भावनिक बुद्धिमत्ता (EQ) वाढवून प्रभावशाली व्यक्ती बनण्यासाठी हे करा

भावनिक बुद्धिमत्ता (EQ)

भावनिक बुद्धिमत्ता (EQ) म्हणजे आपल्या डोक्यात असलेली अशी भावनांची शक्ती, की जी आपल्याला आपले रोजचे प्रश्न सोडवणं जास्त सहज सोपं करते.

भावनिक बुद्धिमत्ता तुम्हाला भीतीला सामोरं जायला, अडचणींना तोंड द्यायला, निर्णयशक्ती वाढवायला मदत करते. तर आजच्या या लेखात भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी केल्या पाहिजेत अशा चार गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मित्रांनो, बुद्धिमत्ता (इंटेलिजन्स) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तीन विषय झटकन येतात, तर्कशास्त्र (लॉजिक) गणित, आणि सायन्स.

ह्या विषयात जो हुशार त्याची बुद्धिमत्ता अगदी चांगली. आपली बुद्धिमत्तेची व्याख्या अशी झटकन ठरते.

मग लगेच ‘आय क्यू’ (IQ) बद्दल विचार येतो.

हुशार लोकांचा आय क्यू चांगला असतो, हे आपल्याला माहिती असतं. ह्याच आय क्यू चा दुसरा पैलू म्हणजे “भावनिक बुद्धिमत्ता” म्हणजेच “ई क्यू” (EQ)

आपण ह्या “ई क्यू” बद्दल आजच्या लेखात काही गोष्टी जाणून घेऊ.

आपल्या डोक्यात सतत विचारांचं चक्र फिरत असतं.

हे विचार करून करून आपण आपल्या आयुष्यात येणारे प्रश्न सोडवत असतो.

पण ही दुसरी ‘भावनिक बुद्धिमत्ता’ म्हणजे नेमकं काय? हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसतं.

ही भावनिक बुद्धिमत्ता (EQ) म्हणजे आपल्या डोक्यात असलेली अशी भावनांची शक्ती, की जी आपल्याला आपले रोजचे प्रश्न सोडवणं जास्त सहज सोपं करते….

म्हणजेच प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा एक वेगळा आणि सोपा मार्ग.

आणखी सोप्या शब्दात सांगायचं तर ह्या आपल्या भावना ह्या आपल्याला कोणत्याही गोष्टीची योग्य निवड करण्यासाठी आणि सहज निर्णय घेण्यासाठी मदत करणारं एक बहुमूल्य साधन आहे.

हीच भावनिक बुद्धिमत्ता तुम्हाला कठीण काळाचा, आलेल्या अडचणींचा खंबीरपणे सामना करायला सुद्धा मदत करते.

डार्विन च्या सिद्धांता नुसार आपलं मन हे भावनांच्या अनुभवातून विकसित होत असतं, म्हणून आपण आपल्या भोवती असलेल्या वातावरणाशी सहज जुळवून घेऊ शकतो.

त्यामुळे जर आपली भावनिक बुद्धिमत्ता (EQ) चांगली विकसित झालेली असेल तर आपल्याला वाटणाऱ्या भीतीपासून, आलेल्या संकटापासून वाचण्यासाठी आपण परफेक्ट निर्णय घेऊ शकतो.

निगेटिव्ह गोष्टीचा सहज सामना करू शकतो.

दुसऱ्या बाजूला आपण आपल्या मनाला सकारात्मक भावनांनी तयार केलं असेल तर आनंद घेण्यासाठी आपलं मन आपल्याला तसे संकेत देतं, आपल्याला तो आनंद घेण्याची चालना मिळते.

मग आता बघू हे भावनिक बुद्धिमत्ता (EQ) चे चार प्रमुख मजबूत आधार स्तंभ कोणते आहेत. आणि भावनिक बुद्धिमत्ता (EQ) वाढवण्यासाठी काय केले पाहिजे.

१) भावनांच्या बाबतीत स्वतःला जागरूक ठेवा

तुमची भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी तुमच्या स्वतःच्या भावनांच्या बाबतीत तुम्ही जागरूक राहायला पाहिजे.

म्हणजेच तुमचा ई. क्यू. हा तुमच्या दोन प्रकारच्या भावनांवर ठरतो. एक म्हणजे तुमच्या मानसिक भावना. आणि दुसरं म्हणजे तुमच्या शारीरिक भावना.

मानसिक भावना म्हणजे, तुमच्या वृत्तीमुळे आणि तुमच्या श्रद्धेमुळे तयार होणारी भावना.

समजा, तुमची वृत्ती खोडसाळ असेल तर तुमच्या मनात सतत खोडकर भावना तयार होत असतील. कोणाची फजिती करण्याची भावना, कोणाची मस्करी करण्याची भावना, अपमान करायची भावना अशा भावना सतत तयार होतात.

पण तुमची वृत्ती चांगली असेल तर कोणाला मदत करण्याची भावना, कोणाला आधार देण्याची भावना, कोणाच्या भल्याची भावना आशा भावना तुमच्या वृत्तीतून तयार होतात.

प्रत्येकाची श्रद्धा जशी असेल तशा भावना नेहमी प्रत्येकाच्या मनात तयार होत असतात.

समजा तुमची देवावर अपार श्रद्धा असेल तर तुमच्या भावना सुद्धा तशाच असतात. त्या भावनांमध्ये दया, प्रेम, करुणा, असते.

आणि जर तुम्ही नास्तिक असाल तर तुमच्या भावना ह्याच्या विरुद्ध असू शकतात. म्हणजे तुमच्या मनात तुमच्या कामाला तुम्ही महत्व देता, किंवा वास्तव गोष्टीला महत्व देता.

तशाच भावना तुमच्या मनात तयार होतात. अशा ह्या वृत्तीतून आणि श्रद्धेतून निर्माण होणाऱ्या भावना असतात.

अशा भावना तुमच्या मनात सतत तयार होत असतात. त्यातल्या कोणत्या योग्य कोणत्या अयोग्य त्या बाबत आपण जागरूक राहायचं असतं.

शारीरिक भावना म्हणजे आळस, उत्साह, आनंद निराशा, राग, लोभ, भय ह्यातून आपल्या शरीराच्या अवस्था ठरतात, आळसात झोपून राहणे, निराशे मुळे काम न करणे, घाबरून कमीपणा घेणे, अशा भावनांना ताब्यात ठेवण्यासाठी तुम्ही जागरूक असायला पाहिजे.

आळसाची, निराशेची, भयाची, लोभाची भावना तुमचं नुकसान करेल, तर आनंद, उत्साह अशा भावना तुमची प्रगती करतील.

कोणत्या योग्य, आणि कोणत्या अयोग्य ह्यासाठी स्वतः ला जागरूक ठेवायचं. कारण ह्या तुमच्या स्वतःच्या भावना असतात त्यांना तुम्हालाच सांभाळायचं असतं.

ज्याचं मन ह्या सगळ्या भावनांवर ताबा ठेऊन असतं, त्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली होत जाते. ही बुद्धिमत्ता वाढत जाणारी असते.

२) तुमच्या भावनांना तुम्हीच शिस्त लावा

तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेचा (ई.क्यु.) चा दुसरा मोठा आणि मजबूत आधारस्तंभ म्हणजे तुम्ही तुमच्या भावनांना लावलेली शिस्त.

तुमच्या भावनांना तुम्हीच शिस्त लावणं गरजेचं असतं. मग ही शिस्त म्हणजे काय आणि ती कशी लावायची?

एकदा तुम्ही तुमच्या भावनांबद्दल जागरूक झालात की पुढचं काम सोपं होतं. आपल्या भावनांना कंट्रोल करायचं ते काम असतं. म्हणजे आपल्या भावना विस्कळीत स्वरूपात निर्माण होत असतात त्यांना आवर घालायचा.

हे भावना आवरण्याचं काम आपण आपल्या मेंदूला व्यायाम देऊन करू शकतो. नकारात्मक भावना निर्माण होऊ द्यायच्या नाहीत, आणि सकारात्मक भावनांना वाट मोकळी करून द्यायची.

प्रसंगा प्रमाणे निर्माण होणाऱ्या भावना आपण एका कागदावर लिहून त्यातल्या आपल्याला उपयोगी पडणाऱ्या भावना नेहमी वापरू शकतो आणि धोकादायक भावना आपल्या डोक्यातून काढून टाकू शकतो, ज्या घातक ठरू शकतात.

आपल्या मनात नेहमी ज्या भावना येतात त्या भावनांचं चित्र मनात रंगवायचं.

आणि त्याचा परिणाम काय होईल ह्याचं सुद्धा चित्र रंगवायचं. जे अयोग्य वाटेल ते चित्र पुसून टाकायचं म्हणजे ती भावना परत निर्माण होणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची.

भावनांना शिस्त लावायची म्हणजे आपण जर नकारात्मक भावनांमध्ये अडकून पडलो असू, तर सकारात्मक गोष्टी शोधायच्या, आणि त्यांचा अनुभव घ्यायचा.

उदा. जर तुम्ही निराश असाल तर एखादा कॉमेडी शो बघायचा. किंवा नकारात्मक भावनेमुळे तुमच्या अंगात आळस भरला असेल तर एखादं उत्साह वाढवणारं म्युझिक ऐकायचं, त्याच्या तालामध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचं. की तुम्ही अगदी ताजे तवाने होता.

राग, भीती, दुःख, किंवा लाज ह्या निगेटिव्ह भावनांनी तुम्हाला ग्रासलं असेल तर त्या भावनांच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करा म्हणजे तुमची गाडी परत रुळावर येईल.

तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा खूप राग आला असेल तर त्याच्या विरुद्ध गोष्ट करा म्हणजे तुमच्यात प्रेमाची भावना जागवा.

गायी गुरांना चारा द्या, किंवा एखाद्या भुकेल्या प्राण्याला किंवा व्यक्तीला पोटभर अन्न द्या. नाही काही तर एखादं गरीब मूल दारावर आलं तर त्याला काहीतरी देणं एवढं तर तुम्ही करूच शकता. तुमच्या मनातली रागाची भावना विरून जाईल.

एखादी गोष्ट करण्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर तीच गोष्ट करून त्यात यश मिळवा. भीतीची भावना पळून जाईल.

समजा तुम्हाला बाईक चालवायची भीती वाटत असेल तर एखाद्या ग्राउंडवर जाऊन ती बाईक चालवत रहा. जोडीला कोणीतरी चांगली बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला घेऊन जा आणि चांगली चालवता येई पर्यंत चकरा मारत रहा. भीती ची भावनाच निघून जाईल.

कोणत्या तरी गोष्टींमुळे तुम्ही दुःखी होऊन घरातच बसून राहिला असाल तर उठा आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरून या. निसर्गाचा आनंद घ्या. दुःखाची भावना दूर जाईल.

एखाद्या प्रसंगामुळे तुम्हाला कोणाला तोंड दाखवायची लाज वाटत असेल तर उठा आणि सगळ्यांशी त्या विषयावर बोला, सगळ्यांना तो प्रसंग सांगत सुटा. तुमची भावना हलकी होईल.

म्हणजे निगेटिव्ह भावनांवर पॉझिटिव्ह भावनांचा वर्षाव करा. अशी लावा शिस्त तुमच्या भावनांना.

३) दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करून सहानुभूतीपूर्वक वागणूक ठेवा

तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावानंबद्दल जागरूक झालात, आणि तुम्ही तुमच्या भावनांना शिस्त लावलीत की अर्धं काम झालं. आता विचार करायचा दुसऱ्यांच्या भावनांचा आणि सहानुभूतीचा.

आपल्यासारख्याच दुसऱ्याच्या पण भावनांचा विचार करणं हे महत्त्वाचं ठरतं.

ज्या लोकांशी आपले नातेसंबंध मजबूत करायचे असतात त्या लोकांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत.

ही गोष्ट तशी सहज सोपी नाही. पण त्यांच्याशी सतत संपर्क, बोलणं, चालू ठेवलं तर हळू हळू त्यांच्या प्रॉब्लेम्स समजायला लागतील.

त्यांच्या नेहमीच्या बोलण्यातून त्यांच्या भावना समजायला लागतील.

नकारात्मक गोष्टींच्या गर्तेत फसलेल्या आपल्या मित्राला आपण त्याचे काही प्रश्न सोडवायला निश्चितच मदत करू शकतो.

आपल्या मदतीने त्याचे प्रॉब्लेम सुटायला लागले की त्याला आपल्याबद्दल विश्वास वाटायला लागतो आणि त्याला आपल्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते.

मजबूत नातेसंबंध कायम ठेवण्यासाठी ही सहानुभूती आपल्याला उपयोगी पडू शकते.

आपल्या नकारात्मक भावना जशा आपण सकारात्मक केल्या त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या भावनांबद्दल आपण त्यांना जागरूक करू शकतो.

अशी जागरूकता सहानुभूतीत बदलते आणि आपले नाते संबंध अधिक चांगले होतात.

आपल्याला दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते अगदी सगळं कळत नाही. पण ही सहानुभूती म्हणजे एक प्रकारचं माईंड रीडिंगच असतं.

आपण दुसऱ्याच्या बोलण्यातून किंवा त्याच्या हलचालींवरून त्याच्या भावनांचा अंदाज लावू शकतो.

४) सामाजिक कौशल्य अंगी बाळगा

एकदा तुम्हाला तुमच्या आणि दुसऱ्यांच्या भावानंबद्दल सगळं काही समजलं की पुढचा एक प्रश्न तुमच्यासमोर उभा राहील, की दुसऱ्यांच्या भावनांना मी कसं उत्तर द्यायचं? किंवा मी कसा प्रतिसाद द्यायचा?

हा आधार स्तंभ तुम्हाला तुमच्या सामाजिक कौशल्याची बाजू मजबूत करून देतो.

समाजामध्ये वावरताना, म्हणजे सतत तुमचा सामाजिक कार्यात सहभाग असेल त्यावेळी अनेक प्रकारची माणसं तुमच्या संपर्कात असतात.

ती माणसं तुमच्यातल्या प्रेम, आदर, आपुलकी ह्या भावनांमुळे तुमच्या जवळची झालेली असतात.

सतत इतक्या लोकांशी तुमचा संबंध जोडला जातो त्यावेळी ही नाती टिकवणं हे महत्वाचं असतं.

ह्यासाठी त्यांच्याशी तुमची भावनिक जवळीक राहिली पाहिजे. पण ही जवळीक कशी साधायची, कशी टिकवायची हे कौशल्य तुम्हाला अवगत असायला पाहिजे..

पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यात जर काही निगेटिव्ह इमोशन्स (भावना) असतील तर त्या भावना कधीही व्यक्त न करणं योग्य ठरेल.

मग ह्या भावना कोणत्या? तर नकार, अपमानजनक भावना, अपराध अशा भावना सामाजिक कार्यात नुकसान करतात.

म्हणून सकारात्मक भावनांची निर्मिती तुम्ही सतत करायला हवी. म्हणजे अशा भावना ज्या तुमच्या जवळ आलेल्या लोकांचा उत्साह वाढवतील, प्रेम वाढवतील, तुमचा सहवास त्यांना आनंद देणारा ठरेल, तुमच्या चेहेऱ्यावरचं हास्य त्यांना खुश करेल.

त्यांच्याशी जवळीक साधून केलेली बोलणी त्यांच्यात विश्वास निर्माण करतील अशा सगळ्या सकारात्मक भावना तुमच्या वागण्या, बोलण्यातून दिसल्या तर इतक्या लोकांशी तुमचं नातं मजबूत होत जाईल.

सतत संपर्क आणि आदर, आपुलकीची भावना नात्याला घट्ट बांधून ठेवते.

जास्त लोकांशी तुमचं नातं टिकवताना दुसऱ्याच्या नकारात्मक भावनांना सुद्धा सामोरं जावं लागतं, त्यासाठी सतत प्रॅक्टिस करून आपलं मन सकारत्मक भावनांनी मजबूत करून ठेवायला लागतं.

समोरच्या लोकांची निगेटिव्ह भावना आपण बदलून सकारात्मक करायची ताकद आपल्याकडे असायला हवी.

जर आपण काही निगेटिव्ह लोकांच्या गराड्यात सापडलो तरी त्यातून पूर्ण सही सलामत आणि अगदी पॉझिटिव्ह विचार ठेवूनच बाहेर येता आलं पाहिजे.

हे तुमच्या प्रॅक्टिस ने तुम्हाला सहज शक्य होऊ शकतं.

अगदी सध्या आणि सोप्या आहेत या चार गोष्टी. या गोष्टी तुमच्या सवयीचा, वागण्याचा, जगण्याचा भाग बनल्या तर तुमचं व्यक्तिमत्त्व प्रभावशाली व्हायला वेळ नाही लागणार.

हे जमायला लागलं कि भावनिक बुद्धिमत्ता वाढवून, वाढलेल्या बुद्धिमत्तेला चांगलं धारदार बनवू शकता. आणि मोठं यश मिळवू शकता.

हे यश तुमच्या नोकरी व्यवसायातलं असो किंवा सामाजिक कार्यातलं असो. हे तुमच्या स्वतःच्या भावनांचं यश असणार आहे. जसं तुम्हाला हवं तसं.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. Nilkanth Dhat says:

    खूप छान लेख आहे, अतिशय सोप्या भाषेत सांगितला. तुमच्या भावना पोहचल्या. सर्व लेख खूप छान आणि माहितीपूर्ण असतात.

  2. प्रमोद रा. नाईक says:

    खुप सुरेख, जीवनात उपयोगी येईल व भरपूर फायदा होईल अशी माहिती या लेखातून दिलेली आहे.
    मनाचे talks नेहमीच अशी सुंदर जीवन उपयोगी माहिती आपल्या रोजच्या लेखाच्या माध्यमातून देत असते त्या बद्दल लेखकाचे व मनाचे talks संपूर्ण टीम चे मनापासून आभार व खुप साऱ्या शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!