ओठांचा काळपटपणा घालवण्याचे पाच उपाय

ओठांचा काळपटपणा घालवण्याचे पाच उपाय

ओठांच्या काळपटपणाला कंटाळात? घरच्याघरी ओठांचा काळपटपणा घालवून ओठ मऊ, टवटवीत आणि गुलाबी करण्यासाठी हा लेख वाचा

गुलाबी ओठ म्हणजे सौन्दर्याचं एक लक्षण हे जरी खरं असलं तरी ते तेवढ्यापुरतंच मर्यादित आजिबात नाहीये.

गुलाबी आणि टवटवीत ओठ म्हणजे निरोगीपणाचं सुद्धा लक्षण आहे.

थंडीत जेव्हा ओठ फुटतात तेव्हा त्यातून बऱ्याचदा रक्त येतं, दुखतं आणि ते दिसायला सुद्धा चांगलं दिसत नाही, हो ना?

मग आपण काय करतो? आपल्या नकळत त्यावरून जीभ फिरवतो.

पण त्याने फायदा होतो का? तर नाही असं केल्याने ओठ अजूनच कोरडे आणि काळपट पडतात.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण केवळ थंडी हे एकमेवं कारण नाहीये, इतर अनेक कारणं आहेत त्यामुळे ओठ कोरडे आणि काळपट पडतात.

जसं की उन्हात खूप वेळ राहिल्याने, एखाद्या लिपबामची किंवा लिपस्टिकची ऍलर्जी, वाईट क्वालिटीची लिपस्टिक, लिपग्लॉस वापरल्याने, तंबाखू किंवा सिगारेटचं व्यसन, प्रमाणाबाहेर चहा किंवा कॉफी पिणं, पाणी कमी पिणं, स्ट्रेस अशी अनेक कारणं आहेत.

आपल्याबाबतीत यापैकी एक किंवा जास्त कारणं असू शकतात.

काही असलं तरी हे मात्र खरं आहे की काळपट ओठ कोणालाच नको असतात.

त्यासाठी मग आपण आपले कृत्रिम उपाय करतो जसं की सारखी लिपस्टिक लावणे, कारण आपला एक गैरसमज असतो की कॉस्मेटिक उपचार खूप खर्चिक असतात शिवाय वेळखाऊ पण असतात त्यामुळे आपण बाहेर जाताना लिपस्टिक लावून जाण्याचा सोपा मार्ग स्वीकारतो.

पण जर तुम्हाला असं कळलं की आपण घरच्याघरी, घरी असलेल्या साहित्यातूनच ओठांचा काळपटपणा घालवू शकतो तर?

आम्ही आज तुमच्यासाठी असेच ओठांचा काळपटपणा, कोरडेपणा आणि इतर तक्रारी घालवण्यासाठी घरच्याघरी, घरात नेहमी असणाऱ्या पदार्थांपासूनच करता येतील असे रामबाण उपाय घेऊन आलोय..

पण एक लक्षात घ्या ‘पी हळद अन हो गोरी’ असं होत नसतं त्यामुळे यासाठी तुम्हाला काय करायचंय?

तर चिकाटीने हे करत रहायचं आहे.

लगेच तुम्हाला हवे तसे ओठ झाले नाहीत तरी न कंटाळता हे उपाय सातत्याने करत रहायचे आहेत.

चला तर मग बघूया असे कोणते घरगुती उपाय आहेत ज्याने ओठांचा काळपटपणा जाऊ शकतो.

१. मध आणि साखरेचा स्क्रब

आहे की नाही सोपा उपाय? मध आणि साखर आपल्या सगळ्यांच्याच घरात असते.

मग आपल्याला आठवड्यातून तीन दिवस फक्त पाचच मिनिटं वेळ काढून एक चमचा साखर आणि एक चमचा मध असं मिश्रण घेऊन एक मिनिटभर ते आपल्या ओठांवर हलक्या हाताने चोळायचं आहे.

याने काय होतं?

ओठांवरची जी डेड स्किन असते (ज्यामुळे ओठ फुटल्यासारखे दिसतात) ती साखरेमुळे निघून जाते आणि मधाच्या ओशटपणामुळे ओठांच्या आतल्या भागाला ओलावा मिळतो.

यामुळे हळूहळू सगळी डेड स्किन निघून जाऊन ओठांना योग्य प्रमाणात ओलावा मिळेल, याचा अजून एक फायदा म्हणजे चोळल्यामुळे ओठांना मसाज होईल ज्यामुळे ओठांमध्ये रक्तपुरवठा वाढेल मग आपोआप काळपटपणा नाहीसा होऊन तुमचे ओठ छान मऊ, गुलाबी होतील.

२. डाळिंबाचे दाणे आणि साय

त्वचेचा काळपटपणा हा त्वचेत तयार होणाऱ्या मेलॅनिन नावाच्या पिगमेंटमुळे येतो.

उन्हात जास्त वेळ राहिल्याने हे मेलॅनिन जास्त प्रमाणात तयार होतं आणि त्याचमुळे काळपटपणा येतो.

डाळिंबामध्ये ‘पुनीकॅगालीन’ नावाचं एक द्रव्य असतं ज्यामुळे मेलॅनिन, पिगमेंटेशन कमी होतं.

जास्त वेळ उन्हात राहून जर ओठ काळे पडत असतील तर हा त्यावरचा सोपा उपाय आहे.

डाळिंबाच्या बिया मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायच्या आणि त्यात ताजी साय घालून पेस्ट करून घ्यायची आणि रोज ओठांवर पाच मिनिटांसाठी लावून ठेवायचं.

साधारण पाच मिनिटांनी ते वाळल्यावर थंड पाण्याने हळूच ओठ धुवून घ्यायचे. हा सोपा उपाय रोज एकदा केला तर महिनाभरातच फरक दिसू शकेल.

३. लिंबू आणि बदामाचं तेल

लिंबामुळे त्वचेवरचे डाग कमी होतात, उन्हाचा काळपटपणा सुद्धा कमी होतो.

पण याच लिंबामुळे ओठांचा सुद्धा काळपटपणा जाऊन ओठांना नैसर्गिक गुलाबी छटा येते.

अर्ध्या लिंबाचा रस एक चमचा बदामाच्या तेलात घालून नीट मिक्स करून ओठांना रोज रात्री झोपताना लावला तर महिनाभरात फरक पडतो.

लिंबामुळे ओठांचा काळपटपणा जातो आणि बदामाच्या तेलामुळे ते मऊ होतात.

४. बीट

बीट खाल्यावर ओठच काय हात, जीभ सुद्धा लाल होते. बीटाचे खूप फायदे आहेत.

ओठांच्या आरोग्यासाठीचा फायदा मात्र आपल्याला माहीत नसतो.

एक चमचा बीटाचा रस आणि एक चमचा मध असं मिश्रण करून घेऊन रोज रात्री झोपताना थोडं ओठांवर लावून हलका मसाज केला तर महिनाभर काय आठवड्याभरातच ओठांच्या सगळ्या तक्रारी दूर होतील आणि तुमचे ओठ सुंदर, मऊ, गुलाबी होतील.

५. लिंबू आणि साखर

लिंबात असलेल्या सायट्रिक ऍसिडमुळे काळे डाग कमी होतात आणि साखरेमुळे डेड स्किन नाहीशी होते.

त्यामुळे हा सुद्धा ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठीचा एक हमखास उपाय आहे.

लिंबाच्या एका पातळ कापावर थोडी साखर घालून ओठांवर चोळायचं, मात्र हा उपाय रोज करायचा नाही.

आठवड्यातून दोनदा केला तरी फरक दिसून येतो.

काही जणांना, ज्यांची त्वचा एकदम पातळ आणि नाजूक असते अशांना लिंबामुळे झोंबू शकते त्यामुळे नाजूक त्वचा असेल तर हा उपाय जरा सांभाळूनच करावा.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की हे उपाय घरच्याघरी, कमीतकमी साहित्यात आणि वेळात करण्यासारखे आहेत आणि मुख्य म्हणजे आजिबात खर्चिक नाहीत. आणि त्याचा वाईट परिणाम काहीही होणार नाही.

यासाठी फक्त नियमितपणा गरजेचा आहे. यातले एक किंवा दोन जे तुम्हाला सोयीस्कर असतील असे उपाय तुम्ही करून बघू शकता.

हे उपाय करत असतानाच लक्षात ठेवायच्या काही गोष्टी.

१. बऱ्याच समस्यांचं मुळ आपल्या आरोग्याशी निगडित असतं आणि बाह्य उपचारांनी दरवेळेला फरक पडलेच असं नाही त्यामुळे या उपायांबरोबरच भरपूर पाणी पिणे, व्यायाम करणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.

२. कोणताही मेकअप ओठावर रात्रभर राहता कामा नये. त्याने ओठांना काळपटपणा येतो त्यामुळे झोपायच्या आधी ओठ स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करावेत.

३. सिगारेट, तंबाखूमुळे ओठ काळे पडतात त्यामुळे अशा गोष्टींपासून (आपल्या तब्येतीसाठी सुद्धा) लांबच राहावं.

४. सारखी ओठांवरून जीभ फिरवल्याने सुद्धा ओठ काळे पडतात त्यामुळे तशी जर सवय असेल तर ती बदलायचा प्रयत्न करावा.

५. बाजारात मिळणाऱ्या लीपबाम मध्ये केमिकल्सचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. त्यापेक्षा घरच्याघरी ओठांना लोणी लावलं तर अधिक फायदा होऊ शकतो.

आहेत ना सोपे उपाय? मग आजच सुरुवात करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सुद्धा हा लेख शेअर करून सांगा!

मनाचे श्लोक

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 Response

  1. जयंत बुवा says:

    खुप छान माहिती दिली, थंडी व पाठोपाठ येणारा उन्हाळ्यात ओठांच्या समस्या निर्माण होतात, त्यावर वरील लेखातील टिप्स अतिशय उपयुक्त आहे! धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!