डिएसके, तुमचं चुकलंच…

DSK

माल्या आणि मोदी (ललित आणि आजचा नीरव मोदी) जेव्हा सहज देश सोडुन पळुन जातात मात्र एखादाच डिएसके लोकांना फेस करायचं धैर्य दाखवतो आणि ते प्रामाणिक असल्याची लोकांची आशा टिकुन राहते.

आर्किटेक्चर कॉलेजमध्ये असताना, २००४ मध्ये, मी पुण्यात ट्रेनिंगला होतो. डेक्कन जिमखान्याच्या बाजुला आमचं ऑफीस होतं, आणि तिथेच मी पहील्यांदा डिएसके नाव ऐकलं, ‘घराला घरपण देणारी माणसं’ ही टॅगलाईन आणि एक सुंदर असं ब्रोशर पहील्यांदा पाहीलं आणि मी भारावुन गेलो. ते एक उत्कृष्ट बिल्डर होते, त्यामुळे त्यांच्याविषयी एक आकर्षण तयार झालं होतं.

पुढे २०१२ मध्ये, मी त्यांचं बारामतीच्या कॉलेजमध्ये दिलेलं ‘तुम्ही बि घडाना’ व्याख्यान ऐकलं. डिएसकेंच्या ओघवत्या वाणीतुन त्यांचा जीवन पट ऐकणं म्हणजे अतिशय प्रेरणादायी अनुभव होता. कसबा पेठेतला एका गरीब घरातला मुलगा चार हजार कोटींचा मालक आणि मोठा उद्योगपती कसा होतो? ही विलक्षण थक्क करणारी कहाणी आणि आयुष्यातले बरे वाईट अनुभव डिएसके इतके रंगवुन सांगायचे, की त्या दोन तासात आपणही त्यांच्या आयुष्यात एकरुप होवुन जायचो, त्यांच्या यशाचा प्रवासच ते डोळ्यांसमोर जिवंत उभा करायचे. नंतर त्यांची अशी प्रेरणा देणारी भाषणं ऐकण्याचा छंदच लागला.

शुन्यातुन कोट्यावधींचं साम्राज्य उभं करणारा हा माणुस आज आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलाय, हे बघुन खरचं खुप वाईट वाटतं, जे डिएसके मोठ्या अभिमानाने आपली यशोगाथा जगाला सांगायचे, यशस्वी कसं व्हावं, याचे धडे द्यायचे, तेच अपयशी होतात तेव्हा हे असं का झालं, असं वाटतं. प्रत्येक मोठ्या उद्योजकाच्या आयुष्यातुन, त्यांना मिळालेल्या यश आणि अपयशातुन आपण शिकत राहीलं पाहीजे. म्हणून साठ वर्ष विजयरथावर आरुढ होवुन घौडदौड करणार्या डिएसकेंचा घात कोणकोणत्या गोष्टींनी केला, याचीही उत्तरं शोधली पाहीजेत.

 • कर्ज – आपल्या प्रत्येक भाषणात डिएसके सांगायचे की कर्ज घ्यायला आणि ते अंगावर वागवायला लाजु नका. मराठी माणसाला कर्ज नकोसं वाटतं, आणि काही अंशी ते बरोबर आहे. ऋण काढुन सण साजरा करु नये, ह्या विचारसरणीची लोकं आनंदी आयुष्य जगतात. कर्ज म्हणलं की देणेकरी आले, तगादा आला. जोपर्यंत धंदा दुभत्या गायीसारखा असतो तोपर्यंत सारंकाही आलबेल असतं, पण दुध आटलं की सगळे डोक्यावर पैसे मागण्यासाठी उभे राहतात, आणि बहुतांश धंदे हे बेभरवशाचे असतात, फक्त जेव्हा ते चांगले चालतात तेव्हा संभाव्य धोक्याची कल्पना येत नाही आणि माणुस गाफील राहतो. ‘कर्ज घेणं चांगलचं असतं,” ह्याच वृत्तीने डिएसकेंचा घात केला. छत्तीस वर्ष त्यांनी गुंतवणुकदारांना व्याज दिलं, पण एक वर्ष पुढेमागे झालं आणि लोक हात धुवुन त्यांच्या मागे लागले, कारण प्रत्येकाला स्वतःचा पैसा प्रिय असतो.
 • मिडीया – ज्या मिडीयाचा वापर करुन डिएसके यशस्वी झाले, त्याच मिडीयाने आणि तिची धाकटी बहीण, सोशल मिडीयाने डिएसकेंना रस्त्यावर आणण्यात मोलाची भुमिका बजावली. मिडीया हे दुधारी शस्त्र आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. चाळीसपन्नास वर्ष कष्ट करुन कमवलेलं गुडविल काही महीन्यात मातीमोल झालं. समोर उभं राहायची पात्रता नाही असे लोक डिएसकेंचा अपमान करताना दिसले.
 • माध्यमांनी केलेली प्रसिद्धी आणि अपप्रसिद्धी दोघांचाही आपल्यावर परीणाम होवु देऊ नये, हेचं खरं, कारण मिडीयात ‘चमकोगिरी’ करुन माणुस जितक्या वेगाने वर जातो, तो थोडासाही चुकल्यास तितक्याच वेगाने त्याला आपटण्यात मिडीया किंचितही कसुर करत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
 • विश्वासार्हता – डिएसकेंना त्यांच्या आयुष्यातलं पाचशे रुपयांचं पहीलं कर्ज मामा काणेंनी मिळवुन दिलं तेव्हा ते म्हणाले होते, डिएस. हे पाचशे रुपये बॅंकेला ठरलेल्या अवधीत परत कर, एके दिवशी ही बॅंक तुला पाच लाखाचं कर्ज देईल. ते पैसे परत करुन डिएसकेंनी बॅंकेचा विश्वास जिंकला, ह्याच विश्वासार्हतेने डिएसकेंच कर्ज चारशे कोटीपर्यंत पोहचलं. पण अचानक त्यांच्यावर पैशाच्या अफरातफरीचे आरोप व्हायला लागले, आणि त्याचं जग उध्वस्त व्हायला लागलं. त्यांच्याकडे अलिशान गाड्या आहेत, ट्रंप टॉवरमध्ये त्यांचा फ्लॅट आहे, तरीही ते ठेवीदारांना पैसे का देत नाहीत, अशा बातम्यांनी त्यांची क्रेडीबिलीटी ढासळली.
 • कधीकाळी सगळ्यांना हवेहवेसे डिएस आता सगळ्यांचे नावडते झालेत. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत ते सांगताना दिसतात की आधी एक फोन केला की नेतामंडळी, आधिकारीवर्ग पाचकोटी, दहाकोटी अगदी सहज द्यायचा, आता कोणीही देत नाही. एकाएकी सगळ्यांनीच त्यांच्यावर विश्वास ठेवणे का बंद केले? किंवा अचानक सर्व ठेवीदारांनी आपापले पैसे वापस का मागीतले? कुठेतरी विश्वासाला तडा गेला म्हणुन.
 • शनिदेव – आपल्या प्रत्येक भाषणात डिएसके लक्ष्मी आणि शनिदेवाची गोष्ट सांगायचे, वाह रे शनिदेवा!, तु जाताना किती चांगला दिसतोस, आणि आकर्षणाच्या नियमानुसार त्या शनिदेवाने डिएसकेंना गाठलेच. बांधकाम क्षेत्रात मंदी सुरु होती, नंतर डीएसकेंचा गंभीर अपघात झाला, त्यातुन सावरतात तोच नोटबंदी झाली, ह्या सगळ्यात कुंभाराचे विजयास्त्र मागे लागले ज्याने डिएसकेंना सळो की पळो करुन सोडले, डिएसके ह्या सगळ्या गोष्टींचं खापर शनिदेवावर फोडु लागले. कधीकाळी सावरकरांना आदर्श मानणारा, कसल्याही स्थितीत न डगमगणारा, इतरांना “घाबरु नका, हिंमत बाळगा”, असं सांगणारा माणुस, परिस्थीतीसमोर, ग्रहांसमोर हतबल होताना पाहुन खरचं वाईट वाटतं.
 • हात पसरणारे डिएसके – जे डिएसके आपल्या भाषणात सांगायचे की नौकरी मागण्यासाठी हात पसरु नका, तेच डिएसके आज, हजारो कोटींची जायदाद असताना, समाजापुढे जाऊन हात पसरुन क्राऊड फंडींगचं दान मागतायतं. ही गोष्ट मनाला खटकते. विवीध शंका उपस्थित करते.
 • एवढं सगळं असुनही एक मान्य करावेच लागेल, वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी जेव्हा लोक रीटायर्ड होवुन बिनकामाचे आणि बिनाधंद्याचे बनुन, अळणी आणि सपाट आयुष्य जगत मरण येण्याची वाट पाहतात, त्या वयातही डिएसके एका असामान्य उर्जेने आणि तडफेने काम करतात, बोलतात, कोर्टाच्या फेर्या मारतात, ते पाहुन आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

माल्या आणि मोदी (ललित आणि आजचा नीरव मोदी) जेव्हा सहज देश सोडुन पळुन जातात मात्र एखादाच डिएसके लोकांना फेस करायचं धैर्य दाखवतो आणि ते प्रामाणिक असल्याची लोकांची आशा टिकुन राहते. ह्या वयातही, आणि अशा भयानक आर्थिक संकटातही त्यांचा जिंवत आशावाद कायम आहे हे त्यांच्या प्रत्येक स्पष्टीकरणात आणि आवाहनात दिसतं.

रोजच हजारो लोक एकमेकांना फसवतात, त्याचं कोणाला सोयरसुतक नसतं, एखादा उद्योजक व्यवसायात अपयशी होतो, तेव्हा त्याचा इतका मोठ्ठा गवगवा कधीच होत नाही, मात्र तो डिएसके असेल तर समाजाला ते चालत नाही. कारण ह्याच समाजाला कधीकाळी डिएसकेनी प्रामाणिकपणाचे आणि मोटव्हेशनचे डोस पाजलेले असतात, त्यामुळे त्यांच्या क्षुल्लक चुकीलाही माफी नसते. आपण कशा प्रकारे समाजाचे आदर्श आहोत, हे सांगणाऱ्याला तसुभरही चुकण्याची परवानगी नसते.

आणि म्हणुन मग, असं काही झालं की, आतापर्यंत त्यांच्या पाठीशी उभं राहणारं सगळं जग त्यांना म्हणु लागतं, डिएसके, तुमचं चुकलंच!…

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

2 Responses

 1. Abhi Shinde says:

  Please share your contact details to get details about courses

 2. Pankaj says:

  कोर्सच्या माहितीसाठी ९८२२३९९६८० या व्हाट्स ऍप्प नम्बरवर ‘LOA UPDATES ‘ असा मेसेज पाठवा. नवीन batch सुरु होताना तुम्हाला माहिती दिली जाईल.

  धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!