आनंदी सहजीवनामागचं रहस्य जाणून घ्यायचंय?!

आनंदी सहजीवनामागचं रहस्य

आपल्या आईवडील आणि आपल्या मुलांच्याही वरचे.. प्रथम स्थान जोडीदाराचे..!! आता हे आपल्याकडे जास्त पटणारे नाही हे मान्य. पण म्हणूनच, मला नक्की म्हणायचं काय ते पुढे अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत वाचा म्हणजे १०१% पटेल.

भारत असो वा परदेश दाम्पत्य जीवनाचा फंडा आहे सेम सेम.. ह्या आनंदी सहजीवनामागचं रहस्य जाणून घ्यायचंय?!

सोनाराने कान टोचले की उत्तम असते..!! असे म्हणावे लागेल इतपत सध्या आपल्या देशातील लोकांना देशातील रूढी परंपरांपेक्षा पाश्चात्यांचे अनुकरण प्रिय झाले आहे..

भारतातील एखादी परंपरा रुचत नसेल पण तीच परंपरा परदेशी चमकदार कागदात गुंडाळून आपल्यापुढे परत आली तर आपण तिला डोक्यावर घेतो नाही का..?

अहो पत्नी ही भगवती आहे पती हा परमेश्वर आहे हे सत्य युगातले वचन आता कलियुगात कोणी म्हटले तर ठार वेड्यात काढतील आपल्याला.. कारणही तसंच आहे..

पुरुषप्रधान संस्कृतीचा वीट आल्याने फेमिनिझम चे प्रस्थ आता भारतात चांगलंच फोफावू लागलंय.. स्त्रियांना अचानक मिळालेले स्वातंत्र्य असो किंवा पुरुषांना नव्याने मिळालेले गृहकृत्यदक्षतेचे धडे असो..

भारत चांगलाच बदलायला लागलाय.. पण ह्याची सांगड घालणे जमले तरच दाम्पत्य जीवनाचे सूर सापडतात हे नव्याने सांगायला नकोच..

पण संसारात जे बिघडलेले सूर असतात ते कशामुळे असतात ह्याचा जर तारी अंदाज लावू शकतो का आपण..?

एकमेकांवर आयुष्यभर आरोपप्रत्यारोप केले, भांडणे टोकाची झाली पण तरीही, आहे तसे गाडे ढकलत नेले आणि संसार नेटाने चालवला ह्यातच समाधान मानणारी जोडपी आपण बघतो.

ह्यातला शेवटचा टप्पा महत्वाचा की लग्न शेवटपर्यंत टिकून रहाणे.. बाकी मधल्या कोणत्याच टप्प्याला आपण महत्व देत नसतो.

खरे तर लग्न टिकवणे हे फार काही अवघड नाहीये. अमेरिकन, ब्रिटिश अशा पाश्चात्य लोकांचे काही भन्नाट फंडे आपण सुद्धा वापरले तर आपल्याकडे काडीमोड घ्यायचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते.

तर आनंदी सहजीवनाची, यशस्वी लोकांची मुख्य कल्पना आहे की आपल्या जोडीदाराला सगळ्यात महत्वाचे स्थान असुद्यात..

आपल्या आईवडील आणि आपल्या मुलांच्याही वरचे.. प्रथम स्थान जोडीदाराचे..!! आता हे आपल्याकडे जास्त पटणारे नाही हे मान्य. पण म्हणूनच, मला नक्की म्हणायचं काय? ते पुढे अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत वाचा म्हणजे १०१% पटेल.

तुम्ही म्हणाल ही तर भारतीयांचीच मूळ कल्पना, प्रथा आहे. पण भारतीयांच्या प्रथेत पतीपरमेश्वर हीच एक व्याख्या आहे.

ज्यात पुरुषी वर्चस्ववाद डोकावतो. पाश्चात्यांच्या म्हणण्याप्रमाणे जितका नवरा बायकोच्या आयुष्यात महत्वाचा तितकीच बायको सुद्धा नवरोबांसाठी महत्वाची असायला हवी. लेकरं बाळं झाली तरी ह्यात फरक नसावा..

पण आपल्याकडे असे घडत नसते. मुलं झाली की नवरा बायको फक्त आई बाबा म्हणून उरतात.. आयुष्य मुलांसाठी काढतात.

एकमेकांसाठी वेळच नसतो आणि त्यातच एकमेकांच्या अपेक्षांना दुर्लक्षित करतात.. आणि एकमेकांना दुरावतात.. हो खरंय हे..

भांडणं आणि तडजोडी एवढ्यातच आयुष्य संपते मग हाती काय राहते..?

आईचे आपल्या मुलांशी असलेले नाते आपल्या भारतात सर्वोच्च मानले जाते. आई बाबा हे कधीही स्वार्थी बनून स्वतःच्या नात्याला आपल्या लेकरांच्या पेक्षा मोठे मानू शकत नाही.

हे जरी खरे असले तरी आपल्या जोडीदाराला सर्वात प्रथम स्थान देणे का गरजेचे आहे ते आज जाणून घेऊयात.

आई बाबा म्हणून आपण कितीही उत्तम असलो तरी एक नवरा बायको म्हणून जर सतत मुलंसमोर भांडत असू तर ह्याचा अत्यंत वाईट परिणाम आपण आपल्या मुलांवर करत असतो.

त्यामुळे जोडीदाराच्या गरजांना मग त्या आर्थिक असो, शारीरिक असो किंवा मानसिक दुर्लक्ष न करता त्या पहिल्या पूर्ण केल्या तर हेल्दी रिलेशनशिप आपण जगतो आणि मुलांसमोर आदर्श दाम्पत्य म्हणूनही उभे राहू शकतो..

आपल्याकडे मुलांना बालपणापासून स्वतंत्र खोली द्यायची सवय नाही. त्यामुळे वैवाहिक जीवनातली स्वतंत्रता आपण गमावून बसतो.

मुलांना कालांतराने त्यांच्या खोलीमध्ये झोपण्याची सवय केली तर त्यांनाही स्वावलंबनाची सवय लागते आणि जोडीदाराशी आपले असलेले उत्कट क्षण आपल्याला भरभरून जगता येतात.

कारण जोडीदार हा फक्त आपला रूममेट नसतो तो आपला प्रियकर किंवा प्रेयसी नाहीतर मित्र किंवा मैत्रीण सुद्धा असतोच की…

सतत मुलांनाच आपल्या आयुष्याचा केंद्र बिंदू करून ठेवले तर तेही कायम असेच वागतील. त्यांना सतत वाटत राहील की आपणच महत्वाचे.. त्यामुळे ते आत्मकेंद्री बनल्यास नवल वाटायला नको. जागरूक पालक म्हणून सुद्धा हे तितकेच महत्त्वाचे.

आणि हो मुलांचे मोठेपणी लग्न करून देणारच ना आपण..? का कायम पदराखाली ठेवणार..? आईचे, लग्न झालेल्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी तळमळणे आणि अंततः त्यांच्या संसारात आग लावण्याचे प्रकार आपण पाहतोच..

मुलांच्यात इतके गुरफटल्यावर त्यांना त्यांचे आयुष्य, त्यांच्या जोडीदारासोबत हवे तसे जगण्यासाठी आपल्या पाशातून मोकळे केले पाहिजे हे भारतात तरी विरळच झाले आहे.

आयुष्य मुलांमध्ये घालवल्यावर त्यांचे लग्न झाल्यामुळे आपण अचानक एकटे पडतो. जोडीदाराबरोबर संभाषण करणे, वेळ घालवणे हे कधीच न केल्याने, मुलांच्या संसारात लक्ष घळण्यापालिकडे काहीही दुसरे सुचत नाही आणि म्हणूनच कदाचित भारतात घरगुती छळांवर बनलेले सिनेमे, सीरिअल्स खूप चवीने पहिल्या जातात..

त्यामुळे आपल्या जोडीदाराला रोज थोडा क्वालिटी टाईम देणे हे अतिशय गरजेचे आहे.

कित्येक घरात सासू सुनेचे किंवा जावयाचे त्याच्या सासू सासऱ्यांशी पटत नसल्याचे पडसाद नवरा बायकोच्या जीवनावर पडतात..

पण हे लक्षात घ्या कोणाचेही आईवडील अथवा सासू सासरे सुद्धा तुमच्या दोघांच्या नात्यात येता कामा नये.

कारण शेवटी आयुष्यभर तुम्हाला एकमेकांची साथ द्यायची असते. दुसरे कोणी तुमच्या जीवनाचा भागीदार नसतेच मुळी.

तुमची मुलं, आई वडील आणि त्यांच्या प्रति कर्तव्य हे महत्वाचे आहेच पण म्हणून आयुष्य तुमच्या नावे केलेल्या जोडीदाराला तुम्ही गृहीत धरु शकत नाही.. त्याच्या/तिच्या भावनांना दुर्लक्षित करू शकत नाही..

बरं.. आता हे सगळे वाचून पूर्वायुष्यातल्या बऱ्याच चुका झालेल्या तुम्हाला भंडावून सोडू शकतात. पण काळजी करू नका.. मी इथे काही टिप्स दिल्यात त्या अगदी निसंकोचपणे पळून तर बघा.

वेळ कधीही गेलेली नसते. अजूनही तुम्ही तुमची सेकंड इनिंग चालू करू शकता. बघा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा जसे….

१. रोजचा नाश्ता बायको बनवत असेल तर रविवारी नवऱ्याने बनवल्यास किती तिला आनंद वाटेल.

२. एकमेकांना मिठी मारण्यास जमले नसेल तर आज पासूनच सुरुवात करा.

३. एकमेकांचे मित्र बना, प्रियकर प्रेयसी बना. एकमेकांना प्रेमपूर्ण तर कधी चावट मेसेज करा.

४. एकमेकांसाठी शक्य तितकी सरप्रायझेस प्लॅन नक्की करा. ह्याला वयाची चिंता करायची गरजच नाही.

५. तुमच्या मुलांना त्यांची खोली द्या आणि तुमच्या खोलीला ‘नो किड्स झोन’ करा. मुलांना समजावून द्याल तर त्यांना नक्कीच समजते.

६. मुलांसमोर, आई वडिलांसमोर एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी लाजू नका.. एकमेकांना आय लव्ह यु म्हणणे म्हणजे पाप नाही.

७. आई वडिलांच्या तुमच्या संसारातील अपेक्षांना तुमच्या नात्यामध्ये आणू नका.

८. सिक्रेटस ना वैवाहिक जीवनात अजिबात स्थान देऊ नका.

९. कोणाच्याही समोर आपल्या जोडीदाराचा अपमान करू नका.

१०. मी मोठा किंवा मी शहाणी समजून एकमेकांशी प्रतिस्पर्ध्यांसारखे न वागता एक टीम म्हणून काम करा.

फॅमिली कधीही कोणाला एकटे पाडण्यासाठी नसते. एकमेकांच्या गुणदोषासकट एकमेकांना समजून घेणारी असते..

आपले काम, आपला हुद्दा, आपले आईवडील, आपले नातेवाईक, आपले दोस्त, हल्ली आपले सोशल लाईफ आणि मोबाईल, आणि अगदी आपली लेकरं कितीही महत्वाची असली तरीही जोडीदारापेक्षा महत्वाची नाहीत हे मात्र लक्षात असू द्या.

तुमच्या सगळ्यात जास्ती प्रेमाचा भागीदार हा फक्त तुमचा जोडीदारच असेल ह्याची खात्री करा.. म्हणजे उद्या तुमची मुले सुद्धा एक सुंदर वैवाहिक जीवन जगण्यास शिकतील. आपापल्या जोडीदारांना सुखात ठेवतील..

तर मग आजपासूनच करा सुरुवात हॅपी मॅरीड लाईफची..!!

Picture Credit: https://goldvoice.club/

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

5 Responses

  1. Want to speak the editor. Is it possible?

  2. राजीव ज्ञांनेश्वर कुलकर्णी says:

    मनाचे Talk – लेख खूपच छान असतात.आपल्या व इतरांच्या जीवनाकडे बघण्याची, नव्याने पाहण्याची
    सुंदर दृष्टी देतात.निखळ आनंदाच्या निर्मितीचा स्त्रोत असतात.

  3. Naw garajeche nahi says:

    60% lekh wachun jhalyaw tumhi mahatwa samjawun sangtay.. te dekhil kahi mojkya shabdat.. jas jodidarach mahatw sangital ya saglyat aai wadil mul yana tumhi ignore kartay.. jashya jodidarachya apeksha asta tashya aai wadil tyanchyahi apeksha asta he kas wisaru shakta. Manus jalmala aala he fakt jodidara sathi asach disat ya lekhatun.. he kas wisarta ki pratekache jodijara wyatirikt pan swapn asta.. jodidar fakt prem, mithi ani gappa yathi nasun sarvana sobat gheun chalnara asawa hehi sangayla haw.. shewti mansala jodidara sobat mitr family mul he pan hawech na.. nahit mulana jalm dyaychach kashasathi.. Jodidara be ekmekan sathi kay karawe he sangitale pan jodidarane aplya family aai wadil sasu sasre mul yanchya sathi kay karawe he hi sanga.. tumhi lihilela lekh chukicha jari nasla tari to arthwat ani fakt jodidar ya natyalach mahatw denar aslya mule baki nati bighadwnya karan tharu shakto

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!