करारी, बाणेदार होण्यासाठी निर्णयशक्ती वाढवण्याची पंचसूत्री

निर्णयशक्ती वाढवण्याची पंचसूत्री

तुम्ही अगदी गृहिणी असा, व्यावसायिक असा, नोकरदार असा किंवा राजकारणी असा.. आपापल्या दृष्टीकोणातुन या लेखात सांगितलेल्या सवयी स्वतःला लावून घ्या. कालांतराने तुम्हालाच जाणवेल कि ‘अचूक निर्णय घेणे’ हि सवय आणि करारी, बाणेदार हि चारचौघात तुमची ओळख होऊन गेलेली असेल.

चांगलं आयुष्य जगण्याच्या कुलुपाची चावी काय असेल माहित ये का? ती म्हणजे चांगली निर्णयशक्ती!!

कुठल्याही प्रसंगाला तुम्ही काय निर्णय घेता यावर तुमचं भविष्य अवलूंबून असतं. अगदी इंटरव्ह्यूला जाताना कुठला ड्रेस घालायचा, आपला हार्ड अर्न्ड मनी म्हणजे कष्टाने कमावलेला पैसे कुठे गुंतवायचा इथपासून तर बिजनेस पार्टनरने धंद्यात फसवलं किंवा नात्यात विश्वासघात झाला कुठल्याही परिस्थितीत अचूक निर्णय घेणं तुम्हाला जमलं तर तुमच्यावर कोणीही मात करू शकत नाही.

निर्णय अचूक वेळेवर घेता येणं, घेतलेल्या डिसीजनबद्दल पूर्ण विश्वास असणं हे सुद्धा खरं तर एक स्किल आहे. मनाचेTalks चे लेख नियमाने वाचणाऱ्यांसाठी सांगायचं तर ते सुद्धा एक निन्जा टेक्निक आहे😄

प्रत्येकालाच असं वाटतं कि आपल्याला वेळेवर चांगले निर्णय घेणं जमलं पाहिजे. चांगले निर्णय घ्यायचे असतील तर स्वतःचे निर्णय सारासार विचार करून स्वतः घ्या.

हो, प्रत्येक जण प्रत्येक विषयात परफेक्ट असतोच असे नाही.. त्यामुळे कोणाचातरी सल्ला हा घ्यावाच लागतो. पण सल्ला घेण्यासाठी त्या विषयातल्या जाणकारालाच भेटून सल्ला घ्या.

आज या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे त्या पाच सवयी फक्त तुम्ही स्वतःला लावून घ्या. मग बघा जादू, हळूहळू तुम्ही कसे कणखर, करारी (नाही काही तर निदान चांगले😅) डिसीजन मेकर व्हाल.

निर्णयशक्ती वाढवणाऱ्या पाच सवयी

१) चांगली निर्णयशक्ती असलेल्या लोकांचे वाचन अफाट असते:

चांगली निर्णयशक्ती असलेले लोक हे चौफेर वाचन ठेऊन सर्व विषयांचे ज्ञान पदरी ठेवतात. सर्व प्रकारची माहिती घेऊन हे लोक नेहमी स्वतःला अपडेट ठेवत असतात.

आता हे वाचून असा समज अजिबाज करून घेऊ नका कि हे फक्त ज्ञानी लोकांचे काम आहे बाबा!! हा पहिला पॉईंट तर आपल्या हातून निसटला…

आजकाल या माहितीच्या युगात ज्ञान हे तुमच्या फिंगरटीप वर आहे. फक्त ते घेण्याची तुमची इच्छाशक्ती पाहिजे. पुस्तकं वाचून माहिती घेत राहणं हे जसं यात आलं तसंच इंटरनेटचा आणि रोजच्या दीड GB डेटा चा उपयोग कसा करायचा हे आपलं आपणंच ठरवायचं. निर्णयशक्ती चांगली असण्याचं मूळ हे तुमच्याकडे असलेल्या चौफेर माहितीत आहे.

तुमच्याकडे असलेलं त्या त्या विषयाचं ज्ञान तुम्हाला स्वतःचे निर्णय घेताना कामाला येईल. वरती सांगितल्याप्रमाणे निर्णय प्रभावी असण्यासाठी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत आणि गरज पडेल तिथे जाणकारांचा सल्ला घ्यावा.

२) या लोकांमध्ये क्युरिऑसिटी खूप असते:

चांगली निर्णयशक्ती असलेले लोक हे चौकस बुद्धीचे असतात. त्यांचा कल हा नेहमी आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर शोधण्यात असतो.

अमेरिकन सायकोलॉजी असोसिएशन च्या अभ्यासानुसार क्युरीयस लोक हे स्मार्ट आणि चांगले निर्णय घेणारे असतात.

३) संभाव्य धोक्यांचा ते आधीच विचार करून ठेवतात

कुठल्यापण गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे यावर तुम्ही कसा निर्णय घेणार हे अवलंबून असते. चांगली निर्णयशक्ती असणारे लोक हे आपल्या कामात काय अडचणी येऊ शकतात याचा आधीच तटस्थपणे विचार करून ठेवतात.

त्यामुळे जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा ते हडबडून जात नाहीत. आणि सारासार विचार करण्याची शक्ती त्यांच्यात नेहमीच जागी असते.

तुमच्या नोकरीत प्रमोशन मध्ये येऊ शकणाऱ्या अडचणी असो, कलिग्स मध्ये स्पर्धेमुळे कामातलं राजकारण असो, किंवा नात्यांमध्ये आसुयेमुळे एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी असो, कुठल्याही बाबतीत गॉसिप्स ला बळी पडून मतं बनवण्या ऐवजी सारासार विचार करून संभाव्य धोक्यांना जे हेरून ठेवतात त्यांनाच अचूक निर्णय घेणं जमतं.

यावर थोडा नीट अभ्यास केला तर हे हुनर तुम्हालासुद्धा आत्मसात करता येईलच.

४) हे लोक प्रॉब्लेम्सचा चहूबाजूंनी विचार करतात:

कुठल्याही विषयावरचं तुमचं मत कशावर अवलंबून असतं सांगता येईल का?

त्या विषयाला, त्या प्रोब्लेमला तुम्ही कसं बघता? त्याला तुमचा रिस्पॉन्स काय असतो यावर हे सगळं गणित अवलंबून असतं.

जेव्हा एखाद्या आजाराची ट्रीटमेंट घेताना तुम्ही डॉक्टरशी चर्चा करतात. तेव्हा डॉक्टर सांगतो कि, या उपचाराने आजार बरा न होण्याची शक्यता हि फक्त ५ टक्केच आहे.

अशा वेळी दुसरा विचार करून तुम्ही जेव्हा हे समजून घ्याल कि या ट्रीटमेंटने बरं होण्याची शक्यता हि ९५ टक्के आहे तेव्हा अगदी कॉन्फिडन्सने तुम्ही निर्णय घेऊ शकाल.

असंच अडचणींचा वेगवेगळ्या अंगाने विचार केला तर निर्णयशक्ती वाढवण्याचं कसब तुम्हाला साध्य झालंच समजा.

५) रोज रात्री झोपण्याआधीचा काहीवेळ दिवसभराच्या निर्णयांचं पुनरावलोकन करा:

घरातून बाहेर निघताना छत्री घेणं राहिलं त्यामुळे दिवसभरात खूपशा गोष्टी मिस कराव्या लागल्या किंवा अवाढव्य खर्च केला, खर्च करताना विचार केला नाही त्यामुळे महिन्याचं बजेट कोलमडलं….

पूर्ण दिवसभरात तुम्ही जे छोटे मोठे निर्णय घेतले त्याचा रिव्हिव्ह करण्याची रोजची सवय करून ठेवा. यात जेव्हा तुमचे निर्णय चुकल्याचं जाणवेल तेव्हा कुठे चूक झाली हे स्वतःला विचारा. प्रत्येक चुकिपासुन काय धडा घेता येईल याचा विचार करा.

झालेल्या चुकीसाठी स्वतःला दोष देण्यात स्वतःची शक्ती वाया घालवू नका. रोज रात्री फक्त दहा मिनिटं हि एक्झरसाईझ करण्यासाठी वेळ पुरेसा आहे.

तुम्ही अगदी गृहिणी असा, व्यावसायिक असा, नोकरदार असा किंवा राजकारणी असा.. आपापल्या दृष्टीकोणातुन या सवयी स्वतःला लावून घ्या.

कालांतराने तुम्हालाच जाणवेल कि ‘अचूक निर्णय घेणे’ हि सवय आणि करारी, बाणेदार हि चारचौघात तुमची ओळख होऊन गेलेली असेल.

निर्णयशक्ती वाढवायला शुभेच्छा आणि मनस्वी धन्यवाद.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

  1. करारी,बाणेदार होण्यासाठी जे माग्रदरश मिळाले
    धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.