मुलांना जवाबदार, सेल्फ मोटिव्हेटेड बनवणाऱ्या पालकत्त्वाची दहा सूत्र

मुलांना जवाबदार सेल्फ मोटिव्हेटेड बनवणाऱ्या पालकत्त्वाची दहा सूत्र

मुलांचे ‘चांगले’ आई वडील होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. चांगले तर सगळेच असतात. पण मूल जसं मोठं होत जातं तसं योग्य पद्धतीने त्याला आपली जवाबदारी समजणं, त्याच्या बुध्यांकाबरोबर त्याचा भावनांक सुद्धा वाढत जाणं, त्याने किंवा तिने सेल्फ मोटिव्हेटेड होणं या गोष्टी मुलांमध्ये लहान वयापासूनच उतरवणं हि ती कला आहे.

मुलांना जवाबदार, सेल्फ मोटिव्हेटेड बनवण्यासाठी लहानपणा पासून काय काळजी घेतली पाहिजे ते वाचा या लेखात. आणि यातल्या कुठल्या गोष्टी आपण करतो आणि कुठल्या राहून जातात. ते एनलाईझ करा.

तुम्ही उत्तम आई वडील कसे व्हाल….

आयुष्यात आपण आई, वडील होणं म्हणजे आयुष्यचं सार्थक होणं असं आपल्याकडे मानलं जातं. आणि ते तसं खरं पण आहे.

आई, वडील झाल्यावर आपल्याला सगळ्यात जास्त आनंद होतो. हा एक सुखद अनुभव असतो.

आई वडील होणं म्हणजे आयुष्यातली एक मोठी पूर्ती आहे. पण जबाबदारी म्हणून जर विचार केला तर ही आयुष्यातली सगळ्यात मोठ्ठी आणि अवघड जबाबदारी आहे.

ही जबाबदारी पेलणं तितकी सोपी गोष्ट नाही. जे आई वडील झालेत ते जाणून असतील.

मुलांचे ‘चांगले’ आई वडील होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. चांगले तर सगळेच असतात. पण मूल जस मोठं होत जातं तसं योग्य पद्धतीने त्याला आपली जवाबदारी समजणं, त्याच्या बुध्यांकाबरोबर त्याचा भावनांक सुद्धा वाढत जाणं, त्याने किंवा तिने सेल्फ मोटिव्हेटेड होणं या गोष्टी मुलांमध्ये लहान वयापासूनच उतरवणं हि ती कला आहे.

आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हि गरज बदलत जाते.

आई वडिलांच्या उतारवयात मुलांनी त्यांच्याकडे न बघणं, अपरिहार्यपणे कुटुंब खिळखिळी होणं या गोष्टी न होण्यासाठी हि कला जमवून घेणं गरजेचं आहे.

ह्या कलेत सगळ्या आई वडिलांनी निपुण असायला पाहिजे.

म्हणजे तुमच्या मुलांचं संगोपन करताना तुम्ही मुलांना काय चांगलं आणि काय वाईट ह्यातलं अंतर अगदी सहज समजून देऊ शकाल.

आणि मुलांना एक अतिशय पोषक, सकारात्मक विचार देणारं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणारं वातावरण त्यांच्या भोवती तयार करू शकाल.

मग चला तर जाणून घेऊ ह्या लेखातून, की चांगले पालक होण्यासाठी तुम्हाला काय काय करायला लागेल…..

१:- मुलांवर प्रेम आणि स्नेहाचा वर्षाव करा.

मूल लहान असताना त्याला आपली भाषा कळणार नाही, अशावेळी त्याला तुमच्या हळुवार स्पर्शातून तुम्ही प्रेम आणि स्नेहाचा वर्षाव करा.

तुमच्या स्पर्शातून मुलांना ते जाणवलं पाहिजे. बाळाच्या पोटावर, गळ्यावर, छातीवर, गालावर हळुवार स्पर्श करा, मूल तुम्हाला त्याच्या हातांनी घट्ट पकडून ठेवेल. असा तुमचा स्पर्श बाळाला हवा हवासा वाटेल.

मूल खेळत असताना त्याच्या प्रत्येक नवीन हालचालीवर लक्ष द्या, तुम्ही जवळ गेलात की ते जोर जोरात हातपाय हलवायला लागते. त्यावेळी त्याला हळुवार आलिंगन द्या.

त्यामुळे त्याला त्याच्या हालचालींना प्रोत्साहन मिळेल. तुम्ही बाजूला झालात की पुन्हा जोरात हातपाय हलवायला लागेल. चेहऱ्यावर आणखी आनंद दिसायला लागेल.

लहान असताना मूल त्याला काही त्रास होत असल्यास आपल्याला सांगू शकत नाही. त्यामुळे ते जोरात रडायला लागते.

मुलाच्या रात्री बेरात्री रडण्यामुळे आई वडिलांची झोप उडते. झोप नीट न झाल्यामुळे चीड चीड होते. पण त्याचा राग कधीही मुलांकडे दुर्लक्ष करून व्यक्त करू नका.

काहीही झालं तरी बाळाला तुमच्या प्रेमाचा ओलावा द्या. त्याला जवळ घ्या, त्याच्या कपाळाचं चुंबन घ्या. आणि प्रेम व्यक्त करा.

मुलं मोठी व्हायला लागतात, अवखळ होत जातात. त्यांच्याकडून चुका व्हायला लागतात.

पण चुका त्यांना समजावून सांगा, न रागावता. जर रागावण्या एवढी मोठी चूक केली असेल तर रागवा, पण नंतर काही चांगलं केलं तर रागावण्याच्या अनेक पटींनी जास्त त्याची प्रशंसा करा. शाबासकी द्या.

२:- मुलांना प्रोत्साहन द्या, त्यांची प्रशंसा करा.

कुठल्याही चांगल्या गोष्टी करायला नेहमी प्रोत्साहन द्या. मदत करा. आणि त्यात प्राविण्य, यश मिळवल्यावर तोंड भरून त्यांची प्रशंसा करा.

त्यामुळे मुलांना कोणतीही गोष्ट स्वतः च्या हिमतीवर करायची सवय लागेल. जर आपण प्रोत्साहन किंवा प्रशंसा केली नाही तर त्यांच्यात पाहिजे तशी प्रगती होणार नाही.

मुलांच्या चुकांकडे जास्त लक्ष न देता, त्यांच्यातले चांगले गुण, त्यांच्या चांगल्या गोष्टींकडे अधिक लक्ष पुरवा. त्या गुणांच्या वाढीसाठी त्यांना मदत करा. चांगले गुण वाढायला लागले की चुका आपोआप कमी कमी होत जातील.

चुका केल्यावर त्यांना तुम्ही रागावलात तर काही चांगलं केल्यावर त्याच्या तिप्पट त्यांची प्रशंसा करा.

प्रशंसा सगळ्यांनाच आवडते, हळू हळू चूका कमी होत जातील. म्हणजेच काय चूक आणि काय बरोबर हे मुलांना कळायला लागेल.

३:- मुलांची तुलना दुसऱ्या मुलांबरोबर किंवा त्यांच्याच बहीण भावाबरोबर करू नका.

प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाची आकलन शक्ती, शारीरिक क्षमता वेगवेगळी असते.

त्यामुळे कोणत्याही मुलाची तुलना कोणाशी करणं टाळावं. तुलना केली की मुलांना तो कमीपणा वाटतो, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आकस निर्माण होतो.

आणि मुलं तुमच्यापासून दूर राहायला लागतात.

प्रत्येक मुलातले चांगले गुण कोणते, त्याची आवड काय हे आई वडिलांनाच कळून येतं.

त्याप्रमाणे त्याच्या आवडीच्या गोष्टीत जास्त लक्ष देऊन त्याला त्या गोष्टीसाठी जी काही मदत करता येईल ती करावी.

म्हणजे मुलं त्या गोष्टीत सहज प्रगती करतात, आणि स्वतःची जबाबदारी घेऊ शकतात. त्यांच्यावर त्यांच्या इच्छे विरुद्ध काहीही लादू नये.

मुलं लादलेल्या गोष्टीत चांगली प्रगती करू शकत नाहीत कारण ती त्यांना नको असलेली गोष्ट असते.

मुलांना चित्रकला आवडत असेल आणि तुम्ही त्याला जबरदस्तीने कराटे शिकायला पाठवलेत तर तेवढं मनापासून तो त्यात निपुण होणार नाही.

४:- मुलांच्या बोलण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

मुलं सतत प्रश्न विचारतात, काहीतरी कळत नाही म्हणून तुमच्याकडून समजून घेण्यासाठी तुमच्याकडे येतात.

अशावेळी त्यांना वेळ द्या. ते काही विचारात असताना त्यांच्याकडे बघून त्यांचं नीट ऐका. मुलं तुमच्याशी बोलत असताना तुमचं लक्ष मोबाईलमध्ये किंवा दुसऱ्याच गोष्टीकडे असेल तर मुलांना तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय असं वाटतं. मुलं निराश होतात.

मूल तुमच्याशी बोलत असताना तुमचं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे असायला पाहिजे.

त्याने विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. त्याच्या हुषारीचं कौतुक करा. त्याचं पूर्ण समाधान होईपर्यंत त्याला समजावून सांगा.

त्यामुळे मुलांना तुमच्याबद्दल विश्वास वाटायला लागतो. आणि तुमचं नातं खूप घट्ट होत जाईल.

५:- मुलांना तुमचा वेळ द्या.

मुलांना आपला क्वालिटी टाइम देणं पण तितकंच महत्त्वाचं. मुलांना घेऊन ग्राउंडवर खेळायला जाणे, त्यांच्याशी मैदानी खेळ खेळणे. निसर्गाच्या सानिध्यात त्यांना घेऊन जाणे, घरात सुद्धा त्यांच्याशी बैठे खेळ खेळणे, त्यांचा होमवर्क घेणे, त्यात त्यांना मदत करणे.

असं मुलांशी जवळीक साधण्यासाठी आई वडिलांनी आपला वेळ दिला पाहिजे.

म्हणजे मुलं एकलकोंडी, किंवा हट्टी होत नाहीत. काही मुलं टी व्ही बघणं पसंत करतात. पण त्यांना खेळायला बाहेर घेऊन गेलात आणि ती सवय लावली, तर टी व्ही चं वेड कमी होईल.

मुलांच्या शाळेतल्या कार्यक्रमांना जरूर हजेरी लावा. मुलांना खूप आनंद होतो.

शाळेतली प्रगती जाणून घेण्यासाठी पालक- शिक्षक सभेला जरूर जा. मुलांच्या प्रगतीची जरूर वाहवा करा. मूल पुढच्या वेंळी आणखीन प्रगती करून दाखवेल.

६:- मुलांच्या खास कार्यक्रमांना उपस्थित रहा.

बक्षीस समारंभ, गॅदरिंग, स्पोर्ट्स इव्हेंट्स किंवा मुलांनी ज्या ज्या कार्यक्रमात भाग घेतला असेल त्या कार्यक्रमांना जरूर उपस्थित रहा.

मुलांना त्यामुळे एक भावनिक आधार मिळतो. त्यांचा उत्साह वाढतो. ह्यात मुलाच्या वयाचा विचार नाही करायचा. अगदी तुमच्या मुलाला पदवी मिळाली तरी त्याच्या पदवीदान समारंभाला तुम्ही असायालाच पाहिजे. तुमच्या शाबासकीची थाप मुलांचा आत्मविश्वास वाढवते.

७:- चांगल्या सवयी, आणि नियमांचं पालन ह्यांचा आग्रह धरा.

आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी तुम्हाला काही नियम घालून द्यायला लागतील. पण चांगल्या सवयी आधी चांगले आई वडील स्वतःला लावून घेतात. नियम स्वतः पाळतात.

मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून त्या सवयी आधी आपल्याला लावून घ्याव्या लागतील. म्हणजे त्याच सवयी मुलांमध्ये आणायला अवघड जाणार नाही.

घरात काही नियम सुद्धा सगळ्यांनी पाळावेत म्हणून ठरवले जातात. नियम हे आई वडिलांनी पाळायला पाहिजेत म्हणजे मुलांना ते पाळायला सांगताना सोपं जातं.

ह्या चांगल्या सवयी किंवा नियम मुलांना पाळायला सांगताना त्यांना ते लादले गेलेत असं वाटता कामा नये.

आई वडील पाळत असले की मुलं ही सहज ते पाळायला लागतात. वेगळं मारून मुटकून त्यांच्यावर ते लादायला लागत नाहीत.

चांगल्या सवयी सुद्धा मुलं हळू हळू आत्मसात करतात. कारण आई वडिलांच्या त्याच सवयी बघून मुलांना पण त्या सहज लागतात. म्हणजे ह्यात जोर जबरदस्ती नसावी.

८:- रागावर नियंत्रण.

राग हा घरातली शांतता घालवतो. म्हणून त्याच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे.

मुलांच्या काही चुकांमुळे काहीवेळा घरातल्या मौल्यवान वस्तू खराब होतात, काही नुकसान होते अशावेळी नुकसान झाल्यामुळे राग येतो.

पण रागामुळे खराब झालेली वस्तू दुरुस्त होत नाही. त्यामुळे रागावर ताबा ठेवणं जरुरीचं असतं. चांगले आई वडील रागावर नियंत्रण ठेऊन, घरातली शांतता ढळू देत नाहीत.

९:- मुलांना स्वावलंबी बनवा….

चांगल्या मुलांना सवयी लावताना स्वावलंबी बनवा. स्ववलंबी असलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.

सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करताना जबाबदारी घेण्याची ताकद येते. ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जबाबदारी स्वीकारणारे आयुष्यात चांगलं यश मिळवू शकतात.

१०:-एक गोष्ट लक्षात असू द्या की चांगल्या आई वडिलांचं कर्तव्य कधीच संपत नाही..

मुलं ही सतत आई वडिलांच्या छायेखालीच चांगली वाढतात. म्हणजे सतत काहीतरी मार्गदर्शन आई वडील मुलांना करतच असतात.

मुलं आता मोठी झाली म्हणून तुमचं काम संपत नाही. मोठी झाल्यानंतर सुद्धा मुलांना आई वडिलांच्या सल्ल्याची गरज पडतेच.

योग्य वेळी योग्य सल्ला मुलांना देत राहणं हेच पुढचं कर्तव्य ठरतं. मुलांचं वय कितीही असलं तरी त्यांना आई वडिलांचा आधार हवाच असतो. बाकी सगळ्या बाबतीत मुलं स्वावलंबी झालेलीच असतात.

पण तरी सुद्धा तुमच्या आधाराचा वटवृक्ष त्यांना सुखाची सावली देत रहातो. त्यामुळं मुलांना ह्या सावलीत सुरक्षित वाटतं.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.