‘सून’ ही मैत्रीणही बनू शकते. नाही पटत..? मग वाचा ह्या लेखात

'सून' ही मैत्रीणही बनू शकते.

हा लेख वाचून तुम्हाला नक्की पटेल कि आई म्हणून खंबीर पणे मुलाच्या आणि सुनेच्या पाठीशी उभे कसे राहावे.. म्हणजे सून आपसूकच तुमची सखी होईल आणि ‘सासू-सून’ ह्या नात्याची भीती समाजातून सुद्धा नाहीशी होऊन जाईल..!! अगदी आसावरी-शुभ्रा सारखी!!!

‘अरे लग्न कधी करतोस?’ ‘आज तरी मुलगी बघायला जा.’ ‘कोणी ठरली आहे का तुझी?’ ह्या डायलॉग्स ची सगळ्यांना ओळख आहे.

घरात लग्नाचा मुलगा, दादा, भाचा, पुतण्या असला की सगळे वडील धारी जोमात कुंडल्या घेऊन त्या लग्नाळू मुलाच्या हात धुवून मागे लागलेले असतात.

मुलाचे लग्न म्हणजे एक मोठी जबाबदारी असे समजून आई बाबा अगदी प्रेमाने, रागाने, हक्काने त्याच्याकडून सगळे रीती रिवाज पार पाडून घेत असतात. मिनतवाऱ्या करून लग्न जमते, ठरते आणि पारही पडते..

त्यात लग्न ठरल्यापासून होणाऱ्या सासूला होणाऱ्या सुनेचे कोण कौतुक…!!

आमची सून किती शिकली, काय करते, किती कमवते पासून आमच्यासाठी काय काय करतेय इथपर्यंत तिचे कोड कौतुक येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांपुढे चालू असते.

वाजत गाजत सून घरी येते.. नव्या नवलाईचे नऊ दिवस नांदते आणि मग मात्र एकेक गोष्टी तिच्या सासू सासऱ्यांना खटकायला लागतात.. आणि मग सुरू होतो टॉम अँड जेरी चा खेळ..!!

आधी केलेले सगळे कौतुक विस्मरणात जाते आणि माझी सुनबाई किती वाईट हे सिद्ध करण्यात सोसायटीच्या सासवांमध्ये चढाओढ लागते..

एखादी ‘निरोगी’ सासू सून जोडी पहिली की मात्र सगळ्यांमध्ये कुजबुज चालू होते.

ह्यांच्या मध्ये काहीच कसे भांडण तंटे नाहीत ह्याचे सगळ्यांनाच कुतूहल असते..!!

मनातून सगळ्यांनाच वाटत असते त्यांच्यातल्या मैत्री सारखी मैत्री आपल्यात असावी. पण ताकास तूर काही लागत नाही हो त्यांच्या सिक्रेट फ्रेंडशिप फॉर्म्युलाचा..!!

म्हणूनच होऊ घातलेल्या ‘सासू आणि सासरे बुवा’ तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सुनेशी मैत्री करण्याचा तो ‘सिक्रेट मंत्र’ जो तुम्हाला कोणत्या पुस्तकात मिळणार नाही..

बघा हा मंत्र तुमच्या घरी कशी जादू करेल..!!

१. मंत्र पहिला: सूनेला आपली मुलगीच माना

आपल्या मुलीला लहान पणापासून आपण लाडाकोडाने वाढवतो. घरकाम तिच्यावर सोपवून तिला इतर संधींपासून वंचित ठेवत नाही.

तिच्या करिअरमध्ये तिला साथ देतो. तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो. तिचे नखरे सांभाळतो. वेळप्रसंगी थोडे मतभेद होतात, वादावादी होते पण ते आपण मनावर घेत नाही.

तिला काही गोष्टी आपणहून तिच्या सवडीने शिकवतो आणि आपली राजकन्या, आपली लेक म्हणून तिला उत्तम नवरा शोधून देतो.

तुम्ही स्वतः सून असताना तुम्हालाही माहेरच्यांचा लळा जास्ती होता.. तिलाही असणार पण म्हणून तिला दूर करू नका..

तुम्ही तिला मुलीसारखे वागवलेत तर तिलाही सासर माहेरात फरक जाणवणार नाही. ती रुळेल आणि हळू हळू तुम्हालाही आपल्या आई वडीलांप्रमाणेच मानेल.

२. दुसरा मंत्र: मैत्री वाढवायला वेळ द्या

सुनेशी लगेच दुसऱ्या दिवशी मैत्री होणार नाही. तिला तुम्ही समजून घ्या आणि तिलाही तुम्हा सर्वांना समजून घ्यायला वेळ द्या.

तिलाही मनातून भीती असते की ह्या नवीन घरात तिला कशी वागणूक मिळेल..?? तिची ही भीती दूर करा. तिच्यावर विश्वास दाखवा.

घरातील छोट्या छोट्या गोष्टीत, निर्णयांमध्ये तिलाही सामावून घ्या. काही निर्णय तिच्यावर सोपवा.

खऱ्या अर्थाने तीही तुमच्या घरची झाली की मग मने जुळायला वेळ लागणारच नाही.

३. तिसरा मंत्र: तिच्यातल्या दोषांना तुमच्या नातेसंबंधातील दरी होऊ देऊ नका

कोणताच माणूस सर्वगुणसंपन्न नसतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

नवीन संसार सुरू केल्यावर हा संसार आपला आहे आणि आपण ह्याची राणी असे सगळ्याच मुलींना वाटते.

त्यात तुम्ही आमच्या कडे हे चालत नाही, असे वागायचे नाही, हे बनवायचे नाही अशा अटी, शर्ती लागू केल्यात तर तुम्ही स्वतःहून तिच्या नजरेत ‘हिटलर’ बनायला सुरुवात केलीये हे समजून जा..

स्वयंपाक करताना, खरेदी करताना, घरातील कार्यक्रम आखताना तिच्या कडून चूका होणार. मात्र त्यावर मायेने पांघरूण घाला. समजावून सांगा.

पुढच्या वेळी मदत करू हे आश्वासन द्या. आणि विषय सोडून द्या.

कारण तोच तोच विषय चघळण्यात काहीही अर्थ नसतो आणि चुका अपल्याकडूनही होतात. शिवाय आपल्या अनुभवांशी तिची बरोबरीही होऊ शकत नसते किंवा तिच्या नवीन पिढीच्या विचारांबद्दल आपल्यालाही काही माहीत नसते.

एकमेकींना आपल्याकडचे ज्ञान द्या तेही अगदी मित्रत्वाच्या नात्याने.. तिचे विरोधी न बनता, तुम्ही तिच्याच संघात असल्याची तिला शाश्वती द्या..!!

४ चौथा मंत्र: जिथे शक्य आहे तिथे न भांडता सबुरीने घ्या

सून आल्यापासून घरात घडणाऱ्या बदलांमुळे तुमच्यातली कर्ती स्त्री, आई, अनुभवी महिला आणि पर्यायाने सासू जागृत होऊ शकते. किंबहुना होतेच. त्यापेक्षा थोडे तटस्थ राहा.

सून मुलात भांडण होत आले तर त्यात तुम्ही जाऊच नका, मुलाचीच बाजू बरोबर असे सुरुवातीलाच निष्कर्ष काढू नका, भांडणात अजून वाद वाढवायला जाऊच नका.

त्यापेक्षा त्यांचे ते बघून घेतील आणि तुमच्याकडे समस्येचे निवारण करून घेण्यास आले तरच, दोन्ही बाजूने मत जाणून घेऊन आपले मत सांगा. तो पर्यंत त्यांच्या फंदातही न पडलेले उत्तम.

सून आल्यावर घरात बरेच बदल घडू शकतात. काही बदल खुल्या दिलाने स्वीकारा. काही पटत नसल्यास स्पष्ट चर्चा करा.

मात्र कुरघोड्या करण्यापेक्षा तुमचे मत मांडून बाजूला व्हा. पुढे नव्याने संसार चालवणारे नवरा बायको बघून घेतील काय ठरवायचं ते.

आणि त्यांनतर येणाऱ्या प्रोब्लेम्समुळे त्यांचाही अनुभव वाढेल असे समजून बदलांना सामोरे जा.

हे सगळे करत असताना तिच्या मनात तुमच्या बद्दल एक ‘सासू’ ही प्रतिमा उभी न राहता ‘आई’ किंवा ‘मैत्रीण’ अशीच प्रतिमा बनेल ह्याची काळजी घ्या.

म्हणजे कितीही वादविवाद झाले तरी शेवटी नात्यात दुरावा येणारच नाही.

५ पाचवा मंत्र: भांडण झालेच तर त्यावर तोडगा काढा

घरातली भांडी कधी ना कधी एकमेकांवर आपटतातच. घरात चार डोकी एकत्र आली तर वादविवाद, भांडण हे होणारच.

आणि त्याशिवाय जीवनाला मजाही नाही. मात्र ही वाटीतली, पेल्यातली भांडणं तात्पुरती राहिली पाहिजेत.

कधी सून आपल्याला विचारतच नाही असे वाटल्यास मुलगा आणि सून दोघांशी एकाच वेळी समोर बसून बोला.

त्यांचे म्हणणे जाणून घ्या. तुम्ही कशी मदत करू शकता हे पटवून द्या.

भांडणं झालीच तर त्यानंतर त्याच्यातून एक मार्ग काढा. एकमेकांच्या मतभेदातील सुवर्णमध्य शोधा. आपल्यातली भांडणे अपल्यातच मिटवा.

सुनेची कागाळी घराबाहेर करणे प्रशस्त नाही. तुम्ही रिस्पेक्ट दिला तर तुम्हालाही तो मिळणार आहे हे लक्षात घ्या.

अर्थात इतके सगळे करूनही तुम्हाला सतत पडते घ्यावे लागत असेल किंवा तुमचा अपमान केला जात असेल तर मात्र सहन करणे हा पर्याय नाहीच.

मात्र बऱ्याचदा कडू वाटणारी परिस्थिती एकमेकांशी बोलण्याने, समजूतदारपणा दाखवण्याने गोड, सुमधुर होऊन जाते ह्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल.

तर मैत्रिणींनो, तुमची सून हा कोणी बागुलबुवा नसून घरात येणारी एक नवीन मैत्रीण असणार आहे असे स्वतःला समजवा.

सून ही मुलाला आई पासून तोडत नसते तर स्वतःच्या नवऱ्याला फक्त आपलंसं करत असते.

मुलगा आपल्यापासून लांब जात आहे ह्या भावनेनेच खरे तर सगळ्या घरात भांडणे होतात. मात्र आई मुलाचे लग्न स्वतःच हौसेनी ठरवते हे विसरून जाते..

आणि पुढे संघर्ष सुरू होतो सासुसूनेत..!! त्यामुळे कौतुकाने ज्या मुलीच्या हाती आपल्या मुलाचा हात दिला तिला सुद्धा आपलीशी करून घ्या आणि मुलाला तिच्या पदराशी बांधून टाका.

आई म्हणून खंबीर पणे दोघांच्याही पाठीशी उभे राहा.. सून आपसूकच तुमची सखी होईल आणि ‘सासू-सून’ ह्या नात्याची भीती समाजातून सुद्धा नाहीशी होऊन जाईल..!! अगदी आसावरी-शुभ्रा सारखी पटतंय ना!!!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Shweta mandaokar says:

    Khup cchan ….kunitari positively baghtoy ya natyamadhe …ani he agdi barobar ahe ki ..navin sunechi jashi jababdari aste sasr sambhalun nyaychi tevdich garaj sasrchyana pan aste ..pan mostly sagle sunela katgharyat thevun mokle hotat ani tithech sagla dhuva udato ..

    Khup chhan baju mandlit tumhi ,..ek navin drushtikon dilat ..thanks .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!