा फोन आला आणि त्यांच्या क्लास मेटचे लग्न असल्याचे सांगितले व तुला पण यायचे आहे हे आवर्जून सांगितले कारण कॉलेज मधील तो या सर्वांचा कॉमन मित्र होता.

आधी तिने नकारच दिला पण शेवटी रियाने सांगितले सर्व मित्र मैत्रिणी येणार असल्याचे सांगून तिला येण्यासाठी भाग पाडले.. तिला तिळमात्रही कल्पना नव्हती की विवेक भारतात असेल आणि तो सुद्धा लग्नाला येईल कदाचित योगायोग म्हणावा लागेल. तिने तयारी सुरू केली साधासा ड्रेस त्यावर मॅचिंग गळ्यातला सेट.. साध्या वेशातही ती छान दिसत होती….

मैत्रिणींमध्ये मिसळताना मनाची घालमेल सुरू होती, थोडे अस्वस्थ वाटत होते. खूप रडून घ्यावं आणि एकदाचं मन मोकळं करून टाकावं ही अवस्था.. स्वतःला सावरत होती.. शेवटी सर्वजण जमा झाले आणि एकमेकांची चौकशी करायला लागले. विवेक भारतात नसल्यामुळे त्याचा संपर्क कमी होता पण आता तोही इथेच सेटल झालेला आहे हे ऐकून जोरदार टाळ्या झाल्या. सर्व आनंदाने ओरडू लागले हे माया मन लावून ऐकत होती आणि तीही त्या आनंदात सामील झाली…

हा आनंद आज मीच वेचला असता पण माझ्या नशिबी हे नव्हतेच जणू.. इकडे विवेक बेचैन.. माया इतकी का बदलली याचे उत्तर त्याला जाणून घ्यायचे होते, तिच्या चेहऱ्यावर दिसणारे दुःख तोच वाचू शकला होता म्हणून त्याने मित्राकडून माहिती काढली..

ऐकून निशब्दच झाला आणि म्हणूनच त्याने तिला भेटायचे ठरविले.. ती तयार नव्हती कारण तिच्यामध्ये आता इतकी हिंमत नव्हती की, त्याला भेटून ती तिचे रडगाणे सांगणार… नकोच भेटू का? पण मला सुद्धा त्याला काही सांगायचच आहे.. खूप गप्पा मारायच्या आहेत कित्येक दिवसांनी तो भेटत आहे.. एक युग गेल्याप्रमाणे वाटत होते परंतु नाहीच भेटायचे हा निर्धार करून ती निघायला लागली तेवढ्यात विवेक आला. मागचा पुढचा विचार न करता त्याने तिचा हात पकडून कारच्या दिशेनी तिला घेऊन गेला..

थोडावेळ अगदीच शांतता… मायाला काहीच कळले नाही… थोड्याच वेळात कार कॉफी हाऊस समोर थांबली.. दोघेही उतरले… तेच कॉफी हाऊस, तीच जागा, ते दोघे सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या… सर्व चित्र डोळ्यासमोर फिरायला लागले..

पण नकोय या भावनेत आता अडकू नकोस.. हे सुकलेलं फुल देवाला अर्पण करायचे? छे..!! काही काही विचार मनात गर्दी करीत होते.. विवेकनी तिच्याकडे पाहिले ती कुठल्यातरी विचारात गढलेली, तिच्या चेहऱ्यावर दुःखाची झलक ठळक पणे दिसून येत होती जणू एक अबोल बाहुली बसलेली… विवेक तिच्याकडे सारखा बघून तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होता क्षणभर तो सुद्धा भाम्बावला पण लगेच त्याने स्वतःला सावरले आणि मायाला आवाज दिला ती अबोल बाहुली एकदम स्वप्नवत जागी झाली.. बघतो तर काय डोळे डबडबलेले.. केव्हाही बांध फुटून आपली वाट मोकळी करणार…

त्या अबोल डोळ्यांना खूप काही सांगायचं होतं.. मग हळूच विवेकनी तिच्या डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसल्या आणि तिला तो बोलला तू काहीच सांगू नकोस तुझे हे डोळे खूप काही सांगून गेले मला जे समजायचंच ते समजलंय..

आता समोर मी तुला सांभाळणार. मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो जितकं मी आधी करायचो.. तू माझ्यासाठी का थांबली नाहीस? माझ्यावर तुझा इतकाही विश्वास नव्हता का? मी तुझ्यावाचून एक एक दिवस कसा काढलाय..!

तू दिलेल्या आठवणी मी आजही ताज्या करतोय आणि त्यांना गोंजारत बसतोय पण तू किती कठोर ग.. तु लग्नाला तयारच कशी झालीस? किती वाट पाहिली ग मी तुझी.. इतकं होऊनही एक अवाक्षरही कळू दिले नाहीस.. पण ठीक आहे आजही वेळ गेलेली नाही. मी आजही तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे..

मायाचा हुंदका एकदम बाहेर पडला तिला आवरणे खूप कठीण होते.. कित्येक दिवसांनी साचलेल्या पाण्याला वाट मिळाली आणि ते निर्मळपणे वाहायला लागलं.. स्वतःला सावरले आणि बोलली, “नाही विवेक..!! तू दुसरी मुलगी बघ नी लग्न करून सुखी हो… आता मी एक लग्न झालेली स्री आहे.. यामधून सावरेल सुद्धा.. पण आता तुझ्यासोबत लग्न..!! कल्पनाही नाही करवत.. खाली पडलेलं फुल आपण देवाला वाहतो का? तू माझा विचार सोड.. विवेक नको स्वप्न बघूस, नको चित्र रेखाटूस… सुख हे नियतीच देणं आहे सगळ्यांनाच मिळेल असही नाही… ते चित्र माझ्यासाठी नाहीच.. नकोच त्या चित्रात रंग भरुस…मी मन मारून जगायला शिकत आहे कारण त्यामुळे आशेचा स्पर्शही होणार नाही….. ही सुंदर चित्र माझ्यासाठी नाहीच याची मनाला पक्की खून गाठ बांधून, घाव सहन करीत पुढे जायची हिम्मत करीत आहे.. आता तुझ्या आणि माझ्या वाटा वेगळ्या आहेत.. मी सदैव तुझा आदरच केला नी यासमोर सुद्धा करीत राहील.. माझ्यासाठी तू देवापेक्षाही महान आहेस. नको अडवूस आता विवेक मी तुला हात जोडते” आणि भरल्या डोळ्यात वेदना भरून जायला निघाली.

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विवेक मनात असंख्य विचार घेऊन पाणावलेल्या डोळ्यांनी बघतच हळूच पुटपुटला… “तुझ्याशिवाय मी कसं जगू… हा विचारही सहन नाही होत…तुझ्याइतकं मी महान नाहीये पण निश्चितच प्रयत्न करील आणि जड पावलांनी” त्या रिकाम्या झालेल्या कॉफीच्या मगाकडे बघत खाली हातानी तो तेथून निघाला…पण नकारात्मक विचार बाजूला ठेऊन सकारात्मकडे झुकून…एक आशेचा किरण बाळगून…..

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.