सतत आनंदी राहणाऱ्या लोकांच्या सात सवयी….

सतत “आनंदी ” असणाऱ्या लोकांकडे असं काय असत? कधीही बघा ते आनंदीच दिसतात. त्यांच्या सात सवयी त्यांना असं आनंदी ठेवतात. त्यांच्याकडे असं काय विशेष असतं? हे जर तुम्ही समजावून घेतलं ना तर तुम्ही पण आनंदी राहू शकता.

लेखात सांगितलेल्या सात सवयींच्या मोजपट्टीवर आपला पॉईंट काय? ते बघा आणि मग सात पैकी सात मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा.

“आनंदी” असणं हा माणसाचा मूळ स्वभावच आहे.

मूल जन्माला आलं की ते आनंदीच असतं. ते मोठं होत असताना स्वतः आनंदी असतंच पण इतरांना पण आनंदी ठेवतं.

ते मूल जसं जसं मोठं होत जातं ना तसं त्याच्यावर सभोवतालच्या विपरीत वातावरणाचा परिणाम व्हायला लागतो.

आणि हळू हळू त्या मुलाच्या चेहेऱ्यावरचा आनंद मावळायला लागतो.

भीती, राग, ईर्षा, दुःख, ह्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम त्याच्या मनावर व्हायला लागतो.

माणसाचा मूळ स्वभाव आनंदी असतो मग इतकं नकारात्मक वातावरण त्याच्या भोवती कसं तयार होतं????

उत्तर साधं, आणि सोपं आहे…. “त्याच्या सवयी”.

माणसाला वेगवेगळ्या सवयी लागतात, काही चांगल्या, काही वाईट, काही नको त्या पण सवयी लागतात.

चांगल्या सवयी माणसाला मोठं करतात, वाईट सवयी खाली खेचतात. आणि नको त्या सवयी त्याच्या डोक्याला त्रास देतात.

त्यातल्या चांगल्या सवयीसाठी माणसाला बरेच कष्ट घ्यायला लागतात.

त्या अशा सहजा सहजी लागत नाहीत. पण वाईट सवयी, नको त्या सवयी आपोआप येऊन चिकटतात.

त्या सवयी कधी, कशा लागल्या हे सुद्धा कळत नाही.

तुम्हीच बघा की तपासून. चांगल्या, वाईट, नको असलेल्या कोणत्या कोणत्या सवयी तुम्हाला आहेत.

ह्यातल्या काही सवयी तुमच्या मनाचं स्वास्थ्य बिघडवतात.

आधी तुम्ही चांगले आनंदी असता पण मोठे होत असताना सभोवतालचं वातावरण तुमच्यात काहीतरी निगेटिव्हीटी भरून टाकतं, आणि सगळीच गडबड होते.

तोच-तोच नकारात्मक विचार तुम्हाला आनंदा पासून लांब नेतो.

तुम्हाला नकारात्मक विचार करण्याची सवय लागून जाते. हे तुम्हाला सहज कळत नाही, पण तुम्ही दुःखी होता.

पण हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं असं नाही बरं का.

काही लोक असल्या निगेटिव्ह वातावरणात राहून सुद्धा आनंदीच राहतात.

मग त्यांच्याकडे असं काय विशेष असतं? ते खुश कसे राहू शकतात?

हे जर तुम्ही समजावून घेतलं ना तर तुम्ही पण आनंदी राहू शकता. फायद्याची गोष्ट आहे, वेळ कशाला घालवायचा?

ताबडतोब बघू चला, आनंदी लोकांच्या त्या सात सवयी….

आणि या सात सवयींच्या मोजपट्टीवर आपला पॉईंट काय? ते बघा आणि मग सात पैकी सात मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा.

मनाचेTalks च्या पेजवर आपण सध्या जे #३०डेजचॅलेंज घेतोय ना ते हे सात पैकी सात मार्क मिळवण्यासाठी खास डिझाईन केलेले आहे.

१- “आनंदी” राहणारे लोक नेहमी चांगलं काय आहे ह्याचाच शोध घेत असतात. वाईट, किंवा चुकीच्या गोष्टींचा नाही.

तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? प्रत्येक माणसामध्ये निसर्गतःच नकारात्मक गोष्टी पटकन आत्मसात करायची प्रवृत्ती असते. म्हणजेच ‘नको त्या गोष्टी माणसाच्या डोक्यात ताबडतोब घुसतात.

आपल्या समोर स्टेजवर एखादी व्यक्ती काही माहिती देण्यासाठी आली आहे असं समजा.

तर त्या व्यक्तीच्या चुका काय होतात हेच आधी आपण बघतो…. बरोबर ना!!!

तो उभा कसा राहतो? बोलतो कसा? ह्या त्याच्या बोलण्या चालण्यावर आपण टीका करतो. त्याची थट्टा करतो.

त्याला आपण हसतो. आणि त्यातच आपण समाधान मानतो.

आनंदी राहणारा माणूस असतो ना, त्याला त्या व्यक्तीच्या बोलण्यातला प्रभाव जाणवतो.

त्याची तळमळीने सांगण्याची पद्धत चांगली वाटते, त्या व्यक्तीच्या हुशारीला आनंदी माणूस अगदी भरभरून दाद देतो. त्याच्या कडून मिळालेल्या बहुमूल्य माहिती मुळे आनंदी व्यक्ती त्याला भेटून धन्यवाद देतो.

एकच व्यक्ती पण आनंदी राहणाऱ्या माणसाचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आपला त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन, दोन्ही मध्ये किती फरक आहे ?

आपण त्याच्या चुकाच बघण्यात वेळ घालवला. आपल्याला काहीच मिळालं नाही.

पण आनंदी व्यक्तीने त्याच्यातल्या चांगल्याच गोष्टी बघितल्या, आणि त्याला त्याचा फायदाच झाला. पाहिजे ती माहिती मिळाली.

सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीकोन हा चांगलं शोधायची सवय आणि चुका शोधायची सवय ह्यातून कळून येतोय ना? सवयीतला हा फरक.

आपण वेळ वाया घालवला, आणि सतत आनंदी राहणाऱ्या व्यक्तीने तोच वेळ सत्कारणी लावला म्हणून तो आनंदी झाला आणि आपण ?????

२- नेहमी खुश असणारी माणसं माफ करणं आणि माफी मागणं हे चांगलं जाणतात.

खुश राहण्यासाठी मनावरचा ताण घालवणं हे जरुरीचं असतं बरं का.

आपल्या मनावरचा ताण कधी कधी वाढतो, कसा?…. चुकी मुळे.

मग ती चूक आपली असेल किंवा दुसऱ्याची. दोन्ही गोष्टी ताण वाढवणाऱ्याच असतात.

नेहमी खुश राहणारे लोक ताण वाढू देतंच नाहीत. खटकाच मिटवून टाकतात.

चूक झाली, झाली ती, कशी झाली? का झाली? ह्या विचारांनी आणि खरं खोटं करत बसलं तर जास्तच डोक्याला त्रास.

दुसऱ्याची जरी चूक झाली तरी माफ करून टाकतात. पुन्हा कामाला सुरुवात. कारण ते लोक स्वतः जबाबदारी घेतात.

जबाबदार माणसाकडे चूक माफ करून पुन्हा नवीन सुरुवात करायची हिम्मत असते.

वाद घालून वेळ वाया जाऊ देत नाहीत.

असे लोक स्वतःची जरी मोठी चूक झाली असेल तरी ताबडतोब माफी मागून डोक्याचा ताण हलका करतात.

माफी मागून ती चूक परत होणार नाही ह्याची काळजी घेतात.

आणि त्या कामाची जबाबदारी सुद्धा स्वीकारतात. म्हणजेच जबाबदार व्यक्तीकडे तशी ताकद सुद्धा असते.

ते शून्यातून जग निर्माण करू शकतात. म्हणून ते सुखी, आनंदी आणि खुशीत असतात.

३- नेहमी आनंदी दिसणारे लोक स्वतः भोवती मजबूत नात्यांचा आधार निर्माण करतात.

एखाद्या झाडावर चढलेला माणूस १० फूट उंचीवरून खाली उडी मारायला घाबरतोच.

पण विमानातून पॅराशूट लावून उडी मारणारा माणूस अगदी हसत हसत उडी मारतो.

झाडावरून उडी मारताना हात पाय फ्रॅक्चर होण्याची भीती असते. कारण आधार नसतो.

पण पॅराशूट चा मजबूत आधार मिळाल्यावर उंच आकाशातून उडी मारायला सुद्धा माणूस घाबरत नाही.

अगदी बिनधास्त आणि हसत हसत उडी मारतो.

ही आनंदी माणसं सुद्धा नेहमी दोन मजबूत खांबाचा आधार घेऊन अगदी मस्त मजेत आयुष्याचा आस्वाद घेत असतात.

पहिला खांब म्हणजे त्यांचं कुटुंब आणि दुसरा खांब म्हणजे जिवलग मित्र.

सगळ्यात मोठा आधार हा कुटुंबाचा असतो. कुटुंब सुखी तर माणूस सुखी. कुटुंबाला भरपूर प्रेम देणं, त्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आदर करणं, सगळ्यांना म्हणजे लहान असुदे किंवा मोठे.

सगळ्यांना मान देणं, त्यांच्या आनंदात सहभागी होणं, अडचणी, प्रश्न ताबडतोब सोडवणं, हे जर घरातल्या कर्त्या व्यक्तीने वेळच्या वेळी केलं तर संपूर्ण कुटुंब आपल्या कामात आधार देतं. घरात कुरबुरी झाल्या तर त्या तणाव निर्माण करतात. आणि आनंद लांब जातो.

घर, कुटुंब आनंदी असेल तर कर्ता माणूस सुद्धा आनंदीच राहतो. म्हणून आनंदी लोकांच्या आनंदी दिसण्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आधार कारणीभूत असतो.

दुसरे म्हणजे जिवलग मित्र. जिवलग मित्र म्हणजे असे मित्र की जे तुमच्या घरातल्या लोकांसारखेच तुमच्यावर प्रेम करतात. तुमच्या सगळ्या कार्यक्रमात ते सहभागी असतात. असे अगदी जवळचे मित्र.

Family And Friends …. म्हणजेच F & F हे दोन आधार ज्याचे भक्कम असतील ती व्यक्ती नेहमी आनंदीच असेल.

एक गोष्ट अगदी सगळ्यांनीच लक्षात घ्यायची ती म्हणजे हे जे मित्र आपण मिळवतो ते मित्र असे आहेत का ते नीट बघा.

तुमचे भरपूर मित्र असतील पण असे मित्र असायला पाहिजेत की ज्या मित्राला तुम्ही अगदी बिनधास्त, कोणताही संकोच न ठेवता रात्री, बेरात्री अगदी रात्री २/३ वाजता फोन करू शकता का?

आणि तो मित्र तुम्हाला काही अडचण आली तर मदत करायला धावून येईल का? अगदी एखादी मोठी पैशाची मदत सुद्धा करू शकेल का?

असे मित्र अगदी आयुष्यभर तुम्हाला सांभाळायचे असतात. त्यांच्यासाठी सुद्धा मदतीला तुम्ही धावून जायला लागतं.

त्यांच्या वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमात सहभागी व्हायचं असतं.

भेटल्यावर दोघांनाही आनंद होतो. त्याची गळाभेट सुद्धा तुम्ही घेता. हात मिळवताना अगदी खुश असता. असे मित्र तुमचे आधार ठरू शकतात. F&F हे दोन भक्कम आधार असणारे लोक नेहमीच आनंदी असतात.

मग असे किती मित्र तुम्ही जोडलेत?????

४- सतत खुश असणारे लोक आपल्या मनाप्रमाणे काम करतात किंवा जे काम करतात ते अगदी मनापासून करतात.

बरेच लोक आपल्या इच्छे प्रमाणे आपला व्यवसाय निवडतात. असा निवडलेला व्यवसाय हा नेहमी तुमच्या प्रगतीला साथ देतो. तुम्ही त्यात यशस्वी होता आणि आनंदी राहता.

पण सगळ्यांना आपल्या मनाप्रमाणे व्यवसाय करता येत नाही. ते नोकरी करतात.

त्या नोकरीत त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येत नाही. पण जे काही काम करत असाल ते अगदी मन लावून करा.

त्यात तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं तर शिका. आणि ते काम करत असतानाच दुसरे तुमच्या आवडीचं काम मिळवायचा प्रयत्न करा.

ते मिळाल्यावर हे जुने काम सोडा.

काही लोक तर जे काही काम करत असतात ते त्यांना चांगले काम वाटत नाही.

त्या कामाला ते वाईट समजून नावं ठेवतात. त्या कंपनीला नावं ठेवतात.

पण त्यांनी असं न करता त्या कामात काय चांगलं आहे त्याचा शोध घ्यावा, त्यात बदल घडवून आणावा, आणि ते सोपं करून आनंद घ्यावा.

५- आनंदी असणारे लोक नेहमी त्यांच्या मनात येणारे सगळेच विचार मनावर घेत नाहीत.

संशोधकांच्या म्हणण्या नुसार आपला मेंदू रोज ६०,००० विचार तयार करत असतो.

ह्या विचारांमधले जास्तीत जास्त विचार हे नकारात्मक विचार असतात. मग एवढे नकारात्मक विचार आपण मनावर घेतले आणि त्याप्रमाणे काम करायला लागलो तर आनंद, खुशी आपल्यापासून लांब पळून जाईल.

सतत निगेटिव्ह विचार केले तर आपलं ब्लड प्रेशर वाढत जाईल.

आनंदी राहणारे लोक असले निगेटिव्ह विचार सोडून देतात. आणि फक्त सकारात्मक विचार करून त्याप्रमाणे काम करतात.

म्हणून ते खुश राहू शकतात. डोक्याला काही तापच ठेवत नाहीत. हा ताप आपल्या आनंदाच्या मापात पाप करतो.

६- आनंदी लोक नेहमी आपल्या कामाला किंवा आपल्या आयुष्याला भव्यतेशी जोडून बघतात.

ह्यासाठी एक उदाहरण देऊन हे समजावून देता येईल.

एका ठिकाणी एक बांधकाम चालू असते, आणि ते काम तीन लोक करत असतात.
एक वयस्कर बाई तिथून जाताना पहिल्या कामगाराला विचारते तुम्ही हे काय काम करताय? तेंव्हा तो कामगार म्हणजे गवंडी तिला उत्तर देतो….

मी ह्या विटा रचून बांधकाम करतोय.

ती पुढे जाते आणि दुसऱ्या काम करणाऱ्या माणसाला विचारते. तुम्ही हे काय काम करताय? तो उत्तर देतो की,

मी माझ्या पोटासाठी, आणि माझ्या घरच्या लोकांसाठी हे मजुरी काम करतोय.

ती बाई आणखी पुढे जाऊन तिसऱ्या माणसाला पण तोच प्रश्न विचारते…. तुम्ही काय काम करताय??
तो तिसरा गवंडी उत्तर देतो,

मी आपल्या ह्या देशातलं सगळ्यात मोठं मंदिर बांधायचं काम करतोय.

जो पहिला गवंडी काम करत असतो तेच काम हा तिसरा गवंडी पण करत असतो, पण पहिल्याचं उत्तर म्हणजे तो बांधकाम करतोय. एवढंच कळतं.

पण तिसरा गवंडी जे उत्तर देतो ते काहीतरी वैशिष्ट्य दाखवते. म्हणजे तो जे काम करतोय ते खरच एक भव्य दिव्य आहे. देशातलं सगळ्यात मोठं मंदिर तो बांधतो आहे.

आपल्या कामाला जगातल्या मोठया गोष्टींशी जोडा. त्या कामाची किंमत वाढवा. म्हणजे ते काम करायला अभिमान वाटेल.

आणि अभिमानाने केलेलं कोणताही काम आनंद देणारच. म्हणजे तुम्ही सुद्धा आनंदी राहता. खुश राहता.

७- सगळ्यात चांगली सवय म्हणजे, आनंदी लोक नेहमी आपल्या आयुष्यात आपल्या सगळ्या कामांची स्वतः जबाबदारी घेतात.

स्वतःच्या आयुष्यात येणारी सुखं, दु:खं, व्यवसाय, किंवा नोकरीत येणारे सगळे चढ उतार, कामातले यश किंवा अपयश. ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी हे आनंदी राहणारे लोक स्वतः घेतात.

दुःख, संकटं, अपयश आलं तरी त्याचं खापर हे लोक कधी दुसऱ्यावर फोडत नाहीत.

स्वतःच्या चुकीमुळे, परिस्थितीमुळे किंवा दुसऱ्याच्या चुकीमुळे जरी असलं तरी स्वतःलाच जबाबदार धरतात.

आणि पुन्हा दुप्पट जोमाने काम करून त्या परिस्थितीतून बाहेर पडतात. त्यामुळे होतं काय?

कसलीही परिस्थिती, संकट आलं तरी ती ह्या आनंदी लोकांवर स्वार होऊ शकत नाही.

तर त्या परिस्थती किंवा संकटांवर ह्यांची सत्ता चालते. म्हणून असे लोक आनंदीच असतात.

दुसऱ्याची चूक शोधून दुसऱ्याला दोष देण्यामुळे आपल्या मनात राग निर्माण होतो.

म्हणजेच आनंद दूर जातो. पण दुसऱ्याच्या चुका शोधून काढायला आपली शक्ती कशाला वाया घालवायची?

त्या पेक्षा तीच शक्ती स्वतःच्या चुका सुधारायला वापरली तर आपल्यात केवढा बदल होईल?

आत्ता निगेटिव्ह वातावरणात बसलेले आपण उद्या ह्या आनंदी लोकांबरोबर असू. फायद्याचं काय ते बघा.

फायदा त्याचा वायदा द्या की. चांगली सवय लावून घ्यायची फक्त. एवढाच वायदा द्यायचा.

करा सुरवात उद्यापासूनच… ऑफिसमध्ये पोचायला उशीर झाला तर दुसऱ्याला नाही दोष द्यायचा. उद्या घरातून लवकर निघायचं.

चेहेऱ्यावर आनंद दिसायलाच पाहिजे. पॉझिटिव्ह विचार ठेवा आनंदाच्या समुद्रात पोहायला लागाल.

पटलं ना तर कळवा बरं का…

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “सतत आनंदी राहणाऱ्या लोकांच्या सात सवयी….”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय