जादू दोन शब्दांची… थँक यु आणि प्लिज!!

दोन वर्ष ब्रिटीश शाळेत शिकल्यामुळे माझ्या नकळत वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षापासून मला एक चांगली सवय लागली आहे. कोणी काही दिलं की पटकन ‘थँक्यू’ म्हणायचं. अर्थात ही सवय माझ्या अगदी नकळत लागल्यामुळे मला तिची कोणीतरी जाणीव करून दिल्यावरच ती समजली.

एकदा आम्ही सगळी भावंड माझ्या चुलत भावाच्या लग्नाचा व्हिडीओ बघत होतो, त्यात जेवायला वाढत असताना माझा व्हिडीओ आला होता. संपूर्ण व्हिडीओभर लग्नाच्या मूडला शोभतील अशी वेगवेगळी गाणी लावली लावली होती त्यामुळे कोणाचंच बोलणं ऐकू येत नव्हतं पण वाढप्याने भाजी वाढल्यावर माझ्या ओठांच्या हालचालीवरून माझं ‘थँक्यू’ स्पष्ट समजत होतं.

सिडी बघताना सगळ्यांच्या हेच लक्षात आलं आणि सगळ्यांनी किंचितस हसून मला त्याबद्दल सांगितलं. म्हणजे पुरी वाढली की माझं ‘थँक्यू’, भाजी, आमटी, गोड पदार्थ काही वाढलं तरी तेच!

इतर कोणीच वाढप्याला ‘थँक्यू’ म्हटलं नव्हतं. पंचतारांकित हॉटेलमधे गेल्यावर किंवा अशाच एखाद्या चांगल्या ठिकाणी गेल्यावर काही ‘एटीकेट्स’ पाळायला म्हणून ‘थँक्यू’ किंवा ‘प्लिज’ ह्या शब्दांचा वारंवार उच्चार करावा लागतो.

जुन्या इंग्रजी कादंबऱ्या वाचल्यावर हे दोन शब्द त्यांच्या भाषेत किती महत्वाचे आहेत आणि ते अशा खास काही ठिकाणांसाठी किंवा प्रसंगांसाठी मर्यादित न ठेवता, त्यांच्या रोजच्या जीवनात या दोन शब्दांचा किती सहजपणे वापर केला जातो हे समजतं.

माझ्या ‘थँक्यू’ म्हणण्याच्या सवयीबद्दल माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे हे दोन शब्द प्रामुख्याने उपहास दर्शवण्याकरता वापरतात, म्हणजे एखाद्याला पन्नास वेळा सांगून ही तो ते काम करत नसेल आणि एके दिवशी एकावन्नाव्यांदा न सांगताच अचानक त्याने ते काम केलं की उपहासाने त्याला ‘थँक्यू’ म्हणायचं किंवा समजा काहीतरी त्रास होत असल्याने आपल्याला पंखा चालत नाही हे एखाद्याला माहीत असतं पण तरीही आपण खोलीत असताना त्याने पाचवर पंखा सुरु ठेवलेला असतो आणि जरा वेळ गेल्यानंतर अचानक आपण तिथे आहोत व आपल्याला पंखा चालत नाही हे त्याला आठवतं आणि तो पंखा बंद करायला उठतो तेव्हा उपहासात्मक ‘थँक्यू’ तोंडातून निघून जातं.

तसंच काहीस ‘प्लिज’ ह्या शब्दाचं पण आहे. एखाद्याला पहिल्यांदाच विनंती करताना ‘प्लिज’ क्वचितच वापरला जातो. एखाद्या माणसाला कामं वेळेत करायची सवय नसते आणि आपलं नेमकं एखादं महत्वाचं काम त्याला सांगायची वेळ आली की याच ‘प्लिज’वर एक विशीष्ट प्रकारचा जोर देऊन आपण बोलतो. त्यात ‘कृपा कर’ असा छुपा अर्थ दडलेला असल्याची भावना दिसते.

अर्थात हे निरीक्षण काही सगळ्यांना लागू होईलच असं नाही, किंवा सगळेच हे मुद्दाम उपहास दाखवायलाच करत
असतील असं ही नाही पण बहुतेक वेळा हे असं होतं असावं, माझ्याकडून सुद्धा ‘प्लिज’ बऱ्याचदा याच अर्थाने वापरलं जातं आणि त्यात बदल घडवा यासाठी या लेखातलं पुढचं उदाहरण फार उपयोगी आहे.

असो, तर ज्याचं जे काम असतं ते त्याने केल्यावर आपल्याकडे शक्यतो कोणीच एकमेकांचे आभार मानत नाहीत आणि म्हणूनच कदाचित माझं ‘थँक्यू’ सगळ्यांच्या लक्षात राहिलं असेल.

याच मुद्द्याला पुढे नेऊन माझ्या भाचीचं उदाहरण द्यावसं वाटतं. पाच वर्षाची होईपर्यंत इंग्लडमध्ये राहून या वर्षी ती भारतात परतली. इथल्या वातावरणात, मित्रांमध्ये ती सहज रमली पण तिथे शिकलेल्या काही चांगल्या गोष्टी तिच्या नकळत तिच्यात भिनल्या गेल्या आहेत ज्याचा प्रत्यय आम्हाला सगळ्यांना सारखा येत असतो.

साधा ‘उनो’चा खेळ खेळताना तिने आम्हाला सगळ्यांना खूप मोठा धडा शिकवला. ‘उनो’ मधे रंग बदलायचा पत्ता खेळल्यावर आम्ही सगळे नुसतेच रंगाचं नाव म्हणत असू पण ही पाच वर्षाची चिमुरडी मात्र रंगाच्या नावापुढे ‘प्लिज’ लावत होती. तिचं फार कौतुक तर वाटलंच आणि तिच्याकडून पटकन ही चांगली सवय घ्यायची असं ठरवलं.

माझ्या एका दिवसात मी बऱ्याच वेळा ‘थँक्यू’ म्हणते. भाजीवाल्याला, पेट्रोल भरणाऱ्या माणसाला, दुकानदाराला, टपरीवरच्या चहावाल्याला, कचरा नेणाऱ्या माणसाला, काही काम केल्यावर किंवा बसल्याजागी मला हवी असलेली वस्तू आणून दिल्यावर नवऱ्याला किंवा आई-बाबांना.. वगैरे.

खुपदा माझं ‘थँक्यू’ ऐकून काही लोकं गोंधळतात. भाजीवाले किंवा टपरीवाले माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात तेंव्हा लक्षात येतं की ह्यांना ‘थँक्यू’ ऐकायची सवय नाही. बऱ्याचदा गर्दीच्या ठिकाणी माझं ‘थँक्यू’ पटकन कोणाच्यातरी लक्षात येतं आणि मी मुद्दाम म्हटले नसले तरी त्या माणसाला खुश करून जातं.

आज संध्याकाळी पावसाळी वातावरण झालं म्हणून वडापाव घ्यायला गेले होते. टपरीवर एकटीच बाई होती. वडे तळून काढत होती. बाजूला काही लहान मुलांचा ग्रुप जमला होता, ते आधीच्या घाण्यात काढलेले वडे खात असावेत.

मी जाऊन माझी वडापावाची ओर्डेर दिली आणि तिचं काम बघत उभी राहिले. तिच्या कामात यांत्रिकपणा होता, हात सरावलेले होते पण तिचा चेहरा मात्र आजिबात हसरा नव्हता, काहीच हावभाव चेहऱ्यावर नव्हते तिच्या. आजूबाजूच्या लहानमुलांच्या हसण्या-खिदळण्याचा ही तिच्यावर परिणाम होत नव्हता.

वडे छान तळून होईपर्यंत तिलाही मोकळा वेळ होता त्यामुळे त्या वेळात मी तिला पैसे देऊन टाकले. सुटे पैसे दिल्यामुळे तिच्याकडून परत पैसे यायची वाट बघायची नव्हती.

गरम-गरम नुकतेच काढलेले वडे तिने वर्तमानपत्रात बांधले आणि पिशवीत भरून माझ्या हातात दिले, आपसूकच मी ‘थँक्यू’ म्हणत ती पिशवी घेतली आणि तिच्या काहीशा त्रासलेल्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित आले.. त्याचंच निमित्त झालं हे सगळं आठवलं. कोणाच्यातरी चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू आलं की आपला दिवस पण छान जातो हे नक्की!

लेखन: मुग्धा शेवाळकर

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “जादू दोन शब्दांची… थँक यु आणि प्लिज!!”

  1. Mala tumcha lekha kup aavdla tsech thank you please barobar Dada bhau bhava aaji mavshi Kaku yogveli yogya vapar kelyas pudyachyakadun aaple Kam lavakar honyas madat hotel asa Maza anubhav aahe

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय