कपड्यांवरचे चिवट, चिकट हळदीचे डाग घालवण्याचे काही रामबाण उपाय

कपड्यांवरचे चिवट चिकट हळदीचे डाग

कपड्यांवरचे आंब्याचे, चहाचे डाग बघून फक्त जाहिरातीतलीच आई हसू शकते.

प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे चिकटून राहणारे, अजिबात न जाणारे डाग बघितले की कोणालाही टेन्शनच येईल, त्यात कपडे जर नवीन असतील आणि पहिल्यांदाच घातले असतील तर काही विचारायलाच नको.

काही डाग मुळातच अवघड असतात, कितीही धुवा, घासा, रगडा तरी निघता निघत नाहीत. एकवेळ कपडे विरून फाटायला येतील पण तो डाग जशाच्या तसा!

असाच एक अवघड, सहजासहजी न हटणारा डाग म्हणजे हळदीचा!

आपल्या भारतीय स्वयंपाकात हळद म्हणजे फार महत्वाचं जिन्नस. चिमूटभर का होईना सगळ्याच पदार्थांच्या फोडणीत हळद ही असतेच.

काही ग्रेव्ही अशा असतात की त्यात हळदीचा अगदी सढळ हाताने वापर केलेला असतो, काही लोणच्यांमध्ये सुद्धा हळद असतेच आणि शिवाय हळदीचं लोणचं सुद्धा असतंच!

त्यामुळे आपल्या कपड्यांवर हळदीचे आणि तेलाचे भयंकर पिवळे डाग पडत असले तर नवल वाटायचं काही कारण नाही..

हां, हे डाग जर आपल्याला घालवता आले तर ते मात्र नवल वाटण्यासारखं आहे आणि म्हणूनच,

आज आम्ही तुमच्यासाठी हे चिवट, चिकट हळदीचे डाग घालवण्याचे काही रामबाण उपाय घेऊन आलोय.

या लेखात दिलेले उपाय प्रत्यक्षात करताना मात्र एक काळजी अशी घ्यायची आहे की, आपल्या कपड्यांच्या लेबलवरच्या सूचना नीट वाचायच्या कारण यातल्या काही उपायांमध्ये ज्या पदार्थांचा वापर आहे ते नाजूक लोकरीच्या किंवा सिल्कच्या कपड्यांवर चालेलच असं नाही त्यामुळे त्याची काळजी घ्यायची.

हळदीचे डाग दोन प्रकारचे असतात, कधीकधी हळदकुंकू लावताना किंवा महिन्याचं सामान भरताना कोरडी हळद आपल्या कपड्यांवर उडते.

अशा वेळेस त्यावर पाणी लावण्याची फार मोठी चूक आपण करतो. अशा डागांना पाण्याचा एक थेंब सुद्धा लागू द्यायचा नाही.

1) कपड्यांवर उडालेली हळद सगळ्यात आधी हाताने किंवा कोरड्या ब्रशने झटकून घ्यायची. यानंतर सुद्धा त्यावर आधी पाणी न लावता आधी घरात वापरात असलेला कोणताही liquid detergent घालायचा आणि बोटं गोल गोल फिरवत अलगद चोळायचं आणि मग थोडंसं पाणी लावून डिटर्जेन्ट धुवून टाकायचा.

कधीकधी जास्त मोठा डाग पडला असेल तर असं एकदोन वेळा करावं लागेल.

2) हळदीचा दुसऱ्या प्रकारचा आणि जास्त भीतीदायक असा डाग म्हणजे भाजी, रस्सा किंवा लोणच्यातल्या! म्हणजे हळद आणि तेल असा एकत्र डाग.

असा डाग पडला की सगळ्यात आधी एक टिश्यू पेपर घेऊन कपड्यांवरच तेल शोषून घ्यायचं मात्र हे करताना टिश्यू पेपर फक्त अलगद त्या डागावर ठेवायचा जर चुकून तो चोळला तर डाग अजूनच पसरेल आणि तो काढायला जास्त अवघड जाईल.

एकदा सगळं तेल शोषून घेतलं की मग त्यावर किमान वीस मिनिटांसाठी तरी कॉर्नफ्लोअर भुरभुरून टाकायची, समजा कॉर्नफ्लोअर आपल्याजवळ नसेल, तर त्या ऐवजी आपण लिंबाचा रस टाकून ठेऊ शकतो.

नंतर सुद्धा अजिबात पाणी न लावता आधी liquid detergent चोळून डाग घालवून घ्यायचा आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. हा उपायाने कपड्यांवरचे हळदीचे डाग न पसरता हमखास जातील.

पण सगळे कपडे सारखे नसतात, काही जास्त नाजूक, कधीतरीच घालायचे असे असतात तर काही अगदी रोजच्या वापरातले असतात. त्यांचा बाबतीत थोडा हलगर्जीपणा खपण्यासारखा असतो.

असंच कपड्यांचं एक महत्वाचं वर्गीकरण म्हणजे पांढरे, फिकट रंगांचे कपडे आणि काळे किंवा डार्क रंगाचे कपडे. आपल्याला माहीतच आहे की फिकट रंगाचे कपडे एरवी धुताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते त्यामुळे त्याच्यावर जर डाग पडला असेल आणि तो सुद्धा हळदीचा तर अर्थातच त्याची पद्धत वेगळी असणार.

तर असे फिकट रंगाचे किंवा पांढऱ्या कपड्यांवर जर का चिकट हळदीचे डाग पडले तर काय करायचं?

कपड्यांवरचे चिवट चिकट हळदीचे डाग

पांढऱ्या रंगांच्या कपड्यांवर पडलेले हळदीचे डाग घालवण्याचे दोन जालीम उपाय आहेत, एक म्हणजे ब्लीच वापरून आणि दुसरा व्हिनेगर वापरून.

ज्या कपड्यांना ब्लिच चालत नाही त्याला आपण व्हिनेगर वापरू शकतो. या लेखात आपण दोन्ही पद्धती बघणार आहोत.

दोन्ही पद्धतींमध्ये कपड्यांना अत्यंत नाजूकपणे हाताळणे गरजेचे आहे.

ब्लिच वापरून: आपण आधी वाचल्याप्रमाणे कोरडी हळद पडली असेल तर नुसती झटकून घ्यायची आणि हळदीचा डाग पडला असेल तर तो साध्या टिश्यू पेपरने अलगद टिपून घेऊन मग त्या डागावर थोडा बेकिंग सोडा घालून ठेवायचा.

आणि एकीकडे एका छोट्या स्प्रे बॉटल मध्ये अर्धा कप व्हिनेगर, एक चमचा भांडी घासायचं liquid आणि अर्धा कप पाणी घालून क्लिनिंग सोल्युशन तयार करून घ्यायचं.

पाच एक मिनिटांनी बेकिंग सोडा घातलेल्या डागावर हे सोल्युशन त्याची साधारण पेस्ट होईल इतपत फवारायचं.

डाग फिकट होईपर्यंत आपल्या बोटांनी चोळत राहायचं. साधारण तीन ते चार मिनिटात डाग फिका पडायला लागतो, मग साध्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं.

या नंतर एका बादलीत एक कप ब्लिच घालायचा आणि त्यात डाग पडलेला ड्रेस साधारण वीस मिनिटं भिजत ठेवायचा.

आपण कोणत्या ब्रॅण्डचा ब्लिच वापरतो त्यावर त्याचं प्रमाण ठरतं त्यामुळे त्याबद्दलची सूचना ब्लिचच्या बाटलीवर वाचून घ्यायची पण साधारणतः हा वेळ वीस मिनिटांपर्यंत असतो.

या नंतर मग स्वच्छ पाण्याने एकदा पूर्ण ड्रेस धुवून घ्यायचा. फिकट रंग असल्यामुळे कधीकधी या नंतर सुद्धा ड्रेसवर थोडा डाग शिल्लक राहतोच त्यासाठी मग परत अर्धी बादली पाण्यात एक कप बेकिंग सोडा घालायचा आणि त्यात ड्रेस रात्रभर भिजवून ठेऊन सकाळी उठून स्वच्छ धुवायचा आणि डाग पूर्णपणे गेला की मग नेहमी वाळवतो तसं वाळवायचं.

व्हिनेगर वापरून: सिल्कच्या नाजूक कपड्यांना ब्लिच करून चालत नाही पण अशा कपड्यांवर हळदीचे डाग पडणार नाहीत असं नसतं त्यामुळे अशा नाजूक कपड्यांवर पडलाच असा एखादा डाग तर काय करायचं या साठी ही पद्धत.

एका बाऊलमध्ये दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा भांडी घासायचं liquid यांचं मिश्रण करून फक्त डाग पडलेला भाग त्यात अर्धा तास भिजून ठेवायचा आणि मग गार पाण्याने धुवायचा.

डाग बऱ्याच प्रमाणात फिकट झालेला असेल त्यानंतर नेहमीसारखं एका बादलीत डिटर्जेन्ट liquid घेऊन त्यात डाग पडलेला ड्रेस भिजवून ठेवायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचं, आता डाग पूर्णपणे गेलेला असेल.

या दोन झाल्या पांढऱ्या, नाजूक कपड्यांवरचे डाग काढायच्या पद्धती.. पण डार्क कपड्यांचे काय?

त्यांच्यावर इतके नाजूक उपचार करून उपयोग नसतो. पण एक आहे, पांढऱ्या कपड्यांच्या मनाने डार्क कपड्यांवरचे डाग घालवणं जास्त सोपं असतं. कसं ते आपण बघू.

 

डार्क कपड्यांवरचे चिकट हळदीचे डाग कसे घालवायचे?

कपड्यांवरचे चिवट चिकट हळदीचे डाग

पद्धत १: 

डागावर आपण वापरत असलेलं liquid डिटर्जेन्ट घालून, बोटांनीच चोळून साधारण अर्धा तास ठेवायचं आणि मग गार पाण्याने धुवून घ्यायचं.

डाग बऱ्याच प्रमाणात कमी झालेला असेल. त्यानंतर मग एका पेपर टॉवेलवर व्हिनेगर घ्यायची आणि त्या डागावर ठेऊन द्यायचं. थोड्या वेळाने डाग गेलेला असेल मग आपल्या नेहमीच्या पद्धतीने ड्रेस धुवून घ्यायचा.

पद्धत २:

काही डाग प्रचंड चिवट असतात. जर वरच्या पद्धतीने सुद्धा डाग गेला नाही तर काय करायचं हे आपण या पद्धतीत बघू.

पांढऱ्या कपड्यांसाठी केलं होतं तसं दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा भांडी घासायचं liquid एकत्र करून क्लिनिंग सोल्युशन तयार करून घेऊन त्यात डाग पडलेला भाग अर्धा तास बुडवून ठेवायचा आणि मग गार पाण्याने धुवायचा.

या नंतर मग कपडे धुवायची पावडर त्या डागावर घालायची आणि जुन्या टूथब्रशने तो डाग जाईपर्यंत खसाखसा घासून काढायचं. डाग गेला की मग परत नेहमीच्या पद्धतीने ड्रेस धुवून घ्यायचा.

आहेत ना सोप्या पद्धती? मग पुढच्या वेळेला असे अवघड डाग पडले की घाबरून न जाता हे उपाय करून बघणार ना?

अशेच स्वयंपाक घरातले किंवा इतर ग्रीस, तेल लागलेले डाग घालवण्याच्या तुमच्यापण काही पद्धती असतील तर कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या मित्र मैत्रिणींना लेख शेअर करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!