व्हाट्स ऍपचा वापर कितपत आणि कसा करावा?

आजकालच्या विभक्त परिवाराच्या दुनियेत आपण सगळेच बहुतेक एकमेकांपासून लांब असतो. नवरा-बायको, एखादं मुल अशीच कुंटुंब आपल्या आजूबाजूला सहसा बघायला मिळतात.

नाही म्हणायला क्वचित आजी-आजोबा किंवा दोघांमधलं एकजण सुद्धा कधीकधी असतो पण असं असलं तरी एका कुटुंबातले, एका घरातले सगळे एकत्र एका वेळेच्या जेवणाला सुद्धा जमणं अवघड असतं असं चित्र सध्या आहे.

अशात इतर नातेवाईकांत किंवा मित्रमंडळीत मिळून-मिसळून राहणं, भेटी-गाठी, एकत्र बसून बोलणं, गप्पा मारणं हे जवळपास नष्टच झालं आहे.

हे चांगलं का वाईट ते ठरवण्याचा या लेखाचा हेतू नाही, कारण हा बदल काही एका दिवसात झाला नाही. खरंतर हा बदल एका पिढीत सुद्धा झाला नाही.

सूक्ष्म बदल अनेक पिढ्यांपासून होत गेले असणार आणि त्याचमुळे आजच्या दिवसाला ही स्थिती आली आहे आणि ती काही अंशी आजच्या पिढीच्या पुढे असलेल्या अव्हानांना साजेशी अशीच आहे.

पण या अशा परिस्थितीमुळे एक अशी गोष्ट झाली आहे जी चांगली आहे का वाईट याबद्दल चर्चा या लेखातून होणार आहे- व्हाट्सएप ग्रुप.

गेल्या सात-आठ वर्षाच्या काळात या माध्यमाने आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शिरकाव केला आहे. सुरुवातीला कॉलेजच्या मुलांमध्ये लोकप्रिय असलेलं हे मेसेंजर हळूहळू घरातल्यांच्याही संपर्कात राहण्यासाठी उपयुक्त ठरलं.

मग राहत्या कुटुंबांचे समूह झाले, म्हणजे कोणाला काही निरोप सांगायचा असेल तर तो त्या समुहात कळवायचा म्हणजे सगळ्यांनाच समजतो, काही परिवारात मुलं शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशी असली तर अशा कुटुंबांना हा मेसेंजर म्हणजे पर्वणीच.

अशातूनच मग सगळ्या नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे ग्रुप्स तयार होऊ लागले. म्हटलं तर ही गोष्ट अत्यंत उपयुक्त होती. एकाच शहरात राहून भेटत नसलेल्या किंवा लांब राहणाऱ्या नातेवाईकांना एकत्र बांधून ठेवायला हे माध्यम फार मोलाचं ठरलं.

शिवाय अशा समुहात लहान-मोठे सगळेच एकत्र असल्याने नवीन पिढीला ही आपले दूर असलेले नातेवाईक समजले, त्यांच्यात संबंध निर्माण झाले जे कदाचित एरवी झाले नसते.

अजून एक मज्जा म्हणजे दुपारी घरात कंटाळा येणाऱ्या आजी-आजोबांनाही जग जवळ आले. आपली भावंड, भाच्या-भाचे, पुतणे, मित्र-मैत्रिणी वगैरे मंडळींशी त्यांचा संपर्क होऊ लागला.

नातवंडांच्या मदतीने बहुतेक घरचे आजी-आजोबा आता व्हिडीओ कॅलिंग सुद्धा करायला शिकले.

पण याच माध्यमाने अनेक अडचणी आपल्या समोर आणल्या आहेत आणि त्या आपल्या नकळत वाढत चालल्या आहेत.

एकतर प्रत्येकाचे असे एक-दोन ग्रुप्स तरी असतातच आणि अशा ग्रुप्सची सुरुवात जरी गप्पा, विनोद, विचारपूस या हेतूने झाली असली तरी कालांतराने चित्र बदलते.

कोणी राजकीय घडामोडींवर भाष्य करायला जातात, त्यातून वादविवाद होतात, दोन भिन्न विचारसरणीची माणसं असतील तर मग विचारायलाच नको, दोघांकडून मेसेजचा असा मारा होतो की ते म्हणजे ग्रुपमधल्या इतर सदस्यांना विकतचं दुखणंच होऊन बसतं.

ग्रुपमधे भरपूर नातेवाईक असतील तर अनेकांना बाहेर पडायला संकोच वाटू शकतो शिवाय एका-दोघांसाठी अनेक जणांचा संपर्क का बंद करायचा असा ही प्रश्न उदभवतो कारण बहुतेक वेळा ग्रुपच्या व्यतिरिक्त आपला कोणाशी बाहेर फारसा व्ययक्तिक संपर्कच नसतो.

अशा वेळेला बहुतेक जण, माझ्यासकट असे ग्रुप ‘म्युट’ करतात आणि हव्या त्या कालावधीसाठी या रोजच्या कटकटीतून सुटका करून घेतात. पण असं केल्याने ग्रुपचा जो मुख्य हेतू होता तोच कुठेतरी मागे पडतो आणि तुटायचा तो संपर्क तुटतोच.

बऱ्याचदा अशा ग्रुप्समधे अनेक पुढे ढकललेले मेसेज सुद्धा येत असतात. त्यातले बहुतेक मेसेज हे आरोग्याशी निगडीत असतात. आपल्या आरोग्याशी संबंधित काहीबाही माहिती, कधीकधी घरगुती उपाय किंवा औषधी इत्यादी बद्दल यांत मार्गदर्शन असतं.

बऱ्याचदा तो लेख कोणी लिहिला आहे, त्यात कितपत तथ्य आहे हे न तपासताच लोकं पुढे पाठवत राहतात. अशाने अनधिकृत माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि गैरसमज निर्माण होतात.

ग्रुपमधला एखादा भाबडा सदस्य त्यावर विश्वास ठेऊन आपल्या शारीरिक समस्येकडे खरोखर दुर्लक्ष करून त्यातील उपाय करून बघायची शक्यता निर्माण होऊ शकते आणि शिवाय तो मेसेज पुढे किती ठिकाणी जातोय यावर आपलं काहीच नियंत्रण राहत नाही.

या सगळ्यात आपण काय करायचं?

१. आपण या ग्रुप्सच्या आणि एकूणच या माध्यमाच्या किती अधीन आहोत? सकाळी उठल्यावर आपण करत असलेली पहिली गोष्ट म्हणजे व्हाट्सएप उघडून बघणे ही असेल तर ताबडतोब ते थांबवलं पाहिजे.

सकाळी उठल्यावर आपण जी गोष्ट सगळ्यात आधी करतो त्याचा प्रभाव दिवसभर आपल्यावर राहतो आणि आपला दिवस चांगला किंवा वाईट जाण्यामागे त्या गोष्टीचा बराच मोठा वाटा असतो.

जर आपली सुरुवात एखादा चांगला मेसेज किंवा फोटो बघून होणार असेल तर ठीक आहे, पण जर हीच सुरुवात एखाद्या राजकीय मुद्यावर किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यावरची वादावादी वाचून, उगीच आरोग्याशी संबंधित काही नकारात्मक गोष्टी वाचून होणार असेल तर ते आपण टाळलं पाहिजे.

हेच वैयक्तिक मेसेज पाठवणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा लागू आहे. जर काही कारणारे इंटरनेट उपलब्ध नसेल आणि त्याचमुळे आपली चिडचिड होत असेल तर डिजिटल डीटोक्सचा विचार करायला हवा. हाच मुद्दा रात्री झोपण्यापूर्वी आपण काय करतो याला सुद्धा लागू होतो.

आपण काय वाचून झोपायला जातो यावर आपल्या झोपेची लांबी आणि दर्जा अवलंबून असतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी वाद, नकारात्मकता पसरवले असे काही मेसेज न वाचता फक्त सकारात्मक मेसेजचं वाचायची किंवा पुस्तक वाचायची सवय करायचा प्रयत्न केला पाहिजे.

२. एखाद्या ग्रुप आपल्याला म्युट करून ठेवावा लागत असेल तर कोणतीही भीड न बाळगता ग्रुपमधे सगळ्यांना सांगून तसं करावं, यामुळे आपण आपलं मानसिक स्वास्थ्य जपतोच पण समोरच्याला ही त्याचं किंवा त्यांचं काहीतरी चुकतंय हे लक्षात आणून देतो.

बहुतेक वेळा आपण बोलल्यानंतर अजून एक दोन जण सुद्धा आपल्या बाजूने बोलतात आणि त्यामुळे कदाचित ग्रुपचं वातावरण बदलून जाऊ शकतं.

३. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अनधिकृत मेसेज. बऱ्याचवेळा जरी अशा मेसेजमुळे फार अपाय होणार नसला तरी तशी शक्यता नाहीच असे म्हणता येत नाही त्यामुळे आपल्याकडून असे मेसेज पुढे जाणार नाहीत.

आणि आपल्याला असे मेसेज पाठवणाऱ्याला त्याची जाणीव करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग लहान-मोठा कमी-जास्त अशा कसल्याच मोजमापात न अडकता आपल्याला स्पष्ट बोलण्याचा मार्ग शोधायला पाहिजे.

लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्हाट्सएप हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, उपयुक्त तर आहेच आणि त्याचा उपयोग आपल्यापासून लांब असलेल्या लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी जरूर व्हावा पण तसं करताना आपण स्वतःला त्रास तर करून घेता कामा नयेच शिवाय आपल्याकडून दुसऱ्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Picture credit YouTube

लेखन: मुग्धा शेवाळकर

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “व्हाट्स ऍपचा वापर कितपत आणि कसा करावा?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय