हिंदू संस्कृतीत पाया पडण्याचे अध्यात्मिक, शास्त्रीय कारण काय आहे?

हिंदू संस्कृतीत पाया पडण्याचे अध्यात्मिक शास्त्रीय कारण काय आहे

मनाचेTalks कडे जशी नेहमी वाचकांची एखादा काही विषय लिहा, याबद्दल मागणी येत असते तसाच एवढ्यात एक मेसेज आला होता. कि….

आपल्या संस्कृतीत ‘चरणस्पर्श’ म्हणजे पाया पडले जाते त्यामागे काय कारण असेल?

काही शास्त्रीय कारण, आध्यात्मिक कारण कि मानसशास्त्राचा एक भाग…. नेमके काय असण्याची शक्यता आहे? बघूया, आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये सांगा.

विचारणारी व्यक्ती एका कॉलेजमध्ये प्रोफेसर असल्याने एका डिबेट साठी त्यांना तो विषय आलेला होता.

तर विषयही इंटरेस्टिंग होता त्यामुळे आमची टीम या विषयाबद्दल वेगवेगळी पुस्तकं, इंटरनेट तसेच काही जणांशी बोलून माहिती घेऊ लागली.

आणि साध्या वाटणाऱ्या या विषयाबद्दल बरीच इंटरेस्टिंग माहिती मिळाली.

भारतामध्ये वयाने मोठ्या व्यक्तींच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे.

हिंदू लोक तरी मोठ्या व्यक्तींच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेताना आपल्याला नेहमी दिसतात.

अगदी हिंदी, मराठी चित्रपटात किंवा रोज टी. व्ही. वर चालू असलेल्या काही मालिकांमध्ये सुद्धा सतत आपण मोठ्या व्यक्तींना नमस्कार करताना चित्रित केलेले काही प्रसंग पाहतो.

ह्यामागचा हेतू म्हणजे समोरच्या मोठ्या व्यक्तींना मान देणे किंवा त्यांचा आदर करणे हा आहे. हा संस्कार प्रत्येक घरात लहानपणापासून अंगवळणी पडलेला असतो.

मुलांना घरात चांगल्या सवयी लावल्या जातात त्यातली ही एक सवय बहुतेक घरात लहानपणापासून लावली जाते.

आपल्या आई वडिलांनी आपल्याला लावलेली ही सवय आपण आपल्या मुलांना सुद्धा लावतो. हा एक चांगला संस्कार म्हणून मुलंही त्याचा स्वीकार करतात.

जुन्या जाणत्या लोकांच्या म्हणण्यानुसार,

“ह्या सगळ्याच चांगल्या संस्काराच्या मागे काही करणं असतात म्हणून हे संस्कार फार पूर्वी पासून चालत आलेले आहेत.

मोठ्या लोकांना खाली वाकून पायाला स्पर्श करून केल्या जाणाऱ्या नमस्काराची पद्धत तर फार प्राचीन म्हणजे अगदी वेद काळापासून चालू आहे.

मानवी शरीरात असंख्य रक्तवाहिन्या, धमन्या, सतत कार्यरत असतात. ह्या धमन्या मानवी मेंदूपासून सुरू होतात आणि त्यांचा शेवट आपल्या हातांची बोटं, आणि पायांची बोटं या मध्ये येऊन होतो.

ज्यावेळी आपल्या समोरच्या व्यक्तीच्या पायाला आपल्या हातांच्या बोटांनी स्पर्श केला जातो त्यावेळी एक मंडळ पूर्ण होतं जसा विजेचा दिवा सर्किट पूर्ण झाल्यावर लागतो तसाच आपल्या हाताची बोटं आणि त्यांचा पदस्पर्श होताच आपल्या शरीरात एनर्जी चा प्रवाह सुरू होतो.

याबद्दलची मतं आम्ही जेव्हा घेत होतो तेव्हा तिथे वेगवेगळ्या वयोगटाचे चार-पाच जण असल्याने यावरचे बहुरंगी बहुढंगी विचार पण ऐकायला मिळाले.

‘पॉझिटिव्ह एनर्जी प्रवाहित होते.’ असं जेव्हा चर्चेत सामील असलेल्या जोग काकांनी सांगितलं तेव्हा कॉलेजमध्ये शिकत असलेला त्यांचा नातूही तिथे होता…

त्याने मात्र त्याच्या वयाला साजेशी बॅटिंग केलीच!!!

आजोबा मग तुम्ही का मला कोणाच्याही पाया पडायला लावता? मग हे नको का बघायला समोरचा माणूस पॉझिटिव्ह आहे कि निगेटिव्ह आहे!!

ह्यूमरस बाजू पुढे आली तेव्हा मात्र विषयाला जरा वेगळी कलाटणी पण मिळाली.

पाया पडणं हे बरेचदा आपण मनापासून करत असतो पण बरेचदा काही ओकेजन असल्यामुळे तिथे उपस्थित सर्वांच्या पाया पडण्याची प्रथा असते त्यामुळेही कधी कधी पाया पडलं जातं. हाही विचार पुढे आला.

काही पुस्तकांमध्ये, आपल्या संस्कृतीत चरण स्पर्श करून नमस्कार करण्याचे काही शारीरिक फायदे सुद्धा सांगितलेले आहेत.

चरण स्पर्श नमस्काराच्या तीन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे कमरेत वाकून समोरच्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करायचा. ह्या नमस्कारामुळे आपण कमरेत वाकून नमस्कार करतो, त्यामुळे कंबर आणि पाठीचे सगळे स्नायू ताणले जातात.

दुसरी पद्धत म्हणजे गुडघ्यात वाकून समोरच्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करायचा. ह्या नमस्कारामुळे गुडघे वाकवल्यामुळे गुडघ्याच्या स्नायूंना ताण मिळतो आणि ते चांगले कार्यरत राहतात.

तिसरी पद्धत म्हणजे साष्टांग नमस्कार. संपूर्ण शरीर जमिनीवर ठेऊन आपलं मस्तक समोरच्या व्यक्तीच्या पायावर ठेऊन केलेला नमस्कार. ह्या नमस्कारामुळे संपूर्ण शरीराला ताण दिला जातो आणि पूर्ण व्यायाम होतो. असे नेहमी नमस्कार केल्यामुळे शरीराला फायदाच होतो.

यावर मात्र आमच्याच टीममध्ये जेव्हा ब्रेन स्टोर्मिंग होत होती तेव्हा एक फेमिनिस्ट विचार सुद्धा बाहेर आला. तो असा की, ‘पाया पडणं हे आपल्या सामाजिक व्यवस्थेत बरचसं दिलं गेलं ते बायकांकडे. पूर्वीच्या काळात बायकांना ठरवून व्यायाम किंवा योग करता येत नव्हता त्यामुळे तेव्हा लावलेला हा तर्क असू शकतो.’

या सर्व गोष्टी वय, अनुभव आणि विचार करण्याची पद्धत यानुसार बदलतच जाणार.

पण वारकरी संप्रदायात तर समोर कोणीही असो लहान, मोठा सगळ्यांच्या पाया पडतात..

कारण नमस्कार हा व्यक्तिला नाही तर त्यांच्यातील हृदयस्थ भगवंताला असतो असे अशी मान्यता वारकरी समप्रदयात आहे..

नमस्कार करणे म्हणजे नतमस्तक होणे.. ह्या मुळे गर्व, फुकाचा अभिमान, मी पणा ह्यालाही चाप बसतो.

शास्त्र, अध्यात्म हे तर आपल्या जागी आहेच पण एवढं मात्र नक्की की चरण स्पर्श केल्याने अहंकार जाऊन विनम्रतेची भावना निर्माण होते. काय वाटतं तुम्हाला?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!