घ्या जाणून सेल्फ क्वारंटाईन मध्ये काय काय करता येईल?

जनता कर्फ्यु आणि सेल्फ क्वारनटाईन

कोरोनाला घाबरू नका!! घरात बसा. विषाणूचा फैलाव थांबला तर परिस्थिती आपोआपच आटोक्यात येईल. आणि म्हणून हे सगळं छान छान कसं आहे आणि हा वेळ एन्जॉय करत कसा घालवायचा ते वाचा या लेखात.

अज्ञातवास, विलगिकरण किंवा क्वारंटाईन मध्ये असणे ही एक शिक्षा वाटतेय का तुम्हाला..??

पण आपण ह्याला एक संधी म्हणून बघुयात का..? आता तुम्ही म्हणाल कोरोनाचा प्रादुर्भाव हा एक चिंतेचा विषय असल्यावर ह्यात कसली आलीये संधी..??

अहो पण जरा विचार करा.. ज्या कोरोनाने आपल्याला इतक्या चांगल्या सवयी लावल्या त्यात चांगल्या संधीही सापडतीलच की नाही..?!

आता बघा ना..

एरवी कितीही ऊन असो, पाऊस असो किंवा थंडी आपल्याला कोणी सुट्टी देतं का..?? नाही ना..!!

आपण आपल्या रोजच्या आयुष्यात किती गुरफटलेले असतो.. सकाळी उठणे, आवरणे, कामावर जाणे, घरी येणे, जरा वेळ टाईम पास करणे आणि झोपी जाणे..

ह्या व्यतिरिक्त विकेंड ला जरा मोकळा श्वास घ्यावा म्हणावं तर बाहेर जावे लागते, ऑफिस मधून अचानक एखादी अर्जंट टास्क येते.. कधी आपणच आजारी पडतो आणि मग वीकएंडचाही सत्यानाश होतो..

पण ही कोरोना मुळे सगळ्यांना सक्तीची सुट्टी अनायसे मिळाली आहे.. काहींना वर्क फ्रॉम होम आहे, ज्यात ते ऑफिसला लागणारे काम घर बसल्या करून देऊ शकतात..

आता बघा जरी ऑफिस चे काम करावे लागणार असले तरी आराम आहे ना..!! ऑफिस मध्ये त्या टेबल खुर्ची शिवाय पर्याय नाही..

पण घरी तुम्ही सोफ्यावर, टीव्ही बघता बघता किंवा अगदी आपल्या गाद्या गिरद्यांवर लोळत आपले काम करू शकता..

घरचे बनवलेले जेवण, चहा, स्नॅक्स चा आनंद घेऊ शकता.. आणि मुख्य म्हणजे ऑफिसला जायचा यायचा वेळ ही वाचला असल्याने तुम्हाला इतरही खूप कामं करता येऊ शकतात..

आणि यातून आणखी एक शक्यता काय आहे माहित आहे का? या अनुभवातून पुढे मागे आपल्या भारतात सुद्धा ‘वर्क फ्रॉम होम’ चं कल्चर सुरु होऊ शकतं.

उद्याच्या कर्फ्यु करता किंवा पुढील आठवड्याच्या होम क्वारनटाईन करता आम्ही आज काही आयडियाज आणल्या आहेत.. बघा तर करून..

१. वर्षानुवर्षे घ्यायची राहिलेली झोप पूर्ण करा:

होय कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून डॉक्टरदेखील पुरेशी झोप घ्यायला सांगत आहेत.. मग ही तर आयती संधी आहे…

ना सकाळी लवकर उठायची घाई, ना कुठे जाण्याची आवराआवर..!! मग काय झोपा की निवांत..

किती वर्षात अशी निवांत झोप घेता अली नसेल ती आता पूर्ण करा. बघा हा कोरोनाचा धोका टळल्यावर तुम्ही पुन्हा ऑफिस मध्ये जाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक तजेला असेल..

मग आजच तो अलार्म बंद करून टाका आठवडाभरासाठी आणि लावा ब्रह्मानंदी टाळी..!!

२. कुकिंग शिकून घ्या:

नामी संधी आहे आईला किंवा बायकोला खुश करण्याची.. तुमचे जेंडर कोणतेही असुद्या पाककला शिकणे हल्ली गरजेचे आहे..

त्यात तुम्ही आईला किंवा बायकोला मदत म्हणून शिकणार असाल तर सोने पे सुहागा..!!

सगळेच घरात म्हटल्यावर घरच्या सुगरणीला नक्कीच पदर खोचून स्वयंपाकघरात उभे राहावे लागत असणार.. मग करा की थोडी मदत..

तुम्हालाही खूप मज्जा येईल.. ओबडधोबड का असेना स्वतः काहीही केल्याचा अभिमान वाटेल तो वेगळा..

३. बाग काम करा:

गच्चीवरील बाग हा आमचा लेख तुम्ही वाचलेच असेल.. लेखाच्या शेवटी लिंक बघा👇

जर तुमच्या गच्चीवर, बाल्कनीत छोटीशी बाग असेल तर आत्ता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तिला अजून फुलवायला..

नवीन रोपं लावा, तण काढा, खत घाला, माती बदला अशी बरीच कामं तुम्हाला करता येतील.. तसंही उन्हाळा दारापाशी येऊन ठेपला आहेच त्यामुळे आपल्या बागेची काळजी घेणे सुरू करा..

उन्हाळ्यात हिरवीकंच बाग किती आल्हाददायक असेल..?!!

४. घरातल्या बालगोपाळांचे शिबिर घ्या:

शाळेला सुट्ट्या असल्याने आणि घराबाहेर जाता येत नसल्याने घरातली चिल्लीपील्ली खूपच कंटाळली आहेत हे दृश्य सध्या सगळीकडेच दिसत आहे..

टीव्ही तरी किती पाहणार..? व्हिडीओ गेम किती खेळणार..??

त्यामुळे त्यां वैतागलेल्या लहानग्यांना एकत्र जमवा आणि त्यांची वेगवेगळी शिबिरं घ्या..

त्यांना गॅसविरहीत रेसिपी शिकवा, चित्रकला हस्तकलेचे वर्ग घ्या.. त्यांच्याशी पत्ते, कॅरम खेळा.. उन्हाळ्यासाठी पक्ष्यांसाठीची घरटी, पाणपोई इत्यादी बनवण्यात मुलांना गुंतवा..

वाचन, गप्पा गोष्टी, सागरगोट्या, काचपाणी, भातुकली आणि इतर खेळ जे आपण पूर्वी खेळायचो जेव्हा टीव्ही नव्हते ते त्यांना शिकवा..

संध्याकाळी पाढे, श्लोक, परवचा म्हणवून घ्या.. तुम्हालाही तुमच्या बालपणात गेल्याचे सुख मिळेल आणि मुलांना ही काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी केल्याचा आनंद..!!

५. दुरुस्त्या करा:

वस्तू, इलेक्ट्रॉनिक समान, कपडे, नळ, खेळणी कशाचीही हलकी फुलकी दुरुस्ती कित्येक दिवस लांबलेली असल्यास ती मार्गी लावा..

६. वाचन, लिखाण आणि वेबसिरीज इज अ मस्ट:

बकेट लिस्ट मधली किंवा अर्धवट राहिलेली पुस्तकं असो, राहिलेले लिखाण असो वा वेबसिरीज सगळ्यांचा धडाका लावून टाका.. काहीही राहायला नको.. किमान ३-४ तास तरी तुमचे मजेत जातील..

७. जुने सिनेमे आणि नाटकं पहा:

हे कोणाला आवडत नाही?? हल्ली स्वस्त झालेला डेटा आणि ऑनलाइन अवेलेबल असलेले नाटक, सिनेमे हे जबरा कॉम्बिनेशन आहे..

डोन्ट मिस इट.. पॉपकॉर्न चा टब घ्या आणि जा भूतकाळात..

८. कौटुंबिक खेळ खेळा:

पिक्शनरी, बिझनेस, पत्ते, अंताक्षरी, क्लू गेम, डम्ब शेराड्स हे सगळं किती वर्षात नाही खेळला हो तुम्ही..?? विसरला तर नाही ना..?? बघा बरं खेळून की अजूनही तुम्हीच किंग आहेत त्यात की लुझर होताय..!! 😝

९. आवडत्या कलेचा रियाझ करायची हीच योग्य वेळ:

ऑफिस वरून आल्यावर गाणी ऐकायला, गायला वेळच नसतो.. चित्र नुसतीच काढून ठेवलीत रंगवायला वेळ नाही..

घुंगरू माळ्यावर ठेवलेत आणि कथकचे तोडे सुद्धा करून वर्षे लोटली.. त्या आवडत्या सिनेमाचा, नाटकाचा डायलॉग ऐकायला सगळ्यांचे कान तरसले असतील.. मग बरसा की तुम्ही.. वाट कोणाची पाहताय..??

१०. व्हिडीओ कॉल चा पुरेपूर वापर करा:

नातेवाईकांना, मित्रांना भेटता येणार नाहीये.. कोरोनाला तर हरवायचं.. मग अंबानी झिंदाबाद.. कशाला इतकं नेट स्वस्त केलंय त्याने..??

ह्याच साठी केलाय हा अट्टाहास.. मस्त कॉनकॉल लावा.. सगळ्यांशी बोला.. विचारपूस करा.. खुशाली कळवा..

सोशल डिस्टनसिंग करा पण सोशल मीडिया पुरेपूर वापरा.. कोरोनाला घाबरू नका काळजी घ्या, मजेत राहा.. आणि घरात राहा.. असाच आनंद घ्या आणि आनंद द्या..

एरवी कुटुंबाची तक्रार असते वेळ देत नाही मग आता फक्त कुटुंब एके कुटुंब.. त्यांना पुरेपूर वेळ द्या.. कोरोनापासून दूर जा आणि कुटुंबाच्या जवळ या.. आहे की नाही ही बेमालूम संधी..?? मग कशाला दवडता..?!!

आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाचेtalks चे लेख वाचून, कमेंट्स चा पाऊस पाडून आमच्याशी बोलायला विसरू नका

लेखन: सोनिया हसबनीस – सावंत

वाचण्यासारखे आणखी काही:

घरात साचणाऱ्या कचऱ्यातून गच्चीवरील मातीविरहीत बाग कशी साकारायची?

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी तसेच स्वविकास करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

3 COMMENTS

  1. जनता करफू मध्ये काशी काळजी घ्यावी याची खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.