वाईटातून चांगलं शोधून नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे कसे जायचे?

नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे कसे जायचे?

यात सुद्धा एक गंमत आहे. सुरुवातीला पाच चांगल्या गोष्टी लिहायला आपल्याला तसे कष्टच पडतात पण वाईट गोष्टी लिहा म्हटलं की त्या एकामागोमाग एक अशा सात-आठ तरी लिहिता येतात. पण हरकत नाही, यातून सुद्धा आपण सकारात्मकतेकडे कसं जायचं हेच बघणार आहोत.

मागच्या लेखात आपण सकारात्मकता अंगवळणी पडण्यासाठी एक सोपा मार्ग बघितला होता- दिवसभरात घडलेल्या पाच चांगल्या गोष्टींची मनात नोंद करायची आणि दिवसभर जमेल तसं किंवा रात्री झोपण्यापूर्वी त्या कागदावर उतरवायच्या.

सुरुवात फक्त पाच गोष्टींपासून केली असली तरी माझी खात्री आहे एक एक-दोन महिन्यातच पाचपेक्षा जास्त चांगल्या गोष्टींची नोंद प्रत्येकाकडून होईलच पण होतं असं की प्रत्येक दिवस सारखा नसतो, काही दिवस असे असतात जेव्हा या गोष्टी फक्त बोलण्या-सांगण्यापुरत्या मर्यादित आहेत असं वाटू लागतं आणि प्रत्यक्ष आयुष्यात त्या करणं अगदीच अशक्य होऊन बसतं.

अगदी माझ्याच बाबतीत असं परवा झालं, रात्री झोपताना मी फोन चार्जिंगला लावला नाही, रात्रीत तो डिस्चार्ज झाला आणि गजर झाला नाही त्यामुळे सकाळी उशिरा जाग आली आणि मग सगळ्याच कामांना उशीर होत गेला🙃.

डबा करता आला नाही, नेहमीची बस चुकली आणि मग एकूण सगळं वेळापत्रकच बिघडलं. नाही म्हटलं तरी दिवसाची सुरुवातच जर वाईट झाली तर त्याचा परिणाम सगळ्या दिवसावर होतो.

भलेही दिवसभरात नंतर काही चांगल्या गोष्टी घडल्याही असतील पण माझ्या मनातून काही हा सकाळचा गोंधळ गेला नव्हता मग त्यात स्वतःला दोष देणं हे ओघाने आलंच.

अशाच मनस्थितीत संध्याकाळी निघाले, निघताना स्वतःला बजावलं की आज एकही चांगली गोष्ट यादीत लिहिण्यासारखी झाली नाही, त्यामुळे आता जे झालं ते झालं असं म्हणून निघायचं आणि संध्याकाळ प्रसन्न करायची.

पण आपण ठरवतो तसचं बऱ्याचदा घडत नाही. संध्याकाळी माझी निघायची वेळ झाली आणि जोरदार पाऊस सुरु झाला, छत्री उघडून मी बसची वाट बघत उभी राहिले आणि आश्चर्य म्हणजे लगेच बस आली सुद्धा..

चला हे तरी निदान चांगलं झालं असं स्वतःशी बोलत मी बसमधे चढले आणि माझ्या लक्षात आलं की ती चुकीची बस होती. चुकीची म्हणजे जाणार माझ्याच घराजवळ होती पण फिरून, एकदम लांबच्या मार्गाने.

झालं! एक चांगली गोष्ट घडवायच्या नादात मी अजूनच गोंधळ घालून ठेवला होता. नेहमी घरी पोहोचायला वीस मिनिटं लागतात ते आज पाऊण तासाच्या वर लागला होता. पोहोचेपर्यंत सुद्धा पाऊस थांबला नव्हता, वैतागायला अजून एक कारण.

अशीच धुमसत घरी पोहोचले आणि नवऱ्याने सांगितलं की सकाळी दोघेही निघताना बाल्कनीचं दार लावायला विसरलो होतो 🤦‍♀️, त्यामुळे तिथून पावसाचं बरंच पाणी घरात आलं होतं, तो माझ्या आधी पोहोचला होता त्यामुळे त्याने बरीच परिस्थिती आटोक्यात आणली होती🤷‍♂️. संध्याकाळी छान वेळ घालवू म्हणून मी जे ठरवलं होतं तो वेळ मात्र पाणी काढण्यात गेला होता. त्यामुळे रात्रीचं जेवण पण फक्त खिचडी-पापडावर करावं लागलं होतं😞.

अशा या दिवसात पाच चांगल्या गोष्टी शोधण फार अवघड होत्या. खरं बघायला गेलं तर पाच काय पाच पेक्षा अधिक चांगल्या गोष्टी त्या दिवसात घडल्या होत्या पण माझी मनस्थितीच अशी होती की मला त्या दिसणं अशक्य होतं.

विशेष म्हणजे अशा दिवसाच्या शेवटी जर कोणी मला अशा चांगल्या गोष्टी लिही वगैरे म्हणून सांगितलं असतं तर माझी चिडचिडच झाली असती, माझीच नव्हे माझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी त्यांची परिस्थिती फार वेगळी नसती.

तर अशा वेळी सकारात्मकता कशी आणावी? आजच्या दिवसात जे झालं ते झालं मात्र याचे पडघम उद्याच्या दिवसावर उमटता कामा नये यासाठी काय करावं?

हे प्रश्न मी माझे मलाच विचारले कारण ही नवीन सवय मी नुकतीच जोपासली होती.

खरंतर अशा परिस्थितीत प्रत्येकाचे उपाय वेगवेगळे असू शकतात आणि एकाचा उपाय सर्वांना लागू होईलच असं नाही पण तरी मी जो माझ्यापुरता उपाय शोधून काढला तो तुम्हाला सांगण्यासाठी हा लेख.

ज्या दिवसात आपल्याला असं वाटतं की दिवसभरात काहीच चांगलं घडलं नाही, अशा दिवसात काय करायचं?

तर सरळ दिवसभरात घडलेल्या पाच किंवा अधिक वाईट गोष्टी लिहून काढायच्या. यात सुद्धा एक गंमत आहे. सुरुवातीला पाच चांगल्या गोष्टी लिहायला आपल्याला तसे कष्टच पडतात पण वाईट गोष्टी लिहा म्हटलं की त्या एकामागोमाग एक अशा सात-आठ तरी लिहिता येतात. पण हरकत नाही, यातून सुद्धा आपण सकारात्मकतेकडे कसं जायचं हेच बघणार आहोत.

त्यामुळे मी तर असचं म्हणेन की जितक्या वाईट गोष्टी लिहाल तितक्या चांगल्या. माझ्या त्या भयंकर दिवसानंतर मी सुद्धा तेच केलं. अगदी सुरुवातीपासून दिवस आठवला आणि यादी करायला घेतली.

१. गजर झाला नाही. जाग यायला उशीर.
२. नेहमीची बस चुकली त्यामुळे पोहोचायला उशीर.
३. संध्याकाळी नेमका निघायच्या वेळेला मुसळधार पाऊस
४. परतीच्या प्रवासात चुकीची बस घेतल्यामुळे घरी पोहोचायला उशीर.
५. सकाळी झालेल्या गडबडीत बाल्कनीचं दार उघडंच राहिल्यामुळे आत आलेलं पावसाचं पाणी.

अशी ही यादी केल्यावर मी एक-एक गोष्ट नीट पुन्हा वाचली, त्यावर विचार केला आणि मला जाणवलं आपण लिहिलं आहे किंवा विचार करतोय तितका काही आपला दिवस वाईट गेलेला नाहीये. इतक्याच गोष्टी झाल्यात न?

पण उशिरा का होईना आपल्याला जाग आली, रविवार सारखी एकदम नऊ वाजताच जाग आली असती तर?

नेहमीची बस सुद्धा कधीकधी उशीर करते, गर्दी होते किंवा एखाद्या वेळेस काहीही अपघात वगैरे झाला असतो त्यामुळे नेहमीची बस नाही मिळाली तरी लेट मार्क मिळेपर्यंत उशीर झाला नव्हता.

संध्याकाळी पाऊस पडला पण आपल्याजवळ छत्री होती, घाईत निघाल्यामुळे आपण छत्री विसरू शकत होतो पण आपण आठवण ठेवल्यामुळे पावसात भिजलो नाही. चुकीची बस घेतली खरी, पण या लांबून जाणाऱ्या बसमधे गर्दी तशी कमी असते त्यामुळे एरवी वीस मिनिटं गर्दीत उभं राहावं लागतं पण आज मी पाऊण तास आरामात बसून आले तेव्हा जर मूड चांगला ठेवला असता तर खिडकीत बसल्या-बसल्या छान गाणी ऐकत बाहेरची मज्जा बघत येता आलं असतं.

संध्याकाळचा वेळ पाणी काढण्यात गेला खरं पण नवरा आपल्या आधी पोहोचल्यामुळे त्याने लवकर दार बंद करून परिस्थिती आटोक्यात आणली होती शिवाय बरंच पाणी सुद्धा त्याने काढलं होतं.

यानंतर माझ्या दिवसाकडे वाईट दिवस म्हणून बघायचा का चांगला दिवस म्हणून हा प्रश्न माझ्यापुढे होता! हा सोपा उपाय करून तुम्ही सुद्धा एखाद्या दिवसाकडे बघायच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणू शकता.

लेखन: मुग्धा शेवाळकर

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.