निगाहों में मंजिल थी, गिरे और गिरकर संभलते रहे – प्रेरणादायी ओपरा विनफ्रे

प्रेरणादायी ओपरा विनफ्रे

तीव्र इच्छाशक्ती, आणि जबरदस्त आत्मविश्वास असेल तर हातात काहीही नसलेला माणूस, किंवा स्त्री काय करू शकते याचं हे उदाहरण आहे, ते स्वप्न नाही…. हि एका अशा हिऱ्याची गोष्ट आहे ज्याला दुःखांनी पैलू पाडले. तेच तिचे आयुधं बनले आणि तेच हत्यारं.

ह्या मुलीच्या हिमतीला तुम्हीही सलाम कराल, सगळ्या जगाने दाद दिली हिच्या हिमतीला.

हिची आई १४ वर्षांची असताना असहाय्य परिस्थितीत तिने हिला जन्म दिला.

आणि इतक्या तान्ह्या वयात त्या आईने तिला तिच्या आज्जीकडे सोडून दिलं.

आज्जी सुद्धा अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आयुष्य जगत होती. अशा परिस्थितीत ही मुलगी वाढली.

आणि ती सुद्धा चौदा वर्षाची असताना तिच्यावर तिच्याच काकाने बलात्कार केला. वयाच्या चौदाव्या ही प्रेग्नन्ट राहिली. कमी दिवसातच तिने एका मुलाला जन्म दिला, पण तो मुलगा जगू शकला नाही.

अशा परिस्थितीत ह्या मुलीनं तीचं पुढचं आयुष्य कसं जगलं असेल?

असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना? किती त्रास सहन केला असेल, किती संघर्ष करावा लागला असेल त्या मुलीला?

आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही.

अशा परिस्थिती मोठं झालेलं माणूस पुढे कीड, मुंगीचंच आयुष्य जगेल…. हाच तर लोकांचा समज असतो.

कोण होती ती मुलगी? एका अतिशय गरीब घरात असहाय परिस्थितीत जन्मलेली, रहायला घर नसलेली, अंगावर घालायला चांगले कपडे नसलेली आणि त्या अजाणत्या वयात अत्याचार सहन केलेली तीच मुलगी म्हणजे आजची सगळ्यात प्रसिद्ध असलेली, एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून मान्यता मिळालेली, जगातल्या प्रभावशाली स्त्रियांमधली एक म्हणून नावाजलेली स्त्री ‘ओपरा विनफ्रे’

‘ओपरा विनफ्रे’ ही आज स्व-कर्तृत्वावर मिळवलेल्या अब्जावधीच्या संपत्तीची मालकीण आहे. कॅलिफोर्निया मधे ४२ एकर जागेत बांधलेल्या आलिशान बंगल्यात राहणारी एक श्रीमंत स्त्री.

जिचा स्वतःला राहण्यासाठी एकच बंगला नाही तर असे अनेक मोठे मोठे बंगले आहेत. अनेक महागड्या गाड्या आहेत आणि ती एकटी त्याची मालकीण….

रोज एका नव्या संकटाला, आव्हानाला सामोरं जात तिनं आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं.

परिस्थिती, पैसा, नशीब ह्या गोष्टींच्या समोर ती कधीच झुकली नाही.

जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर तिने परिस्थितीलाच झुकवलं, पैसा नसताना सुद्धा ती खचून गेली नाही.

आणि नशिबावर ती कधीच भरोसा ठेऊन मागे हटली नाही. नेटानं आयुष्यात येणारी सगळी आव्हानं एकटीनं पेलली. आणि उत्तुंग यश संपादन केलं.

म्हणून तिच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. सगळ्या जगाने ह्या हिम्मतवान स्त्रीचं कौतुक केलं. न डगमगता स्वतःला तर तिनं सावरलंच पण एवढी मोठी भरारी सुद्धा घेतली.

उत्तुंग यश हेच आपल्याला प्रसिद्धी च्या झोतात आणते. आपला प्रभाव सगळीकडे पडतो. आणि सगळं जग आपल्याला ओळखायला लागतं.

ही ‘ओपरा विनफ्रे’ च्या उत्तुंग यशाची गोष्ट तुम्हाला इथं कशासाठी सांगितली?

निगाहों में मंजिल थी, गिरे और गिरकर संभलते रहे
हवाओं ने बहुत कोशिश की, मगर चिराग आंधियों में जलते रहे।

हि जगण्याची जिद्द असेल तर मोठमोठ्या अडचणींचा सामना करायची ताकत सहज तुम्हाला अंगी भिनवता येईल.

ओपरा असा हिरा आहे, जिला तिच्या दुःखांनी पैलू पडले, तेच तिचे आयुधं आणि तेच तिचे हत्यारं बनले.

तीव्र इच्छाशक्ती, आणि जबरदस्त आत्मविश्वास असेल तर हातात काहीही नसलेला माणूस, किंवा स्त्री काय करू शकते याचं हे उदाहरण आहे, ते स्वप्न नाही…. खऱ्या खुऱ्या एका आयुष्याची हि गोष्ट आहे. जी कोणीही आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या जोरावर साकार करू शकतो.

तुमच्या आमच्या सारखा सुद्धा आपलं आयुष्य बदलू शकतो म्हणून कोणाला ह्यातून प्रेरणा मिळावी हा हेतू आहे.

अशी प्रेरणा मिळाली तर तुमचा सुद्धा आत्मविश्वास तुम्ही जबरदस्त इच्छा शक्तीच्या जोरावर वाढवू शकता आणि तुमच्या अपयशाला कलाटणी देऊन आपलं आयुष्य बदलू शकता. जगण्याला एक नवी दिशा देऊ शकतात.

जर तुम्ही तुमचं एक ध्येय निश्चित केलं असेल आणि तुम्ही ती वाटचाल सुरू केलीच असेल तर परिस्थिती, पैसा, आणि नशीब हे सगळं आपल्या कामांच्या आड येतं असं रडगाणं गायचं तुम्ही सोडून द्याल.

मोठं यश मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्यात आधी काही बदल घडवून आणावे लागतात. तेच बदल तुमची परिस्थिती बदलतात.

पैसा हातात नसताना सुद्धा तुम्ही जिद्दीने परिस्थितीवर मात करून सकारात्मक परिणाम घडवून आणू शकता.

कोणत्याही अडचणी समोर आल्या तर तुम्ही त्या कशा सोडवून पुढं जाता त्याच तुमच्या यशाच्या एक एक पायऱ्या ठरतात.

अडचणी, मोठी आव्हानं समोर येतच राहतील, त्यांना घाबरून तुम्ही जर थांबून राहिलात, आणि कोणाची मदत मिळेल, किंवा नशीब पालटेल म्हणून वाट बघत बसलात तर तसा कुठलाही बदल घडणार नाही.

तुम्हाला बदल हवा आहे तर तुमच्यात बदल घडवा. कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर कुठलीतरी गोष्ट सोडायला लागते. यश मिळवायचं आहे तर तुमची मेहेनत, तुमचा वेळ, खर्च करा. यश तुमचंच असेल.

तुमच्या आयुष्यात तुमची आवड कोणती आहे? त्या प्रमाणे तुमचं ध्येय ठरवायचं असतं.

आता यश, ध्येय या खूप मोठ्या गोष्टी, आपल्याला आपलं रोजचं जगणं मजेत गेलं तरी खुप झालं!!

हा आपला सर्वसामान्य विचार असतो. पण या सर्वसामान्य विचाराने जगताना सुद्धा छोटे छोटे निर्णय विचारपूर्वक घेतले तरी एक एक पायरी चढत यश, ध्येय म्हणजेच आपल्या सध्या सोप्प्या भाषेत ‘मजेत जगणं’ जमायला लागतं.

दुसरा सांगतो म्हणून डोळे झाकून एखादं क्षेत्र निवडून नाही चालणार, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय जमेल, तुमची क्षमता काय आहे ह्याचा विचार करा, आणि आवडीच्या क्षेत्रात पाऊल टाका, आपला आवडीचा व्यवसाय निवड आणि ध्येय ठरवा. तरच जोरदार प्रगती कराल.

तुमचा मित्र आय. ए. एस. ऑफिसर झाला असेल तर तुम्ही पण त्याच्या मागे गेलात तर कदाचित ते क्षेत्र तुमच्या आवडीचं नसेल. मग अपयश निश्चित येणार हे डोक्यात ठेवा.

असे बरेच जण डोळे झाकून दुसऱ्याने सांगितले म्हणून गेले ते परत उभं राहू शकले नाहीत.

आयुष्य हे तुम्हाला मिळालेली एक देणगी आहे असं समजून तुम्हाला एखाद्या फुला सारखं उमलायचंय.

जशी झाडावरची फुलं आपल्याच सौंदर्याला खुलवत उमलत असतात. ती फुलं दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाहीत. तर आपल्याच सौंदर्याला खुलवत जास्तीत जास्त सुंदर दिसतात.

अगदी तसंच तुम्हाला तुमच्या सगळ्या गुणांचं तेज उधळत उमलायचंय. मग यश तुमचं असेल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.