तुम्हाला माहित आहेत का, घरातली हवा शुद्ध करणारी हि इनडोअर झाडे!!

घरातली हवा शुद्ध करणारी हि इनडोअर झाडे

आपल्या आजूबाजूच्या वातावरणात खूप वायूप्रदूषण असते.

धूळ, मातीचे कण, गाडीचे धूर, कारखान्यातून निघालेला धुर हे सगळे प्रदूषण आपल्या आजूबाजूला असते.

शहरातील लोकांना याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो.

विशेषतः शहरात मध्यवर्ती भागात राहणाऱ्यांना.

वाहने, कारखाने हे बंद तर होणार नाहीतच उलट जसजसा देश प्रगत होत जाईल तसेतसे ते वाढतच जाईल.

यामुळे जसे आपल्या आजूबाजूला प्रदूषण होते तसेच ते आपल्या घरात सुद्धा होत असते.

आजूबाजूच्या परिसरात झाडे असतील तर हे प्रदूषण काही प्रमाणात कमी होऊन हवा शुद्ध व्हायला मदत होते.

पण शहरात झाडांची संख्या सुद्धा कमी होत आहे. 

या प्रदुषणाचे खूप विपरीत परिणाम सुद्धा होत आहेत.

सतत दुषित हवेत राहिल्याने डोकेदुखी, घसा खराब होणे, सर्दी किंवा अन्य एलेर्जी, दमा, त्वचेवर रॅश, खोकला, डोळ्यांची इन्फेक्शन यासारखे आजार सर्रास होताना दिसतात. 

घराबाहेर असताना तर या प्रदुषणाला सामोरे जावेच लागते, त्याला काहीच पर्याय नसतो.

पण हीच प्रदूषण युक्त हवा आपल्या घराच्या खिडक्यांमधून घरात येत असेल तर ते त्यावर मात्र आपण काही उपाय केले पाहिजेत.

पण हे कसे करायचे? 

कारण घरात हवा येणार ती आजूबाजूच्या परिसरातून आणि या परिसरातच जर प्रदूषण असेल तर ते आपण कसे कमी करणार? 

महागडे एअर प्युरीफायर लावणार का?

पण जर तुम्हाला असे सांगितले की तुमच्या घरी येणारी हवा तुम्ही शुद्ध करू शकता तर तुम्हाला कसे वाटेल? 

नाही, नाही.. यासाठी कोणते मशीन घ्यायचा सल्ला आम्ही तुम्हाला देणार नाहीयोत!

तुमच्या घरात काही झाडे लाऊन तुम्ही हे साध्य करू शकता.. इतके सोपे आहे. 

ही इंडोअर प्लांट्स, म्हणजेच अशी झाडे जी कमी सूर्यप्रकाशात सुद्धा वाढतात, घरात लावल्याने घरातील हवा शुद्ध होण्यासाठी मदत होते.

त्यामुळे जर तुम्हाला प्रदुषणामुळे त्रास होत असेल, घरात स्वच्छ आणि शुद्ध हवा खेळून हवी असेल तर तुम्ही घरात हे इंडोअर प्लांट्स नक्की लाऊ शकता. 

ही झाडे कोणती, त्याने काय होते, प्रदूषण कसे कमी होते आणि या झाडांची काळजी कशी घ्यायची हे थोडक्यात या लेखात सांगितले आहे. 

१. कोरफड 

कोरफडीचे आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी भरपूर फायदे आहेत.

याच बहुगुणी झाडाचा उपयोग घरातील हवा शुद्ध होण्यासाठी केला जाऊ शकतो.

कोरफड हे हवेमधील बेन्झीन आणि फॉरमलडीहाईड कमी करून हवा शुद्ध करण्यास फायदेशीर असते.

कोरफडीच्या झाडाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. या झाडाला जास्त पाण्याची आवशकता नसते फक्त दिवसातून थोडा वेळ थेट सूर्यप्रकाश मात्र मिळाला पाहिजे.

त्याप्रमाणे एखाद्या खिडकीसमोर या झाडाची कुंडी  ठेवता येते.

कोरफडीला पंधरा दिवसातून एकदा पाणी दिले तरी चालते. 

२. पीस लिली (Peace lili) 

हे झाड घरात लावल्याने घरात सुख, समधान नांदते असे म्हणतात त्यामागे या झाडाचे हवा शुद्ध करण्याचे गुणधर्मच असतील.

हे झाड हवेतील कार्बन मोनोक्साईड हा गाड्यांच्या धुरामधून येणाऱ्या वायुला कमी करतो.

Peace lili

कार्बन मोनोक्साईडमुळे शहरांमध्ये खूप प्रमाणात प्रदूषण होते.

घरातील हवा शुध्द करण्याबरोबरच हे पीस लिली अजून एक महत्वाचे काम करत असते, हे झाड घरात लावल्याने पावसाळ्यात घरातील भिंतीवर, फरशीवर बुरशी येत नाही. 

या झाडाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याला वाढायला थेट सूर्यप्रकाश लागत नाही.

घरातील प्रकाशावर सुद्धा हे झाड छान वाढते.

पाणी सुद्धा चार दिवसातु एकदा घालावे लागते.

अशा या उपयुक्त झाडाची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.

या झाडाला येणारी पांढरी फुले घराची शोभा सुद्धा वाढवतात. 

३. शेवंती 

शेवंतीची फुले सुंदर असतातच पण तिचा उपयोग फक्त फुलांसाठीच किंवा शोभेसाठीच नाही तर घरातील हवा शुद्ध करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.

घरात असणाऱ्या बऱ्याच सामानावर, जसे की प्लास्टिकवर बेन्झीन आणि अमोनिया सारखे केमिकल्स असतात.

इतकेच काय घरात आपण नियमितपणे वापरत असलेल्या डिटरजंटमध्ये सुद्धा हे केमिकल्स असतात. 

यामुळे घरातील हवा दुषित होत असते. शेवंती या केमिकल्सला हवेमधून कमी करण्यात उपयुक्त असते.

या सुंदर झाडांच्या रंगीबेरंगी फुलांनी घराची शोभा सुद्धा वाढते.

या झाडाला मात्र वाढीसाठी सूर्यप्रकाश लागतो, पण तो थेट नसला तरी चालतो म्हणूनच घरात, आतमध्ये हे झाड लावता येते.

एखाद्या खिडकीजवळ, जिथे दिवसभरातून काही वेळ तरी भरपूर ऊन येते, शेवंतीची कुंडी ठेवावी व गरज लागेल तसे पाणी द्यावे. 

४. स्नेक प्लांट 

इनडोअर प्लांट्स पैकी हवेतील कार्बन डायओक्साईड शोषून घेऊन हवा शुद्ध करणारे हे अतिशय महत्वाचे झाड आहे.

या झाडाची पाने रात्रीच्या वेळी सुद्धा हवेत भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतात.

Snake Plant

यामुळे श्वसनाचे त्रास होत नाहीत. या झाडाची काळजी घेणे सुद्धा विशेष जिकरीचे काम नाही.

या झाडाला खूप कमी प्रमाणात पाणी द्यावे लागते, जास्त पाण्याने झाडाची मुळे कुजण्याची शक्यता असते. 

५. स्पायडर प्लांट 

या झाडामुळे हवेतील झायलीन शोषले जाते.

Spider plant

झायलीन हे आपल्यासाठी फारच धोकादायक असते. प्रिंटींगसाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो.

या झाडाची विशेष काळजी घेण्याची गरज नसते. झाडांबद्दल फारशी माहिती आणि अनुभव नसेल तरी या झाडाची काळजी अगदी सहज घेता येते. 

६. फिशटेल फर्न 

या झाडाचे पान फिशटेल सारखे असते म्हणून याचे नाव.

हे झाड हवेतील प्रदूषण कमी करून हवा शुद्ध करते.

Fishtell firn

आरोग्याच्या दृष्टीने घरात हे झाड लावणे चांगले असते. हे झाड फार लवकर वाढते.

एखाद्या खिडकीपाशी हे झाड लावावे. हवा शुद्ध करण्याबरोबरच दिसायला सुद्धा हे छान दिसते. 

मित्रमैत्रिणींनो, हवेतील वाढलेले प्रदूषण कमी करणे हे काही आपल्या हातात नाही त्यामुळे त्याबद्दल तक्रार करून काहीच निष्पन्न होणार नाही..

पण या प्रदुषणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ न देणे हे मात्र आपल्या हातात आहे.

या प्रदूषणाचा शिरकाव आपल्या घरात होऊ नये यासाठी योग्य ती काळजी आपण घेऊ शकतो. या आपल्या झाडांच्या मदतीने आपण ते सहज करू शकतो. 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.